Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी एनसीसी छात्रसैनिक आणि एनएसएसच्या स्वयंसेवकांना केले संबोधित

पंतप्रधानांनी एनसीसी छात्रसैनिक आणि एनएसएसच्या स्वयंसेवकांना केले संबोधित


नवी दिल्‍ली, 24 जानेवारी 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) छात्रसैनिक  आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) स्वयंसेवकांना संबोधित केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनाचे चित्रण करणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा अभिमानाने उल्लेख केला . ते म्हणाले की या कार्यक्रमामुळे आज भारताचा इतिहास जिवंत झाला आहे.

त्यांनी या कार्यक्रमात सहभागी असलेल्या चमूच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि सांगितले की ते आता प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचा भाग असतील. 75 वा प्रजासत्ताक दिन सोहळा आणि भारताच्या नारी शक्तीला समर्पित संचलन या दोन कारणांमुळे तो खास आहे असे पंतप्रधान म्हणाले. देशभरातून सहभागी झालेल्या महिलांचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, त्या येथे एकट्या नाहीत , त्यांनी त्यांच्यासोबत त्यांच्या राज्यांची ओळख, त्यांची संस्कृती, परंपरा आणि त्यांच्या समाजाचा पुरोगामी विचार आपल्यासोबत आणला आहे.

आज आणखी एका विशेष प्रसंगाची दखल घेत पंतप्रधानांनी राष्ट्रीय बालिका दिनाचा उल्लेख केला. मुलींचे धैर्य, दृढनिश्चय आणि कर्तृत्व साजरे करणारा हा दिवस आहे. “भारताच्या मुलींमध्ये  समाजाच्या कल्याणासाठी सुधारणा करण्याची क्षमता आहे”, असे सांगत विविध ऐतिहासिक कालखंडात समाजाचा पाया रचण्यात महिलांनी दिलेले योगदान त्यांनी अधोरेखित केले आणि म्हणाले, हा विश्वास आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात  दिसून आला.“

जननायक कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा उल्लेख करून पंतप्रधान मोदी यांनी हे सरकारचे सौभाग्य असल्याचे नमूद केले आणि आजच्या तरुण पिढीने या महान व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेण्याची गरज अधोरेखित केली. अत्यंत हलाखीची गरीबी आणि सामाजिक विषमता असतानाही ते मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतरही त्यांनी आपला विनम्र स्वभाव त्यांनी कायम ठेवला. “त्यांचे संपूर्ण जीवन सामाजिक न्याय आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी समर्पित होते” असे पंतप्रधान म्हणाले.

गरीबांवर लक्ष केंद्रित करणे आणि शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरु केलेली विकसित भारत संकल्प यात्रा यांसारख्या उपक्रमांमधून कर्पूरी ठाकूर यांची प्रेरणा प्रतिबिंबित होते असे मोदी म्हणाले.

तुमच्यातील अनेक जण पहिल्यांदाच दिल्लीला आले आहात असे सांगत, प्रजासत्ताक दिन सोहळ्याबद्दलचा उत्साह आणि उत्कंठा तुमच्या चेहऱ्यावर दिसते, असे पंतप्रधानांनी नमूद केले. दिल्लीतील कडाक्याच्या थंडीचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, उपस्थित असलेल्या अनेकांनी असे हवामान पहिल्यांदाच अनुभवले असेल. भारतातील विविध प्रांतातील वैविध्यपूर्ण हवामान स्थिती देखील त्यांनी अधोरेखित केली.

अशा कठीण हवामानात तालीम करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचे आणि त्यांच्या आजच्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले. तुम्ही जेव्हा आपापल्या घरी परत जाल तेव्हा प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा अविस्मरणीय अनुभव सोबत घेऊन जाल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. “हीच भारताची खासियत आहे” , “एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास केल्यावर प्रत्येक नागरिकाला नवीन अनुभव मिळतो ”असे  पंतप्रधान म्हणाले. 

“आजच्या पिढीला Gen Z म्हणून संबोधले जात असले तरी, मी तुम्हाला अमृत पिढी म्हणणे पसंत करतो,” असे पंतप्रधान म्हणाले. सध्याच्या पिढीची ऊर्जाच अमृत काळात देशाच्या प्रगतीला चालना देईल असे त्यांनी अधोरेखित केले. 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार करताना पंतप्रधानांनी भारताच्या भविष्यासाठी आणि सध्याच्या पिढीसाठी पुढील 25 वर्ष महत्त्वाची असल्यावर भर दिला. “अमृत पिढीची सर्व स्वप्ने पूर्ण करण्याचा, अगणित संधी निर्माण करण्याचा आणि त्यांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करणे हा सरकारचा संकल्प आहे” असे पंतप्रधान म्हणाले. आजच्या कामगिरीमध्ये दिसून आलेली शिस्त, केंद्रित दृष्टिकोन  आणि समन्वय  याच्या आधारे अमृत काळातील स्वप्ने साकार करता येतील असे त्यांनी नमूद केले.  

“देश सर्वप्रथम’ हे अमृत पिढीचे मार्गदर्शक तत्त्व असायला हवे, याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. आपल्या आयुष्यात निराशेला कधीही स्थान देऊ नका, असे आवाहन पंतप्रधानांनी युवकांना केले. प्रत्येक छोट्या योगदानाचे महत्त्व सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, “यही समय है सही समय है, ये आपका समय है, अर्थात हीच वेळ आहे, योग्य वेळ आहे, ही तुमची वेळ आहे.” सध्याच्या क्षणाचे महत्त्व सांगून पंतप्रधानांनी युवकांना विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांचा संकल्प मजबूत करण्याचे, आणि ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्याचे आवाहन केले, ज्यायोगे, भारतीय प्रतिभा जगाला नवी दिशा देईल, आणि नवीन क्षमता मिळवेल, जेणेकरून भारत जगाच्या समस्या सोडवू शकेल. तरुणांना आपल्यामधील क्षमतांची पूर्णपणे जाणीव व्हावी, यासाठीचे मार्ग शोधण्याचे टप्पे त्यांनी सांगितले आणि नव्याने खुल्या झालेल्या क्षेत्रांमधील नव्या संधींचा उल्लेख केला. अंतराळ क्षेत्रात नवीन संधी निर्माण करणे, व्यवसाय सुलभतेसाठी प्रयत्न करणे, संरक्षण उद्योगात खासगी क्षेत्राचे स्थान निर्माण करणे, राष्ट्रीय संशोधन प्राधिकरणाची स्थापना करणे आणि 21 व्या शतकातील आधुनिक शैक्षणिक सुविधा निर्माण करणे, ही उदाहरणे पंतप्रधान मोदी यांनी दिली. भारतातील शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्याचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला, ज्यामुळे विशिष्ट प्रवाह किंवा विषयाशी बांधील न राहता मातृभाषेतून उच्च शिक्षण घेता येईल. तरुणांना संशोधन आणि नवोन्मेषात सहभागी होण्याचे प्रोत्साहन देत पंतप्रधानांनी अटल टिंकरिंग लॅबचा उल्लेख केला, जी सर्जनशीलता आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देते. सैन्यात भरती होऊन करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींसाठी सरकारने नवीन संधी निर्माण केल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “आता मुलींनाही विविध सैनिक शाळांमध्ये प्रवेश घेता येईल”, त्यांना पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आवाहन करून पंतप्रधान म्हणाले, “तुमचे प्रयत्न, तुमचा दृष्टीकोन, तुमची क्षमता भारताला नवीन उंचीवर घेऊन जाईल”.

सर्व स्वयंसेवक त्यांच्या उर्जेला योग्य दिशा देत आहेत, याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी नमूद केले की ज्याच्यामध्ये शिस्तीची भावना आहे, ज्यांनी देशात खूप प्रवास केला आहे आणि ज्यांचे विविध भाषा बोलणारे विविध प्रांतातील मित्र आहेत त्यांचा व्यक्तिमत्व विकास होणे स्वाभाविक आहे. “याला कमी लेखले जाऊ नये”, असे सांगत, पंतप्रधान मोदी म्हणाले की हा एखाद्याच्या संपूर्ण जीवनाचा सर्वात महत्वाचा भाग असू शकेल. आरोग्याला प्रथम प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले. आणि शारीरिक सक्षमता राखण्यासाठी शिस्तीची गरज अधोरेखित केली. “प्रेरणा कधी कधी कमी पडू शकते, मात्र,  शिस्त तुम्हाला  योग्य मार्गावर ठेवते”, पंतप्रधानांनी नमूद केले आणि त्यांनी अधोरेखित केले की, शिस्त ही प्रेरणा बनली तर प्रत्येक क्षेत्रात विजय निश्चित असतो.

एनसीसीशी असलेल्या त्यांच्या संबंधांवर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की, एनसीसी, एनएसएस यासारख्या संस्था किंवा सांस्कृतिक शिबिरे तरुणांना समाज आणि नागरी कर्तव्यांची जाणीव करून देतात.

त्यांनी ‘माय युवा भारत’ या आणखी एका संस्थेच्या स्थापनेची माहिती दिली आणि तरुणांना ‘माय भारत’ स्वयंसेवक म्हणून आपली नोंदणी करण्याचे आवाहन केले.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यादरम्यान, अनेक कार्यक्रम पाहण्याच्या, विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याच्या आणि तज्ञांना भेटण्याच्या अनेक संधी मिळतील, यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. “हा एक अनुभव असेल जो तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील. दरवर्षी तुम्ही प्रजासत्ताक दिनाचे पथसंचलन पाहाल तेव्हा तुम्हाला हे दिवस आठवतील आणि तुम्हाला हे देखील आठवेल की मी तुम्हाला हे सांगितले होते”, पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी युवकांना आवाहन केले की, त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातील त्यांचे अनुभव आणि आपण काय शिकलो, हे रेकॉर्ड करावे, जे नमो अॅपवर लिखित किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरुपात पंतप्रधानांसोबत शेअर करता येईल. “आजची तरुण पिढी नमो अॅपद्वारे माझ्या सतत संपर्कात राहू शकते”, पंतप्रधान म्हणाले. 

आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी तरुणांच्या सामर्थ्यावरचा आपला विश्वास व्यक्त केला. तरुणांनी परिश्रमपूर्वक शिक्षण घ्यावे, कर्तव्यदक्ष नागरिक बनावे, पर्यावरणाचे रक्षण करावे, वाईट सवयी टाळाव्यात, आणि देशाचा वारसा आणि संस्कृतीचा अभिमान बाळगावा, असे आवाहन केले. “माझे आशीर्वाद, माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत”, पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग सिंह ठाकूर, आणि केंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

* * *

R.Aghor/Sushma/Rajshree/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai