Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी एनसीसी छात्र, एनएसएस स्वयंसेवक, आदिवासी अतिथी  आणि चित्ररथ कलाकारांशी साधला संवाद

पंतप्रधानांनी एनसीसी छात्र, एनएसएस स्वयंसेवक, आदिवासी अतिथी  आणि चित्ररथ कलाकारांशी साधला संवाद


 

आगामी प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणारे राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक,आदिवासी अतिथी आणि चित्ररथ कलाकारांशी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानी संवाद साधला. त्यानंतर देशाची समृद्ध संस्कृती आणि विविधता दर्शविणारे सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.

प्रथापद्धत बाजूला सारत पंतप्रधानांनी सहभागींशी अभिनव पद्धतीने संवाद साधला. सहभागींसोबत त्यांनी अनौपचारिक, व्यक्तीशः मोकळा संवाद साधला.

पंतप्रधानांनी राष्ट्रीय एकता आणि विविधतेचे महत्त्व अधोरेखित करत  सर्व सहभागींना एक भारत श्रेष्ठ भारतची भावना बळकट करण्यासाठी विविध राज्यांतील लोकांशी संवाद साधण्याचे आवाहन केले. अशा संवादांमुळे देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या सामंजस्य आणि एकतेला कसे प्रोत्साहन मिळते, हे त्यांनी अधोरेखित केले.

जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्ये पार पाडणे ही विकसित भारताचे स्वप्न सिद्धीस नेण्याची  गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून देशाला बळकट करण्यासाठी वचनबद्ध  राहण्याचे आणि एकजूट राखण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनी तरुणांना माय भारत पोर्टलवर नोंदणी करण्यास आणि राष्ट्र उभारणीत योगदान देणाऱ्या उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यास प्रोत्साहित केले. त्यांनी शिस्त, वक्तशीरपणा आणि लवकर उठणे यासारख्या चांगल्या सवयी अंगीकारण्याचे महत्त्व सांगितले आणि रोजनिशी  लिहिण्यास प्रोत्साहन दिले.

लोकांचे जीवनमान चांगले होण्यास सहाय्यकारी ठरत असलेल्या केंद्र सरकारच्या काही महत्त्वाच्या उपक्रमांबद्दलही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संभाषणादरम्यान चर्चा केली. तीन कोटी लखपती दीदी घडवण्याच्या उद्देशाने राबवल्या जात असलेल्या उपक्रमांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी आपले सरकार वचनबद्ध असल्याची  बाब त्यांनी अधोरेखित केली. या संभाषणात सहभागी असलेल्या एका व्यक्तीने आपल्या आईला या योजनेचा कसा लाभ झाला याविषयी गोष्ट सामायिक केली. या योजनेमुळे आईला उत्पादनांची  निर्यात शक्य झाल्याचे  त्याने सांगितले. भारतात परवडणाऱ्या दरांत इंटरनेट वापरासाठीचा डेटा उपलब्ध आहे, त्यामुळे इथल्या संपर्क विषयक जोडणीच्या परिस्थितीत आमूलाग्र बदल घडून आले आहेत, त्याचसोबत डिजिटल इंडियाच्या वाटचालीलाही बळ मिळाले असल्याचे पंतप्रधान म्हणाले. या सगळ्यामुळे लोकांना परस्परांच्या संपर्कात राहण्यासाठी  आणि संधींची वाढ होण्यातही  मदत झाली असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले

यावेळी पंतप्रधानांनी स्वच्छतेचे महत्त्वही विशद केले. जर 140 कोटी भारतीयांनी स्वच्छता राखण्याचा संकल्प केला तर भारतात कायमच स्वच्छता नांदेल असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी एक पेड मां के नामउपक्रमाचे महत्त्वही  विशद केले आणि प्रत्येकाने झाडे लावावीत आणि ती आपल्या आईला समर्पित  करावीत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पंतप्रधानांनी फिट इंडिया अभियानाबद्दलही चर्चा केली. प्रत्येकाने योगाभ्यास करण्यासाठी वेळ काढावा, शारिरीक तंदुरुस्ती आणि कल्याणावर भर द्यावा असा सल्लाही त्यांनी दिला. ही बाब बलशाली आणि निरोगी राष्ट्राच्या जडणघडणीसाठी गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पंतप्रधानांनी परदेशातून आलेल्या सहभागी प्रतिनिधीसोबतही संवाद साधला. या कार्यक्रमात सहभाग घेऊन आपल्याला आनंद झाल्याची भावना या प्रतिनिधीनी  व्यक्त केली. या प्रतिनिधींनी भारताच्या आदरातिथ्याचेही कौतुक केले आणि त्यांच्या भेटी दरम्यानचे सकारात्मक अनुभव सामायिक केले.

***

N.Chitale/S.Kakade/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com