Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी चौथ्या जागतिक आयुर्वेद महोत्सवाला संबोधित केले

पंतप्रधानांनी चौथ्या जागतिक आयुर्वेद महोत्सवाला संबोधित केले


आयुर्वेदिक उत्पादनांची जागतिक मागणी निरंतर वाढत आहे: पंतप्रधान

जगभरातील निरामय आरोग्याबाबत जागतिक शिखर परिषदेचे केले आवाहन

आयुर्वेद जगताला सरकारकडून पूर्ण सहकार्याचे दिले आश्वासन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हर्च्युअल पद्धतीने चौथ्या जागतिक आयुर्वेद महोत्सवाला संबोधित केले.

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी आयुर्वेदाबाबत जगभरातून वाढत्या रुचीची दखल घेतली आणि आयुर्वेदावर काम करणाऱ्या जगभरातील सर्वांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. ते म्हणाले, “आयुर्वेदाचे वर्णन समग्र मानवी विज्ञान म्हणून केले जाऊ शकते. वनस्पतींपासून ते तुमच्या ताटापर्यंत, शारीरिक सामर्थ्यापासून ते मानसिक आरोग्यापर्यंत, आयुर्वेद आणि पारंपारिक औषधांचा प्रभाव आणि परिणाम  अफाट आहे.”

कोविड -19 महामारी संदर्भात पंतप्रधान म्हणाले की, आयुर्वेदिक उत्पादनांची मागणी सातत्याने वाढत आहे. “सध्याची परिस्थितीमुळे आयुर्वेद आणि पारंपारिक औषधे जागतिक स्तरावर आणखी लोकप्रिय होण्यासाठी ही योग्य वेळ आहे. त्याबाबत उत्सुकता वाढत  आहे. आधुनिक आणि पारंपारिक औषधे या दोन्ही गीष्टी निरोगीपणासाठी किती महत्त्वाच्या आहेत हे जग पहात आहे. लोकांनाही आयुर्वेदाचे फायदे आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या त्याच्या मिकेची जाणीव  आहे, ”असे पंतप्रधान म्हणाले.

भारतातील निरामय आरोग्य पर्यटनाच्या क्षमतेबाबत बोलताना ते म्हणाले की आजारावर उपचार करणे, निरोगीपणा कायम टिकावा हेच आरोग्य पर्यटनाच्या केंद्रस्थानी आहे. म्हणूनच, निरामय आरोग्य पर्यटनाचा सर्वात मजबूत आधारस्तंभ म्हणजे आयुर्वेद आणि पारंपारिक औषध हे आहे.  पंतप्रधानांनी उपस्थितांना मानसिक तणाव कमी करण्यासाठी आणि उपचारासाठी भारताच्या शाश्वत संस्कृतीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले “जर तुम्हाला तुमच्या शरीरावर उपचार करावयाचे असतील किंवा मनःशांती हवी असेल तर भारतात या” .

पंतप्रधानांनी आयुर्वेदाच्या लोकप्रियतेचा आणि आधुनिकतेसह पारंपरिकतेची सांगड घातल्यामुळे उद्‌भवणाऱ्या संधींचा फायदा घेण्याचे आवाहन केले. तरुणांकडून आयुर्वेद उत्पादनांचा अधिक वापर आणि आयुर्वेदाला पुरावा-आधारित वैद्यकीय विज्ञानात विलीन  करण्याबाबत वाढती जागरूकता यासारख्या घटनांचा उल्लेख करून मोदींनी शिक्षण तज्ञांना आयुर्वेद आणि औषधांच्या पारंपारिक प्रकारांवर सखोल संशोधन करण्याचे आवाहन केले. त्यांनी स्टार्ट अप समुदायाला प्रामुख्याने  आयुर्वेद उत्पादनांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. जागतिक स्तरावर समजेल अशा भाषेत आपल्या पारंपरिक  उपचार पद्धती सादर केल्याबद्दल त्यांनी युवकांचे कौतुक केले.

सरकारच्या वतीने पंतप्रधानांनी आयुर्वेद जगताला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. किफायतदार आयुष सेवांच्या माध्यमातून आयुष वैद्यकीय प्रणालीला चालना देण्यासाठी राष्ट्रीय आयुष मिशन सुरू करण्यात आले आहे असे ते म्हणाले.  शैक्षणिक प्रणाली मजबूत करण्यासाठी आणि आयुर्वेद, सिद्ध युनानी आणि होमिओपॅथी औषधांच्या गुणवत्ता नियंत्रणाची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी तसेच कच्च्या मालाची शाश्वत उपलब्धता सुनिश्चित करण्याचे काम ते  करत आहे. सरकार विविध गुणवत्ता नियंत्रण उपाययोजना करत असल्याचे त्यांनी सांगितले. “आयुर्वेद आणि इतर भारतीय औषध प्रणालीसंबंधी आमचे धोरण जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपारिक औषध धोरण 2014-2023 शी सुसंगत आहे.  जागतिक आरोग्य संघटनेने देखील भारतात जागतिक पारंपरिक औषध केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे, ”असे पंतप्रधान म्हणाले.

विविध देशांचे विद्यार्थी आयुर्वेद आणि पारंपारिक औषधांचा अभ्यास करण्यासाठी भारतात येत असल्याचे नमूद करून  पंतप्रधानांन म्हणाले की जगभरातील निरोगी स्वास्थ्याबाबत  विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे. या विषयावर  जागतिक शिखर परिषद आयोजित करता येईल अशी सूचना त्यांनी केली.

आयुर्वेदाशी संबंधित खाद्यपदार्थांना आणि आरोग्य समृद्ध करणाऱ्या अन्नपदार्थांना प्रोत्साहन देण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केल्याचा त्यांनी उल्लेख केला. पंतप्रधानांनी भरड धान्याच्या फायद्यांबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले.

पंतप्रधानांनी आयुर्वेदातली आपली कामगिरी अशीच उंचावण्याचे आवाहन केले. “आयुर्वेद हे एक असे माध्यम बनवूया जे जगाला आपल्या भूमीत घेऊन येईल. यामुळे आपल्या तरूणांनाही समृद्धी मिळेल ” असे ते म्हणाले.