Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी दिल्लीतील भारत मंडपम् येथे अखिल भारतीय शिक्षा समागमचे केले उद्घाटन

पंतप्रधानांनी दिल्लीतील भारत मंडपम् येथे अखिल भारतीय शिक्षा समागमचे केले उद्घाटन


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत भारत मंडपम् येथे अखिल भारतीय शिक्षा समागम् चे उद्घाटन केले. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या औचित्याने  या कार्यक्रमाचे आयोजन झाले. यावेळी त्यांनी पीएम श्री या योजनेचा पहिला हप्ता देखील जारी केला. 6207 शाळांना एकूण 630 कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळाला. यावेळी त्यांना 12 भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या शिक्षण आणि कौशल्यविषयक पुस्तकांचे देखील प्रकाशन केले. तसेच यावेळी आयोजित करण्या आलेल्या प्रदर्शनाच्या ठिकाणी फेरफटका मारून पाहणी केली.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी देशाचे भवितव्य बदलून टाकणाऱ्या घटकांमध्ये शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. जी उद्दिष्टे घेऊन 21 व्या शतकातील भारत वाटचाल करत आहे ती साध्य करण्यामध्ये आपल्या शिक्षण प्रणालीची अतिशय मोठी भूमिका आहे, ते म्हणाले. अखिल भारतीय शिक्षा समागमच्या महत्त्वावर भर देत पंतप्रधान म्हणाले की शिक्षणासाठी चर्चा आणि संवाद महत्त्वाचे आहेत.यापूर्वी झालेल्या अखिल भारतीय शिक्षा समागमाचे आयोजन वाराणसीमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या रुद्राक्ष परिषद केंद्रात करण्यात आले होते आणि या वर्षी अखिल भारतीय शिक्षा समागमचे आयोजन पूर्णपणे नव्या भारत मंडपममध्ये होत असल्याच्या योगायोगाकडे त्यांनी लक्ष वेधले. औपचारिक उद्घाटनानंतर मंडपममध्ये होत असलेला हा पहिला कार्यक्रम आहे. काशीच्या रूद्राक्षापासून आधुनिक भारत मंडपमपर्यंत अखिल भारतीय शिक्षा समागमच्या प्रवासात प्राचीन आणि आधुनिकतेच्या एकीकरणाचा संदेश लपला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.एकीकडे भारताची शिक्षण प्रणाली या भूमीच्या प्राचीन परंपरांचे जतन करत आहे तर दुसरीकडे आपला देश विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे, असे त्यांनी सांगितले. आज राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा तिसरा वर्धापनदिन आहे असे नमूद करत पंतप्रधानांनी एखाद्या मोहिमेप्रमाणे यासाठी काम केल्याबद्दल आणि खूप मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या प्रगतीमध्ये योगदान दिल्याबद्दल विचारवंत, शिक्षणतज्ञ आणि शिक्षकांचे आभार मानले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाबद्दल बोलताना पंतप्रधानांनी कौशल्य आणि शिक्षण आणि नवोन्मेषी तंत्राचे प्रदर्शन अधोरेखित केले. भारताच्या शिक्षण क्षेत्राचा बदलणारा चेहरामोहरा आणि देशातील बदलणाऱ्या शाळा ज्यामध्ये लहान बालकांना   

हसत खेळत  शिक्षण दिले जात आहे याकडे लक्ष वेधले आणि त्यांच्या विषयी विश्वास व्यक्त केला. या प्रदर्शनाला भेट देण्याचे देखील त्यांनी उपस्थित पाहुण्यांना आवाहन केले. युगपरिवर्तनकारी बदल घडून येण्यास थोडा वेळ लागतो असे पंतप्रधान म्हणाले. एनईपीच्या उद्घाटनाच्या वेळी त्याच्या व्याप्तीसाठी लागणाऱ्या खूप मोठ्या क्षेत्राची आठवण पंतप्रधानांनी करून दिली आणि नव्या संकल्पनांचा स्वीकार करण्यासाठी हितधारकांची समर्पित वृत्ती आणि इच्छाशक्तीचे पंतप्रधानांनी कौतुक केले. एनईपीमध्ये पारंपरिक ज्ञान आणि भविष्यवेधी तंत्रज्ञान यांना समान महत्त्व दिले आहे, असे त्यांनी सांगितले. प्राथमिक शिक्षणातील नवीन अभ्यासक्रम, प्रादेशिक भाषांमधील पुस्तके, उच्च शिक्षणासाठी आणि देशातील संशोधन परिसंस्था बळकट करण्यासाठी शिक्षणविश्वातील हितधारकांनी केलेल्या कष्टांचा त्यांनी उल्लेख केला.  विद्यार्थ्यांना आता समजले आहे की 10+2 प्रणालीच्या जागी आता 5+3+3+4 प्रणाली कार्यरत आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षी शिक्षण सुरू होईल ज्यामुळे संपूर्ण देशात एकसमानता निर्माण होईल.  नॅशनल रिसर्च फाऊंडेशन विधेयक संसदेत मांडण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची माहितीही त्यांनी दिली.एनईपी अंतर्गत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा लवकरच येईल. 3-8 वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी हा आराखडा तयार आहे. संपूर्ण देशात एकसमान अभ्यासक्रम  असेल आणि यासाठी एनसीईआरटी नवीन पुस्तके तयार करत आहे. पंतप्रधानांनी माहिती दिली की  विविध 130 विषयांवरील 3 ते 12 इयत्तांसाठीची विविध 22 भाषामंधील पुस्तके येऊ घातली आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून प्रादेशिक भाषातून शिक्षण दिले जात आहे.  

विद्यार्थ्यांचे मूल्यमापन त्यांच्या क्षमतांच्या ऐवजी त्यांच्या भाषेच्या आधारे करणे हा सर्वात मोठा अऩ्याय आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. मातृभाषेतील शिक्षणामुळे भारतातील विद्यार्थ्यांना एका नव्या स्वरुपात न्याय मिळत आहे. सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेले ते एक महत्त्वाचे पाऊल देखील आहे, पंतप्रधान म्हणाले. जगामधील भाषिक विविधता आणि त्यांचे महत्त्व नमूद करून पंतप्रधानांनी जगामध्ये अनेक विकसित देश त्यांच्या स्थानिक भाषेचा वापर करत आहेत आणि त्यांना वेगळी ओळख मिळाली आहे, असे अधोरेखित केले. भारतामध्ये प्रस्थापित भाषांची समृद्धी  असूनही त्यांच्यावर मागासलेपणाचा शिक्का मारण्यात आला आणि जे लोक इंग्रजी बोलू शकत नाहीत त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि त्यांच्या गुणवत्तांना मान्यता देण्यात आली नाही, अशी पंतप्रधानांनी टीका केली. यामुळे ग्रामीण भागातील बालकांवर याचा सर्वाधिक परिणाम झाला, असे पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या आगमनाने आता ही धारणा दूर होऊ लागली आहे. अगदी संयुक्त राष्ट्रांमध्येही मी भारतीय भाषेत बोलतो, पंतप्रधानांनी सांगितले.

समाजशास्त्रापासून अभियांत्रिकीपर्यंतचे विषय आता भारतीय भाषांमध्ये शिकवले जातील, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ज्यावेळी विद्यार्थ्यांना एखाद्या भाषेत आत्मविश्वास असेल, त्यांची कौशल्ये आणि प्रतिभा कोणत्याही बंधनांविना विकसित होतील, पंतप्रधानांनी सांगितले. जे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी भाषेचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत असतात त्यांना आता त्यांची दुकाने बंद करावी लागतील, याकडे त्यांनी निर्देश केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशातील प्रत्येक भाषेला आवश्यक सन्मान आणि श्रेय देईल, ते म्हणाले.

अमृतकाळाच्या येत्या 25 वर्षात आपल्याला ऊर्जावान अशी नवी पिढी घडवायची आहे. गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त झालेली, नवनवीन शोधांसाठी उत्सुक आणि विज्ञानापासून ते क्रीडापर्यंतच्या सर्व क्षेत्रात नावलौकिक मिळवण्यासाठी सज्ज असलेली, 21व्या शतकाच्या गरजेनुसार स्वत:ला कौशल्याने परिपूर्ण करणारी, कर्तव्याच्या भावनेने भारलेली पिढी घडवायची आहे.  “एनईपी यामध्ये मोठी भूमिका बजावेल”, असे पंतप्रधान म्हणाले.

दर्जेदार शिक्षणाच्या विविध मापदंडांचा विचार करता समानतेसाठी भारताचे मोठे प्रयत्न असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारतातील प्रत्येक तरुणाला समान शिक्षण आणि शिक्षणाची समान संधी मिळावी हे एनईपीचे प्राधान्य आहेहे केवळ शाळा उघडण्यापुरते मर्यादित नाही. शिक्षणाबरोबरच संसाधनांपर्यंत समानतेचा विस्तार झाला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.  याचा अर्थ प्रत्येक बालकाला आवडीनुसार आणि क्षमतेनुसार पर्याय मिळायला हवेत असे ते म्हणाले. “स्थळ, वर्ग, प्रदेश यामुळे कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये ही शिक्षणातील समानता होय,” असे ते म्हणाले.  पीएम श्री योजनेंतर्गत हजारो शाळा अद्यायावत केल्या जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.  “5G च्या युगात, या आधुनिक शाळा आधुनिक शिक्षणाचे माध्यम असतील”, असे ते पुढे म्हणाले.  त्यांनी आदिवासी खेड्यांतील एकलव्य शाळा, खेड्यापाड्यातील इंटरनेट सुविधा आणि दीक्षा, स्वयंम आणि स्वयंप्रभा यांसारख्या माध्यमांतून शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचा उल्लेख केला. “आता, भारतात, शिक्षणासाठी आवश्यक संसाधनांची तफावत वेगाने भरून काढली जात आहे”, असेही ते म्हणाले.

सामान्य शिक्षणासोबत व्यावसायिक शिक्षणाची सांगड घालण्यासाठी आणि शिक्षण अधिक मनोरंजक तसेच परस्परसंवादी बनवण्याच्या मार्गांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. प्रयोगशाळा आणि प्रयोग सुविधा पूर्वी मोजक्या शाळांपुरतेच मर्यादित होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अटल टिंकरिंग प्रयोगशाळेत 75 लाखांहून अधिक विद्यार्थी विज्ञान आणि नवोन्मेषाचे धडे गिरवत आहेत यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. विज्ञान स्वतःला सोपे करुन सर्वांसाठी उलगडत आहे. हे तरुण शास्त्रज्ञच महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे नेतृत्व करून देशाचे भविष्य घडवतील आणि भारताला जगाचे संशोधन केंद्र बनवतील, असे ते म्हणाले.

कोणत्याही सुधारणेसाठी धैर्याची आवश्यकता असते आणि धैर्य असते तिथे नवीन शक्यतांचा जन्म होतो. जग भारताकडे नवीन शक्यतांची खाण म्हणून पाहत आहे असे मोदी म्हणाले. सॉफ्टवेअर तंत्रज्ञान आणि अंतराळ तंत्रज्ञानाची उदाहरणे देत भारताच्या क्षमतेशी स्पर्धा करणे सोपे नसल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. संरक्षण तंत्रज्ञानाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, भारताचे स्वस्तआणि उत्कृष्ट दर्जाचेप्रारुप नक्कीच यशस्वी होणार आहे.  भारताची औद्योगिक प्रतिष्ठा आणि स्टार्टअप परिसंस्थेत वाढ झाल्याने भारताच्या शिक्षण व्यवस्थेबद्दलचा आदर जगामध्ये लक्षणीयरीत्या वाढला आहे यावर त्यांनी भर दिला. सर्व जागतिक क्रमवारीत भारतीय संस्थांची संख्या वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.  झांझिबार आणि अबू धाबी येथे आयआयटींच्या दोन   शाखा सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. अन्य अनेक देश देखील त्यांच्या देशात आयआयटी शाखा सुरु करण्याचा आग्रह करत आहेत, असे ते म्हणाले. शैक्षणिक परिसंस्थेत होत असलेल्या सकारात्मक बदलांमुळे भारतात त्यांच्या शाखा सुरु करण्यास इच्छुक असलेल्या अनेक जागतिक विद्यापीठांचाही त्यांनी उल्लेख केला. ऑस्ट्रेलियातील दोन विद्यापीठे गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये त्यांच्या शाखा सुरु करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. शैक्षणिक संस्थांच्या सातत्यपूर्ण बळकटीकरणावर भर देत त्यांना भविष्यासाठी घडवण्याच्या दिशेने काम केले पाहिजे असे ते म्हणाले. भारतातील शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, शाळा आणि महाविद्यालये ही क्रांतीचे केंद्र बनवायला हवीत अशी गरज त्यांनी व्यक्त केली.

सक्षम तरुणांची निर्मिती ही एक सशक्त राष्ट्र निर्माण करण्याची सर्वात मोठी हमी आहे” आणि त्यात पालक आणि शिक्षकांची प्रमुख भूमिका आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. विद्यार्थ्यांना आत्मविश्वासपूर्ण कुतूहल आणि कल्पनाशक्तीच्या वापरासाठी तयार करण्याचे आवाहन त्यांनी शिक्षक आणि पालकांना केले.  आपल्याला भविष्यावर लक्ष ठेवावे लागेल आणि भविष्यवेधी मानसिकतेने विचार करावा लागेल. पुस्तकांच्या दडपणातून मुलांना मुक्त करावे लागेल, असे ते म्हणाले.

जगाची सक्षम भारताबाबतची उत्सुकता आपल्यावर जबाबदारी वाढवणारी असल्याचे पंतप्रधान म्हणाले. योग, आयुर्वेद, कला आणि साहित्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना अवगत करून देण्याची आठवण त्यांनी करून दिली.  भारताच्या 2047 च्या दिशेने सुरु असलेल्या विकसित भारताच्या’  प्रवासात सध्याच्या विद्यार्थी पिढीचे महत्त्व शिक्षकांना सांगून त्यांनी समारोप केला.

यावेळी केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधानही उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

अमृतकाळात देशाचे नेतृत्व करण्यासाठी तरुणांना घडवणे, तयार करणे या उद्देशाने पंतप्रधानांच्या ध्येयदृष्टीने प्रेरित एनईपी 2020 ची सुरुवात करण्यात आली. भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांना तयार करण्याबरोबरच, त्यांच्यात मुलभूत मानवी मूल्ये बिंबवणे  हे याचे उद्दीष्ट आहे. योजनेच्या तीन वर्षांच्या अंमलबजावणी कालावधीत शाळा, उच्च आणि कौशल्य शिक्षणात आमूलाग्र परिवर्तन घडून आले. हा कार्यक्रम 29 आणि 30 जुलै असे दोन दिवस होत आहे. शैक्षणिक संस्था, शिक्षणतज्ञ, धोरणकर्ते, उद्योग प्रतिनिधी, शिक्षक आणि शाळा, उच्च शिक्षण आणि कौशल्य संस्थांमधील विद्यार्थी तसेच इतरांना एनईपी 2020 ची अंमलबजावणी करण्यासाठी आणि ते पुढे नेण्याकरिता धोरणे आखण्यासाठी त्यांच्या यशोगाथा, अनुभव, सर्वोत्तम कार्यपद्धती सामायिक करण्यासाठी हा कार्यक्रम एक व्यासपीठ प्रदान करेल.

अखिल भारतीय शिक्षण समागम मध्ये एकूण 16 सत्रे असतील. दर्जेदार शिक्षण आणि प्रशासनापर्यंत पोहच, समान आणि सर्वंकष शिक्षण, सामाजिक-आर्थिक दृष्टीने मागास समुदायांचे प्रश्न, राष्ट्रीय संस्था मानांकन रुपरेषा, भारतीय ज्ञान प्रणाली, शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण यासह विविध संकल्पनांचा यात समावेश आहे.

पीएम श्री योजने अंतर्गत निधीचा पहिला हप्ता पंतप्रधानांनी यावेळी वितरित केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) 2020 च्या संकल्पने नुसार समानता असलेल्या, सर्वसमावेशक आणि बहुवैविध्य समाजाच्या निर्मितीसाठी, सक्रिय, उत्पादक आणि योगदान देणारे नागरिक बनवण्याकरिता या शाळा विद्यार्थ्यांना घडवतील. बारा भारतीय भाषांमध्ये अनुवादित शैक्षणिक आणि कौशल्य विषयक पाठ्यपुस्तकांचे प्रकाशनही पंतप्रधानांनी यावेळी केले.

***

N.Chitale/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai