नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 सप्टेंबर 2021 रोजी संध्याकाळी, नव्या संसद भवन इमारतीच्या बांधकाम स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन परीक्षण केले आणि सुरु असलेल्या इमारत उभारणी कामाचा आढावा घेतला.
नियोजित स्थळी सुरु असलेल्या बांधकामात प्रगती होत आहे याची पंतप्रधानांनी खात्री करून घेतली आणि या प्रकल्पाचे काम वेळेवर पूर्ण करण्याचा आग्रह व्यक्त केला. इमारतीचे बांधकाम करणाऱ्या कामगारांशी पंतप्रधानांनी संवाद साधला आणि त्यांची विचारपूस केली. हे कामगार एका पवित्र आणि ऐतिहासिक कामात सहभागी झाले आहेत असे सांगून त्यांनी या कामाचे महत्त्व कामगारांना विषद केले.
नव्या संसद भवनाच्या बांधकामाच्या जागेवर काम करणाऱ्या सर्व कामगारांचे कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रांसह लसीकरण पूर्ण झाले आहे याची खात्री करून घेण्याच्या सूचना पंतप्रधानांनी संबंधितांना दिल्या. तसेच दर महिन्याला तेथील सर्व कामगारांच्या आरोग्याची तपासणी केली गेली पाहिजे असे निर्देश देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, या उभारणी कामात सहभागी झालेल्या सर्व कामगारांचे नाव, मूळ ठिकाण, त्यांचा फोटो यांसह सर्व व्यक्तिगत तपशील असलेले डिजिटल संग्रहालय याच इमारतीच्या ठिकाणी उभारले जावे आणि त्यायोगे या सर्व कामगारांच्या इमारत उभारणीतील योगदानाचा सन्मान केला जावा अशा सूचना देखील त्यांनी केल्या. तसेच, या सर्व कामगारांना नव्या संसद भवन उभारणीतील त्यांची भूमिका आणि या प्रयासातील सहभाग दर्शविणारे प्रमाणपत्र देण्यात यावे असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधानांनी अतिशय कमी सुरक्षा व्यवस्थेत आकस्मिक परीक्षण केले. पंतप्रधानांची नवीन संसद इमारत कार्यस्थळावर एक तास उपस्थिती होती.
* * *
S.Thakur/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com