पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ग्रामीण विकास योजनांचा आढावा घेतला.
या वेळी पंतप्रधानांच्या समोर निती आयोगाच्या वतीने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि दिनदयाळ अंत्योदय योजनांचे सादरीकरण करण्यात आले.
2015-16 या आर्थिक वर्षात दरदिवशी सरासरी 91 किलोमीटर लांबीचे ग्रामीण रस्ते बांधले गेले, त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांच्या लांबीत एकूण 30 हजार 500 किलोमीटर्सची भर पडली. यामुळे या आर्थिक वर्षात 6,500 वस्त्या रस्त्याने जोडल्या गेल्या.
ग्रामीण रस्त्यांच्या निर्मितीची प्रगती वेगवान व्हावी यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत वापरल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती यावेळी पंतप्रधानांना देण्यात आली. यामध्ये योजना तयार करणे आणि त्यावर देखरेख ठेवणे यासाठी GIS आणि स्पेस इमॅजिनरीचा वापर, स्तरांची संख्या कमी ठेवून निधीचा पुरेसा पुरवठा, आणि “मेरी सडक” या ॲप द्वारे नागरिकांच्या समस्या जाणून घेणे यांचा समावेश आहे.
या योजनेअंतर्गत बांधल्या जाणाऱ्या रस्त्यांवर देखरेख ठेवून योग्य दर्जा कायम राखण्यासाठी सक्षम यंत्रणा अमलात आणावी असे निर्देश पंतप्रधानांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. साधनसामुग्री खरेदीच्या वेळी, बांधणीच्या वेळी तसंच देखभालीच्या वेळी गुणवत्ता तपासणी केली जावी असेही त्यांनी सांगितले.
दिनदयाळ अंत्योदय योजनेच्या माध्यमातून शाश्वत उपजिविकेच्या माध्यमातून दारिद्रय निर्मूलनाचे लक्ष्य सामोर ठेवण्यात आले आहे. स्वयं सहायता गटांच्या माध्यमातून 3 कोटींपेक्षा अधिक कुटुंब जोडली गेल्याची माहिती यावेळी पंतप्रधानांना देण्यात आली. “आधार” चा उपयोग करुन स्वयं सहाय्यता गटांना दिल्या जाणाऱ्या कर्जावर योग्य देखरेख ठेवण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले. ही योजना यशस्वी होण्यासाठी योग्य लाभार्थ्यांपर्यंतच कर्ज पोहोचली पाहिजेत यावर पंतप्रधानांनी भर दिला.
J. Patankar /S.Tupe / M. Desai