Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी नवी दिल्लीत प्रगती मैदानात भारत मंडपम येथे अखिल भारतीय शिक्षण समागम कार्यक्रमात केलेले भाषण

पंतप्रधानांनी नवी दिल्लीत प्रगती मैदानात भारत मंडपम येथे अखिल भारतीय शिक्षण समागम कार्यक्रमात केलेले भाषण


 

मंत्रिमंडळातील माझे सहकारी धर्मेंद्र प्रधान जी, अन्नपूर्णा देवी जी, राजकुमार रंजन सिंह जी, सुभाष सरकार जी आणि देशातील शिक्षक सन्माननीय मान्यवर आणि देशभरातून जोडले गेलेल्या माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो,

शिक्षण ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये देशाला सफल करण्याची, देशाचे भाग्य बदलण्याची, ज्यामध्ये सर्वाधिक ताकद आहे ते म्हणजे शिक्षणच. एकविसाव्या शतकातील भारत, जी उद्दिष्टे घेऊन पुढे जात आहे त्यात आपल्या शिक्षण व्यवस्थेचं महत्त्व खूप आहे. आपण सर्व या व्यवस्थेचे प्रतिनिधी आहात, ध्वजवाहक आहात. म्हणूनच अखिल भारतीय शिक्षण समागमचा भाग व्हायला मिळाले हा माझ्यासाठीसुद्धा महत्त्वाचा क्षण आहे.

मी असे मानतो की, विद्येसाठी विचार विनिमय आवश्यक असतो, शिक्षणासाठी संवाद जरुरीचा असतो. मला या गोष्टीचा आनंद आहे की अखिल भारतीय शिक्षा समागमच्या माध्यमातून आपण विचारविनिमय आणि विचार करण्याची आपली परंपरा पुढे नेत आहोत. या आधीच्या अशा कार्यक्रमाचे आयोजन काशीच्या नव्याने बांधलेल्या रुद्राक्ष सभागृहात झाले होते. यावेळी हा संगम दिल्लीच्या या नवनिर्मित भारत मंडपम् मध्ये होत आहे आणि भारत मंडपमच्या विधिवत लोकार्पणानंतरचा हा पहिलाच कार्यक्रम असल्याचा आनंद आहेच आणि हा पहिलाच कार्यक्रम शिक्षणाशी संबंधित कार्यक्रम असल्यामुळे आनंदात भर पडली आहे.

 

मित्रहो,

काशीचे रुद्राक्ष ते या आधुनिक भारत मंडपम पर्यंत अखिल भारतीय शिक्षा समागमच्या यात्रेमध्ये एक संदेश दडलेला आहे. हा संदेश आहे प्राचीनता आणि आधुनिकता यांच्या संगमाचा. म्हणजे एका बाजूला आपली शिक्षण व्यवस्था भारताच्या प्राचीन परंपरांना आपलेसे करत आहे‌. तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विज्ञान आणि उच्च तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्येसुद्धा आम्ही तेवढ्याच वेगाने पुढे जात आहोत. या आयोजनासाठी तसंच शिक्षण व्यवस्थेत आपण देत असलेल्या योगदानासाठी आपणा सर्व साथीदारांना शुभेच्छा देतो, साधुवाद देतो. योगायोगाने आज आमच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. देशभरातील  बुद्धीजीवींनी, शिक्षणक्षेत्रातील व्यक्तींनी आणि शिक्षकांनी याला एक मिशन स्वरूप मानले आणि पुढे नेले. मी आज या ठिकाणी त्या सर्वांना धन्यवाद देतो, आभार मानतो.

इथे येण्यापूर्वी आत्ताच मी आधी शेजारच्या पॅव्हेलियनमध्ये सुरू असलेलं प्रदर्शन बघत होतो. या प्रदर्शनात आमच्याकडे असलेले कौशल्य आणि शैक्षणिक क्षेत्राची ताकद, त्यातून मिळणारे फायदे दाखवले आहेत. नवनवीन नाविन्यपूर्ण पद्धती दाखवल्या गेल्या आहेत. इथे बाल वाटिकेमध्ये मला मुलांना भेटण्याची आणि त्यांच्याबरोबर बोलण्याची संधी सुद्धा मिळाली. मुले खेळ खेळताना कशाप्रकारे कितीतरी गोष्टी शिकून घेतात, शिक्षण आणि शाळेत जाण्याच्या बाबी कशा प्रकारे बदलत आहेत हे पाहणे माझ्यासाठी खरोखर उत्साहदायक होते. आणि मी आपणा सर्वांनाही आवर्जून सांगेन की कार्यक्रम संपल्यानंतर जेव्हा संधी मिळेल तेव्हा जरूर तिथे जाऊन त्या सर्व प्रक्रिया बघा.

 

मित्रहो,

जेव्हा युग परिवर्तक बदल होत असतात तेव्हा त्यासाठी वेळ लागतो. तीन वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही राष्ट्रीय शिक्षण धोरणाची घोषणा केली तेव्हा एक फार मोठे कार्यक्षेत्र समोर उभे होते, परंतु आपण सर्वांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी जे कर्तव्यभान दाखवले, योगदान दिले, खुल्या मनाने नवीन विचारांचा नवीन प्रयोगांचा स्वीकार केला, हे नक्कीच भारावून टाकणारे आहे आणि नवीन विश्वास जागवणारे आहे.

आपण सर्वांनी हे मिशन असल्यासारखं घेतलंत. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये पारंपारिक ज्ञान पद्धतीपासून भविष्यकालीन तंत्रज्ञानापर्यंत सगळ्याला एका संतुलित पद्धतीने महत्त्व दिले गेले आहे. प्राथमिक शिक्षणक्षेत्रात नवीन पाठ्यक्रम तयार करण्यासाठी, स्थानिक भाषांमध्ये पुस्तके आणण्यासाठी, उच्च शिक्षणासाठी देशात संशोधनात्मक वातावरण मजबूत करण्यासाठी देशाच्या शिक्षण-विश्वातील महत्वाच्या मान्यवरांनी परिश्रम घेतले.

देशाच्या सर्वसामान्य नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना नव्या शिक्षण व्यवस्थेची पूर्णपणे कल्पना आलेली आहे. शिक्षण व्यवस्थेच्या दहा अधिक दोन या पद्धतीच्या जागी आता पाच अधिक तीन –  अधिक तीन अधिक चार  ही पद्धत अमलात येत आहे. आता शिकण्याची सुरुवात वयाच्या तिसऱ्या वर्षापासून होऊ लागेल.  संपूर्ण देशात यामुळे एकसमानता येईल.

संसदेत नॅशनल रिसर्च फाउंडेशन कायदा आणण्यासाठी मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंतर्गत राष्ट्रीय अभ्यासक्रम आरखडा सुद्धा लवकरच लागू होत आहे. मूलभूत स्तर म्हणजे तीन ते आठ वर्षांच्या मुलांसाठी धोरणाचा आराखडा तयार झाला आहे. साहजिकच आता संपूर्ण देशात सीबीएससी सारखा एकाच तऱ्हेचा पाठ्यक्रम असेल, यासाठी एनसीईआरटी नवीन पाठ्यपुस्तके तयार करत आहे. तिसरीपासून बारावीपर्यंतच्या इयत्तांसाठी जवळपास 130 विषयांची नवीन पुस्तके येत आहेत आणि मला याचा आनंद आहे की, आता स्थानिक भाषांमध्येसुद्धा शिक्षण दिले जाणार आहे, त्यासाठीच ही पुस्तके 22 भारतीय भाषांमध्ये असतील.

तरुणांना त्यांच्या प्रतिभेऐवजी त्यांच्या भाषेच्या आधारे न्याय देणे हा त्यांच्यावर सर्वात मोठा अन्याय आहे. मातृभाषेतील शिक्षणामुळे खरा न्याय भारतातील युवा कलागुणांना मिळणार आहे आणि हे देखील सामाजिक न्यायासाठी एक महत्वाचे पाऊल आहे. जगात शेकडो वेगवेगळ्या भाषा आहेत. प्रत्येक भाषेचे स्वतःचे महत्त्व आहे. जगातील बहुतेक विकसित देशांनी त्यांच्या भाषेमुळे यश संपादन केले आहे. जर आपण फक्त युरोपकडे बघितले तर तेथील बहुतेक देश फक्त त्यांची मातृभाषा वापरतात. पण इथे एवढ्या समृद्ध भाषा असूनही आपण आपल्या भाषा मागासलेल्या म्हणून दाखवतो. यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकते? एखाद्याचे मन कितीही कल्पक असले तरी, त्याला इंग्रजी येत नसेल, तर त्याची प्रतिभा सहजासहजी स्वीकारली जात नाही. याचा सर्वात मोठा फटका आपल्या ग्रामीण भागातील होतकरू मुलांना बसला आहे. आज स्वातंत्र्याच्या सुवर्णकाळात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून देश हा न्यूनगंड मागे टाकू लागला आहे. आणि मी संयुक्त राष्ट्रांमध्ये देखील भारताचीच भाषा बोलतो. ऐकणाऱ्याला टाळ्या वाजवायला वेळ लागला तर लागेल.

 

मित्रांनो,

आता सामाजिक शास्त्रापासून ते अभियांत्रिकीपर्यंतचे शिक्षणही भारतीय भाषांमध्ये होणार आहे. तरुणांना भाषेविषयक आत्मविश्वास असेल तर त्यांची कौशल्ये आणि कलागुणही समोर येतील आणि त्याचा देशाला आणखी एक फायदा होईल. तो म्हणजे भाषेचे राजकारण करून द्वेषाचे दुकान चालवणाऱ्यांचाही आपोआप बंदोबस्त होईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे देशातील प्रत्येक भाषेचा आदर होईल आणि प्रोत्साहन पण मिळेल.

 

मित्रांनो,

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करतांना आगामी 25 वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे. या 25 वर्षात आपल्याला उर्जेने परिपूर्ण अशी तरुण पिढी घडवायची आहे. गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त झालेली पिढी. नवनवीन शोधासाठी आसुसलेली अशी पिढी. विज्ञानापासून क्रीडापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारताचे नाव रोशन करणारी अशी पिढी. हीच पिढी भारताचे नाव पुढे घेऊन जाईल. 21व्या शतकातील भारताच्या गरजा समजून घेणारी पिढी आपली क्षमता वाढवत आहे. कर्तव्याची जाणीव असलेली अशी पिढी आपल्या जबाबदाऱ्या जाणते आणि समजून पण घेते. यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मोठा वाटा आहे.

 

मित्रांनो,

दर्जेदार शिक्षणाबद्दल जगात अनेक मापदंड आहेत, परंतु, जेव्हा आपण भारताबद्दल बोलतो, तेव्हा आपला एक मोठा प्रयत्न असतो, तो म्हणजे – समानता ! भारतातील प्रत्येक तरुणाला समान शिक्षण आणि शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे प्राधान्य आहे. जेव्हा आपण समान शिक्षण आणि समान संधी याविषयी बोलतो तेव्हा ही जबाबदारी केवळ शाळा उघडून पूर्ण होत नाही. समान शिक्षण म्हणजे शिक्षणासोबतच संसाधनांपर्यंत समानता पोहोचली पाहिजे. समान शिक्षण म्हणजे – प्रत्येक मुलाच्या आकलनानुसार आणि आवडीनुसार त्याला पर्याय मिळतात. समान शिक्षण म्हणजे स्थळ, वर्ग, प्रदेश या भेदांमुळे मुले शिक्षणापासून वंचित न राहणे.

म्हणूनच, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा दृष्टीकोन हा आहे की तरुणांना प्रत्येक वर्गात, गावात-शहरात, श्रीमंत-गरीबांमध्ये समान संधी मिळावी, असा देशाचा प्रयत्न आहे. तुम्ही पहा, पूर्वी दुर्गम भागात चांगल्या शाळा नसल्यामुळे अनेक मुले अभ्यास करू शकली नाहीत. पण आज देशभरातील हजारो शाळा पीएम-श्री शाळा म्हणून अद्ययावत  केल्या जात आहेत. ‘5G’ च्या या युगात या आधुनिक हायटेक शाळा भारतातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाचे माध्यम बनतील.

आज आदिवासी भागातही एकलव्य आदिवासी शाळा सुरू होत आहेत. आज प्रत्येक गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. दूरदूरची मुले दीक्षा, स्वयंम, स्वयंप्रभा या माध्यमांतून शिक्षण घेत आहेत. उत्तमोत्तम पुस्तके असोत, सर्जनशील शिक्षणाचे तंत्र असो, आज डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक गावात नवीन कल्पना, नवीन व्यवस्था, नवीन संधी उपलब्ध होत आहेत. म्हणजेच, भारतातील अभ्यासासाठी आवश्यक संसाधनांमधील अंतर देखील वेगाने दूर होत आहे.

 

मित्रांनो,

तुम्हाला माहिती आहेच की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे प्रमुख प्राधान्य हे आहे की शिक्षण हे केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नसावे, तर व्यावहारिक शिक्षण हा त्याचा एक भाग असावा. त्यासाठी व्यावसायिक शिक्षणाची सामान्य शिक्षणाशी सांगड घालण्याचे कामही केले जात आहे. याचा सर्वात मोठा फायदा दुर्बल, मागास आणि ग्रामीण वातावरणातील मुलांना होणार आहे.

पुस्तकी अभ्यासाच्या ओझ्यामुळे ही मुले जास्त मागे पडली. मात्र नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत आता नव्या पद्धतीने अभ्यास होणार आहेत. हा अभ्यास संवादात्मक तसेच मनोरंजक असेल. पूर्वी प्रयोगशाळा आणि प्रात्यक्षिक सुविधा फार कमी शाळांमध्ये उपलब्ध होत्या. पण, आता अटल टिंकरिंग लॅबमध्ये 75 लाखांहून अधिक मुले विज्ञान आणि नवनिर्मिती शिकत आहेत. विज्ञान आता सर्वांसाठी समान प्रमाणात उपलब्ध होत आहे. हे तरुण शास्त्रज्ञ भविष्यात देशातील मोठ्या प्रकल्पांचे नेतृत्व करतील आणि भारताला जगाचे संशोधन केंद्र बनवतील.

 

मित्रहो,

कोणत्याही सुधारणेसाठी धाडस आवश्यक असते आणि जिथे धाडस असते तिथे नवीन संधी जन्म घेतात. म्हणूनच आज जग भारताकडे नव्या संधींची भूमी म्हणून पाहत आहे. आज जगाला माहित आहे की जेव्हा सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचा विषय निघेल तेव्हा भविष्य भारताचे आहे. जगाला माहीत आहे की जेव्हा अवकाश तंत्रज्ञानाचा विषय निघेल तेव्हा भारताच्या क्षमतेशी स्पर्धा करणे सोपे नाही. जगाला माहीत आहे की जेव्हा संरक्षण तंत्रज्ञानाबद्दल बोलले जाईल तेव्हा भारताचे कमी खर्चिकआणि उत्तम दर्जाचेमॉडेल लोकप्रिय ठरणार आहे. जगाचा हा विश्वास आपण कमकुवत होऊ द्यायचा नाही.

गेल्या काही वर्षांत भारताची औद्योगिक प्रतिष्ठा ज्या वेगाने वाढली आहे, ज्या वेगाने आपल्या स्टार्टअप्सचा दबदबा जगामध्ये वाढला आहे, त्याने जगभरात आपल्या शैक्षणिक संस्थांचा सन्मान देखील वाढवला आहे. अनेक जागतिक क्रमवारीत भारतीय संस्थांची संख्या वाढत आहे, क्रमवारीतील आपले स्थानही उंचावत आहे. आज आपल्या आयआयटीची दोन संकुले झांझिबार आणि अबुधाबी येथे सुरू होत आहेत. इतर अनेक देशांकडूनही आपल्याला त्यांच्या देशात आयआयटी संकुले  उघडण्याचा आग्रह होत आहे. त्यामुळे जगात मागणी वाढत आहे. आपल्या शैक्षणिक परिसंस्थेत होत असलेल्या या सकारात्मक बदलांमुळे, अनेक जागतिक विद्यापीठे देखील भारतात त्यांचे कॅम्पस उघडण्यासाठी इच्छुक आहेत. ऑस्ट्रेलियाची दोन विद्यापीठे गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये त्यांचे कॅम्पस उघडणार आहेत. या यशाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला आपल्या शैक्षणिक संस्था नियमितपणे बळकट करायच्या आहेत आणि त्यांना भविष्याच्या दृष्टीने तयार करण्यासाठी निरंतर मेहनत करायची आहे. आपल्याला आपल्या संस्था, आपली विद्यापीठे, आपल्या शाळा आणि महाविद्यालयांना या क्रांतीची केंद्रे बनवायचे आहे.

 

मित्रहो,

सक्षम तरुणांची जडणघडण हीच सशक्त राष्ट्र निर्मितीची  सर्वात मोठी हमी असते आणि तरुणांच्या जडणघडणीत पालक आणि शिक्षकांची सर्वप्रथम भूमिका असते . म्हणूनच मी शिक्षकांना आणि पालकांना, सर्वांना, सांगू इच्छितो की, आपल्याला मुलांना मुक्तपणे भरारी घेण्याची संधी द्यावीच लागेल. आपल्याला त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा आहे, जेणेकरून ते नेहमी काहीतरी नवीन शिकण्याचे आणि करण्याचे धाडस करू शकतील. आपल्याला भविष्याकडे लक्ष ठेवावे लागेल, भविष्यवादी मानसिकतेने विचार करावा लागेल. पुस्तकांच्या दडपणातून आपल्याला मुलांना मुक्त करावे लागेल.

आज आपण पाहत आहोत की कृत्रिम बुद्धिमत्ता  (कृत्रिम तंत्रज्ञान) सारखे तंत्रज्ञान जे कालपर्यंत विज्ञानकथेत असायचे ते आता आपल्या जीवनाचा भाग बनत आहे. रोबोटिक्स आणि ड्रोन तंत्रज्ञान आपल्या दारापर्यंत पोहचले आहे. त्यामुळे जुन्या विचारसरणीतून बाहेर पडून नव्या कक्षांबाबत विचार करावा लागेल.

त्यासाठी आपण आपल्या मुलांना तयार केले पाहिजे. माझी इच्छा आहे की आपल्या शाळांमध्ये भविष्यातील तंत्रज्ञानाशी संबंधित संवादात्मक सत्रांचे आयोजन व्हायला हवे. आपत्ती व्यवस्थापन असो, हवामान बदल असो, किंवा स्वच्छ ऊर्जा असो, आपण आपल्या नवीन पिढीला याची जाणीव करून दिली पाहिजे. यासाठी आपली शिक्षण व्यवस्था अशा पद्धतीने तयार करावी लागेल जेणेकरून तरुणांमध्ये या दिशेने जागरूकता देखील वाढेल आणि त्यांचे कुतूहल देखील वाढेल.

 

मित्रहो,

भारत जसजसा मजबूत होत आहे, तसतशी भारताची ओळख आणि परंपरां याबद्दल जगामध्ये औत्सुक्य देखील वाढत आहे. या बदलाकडे आपल्याला जगाच्या अपेक्षा म्हणून पहायचे आहे. योग, आयुर्वेद, कला, संगीत, साहित्य, संस्कृती या क्षेत्रांत भविष्याच्या अनेक संधी आहेत. आपल्याला आपल्या नव्या पिढीला त्यांची ओळख करून द्यावी लागेल. मला विश्वास आहे की, अखिल भारतीय शिक्षण परिषदेसाठी हे सर्व विषय प्राधान्यक्रमाचे असतील.

भारताचे भवितव्य घडवण्याचे तुम्हा सर्वांचे हे प्रयत्न नव्या भारताचा पाया रचतील. आणि माझा ठाम विश्वास आहे की 2047 मध्ये आपल्या सर्वांचे एक स्वप्न आहे, आपल्या सर्वांचा संकल्प आहे की जेव्हा देश स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल तेव्हा 2047 मध्ये आपला देश विकसित भारत बनला असेल आणि हा कालखंड त्या युवकांच्या हातात आहे जे आज तुमच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत. जे आज तुमच्याकडे तयार होत आहेत, ते उद्या देशाला तयार करणार आहेत. आणि म्हणूनच तुम्हा सर्वांना अनेक शुभेच्छा देत, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक युवकाच्या मनात संकल्प भावना जागृत व्हावी, तो संकल्प प्रत्यक्षात साकारण्यासाठी परिश्रमांची पराकाष्ठा करू, सिद्धी प्राप्त करू, या ध्येयाने  पुढे मार्गक्रमण करा.

माझ्या  तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद !

***

S.Tupe/V.Sahajrao/G.Deoda/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai