Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी तेलंगणात निजामाबाद येथे 8000 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची केली पायाभरणी आणि लोकार्पण

पंतप्रधानांनी तेलंगणात निजामाबाद येथे 8000 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची केली पायाभरणी आणि लोकार्पण


नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणामध्ये निजामाबाद येथे ऊर्जा, रेल्वे आणि आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातील 8000 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये  तेलंगण सुपर थर्मल पॉवर प्रकल्पाचा 800 मेगावॅटचा पहिला टप्पामनोहराबाद आणि सिद्धीपेठ यांना जोडणाऱ्या नव्या रेल्वे मार्गांसह रेल्वे प्रकल्प आणि धर्माबाद मनोहरा बाद आणि महबूबनगर कुर्नुल या मार्गाच्या विद्युतीकरणाचा प्रकल्प अशा विविध प्रकल्पांचा समावेश होता. पंतप्रधानांनी पीएम आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा मिशन अंतर्गत तेलंगणामध्ये उभारण्यात येणाऱ्या 20 क्रिटिकल केअर ब्लॉकची कोनशिला देखील बसवली. पंतप्रधानांनी  सिद्धीपेट- सिकंदराबाद -सिद्धीपेट रेल्वे सेवेला झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी तेलंगणाच्या जनतेचे आजच्या प्रकल्पांबद्दल अभिनंदन केले. ते म्हणाले की कोणत्याही देशाचा किंवा राज्याचा विकास हा आपल्या वीज उत्पादनाच्या स्वयंपूर्णतेच्या क्षमतेवर अवलंबून असतो आणि त्यामुळे लोकांच्या जीवनमानात आणि व्यवसाय सुलभतेत एकाच वेळी सुधारणा होते.  सुरळीत वीजपुरवठ्यामुळे एखाद्या राज्यामधील उद्योगांना चालना मिळते असे पंतप्रधान म्हणाले. तेलंगणा मधील पेढापल्ली जिल्ह्यातील एनटीपीसीच्या सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्टच्या 800 मेगावॅटच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करताना त्यांनी ही बाब नमूद केली.दुसरे संयंत्र देखील लवकरच कार्यान्वित होईल आणि ते पूर्ण झाल्यावर वीज प्रकल्पाची स्थापित क्षमता 4,000 मेगावॅटपर्यंत वाढेल यावर त्यांनी भर दिला. तेलंगणा सुपर औष्णिक वीज प्रकल्प  हा देशातील सर्व एनटीपीसी वीज प्रकल्पांपैकी  सर्वात आधुनिक वीज प्रकल्प आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.या वीज प्रकल्पात उत्पादित होणार्‍या विजेचा मोठा हिस्सा तेलंगणातील लोकांना मिळेल असे पंतप्रधान म्हणाले कारण  ज्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली आहे ते पूर्ण करण्याकडे केंद्र सरकारचा कटाक्ष  आहे यावर त्यांनी भर दिला. 2016 मध्ये या प्रकल्पासाठी पायाभरणी करण्यात आली होती याची त्यांनी आठवण करून दिली आणि आज त्याचे उद्घाटन केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.”आमच्या सरकारची ही नवीन कार्यसंस्कृती आहे” असे ते म्हणाले.

तेलंगणाच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार काम करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. अलिकडेच हसन-चेर्लापल्ली पाइपलाइनचे लोकार्पण केल्याची आठवण त्यांनी करून दिली. ही पाइपलाइन किफायतशीर आणि पर्यावरण-स्नेही पद्धतीने एलपीजी परिवर्तन, वाहतूक आणि वितरणाचा आधार बनेल, असे ते म्हणाले.

धर्माबाद – मनोहराबाद आणि महबूबनगर – कुर्नूल दरम्यानच्या विद्युतीकरण प्रकल्पांबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की यामुळे राज्यातील कनेक्टिव्हिटी वाढेल आणि या दोन गाड्यांच्या सरासरी वेगात वाढ होईल.भारतीय रेल्वे सर्व रेल्वे मार्गांच्या 100 टक्के विद्युतीकरणाचे लक्ष्य घेऊन मार्गक्रमण करत आहे असे ते म्हणाले. मनोहराबाद आणि सिद्धीपेट दरम्यान नवीन रेल्वे लिंकमुळे व्यवसाय आणि उद्योगाला चालना मिळेल असे ते म्हणाले .2016 मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी केल्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली.

यापूर्वी काही निवडक लोकांपुरती आरोग्यसेवा कशी मर्यादित होती याची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्याची  माहिती त्यांनी दिली. बीबीनगरमधील एका महाविद्यालयासह  वैद्यकीय महाविद्यालये आणि एम्सच्या वाढत्या संख्येचा त्यांनी उल्लेख केला.याचबरोबर डॉक्टरांची संख्या वाढविण्याबाबत काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान आयुष्मान भारत पायाभूत सुविधा निर्मिती अभियानाविषयी त्यांनी माहिती दिली, ज्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात दर्जेदार पायाभूत सुविधा उभारल्या जातील याकडे लक्ष दिले जात आहे. आज या अभियानाअंतर्गत, तेलंगणामध्ये 20 क्रिटिकल केअर ब्लॉक्सची  पायाभरणी करण्यात आली आहे असे पंतप्रधान म्हणाले.या कक्षांमध्ये समर्पित विलगीकरण  वॉर्ड, ऑक्सिजन पुरवठा आणि संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी संपूर्ण व्यवस्था असेल अशा प्रकारे त्यांची उभारणी केली  जाईल अशी माहिती त्यांनी दिली.”तेलंगणामध्ये आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी 5000 हून अधिक आयुष्मान भारत आरोग्य आणि निरामयता केंद्रे आधीपासूनच कार्यरत आहेत”, असे ते म्हणाले.तेलंगणामध्ये कोविड महामारीच्या काळात 50 मोठे PSA ऑक्सिजन संयत्र स्थापन करण्यात आले होते, असे पंतप्रधानांनी सांगितले. या संयंत्रांनी मौल्यवान जीव वाचविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, असेही ते म्हणाले. आज लोकार्पण आणि पायाभरणी झालेल्या वीज, रेल्वे तसेच आरोग्य या महत्त्वपूर्ण क्षेत्रातील प्रकल्पांसाठी जनतेचे अभिनंदन करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

यावेळी तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदर्यराजन आणि केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

देशात सुधारित ऊर्जा कार्यक्षमतेसह वीज निर्मिती वाढविण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार,राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळाच्या तेलंगणा सुपर थर्मल पॉवर प्रकल्पाचे पहिले 800 मेगावॅटचे युनिट राष्ट्राला समर्पित करण्यात आले. हे केंद्र तेलंगणाला कमी दरात वीज पुरवठा करून राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देईल. हे देशातील सर्वात जास्त पर्यावरणाशी सुसंगत वीज केंद्रांपैकी एक असेल.

पंतप्रधानांनी देशाला समर्पित केलेल्या प्रकल्पांमुळे तेलंगणाच्या रेल्वे पायाभूत सुविधांना चालना मिळत आहे. यामध्ये मनोहराबाद आणि सिद्धीपेट यांना जोडणारा नवीन रेल्वे मार्ग रेल्वे प्रकल्प; धर्माबाद – मनोहराबाद आणि महबूबनगर – कुर्नूल दरम्यान रेल्वे मार्ग विद्युतीकरण प्रकल्प यांचा समावेश आहे. 76 किमी लांबीच्या मनोहराबाद – सिद्दीपेट रेल्वे मार्गामुळे या भागाच्या विशेषत: मेडक आणि सिद्धीपेट जिल्ह्यांच्या सामाजिक, आर्थिक विकासाला चालना मिळेल. धर्माबाद – मनोहराबाद आणि महबूबनगर – कुरनूल दरम्यानच्या रेल्वे मार्ग विद्युतीकरण प्रकल्पामुळे गाड्यांचा सरासरी वेग सुधारण्यास मदत होईल आणि या प्रदेशात पर्यावरण अनुकूल रेल्वे वाहतूक उपलब्ध होईल. पंतप्रधानांनी सिद्धीपेट – सिकंदराबाद – सिद्धीपेट रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला, या रेल्वे सेवेमुळे या भागातील स्थानिक रेल्वे प्रवाशांना फायदा होईल.

तेलंगणातील आरोग्य पायाभूत सुविधा वाढविण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून पंतप्रधानांनी प्रधानमंत्री -आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानांतर्गत राज्यभरात 20 क्रिटिकल केअर ब्लॉक्सची (CCBs) पायाभरणी केली. आदिलाबाद, भद्राद्री कोठागुडेम, जयशंकर भूपालपल्ली, जोगुलांबा गडवाल, हैदराबाद, खम्मम, कुमुराम भीम आसिफाबाद, मंचेरियल, महबूबनगर (बडेपल्ली), मुलुगु, नागरकुर्नूल, नलगोंडा, नारायणपेट, निर्मलम, राजन्ना सिरसिल्ला, रंगारेड्डी (महेश्वरम), सूर्यापेट, पेद्दपल्ली, विकाराबाद आणि वारंगल (नरसंपेट) या जिल्ह्यांमध्ये ही अति दक्षता केंद्रे बांधली जातील. हे केंद्रे संपूर्ण तेलंगणा राज्यात जिल्हा-स्तरीय अति दक्षता पायाभूत सुविधा वाढवतील आणि यामुळे राज्यातील लोकांना फायदा होईल.

N.Chitale/Shailesh/Sushama/Shraddha/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai