Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी ऑस्ट्रिया-भारत सीईओंच्या बैठकीला केले संबोधित

पंतप्रधानांनी ऑस्ट्रिया-भारत सीईओंच्या बैठकीला केले संबोधित


नवी दिल्ली, 10 जुलै 2024

पंतप्रधान  नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रियाचे चॅन्सलर कार्ल नेहॅमर यांनी आज पायाभूत सुविधा, ऑटोमोबाईल, ऊर्जा, अभियांत्रिकी आणि स्टार्ट-अप्ससह विविध क्षेत्रातील आघाडीच्या ऑस्ट्रियन आणि भारतीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ) गटाला संयुक्तपणे संबोधित केले.

भारत आणि ऑस्ट्रिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यात आणि आर्थिक सहकार्याला चालना देण्यात  उद्योग क्षेत्रातील नेत्यांनी बजावलेल्या भूमिकेचा दोन्ही नेत्यांनी उल्लेख केला.  दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीत गेल्या काही वर्षांमध्ये वाढ होत असल्याचे या नेत्यांनी नमूद केले आणि सहकार्य वृद्धिंगत करून भारत-ऑस्ट्रिया भागीदारी पूर्ण क्षमतेने साकारण्याचे  आवाहन केले.

येत्या काही वर्षात  जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने देश वाटचाल करत  असताना पंतप्रधानांनी ऑस्ट्रियातील उद्योजकांना भारतातील झपाट्याने विकसित होणाऱ्या संधींकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. भारताने गेल्या दहा वर्षांत परिवर्तनात्मक प्रगती केली आहे आणि राजकीय स्थैर्य, धोरण पूर्वानुमान आणि  सुधारणाभिमुख आर्थिक कार्यक्रम या बळावर ही वाटचाल सुरु राहील असे त्यांनी नमूद केले. जागतिक क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांना भारताकडे आकर्षित करणाऱ्या व्यवसाय सुलभतेत सुधारणा करण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांवर त्यांनी भर दिला. भारतीय आर्थिक विकास  आणि परिवर्तनाविषयी बोलताना, त्यांनी स्टार्ट-अप्सच्या क्षेत्रात भारताचे यश, पुढील पिढीच्या पायाभूत सुविधांची  निर्मिती आणि हरित कार्यक्रम पुढे नेण्याची कटिबद्धता यांचा उल्लेख केला. भारत आणि ऑस्ट्रिया दरम्यान स्थापन स्टार्ट-अप सेतूचे लक्षणीय  परिणाम दिसून येतील असे त्यांनी नमूद केले. या संदर्भात दोन्ही देशांनी एकत्र येऊन संयुक्त हॅकाथॉनचे आयोजन करावे अशी सूचना त्यांनी केली. देशातील डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचे यश आणि कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिक सुधारण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल त्यांनी माहिती दिली.

भारताचे सामर्थ्य लक्षात घेऊन , पंतप्रधानांनी ऑस्ट्रियन कंपन्यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी आणि जागतिक पुरवठा साखळी ठिकाण म्हणून मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत उच्च-दर्जाच्या  आणि किफायतशीर उत्पादनासाठी भारतीय आर्थिक परिदृश्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या संदर्भात, त्यांनी सेमीकंडक्टर, वैद्यकीय उपकरणे, सौर पीव्ही सेल यासह इतर क्षेत्रात जागतिक उत्पादन कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी भारताच्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेबद्दल सांगितले. भारताचे आर्थिक सामर्थ्य आणि कौशल्ये आणि ऑस्ट्रियन तंत्रज्ञान हे व्यवसाय, वाढ आणि शाश्वततेसाठी नैसर्गिक भागीदार असल्याचे त्यांनी नमूद केले.

त्यांनी ऑस्ट्रियन उद्योगांना  भारतातील गुंतवणुकीच्या संधींचा वापर करण्यासाठी आणि भारताच्या विकास गाथेचा  एक भाग होण्यासाठी आमंत्रित केले.

S.Patil/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai