Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोनशिलेचे अनावरण केले, आणि डॉ.आंबेडकर स्मृती व्याख्यान दिले

पंतप्रधानांनी डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोनशिलेचे अनावरण केले, आणि डॉ.आंबेडकर स्मृती व्याख्यान दिले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोनशिलेचे अनावरण केले. नवी दिल्लीतल्या 26, अलीपूर रोड या डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण स्थानी हे स्मारक होणार आहे.

पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथे या कोनशिलेचे अनावरण केले. त्यानंतर सहावे डॉ. आंबेडकर स्मृती व्याख्यान देतांना समाजाच्या दुर्बल घटकांना सध्या देय असणाऱ्या अधिकारापासून वंचित व्हावं लागू नये, यासाठी केंद्र सरकारच्या आरक्षण धोरणात कोणताही बदल केला जाणार नाही, असे पंतप्रधानांनी स्पष्टपणे अधोरेखित केले. या प्रकरणी खोटनाटं पसरवणाऱ्या आणि चुकीची माहिती देणाऱ्यांबाबत पंतप्रधानांनी स्पष्ट शब्दात नापसंती दर्शवली. वाजपेयी पंतप्रधान असतांनाही अशीच चुकीची माहिती पसरवली जात होती, याची त्यांनी आठवण करुन दिली. डॉ. आंबेडकरांच्या योगदानाचे स्मरण करतांना, पंतप्रधान म्हणाले की, डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक लवकरच दिल्लीतील लक्षवेधी इमारतींपैकी एक होईल अणि 14 एप्रिल 2018 या बाबासाहेबांच्या जयंतीदिनी आपण स्वत: या इमारतीचे उद्‌घाटन करु असेही त्यांनी सांगितले.

डॉ. आंबेडकरांच्या सन्मानार्थ 5 ठिकाणे ‘पंचतीर्थ’ म्हणून विकसित केली जात असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. यामध्ये महू हे त्यांचे जन्मस्थळ, इंग्लंडमध्ये शिक्षण घेत असतांना, त्यांचे लंडनमध्ये ज्या ठिकाणी वास्तव्य होते ते ठिकाण, नागपूर मधील दिक्षाभूमी, दिल्लीतील महापरिनिर्वाण स्थळ आणि मुंबईतील चैत्यभूमी यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त पंतप्रधानांनी नवी दिल्लीतल्या जनपथ इथे डॉ. आंबेडकर फाऊंडेशनसाठी उभारण्यात येणाऱ्या इमारतीचाही उल्लेख केला.

देशासाठी डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या योगदानाबद्दल बोलतांना, पंतप्रधान म्हणाले की, सरदार पटेल यांनी देश राजकीय दृष्ट्या एकसंध केला, तर डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून देशाला सामाजिक दृष्ट्या एकसंध केले. डॉ. आंबेडकर यांनी कठोर राजकीय विरोध असणाऱ्या काळातही, महिलांसाठी समान हक्कांना पाठिंबा दिला, याची आठवण पंतप्रधानांनी करुन दिली. डॉ. आंबेडकर यांचे योगदान केवळ दलितापुरतेच किंवा भारतापर्यंतच सिमित ठेवणे, हा त्यांच्यावर अन्याय ठरेल, असेही पंतप्रधानांनी सांगितले. ज्यांच्यावर अन्याय झाला, त्या सर्वांसाठी डॉ. आंबेडकर यांनी आवाज उठवला आणि त्यांना अमेरिकेतल्या मार्टीन ल्युथर किंग यांच्या प्रमाणेच एक जागतिक स्थान होते. डॉ. आंबेडकर हे सर्व कष्टकऱ्यांचे केवळ दलित कष्टकऱ्यांचे नव्हे, – मसीहा होते, असेही पंतप्रधान म्हणाले. कामाचे तास 8 तासांपर्यंत सिमित राखण्यात डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या योगदानाची पंतप्रधानांनी आठवण करुन दिली.

नुकतेच हाती घेतलेले धोरणात्मक उपक्रम आणि वैधानिक तरतुदींबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, भारताची सागरी क्षमता विकसित करण्याचा दृष्टीकोन आणि देशांतर्गत जलवाहतूक मार्ग हे स्वप्न सर्वप्रथम डॉ. आंबेडकरांनी पाहिले होते. याचप्रमाणे वीज जोडणी नसलेल्या सर्व गावांमधे 2018पर्यंत वीज जोडणी पुरवण्याचे जे उद्दीष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे ते म्हणजे डॉ. आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. दलित उद्योजकांसोबतच्या आपल्या नुकत्याच झालेल्या चर्चेचा आणि त्यांनी दिलेल्या सूचनांचा उल्लेखही त्यांनी केला. नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र सरकारने या सर्व सूचनांची अंमलबजावणी केल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी सर्वोत्कृष्ट किंमत मिळावी, यासाठी राष्ट्रीय कृषी बाजार हा ई-प्लॅटफोर्म यावर्षी 14 एप्रिल रोजी सुरु करण्यात येईल, असेही पंतप्रधान म्हणाले.

J. Patankar /S.Tupe / M. Desai