नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोवा सरकारच्या रोजगार मेळाव्याला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले.
पंतप्रधानांनी धनत्रयोदशीच्या दिवशी केंद्रीय स्तरावर रोजगार मेळाव्याची संकल्पना सुरू केली होती. केंद्रीय स्तरावर 10 लाख नोकऱ्या देण्याच्या मोहिमेची ती सुरुवात होती. त्यानंतर पंतप्रधानांनी गुजरात, जम्मू आणि काश्मीर आणि महाराष्ट्र सरकारच्या रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि नुकतेच नवीन नियुक्ती झालेल्यांना सुमारे 71,000 नियुक्ती पत्रांचे वाटप करताना विविध सरकारी विभागांमधील सर्व नवीन नियुक्त्यांसाठी ऑनलाइन अभिमुखता अभ्यासक्रमांसाठी कर्मयोगी प्रारंभ मॉड्यूल सुरू केले होते.
मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधानांनी नियुक्ती पत्रे मिळालेल्या युवकांचे अभिनंदन केले आणि गोवा सरकारने रोजगार निर्मितीसाठी उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे नमूद केले. पुढील काही महिन्यांत गोवा पोलिस आणि इतर विभागांमध्ये आणखी भर्ती मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. “यामुळे गोवा पोलिस दल मजबूत होईल आणि परिणामी नागरिक आणि पर्यटकांसाठी सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम होईल. ” असे ते म्हणाले.
“गेल्या काही आठवड्यांपासून देशातील विविध राज्यांमध्ये सातत्याने रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत, तर केंद्र सरकार देखील हजारो तरुणांना नोकऱ्या देत आहे”, असे मोदी यांनी सांगितले. युवकांच्या सक्षमीकरणासाठी दुहेरी इंजिन सरकार असलेली राज्ये त्यांच्या पातळीवर अशा प्रकारचे रोजगार मेळावे आयोजित करण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.
गेल्या 8 वर्षांत केंद्र सरकारने गोव्याच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. सुमारे 3,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या मोपा येथील विमानतळाचे लवकरच उद्घाटन होणार असून त्याबाबत पंतप्रधान म्हणाले की, कनेक्टिव्हिटी आणि राज्यात सुरू असलेले पायाभूत विकास प्रकल्प गोव्यातील हजारो लोकांसाठी रोजगाराचे प्रमुख स्त्रोत बनले आहेत.
“स्वयंपूर्ण गोवा‘चे उद्दिष्ट राज्यातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासोबतच पायाभूत सुविधाही सुधारणे हा आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.गोव्यातील पर्यटनाचा बृहत आराखडा आणि धोरणाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, राज्य सरकारने गोव्याच्या विकासासाठी एक नवीन आराखडा तयार केला आहे ज्यामुळे पर्यटन क्षेत्रात गुंतवणुकीच्या नवीन संधी खुल्या झाल्या आहेत आणि त्यामुळे रोजगारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पारंपारिक शेतीमध्ये रोजगार वाढवण्यासाठी गोव्याच्या ग्रामीण भागाला आर्थिक बळ देण्याच्या दिशेने केल्या जात असलेल्या उपाययोजनांबाबत पंतप्रधानांनी सांगितले की, भात, फळांवर प्रक्रिया, नारळ, ताग आणि मसाले उत्पादक शेतकऱ्यांना स्वयं-सहायता गटांशी जोडले जात आहेत. या प्रयत्नांमुळे गोव्यात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
आज नियुक्तीपत्रे देण्यात आलेल्या युवकांनी गोव्याच्या विकासासाठी तसेच राष्ट्राच्या विकासासाठी काम करावे असे आवाहन करून पंतप्रधान म्हणाले, “तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची 25 वर्षे आता सुरू होणार आहेत.” पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप करताना विकसित भारताच्या स्वप्नाचा उल्लेख केला आणि 2047 च्या नवभारताचे लक्ष्य त्यांच्यासमोर ठेवले. “तुमच्यासमोर गोव्याच्या विकासाबरोबरच 2047 च्या नवभारताचे लक्ष्य आहे. मला विश्वास आहे की तुम्ही सर्वजण पूर्ण निष्ठेने आणि तत्परतेने तुमच्या कर्तव्यपथाचे अनुसरण कराल. ” असे सांगून पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला.
Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
My remarks at Goa Rozgar Mela. Congratulations to the newly inducted recruits. https://t.co/GRqunDGI6w
— Narendra Modi (@narendramodi) November 24, 2022