पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये एकता नगर इथल्या मेझ भुलभुलैय्या उद्यान आणि मियावाकी जंगलाचे लोकार्पण केले.
पंतप्रधानांनी बुद्ध पुतळा येथे भेट दिली आणि जंगलामधील पायवाटेवरून चालत ते मेझ उद्यानाकडे मार्गस्थ झाले. त्यांनी विश्राम गृह, या नवीन प्रशासकीय इमारतीचे आणि ओयो (OYO) हाउस बोटचे उद्घाटन केले. पंतप्रधान मेझ उद्यानामध्ये देखील पायी फिरले.
पार्श्वभूमी
मियावाकी जंगल आणि मेझ उद्यान ही स्टॅच्यू ऑफ युनिटी इथली नवीन आकर्षणाची ठिकाणे आहेत. स्टॅच्यू ऑफ युनिटीचे चार वर्षांपूर्वी उद्घाटन झाले, त्यावेळी प्रत्येक वयोगटासाठी आकर्षण ठरेल, असे पर्यटन केंद्र बनवण्याचा पंतप्रधानांचा दृष्टीकोन होता. त्यामुळे आतापर्यंत आठ दशलक्ष पेक्षा जास्त लोकांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली आहे.
तीन एकराहून जास्त क्षेत्रावर पसरलेल्या या उद्यानात 2,100 मीटर लांबीची पायवाट असून, केवळ आठ महिन्यांमध्ये विकसित करण्यात आलेले हे देशातील सर्वात मोठे मेझ उद्यान आहे. केवडिया येथील मेझ उद्यान, सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या ‘यंत्रा’च्या आकारात बांधण्यात आले आहे. ही रचना निवडण्यामागे, उद्यानामधील गुंतागुंतीच्या मार्गांचे जाळे तयार करण्यावर लक्ष केंद्रित करताना, सममिती आणणे, हे उद्दिष्ट होते. या उद्यानातील कोड्यात टाकणाऱ्या मार्गांवरून चालणे, पर्यटकांसाठी आव्हानात्मक असेल, त्याचबरोबर त्यांना साहस आणि अडथळ्यांवर विजय मिळवण्याच्या भावनेची अनुभूती मिळेल. या मेझ उद्यानाजवळ ऑरेंज जेमिनी, मधु कामिनी, ग्लोरी बोवर आणि मेहंदी यासह विविध प्रकारची सुमारे 1,80,000 रोपे लावण्यात आली आहेत.
मेझ उद्यानाचे हे स्थान मूळतः मलबा टाकण्याचे एक ठिकाण होते, आता हे ठिकाण एका हिरव्यागार परिदृश्यात बदलले आहे. या ओसाड जमिनीच्या पुनरुज्जीवनामुळे केवळ परिसर सुशोभितच झाला नाही तर पक्षी, फुलपाखरे आणि मधमाश्यांची संख्या वाढू शकेल अशा सचेत परिसंस्थेची स्थापना करण्यात मदत झाली आहे .
एकता नगरला भेट देणाऱ्या लोकांसाठी मियावाकी वन हे पर्यटनाचे आणखी एक आकर्षण असेल. जपानी वनस्पतिशास्त्रज्ञ आणि पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ अकिरा मियावाकी यांनी विकसित केलेल्या या जंगलाच्या तंत्रावरून या जंगलाला मियावाकी हे नाव देण्यात आले असून या पद्धतीनुसार हे जंगल उगवण्यासाठी एकमेकांच्या जवळ विविध प्रजातींची रोपे लावली जातात त्यानंतर घनदाट शहरी जंगल विकसित होते.या पद्धतीचा वापर करून वनस्पतींची वाढ दहापट जलद होते आणि परिणामी, विकसित जंगल तीस पट घनदाट होते. मियावाकी पद्धतीच्या माध्यमातून केवळ दोन ते तीन वर्षांत जंगल विकसित करता येते, तर पारंपारिक पद्धतीने किमान 20 ते 30 वर्षे लागतात. मियावाकी जंगलामध्ये पुढील विभागांचा समावेश असेल: एक नैसर्गिक फुलांची बाग, टिम्बर गार्डन , एक फळांची बाग, एक औषधी वनस्पतींची बाग, मिश्र प्रजातींचा एक मियावाकी विभाग आणि एक डिजिटल अभिमुखता केंद्र.
पर्यटकांना त्यांच्या भेटीत पर्यटनाचा समग्र अनुभव मिळावा आणि प्रेक्षणीय स्थळ पाहण्याचा त्यांचा अनुभव कंटाळवाणा होऊ नये यासाठी पर्यटकाचे आकर्षण ठरणाऱ्या या विविध गोष्टींच्या उभारणीला पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचे मार्गदर्शन लाभले आहे.
पर्यटकांसाठी आकर्षक ठरणाऱ्या या जागांचे निसर्गाबरोबरचे साहचर्य हे पर्यावरणाचे महत्व विशद करते तसेच आपल्या संस्कृतीमध्ये असणारे निसर्गाचे महत्त्व अधोरेखित करते.
यातील विशेष भाग म्हणजे आत्ताच विकसित केलेले मेझ गार्डन म्हणजेच चक्रव्यूह-भुलभुलैया बगीचा. याचा आराखडा आपल्या संस्कृतीनुसार केलेला असून परिसरात सकारात्मकता पसरवण्यासाठी निसर्ग हे किती सशक्त माध्यम आहे हे यावरून दिसून येते.
स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळच्या इतर प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये टेन्ट सिटी, आरोग्यवन सारख्या संकल्पनेवर आधारित बगिचे, बटरफ्लाय गार्डन, कॅक्टस गार्डन, विश्व वन, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणजेच भारत वन, युनिटी ग्लो गार्डन, चिल्ड्रन न्यूट्रिशन पार्क, जंगल सफारी सारखे आधुनिक प्राणी संग्रहालय उद्यान आदींचा समावेश आहे.
***
R.Aghor/R.Agashe/S.Chavan/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai