Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी गुजरातमधाील त्रिमंदिर येथे ’मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स’चा केला प्रारंभ

पंतप्रधानांनी गुजरातमधाील  त्रिमंदिर येथे ’मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स’चा केला प्रारंभ


नवी दिल्‍ली, 19 ऑक्‍टोबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील अडालज येथील त्रिमंदिर येथे “मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स”चा प्रारंभ केला. या मिशनची संकल्पना प्रत्‍यक्षात आणण्‍यासाठी एकूण 10,000 कोटी रूपये खर्च होणार आहेत. त्रिमंदिर येथील कार्यक्रमाच्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सुमारे 4260 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण केले. यामध्‍ये नवीन वर्गखोल्या, स्मार्ट क्लासरूम, संगणक प्रयोगशाळा आणि राज्यातील शाळांच्या पायाभूत सुविधांचे एकूणच अद्यतन  करून गुजरातमधील शैक्षणिक पायाभूत सुविधा मजबूत करण्यास मदत होणार आहे.

याप्रसंगी आयोजित  मेळाव्याला मार्गदर्शन  करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज गुजरातने अमृत काळामध्‍ये  अमृत पिढी निर्माण करण्‍याच्या  दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. आजचा हा कार्यक्रम विकसित भारतासाठी आणि विकसित गुजरातसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. त्यांनी ‘मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स’ साठी सर्व नागरिक, शिक्षक, युवावर्ग  आणि गुजरातच्या आगामी पिढ्यांचे अभिनंदन केले.

अलिकडच्या काळात विकसित झालेल्या 5 जी  तंत्रज्ञानाबाबत  पंतप्रधान म्हणाले केली की,  आम्ही इंटरनेटच्या पहिल्या चार ‘जनरेशन’चा, टप्प्‍यांचा  वापर केला असला तरी, 5 जी तंत्रज्ञान  संपूर्ण भारतात परिवर्तन घडवून आणेल. “याआधी आलेले प्रत्येक टप्प्यावरचे तंत्रज्ञान आपल्याला जीवनाच्या लहान- लहान पैलूंबरोबर  जोडले  आहे”,  असे सांगून पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “अगदी याचप्रमाणे  शाळांच्याही  वेगवेगळ्या पिढ्या आपण पाहिल्या आहेत.” 5G तंत्रज्ञानाची  क्षमता किती प्रचंड आहे, यावर   प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की, 5 जी तंत्रज्ञान शिक्षण प्रणालीमधील  स्मार्ट सुविधा, स्मार्ट क्लासरूम आणि स्मार्ट शिकवण्यांच्या पलीकडे घेऊन जाईल आणि पुढील स्तरावर नेईल. “आमचे युवा  विद्यार्थी आता शाळांमध्ये आभासी वास्तवाची शक्ती आणि आयओटी म्हणजेच  ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ चा अनुभव घेऊ शकतात”.   ‘मिशन स्कूल ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून गुजरातने संपूर्ण देशात पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल उचलले आहे; याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या टीमचे अभिनंदन केले.

गेल्या दोन दशकामध्‍ये  गुजरातच्या  शैक्षणिक क्षेत्रात जो कायाकल्प घडून आला आहे,  त्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी गुजरातमधील शिक्षण क्षेत्राच्या ढासळलेल्या अवस्थेची आठवण करून दिली आणि सांगितले की 100 पैकी 20 मुले कधीही शाळेत जात नव्हते. जे विद्यार्थी शाळेत जाण्यात यशस्वी झाले ते आठवी इयत्तेनंतर शाळा सोडत होते. शाळेत जाण्यापासून रोखलेल्या   मुलींची अवस्था इतरांपेक्षाही वाईट बनली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आदिवासी भागात शैक्षणिक केंद्रांवर असणारी अभावाची स्थिती पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिली. ते म्हणाले  की, विज्ञान हा विषय शिकविण्‍यासाठी  कोणतीही योजना नव्हती. “या दोन दशकांमध्‍ये मात्र  गुजरातच्या जनतेने त्यांच्या राज्यातील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट करून दाखवला आहे.” ही गोष्‍ट पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केली.  या दोन दशकात गुजरातमध्ये 1.25 लाखांहून अधिक नवीन वर्गखोल्या बांधण्यात आल्या आणि 2  लाखांहून अधिक शिक्षकांची भरती करण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. “मला अजूनही आठवतो तो दिवस ज्यावेळी राज्यात  ‘शाळा  प्रवेशोत्सव’  आणि ‘कन्या केळवणी महोत्सव’  सारखे कार्यक्रम सुरू झाले होते. घरातला  मुलगा-मुलगी पहिल्यांदा शाळेत जातील त्यावेळी  तो दिवस एखाद्या सणासारखा साजरा केला जावा, असा आमचा प्रयत्न होता, असे पंतप्रधान  मोदी यांनी यावेळी सांगितले.

शिक्षणाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या ‘गुणोत्सव’ या उत्सवाचेही पंतप्रधानांनी स्मरण केले. विद्यार्थ्यांच्या या कल चाचणीमध्ये त्यांचे कौशल्य तसेच क्षमतांचे मूल्यमापन करून योग्य ते उपाय सुचविण्‍यात आले. गुजरातमधील विद्या समीक्षा केंद्रामध्ये ‘गुणोत्सव’ अधिक प्रगत तंत्रज्ञानावर आधारित पुढच्या   आवृत्तीसह  कार्यरत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. “गुजरात नेहमीच शैक्षणिक क्षेत्रातील काही वैशिष्ठ्यपूर्ण आणि मोठ्या प्रयोगांचा भाग राहिला आहे. आम्ही ‘इन्स्टिट्यूट ऑफ टीचर्स एज्युकेशन’ हे गुजरातमधील पहिले शिक्षक प्रशिक्षण विद्यापीठ स्थापन केले,” असेही ते पुढे म्हणाले.

पंतप्रधान मोदी पूर्वी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते त्या काळाचे स्मरण करत त्यांनी सांगितले की राज्यातील एकापाठोपाठ एक अशा अनेक गावांना त्यांनी भेटी दिल्या आणि तेथील लोकांनी त्यांच्या मुलींना शिकण्यासाठी शाळेत पाठविण्याची विनंती केली. “त्याचा परिणाम असा झाला आहे की, गुजरात राज्यातील बहुतांश मुलगे आणि मुली आता शाळेत शिक्षण घेताना दिसत आहेत,” ते म्हणाले. आपापल्या मुलांना शाळेत पाठविण्याच्या विनंतीला मान देऊन मुलांना शाळेत पाठविणाऱ्या पालकांचे त्यांनी कौतुक केले.

एका दशकापूर्वीच गुजरातमधील 15,000 शाळांमध्ये दूरचित्रवाणी संच बसविण्यात आले होते तसेच 20 हजाराहून अधिक शाळांमध्ये संगणकाच्या सहाय्याने शिक्षण देणाऱ्या केंद्रांची स्थापना झाली होती आणि अशा अनेक नव्या प्रणाली अनेक वर्षांपूर्वीच गुजरात राज्यातील अनेक विद्यालयांचा अविभाज्य भाग बनल्या होत्या अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. शिक्षण क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करत पंतप्रधान मोदी यांनी हा मुद्दा ठळकपणे सांगितला की आजच्या घडीला गुजरातमध्ये 1 कोटीहून अधिक विद्यार्थी आणि 4 लाखांहून अधिक शिक्षक  ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती नोंदवतात.या संदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले की, गुजरातमधील 20 हजार शाळा शिक्षणाच्या 5 जी युगात प्रवेश करण्यासाठी सज्ज आहेत.

मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स  अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या प्रकल्पांवर पंतप्रधानांनी अधिक विस्ताराने सांगितले  आणि या विद्यालयांमध्ये 50 हजार नवे वर्ग आणि एक लाखाहून अधिक स्मार्ट वर्ग उभारले जाणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान पुढे म्हणाले की या विद्यालयांमध्ये  अनेक आधुनिक, डिजिटल आणि इतर भौतिक पायाभूत सुविधा तर असतीलच, पण त्याच सोबत, विद्यार्थ्यांचे आयुष्य आणि त्यांचे शिक्षण यांमध्ये मोठे बदल घडवून आणण्यासाठीचे ते एक अभियान देखील असेल. “मुलांची क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक पैलूबाबत येथे काम केले जाईल,”ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, 5 जी तंत्रज्ञानाच्या आगमनाने या सर्व उपाययोजनांना मोठा लाभ होणार आहे कारण, या तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसह, देशातील सर्व विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण सामग्री, अध्यापन आणि शिक्षक उपलब्ध होणार आहेत. “शिक्षणाच्या पर्यायांतील वैविध्य आणि लवचिकता यांमुळे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रत्यक्षात उतरविता येईल,” ते म्हणाले. या नव्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आदर्श नमुना ठरणाऱ्या साडेचौदा हजार पीएम-श्री विद्यालयांबाबत देखील पंतप्रधानांनी माहिती दिली. या योजनेसाठी 27 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.  

“नवे राष्ट्रीक शैक्षणिक धोरण म्हणजे देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करण्यासाठी आणि देशातील प्रतिभा तसेच नवोन्मेष यांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे,” पंतप्रधानांनी स्पष्ट केले. इंग्रजी भाषेच्या ज्ञानाला बुद्धिमत्ता मोजण्याचे साधन समजत आल्याबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले. भाषा ही केवळ संपर्काचे साधन असते तरीही गेली अनेक दशके, भाषा ही अशा प्रकारचा अडथळा होऊन बसली होती की त्यामुळे गावांमध्ये तसेच गरीब कुटुंबांमध्ये असलेल्या प्रतिभेच्या साठ्याचा लाभ देशाला होऊ शकला नाही. “आता ही परिस्थिती बदलते आहे. आता विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि वैद्यक या शाखांतील शिक्षण गुजरातीसह अनेक भारतीय भाषांमधून घेण्याचा पर्याय देखील उपलब्ध होऊ लागला आहे,’ पंतप्रधान म्हणाले. विकसित भारतासाठी ‘सर्वांचे प्रयत्न’ होणे गरजेचे असण्याचा हा काळ असल्यामुळे,  नव्या शैक्षणिक धोरणात ‘कोणालाही मागे पडू द्यायचे नाही’ या प्रेरणेचा अंतर्भाव केला आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला.  

विज्ञान आणि ज्ञानाच्या क्षेत्रात भारतातील पूर्वजांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करत पंतप्रधान म्हणाले, “प्राचीन काळापासून शिक्षण हा भारताच्या विकासाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे.” भारत देश स्वभावतःच ज्ञानाचा पाठीराखा आहे आणि आपल्या पूर्वजांनी शेकडो वर्षांपूर्वी जगातील सर्वोत्तम विद्यापीठांची उभारणी केली तसेच मोठमोठ्या ग्रंथसंग्रहालयांची स्थापना केली.भारतावर परकीय आक्रमणे झाली आणि देशाची ही संपदा नष्ट करण्याच्या मोहिमा सुरु झाल्या त्या काळाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, “आपण आपला शिक्षणाचा आग्रह सोडलेला नाही.” अगदी आजच्या काळात, ज्ञान आणि विज्ञानाच्या या जगात, संशोधनाच्या बाबतीत भारताची वेगळी ओळख आहे. “स्वातंत्र्याच्या अमृत काळात, आपल्या देशाची प्राचीन काळातील प्रतिष्ठा परत प्राप्त करण्याची संधी आपल्याकडे आहे,” मोदी म्हणाले.

भाषणाच्या शेवटी, पंतप्रधानांनी जगातील मोठी ज्ञान अर्थव्यवस्था होण्यासाठी भारताकडे असलेल्या अमर्याद क्षमतेचे  वर्णन केले. ते म्हणाले, “एकविसाव्या शतकात,विज्ञानाशी तसेच तंत्रज्ञानाशी संबंधित असलेली अभिनव संशोधने भारतात केली जातील असा दावा करताना मला अजिबात संकोच वाटत नाही.” गुजरात राज्यासमोर असलेल्या मोठ्या संधीकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. ”आतापर्यंत गुजरात राज्य व्यापार आणि उद्योगांसाठी तसेच उत्पादन क्षेत्रासाठी प्रसिद्ध होते. पण एकविसाव्या शतकात हे राज्य देशातील माहितीचे मोठे केंद्र तसेच नवोन्मेष केंद्र म्हणून विकसित होत आहे. मला खात्री आहे की मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स देखील या प्रेरणेला अधिक चालना देईल,” असे पंतप्रधान समारोपात  म्हणाले.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि गुजरात राज्य सरकारमधील मंत्री जितुभाई वघानी, कुबेरभाई डिंडोर आणि किरीटसिंह वाघेला यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

S.Kakade/S.Chitnis/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai