Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी गुजरातमधील लखपत साहिब गुरुद्वारा येथे गुरु नानक देवजी यांच्या गुरुपूरब उत्सवाला संबोधित केले.

पंतप्रधानांनी गुजरातमधील लखपत साहिब गुरुद्वारा येथे गुरु नानक देवजी यांच्या गुरुपूरब उत्सवाला संबोधित केले.


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील लखपत साहिब गुरुद्वारा येथे होत असलेल्या गुरु नानक देवजी यांच्या गुरुपूरब उत्सवाला संबोधित केले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, लखपत साहिब गुरुद्वारा हा काळाच्या प्रत्येक प्रवाहाचा साक्षीदार आहे. भूतकाळात लखपत साहिब गुरुद्वाराने किती मोठ्या उलथापालथींना तोंड दिले आहे याची आठवण आपल्याला झाली असे ते म्हणाले. एके काळी, परदेशांमध्ये व्यापारासाठी जाण्याचे हे प्रमुख केंद्र होते याची आठवण त्यांनी करून दिली.

PM India

2001 साली आलेल्या भूकंपाच्या वेळी गुरुंच्या कृपेने या पवित्र ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली होती याचा कृतज्ञतापूर्वक निर्देश पंतप्रधानांनी केला. त्या वेळी, देशाच्या विविध भागांतून आलेल्या कारागिरांनी या स्थळाचे मूळ वैभव पुनर्प्रस्थापित केले याची आठवण त्यांनी करून दिली. येथील भिंतींवर प्राचीन लेखन शैलीत गुरुवाणीमधील वचने कोरण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली. हा प्रकल्प युनेस्कोतर्फे देखील गौरविण्यात आला होता असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, महान गुरु साहेबांच्या आशीर्वादाने सरकारला गुरु गोविंद सिंहजी यांच्या प्रकाश उत्सवाची 350 वर्षे, गुरु नानक देवजी यांच्या प्रकाश पर्वाची 550 वर्षे आणि गुरु तेग बहादूरजी यांच्या प्रकाश उत्सवाची 400 वर्षे हे पवित्र प्रसंग साजरे करण्याचा बहुमान मिळाला आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांमध्ये, गुरु नानक देव जी यांचा संदेश अधिक जोमाने संपूर्ण जगभर पोहोचविण्यासाठी प्रत्येक पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अनेक दशके प्रलंबित असलेला कर्तारपूर साहेब कॉरीडॉर 2019 मध्ये पूर्ण करण्यात आला. सध्या गुरु तेग बहादूर जी यांच्या प्रकाश उत्सवाची 400 वर्षे साजरी होत आहेत.

पंतप्रधान म्हणाले की, नुकतेच आपण गुरु ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथातील स्वरूपांना संपूर्ण सन्मानाने भारतात परत आणण्यात यशस्वी झालो आहोत. गुरूंच्या कृपेचा यापेक्षा मोठा अनुभव काय असू शकेल असे उद्गार त्यांनी काढले. पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, काही महिन्यांपूर्वी ते जेव्हा अमेरिका दौऱ्यावर गेले होते तेव्हा अमेरिकेने प्राचीन भारतातील ऐतिहासिक महत्त्वाच्या 150 वस्तू आपल्याला परत दिल्या. या वस्तूंमध्ये एक पेशकब्ज म्हणजे छोटी तलवार देखील आहे, तिच्यावर फारसी भाषेत गुरु हरगोविंद जी यांचे नाव लिहिलेले आहे. आपले सरकार या वस्तू परत आणण्याचे महान कार्य करू शकले हे आमचे सौभाग्य आहे, पंतप्रधान म्हणाले.

शीख समाजाच्या  पंच प्यारे गुरुंपैकी चौथे गुरुशीख, भाई मोकहम सिंग जी हे गुजरातचे होते ही नेहमीच गुजरातसाठी सदैव अत्यंत अभिमानाची बाब राहिली आहे अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली.  भाई मोकहम सिंग जी यांनी खालसा पंथाची स्थापना करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली. देवभूमि द्वारकेला त्यांच्या स्मरणार्थ बेट द्वारका भाई मोकहम सिंग जी गुरुद्वाराची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

परवशतेच्या काळात आणि आक्रमणकर्त्यांच्या हल्ल्यांच्या वेळी भारतीय समाजाकरीता महान गुरु परंपरेने दिलेल्या योगदानाचे पंतप्रधानांनी आदरपूर्वक स्मरण केले.  ते म्हणाले की, जेव्हा समाज ज्ञानाचा अंधकार आणि दुफळीने ग्रासलेला होता, तेव्हा गुरु नानक देवजी बंधुत्वाचा संदेश घेऊन आले होते.  तसेच गुरू अर्जन देवजी यांनी संपूर्ण देशभरातील संतांच्या आवाजाला एकरूपता  देऊन राष्ट्रात एकात्मतेची भावना रुजवली.  गुरु हरकिशन जी यांनी मानवतेच्या सेवेचा मार्ग दाखवला, जो आजही शीख समुदायाला  आणि उर्वरित मानवजातीला मार्गदर्शन करत आहे.  गुरू नानक देवजी आणि त्यांच्या नंतर आलेल्या  आमच्या वेगवेगळ्या गुरूंनी भारताची अस्मिता केवळ जागृत ठेवली, इतकेच नव्हे  तर, भारताला सुरक्षित ठेवण्याचा मार्गही त्यांनी शोधून काढला,असे पंतप्रधानांनी नमूद केले.  आपल्या गुरूंचे योगदान केवळ समाज आणि अध्यात्मापुरते मर्यादित नाही;तर आपले राष्ट्र, राष्ट्राची विचारधारा , राष्ट्राची श्रद्धा आणि अखंडता  आज जर सुरक्षित असेल, तर  त्यामागे शीख गुरुंनी केलेली  महान तपस्यादेखील आहे.  पंतप्रधान म्हणाले, बाबरच्या आक्रमणामुळे भारताला मोठा धोका निर्माण झाला आहे,हे गुरू नानक देव जी, यांना  जाणवले होते .

त्याचप्रमाणे गुरु तेग बहादूर यांचेही संपूर्ण जीवन हे नेशन फर्स्टचे उदाहरण आहे,यावर  पंतप्रधानांनी भर दिला. पंतप्रधान म्हणाले, की गुरु तेग बहादूर जी नेहमीच त्यांना वाटत असलेल्या  मानवतेच्या चिंतेविरुध्द भक्कमपणे  उभे राहिले, ते आपल्याला भारताच्या अंतरंगाचे  दर्शन घडवितात.  देशाने त्यांना हिंद की चादरही पदवी दिली, त्यावरून प्रत्येक भारतीयाचे शीख परंपरेशी असलेले नाते दिसून येते. ते पुढे म्हणाले की, गुरू तेग बहादूर यांचे शौर्य आणि औरंगजेबाविरुद्धचे त्यांचे बलिदान हे आपल्याला आपला देश दहशतवाद आणि धार्मिक कट्टरतेविरुद्ध कसा लढला हे शिकवतो.  त्याचप्रमाणे दहावे गुरू गुरू गोविंद सिंग साहेब यांचे जीवनही धैर्य आणि त्याग याचे जाज्वल्य उदाहरण आहे, असे ते पुढे म्हणाले.

ब्रिटीश राजवटीतही आपले शीख बंधुभगिनी  ज्या शौर्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले, त्या शौर्याचा गौरव करत आपला स्वातंत्र्यलढा आणि जालियनवाला बागची भूमी,ही  त्या बलिदानाची साक्ष देत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.  पंतप्रधान म्हणाले, हीच  परंपरा अजूनही जिवंत आहे आणि  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या या काळात अधिक महत्त्वाची बनते जेव्हा आपण आपल्या भूतकाळाचे स्मरण करत असतो आणि त्यातून प्रेरणा घेत असतो.

पंतप्रधान म्हणाले की, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, कच्छपासून कोहिमापर्यंत संपूर्ण देश  एकच स्वप्ने पाहत आहे, त्यांच्या पूर्ततेसाठी एकत्र मिळून प्रयत्न करत आहे.  देशाचा मंत्र आहे एक भारत, श्रेष्ठ भारत यांचे त्यांनी स्मरण करून दिले.नव्या सक्षम भारताचे पुनरुज्जीवन,हेच राष्ट्राचे ध्येय आहे. आज देशाचे धोरण आहे- प्रत्येक गरीबाची सेवा, वंचितांना प्राधान्य.

कच्छच्या रण महोत्सवाला भेट देण्याचेही आवाहन पंतप्रधानांनी जनतेला केले.  ते म्हणाले, की कच्छचा कायापालट कच्छच्या लोकांच्या दूरदृष्टी आणि कठोर परिश्रमाची साक्ष देतो.  आज श्री. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहताना पंतप्रधानांनी श्री वाजपेयी यांच्या कच्छबद्दलच्या स्नेहाचे स्मरण केले.  भूकंपानंतर येथे झालेल्या विकासकामांमध्ये अटलजी आणि त्यांचे सरकार खांद्याला खांदा लावून उभे राहिले, यांची पंतप्रधानांनी आठवण करून दिली.

दरवर्षी 23 डिसेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीत गुजरातमधील शीख समुदाय लखपत साहिब येथील गुरुद्वारामधे गुरूनानक देव जी यांची गुरुपूरब साजरी करतात.  गुरू नानक देवजींनी त्यांच्या प्रवासादरम्यान लखपत येथे मुक्काम केला होता.  गुरुद्वारा लखपत साहिबमध्ये त्यांची  लाकडी पादत्राणे आणि पालखी (पाळणा) तसेच गुरुमुखीची हस्तलिखिते आणि गुरुमुखी लिपींसह त्यांचे अवशेष जतन केले आहेत.

2001 च्या भूकंपात या गुरुद्वाराचे नुकसान झाले होते.  गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकसान भरपाईसाठी तातडीने प्रयत्न केले होते.  त्यांनी केलेल्या त्या प्रयत्नांवरुन  पंतप्रधानांचा श्रद्धेवरचा अथांग आदर दिसून येतो, तसेच गुरू नानक देवजींचे 550 वे प्रकाशपर्व, गुरू गोविंद सिंग जी यांचे 350 वे प्रकाशपर्व आणि गुरू तेग बहादुर यांचे 400 वे प्रकाशपर्व यासह अलीकडेच  केलेल्या अनेक प्रयत्नांतून तो दिसून येत आहे.

***

Jaydevi PS/S.Patil/S.Chitnis/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com