Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशात वाराणसी येथे 12,100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी

पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशात वाराणसी येथे 12,100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या विविध  विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी


नवी दिल्‍ली, 7 जुलै 2023 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे 12,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरचा पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन – सोननगर रेल्वे  मार्ग,  विद्युतीकरण किंवा दुपदरीकरण पूर्ण झालेले तीन रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग -56 च्या वाराणसी-जौनपूर खंडाचे चौपदरीकरण तसेच  वाराणसीमधील विविध प्रकल्पांचे लोकार्पण यांचा समावेश आहे.

पंतप्रधानांनी 15 पीडब्ल्यूडी रस्त्यांचे बांधकाम आणि नूतनीकरण, 192 ग्रामीण पेयजल योजना, धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण सहा स्नान घाटांवर फ्लोटिंग चेंजिंग रूम जेटी सह मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र घाटांची पुनर्रचना आणि पुनर्विकास  आणि सीआयपीईटी संकुल करसारा येथे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह  यासह विविध  रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी केली. मोदी यांनी लाभार्थ्यांना पीएम स्वनिधी कर्ज, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत  ग्रामीण घरांच्या चाव्या आणि आयुष्मान कार्ड वितरणाचा प्रारंभ केला.  केले. कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यावर  पंतप्रधानांनी मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र घाटांच्या प्रारूपाची  पाहणी केली.

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, श्रावण महिन्याचा प्रारंभ , भगवान विश्वनाथ आणि गंगा मातेचा आशीर्वाद तसेच वाराणसीच्या लोकांच्या उपस्थितीने जीवन धन्य होते . हजारो शिवभक्त ‘जल’ अर्पण करण्यासाठी वाराणसीला येत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आणि यावर्षी इथे विक्रमी संख्येने भाविक येतील असा विश्वास व्यक्त केला. वाराणसीला येणारे लोक नेहमी आनंदी भावनेने परततात”, असे पंतप्रधानांनी येथील  नागरिकांच्या आदरातिथ्यावर प्रकाश टाकताना सांगितले.जी 20 च्या प्रतिनिधींचे स्वागत केल्याबद्दल आणि धार्मिक स्थळांचा परिसर स्वच्छ आणि भव्य ठेवल्याबद्दल त्यांनी काशीतील लोकांचे कौतुक केले.

ज्या प्रकल्पांची पायाभरणी झाली त्या  सुमारे 12000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा संदर्भ देत , “काशीचा प्राचीन आत्मा कायम ठेवत नवीन कायापालट  करण्याच्या  आमच्या संकल्पाचा हा विस्तार आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी या प्रकल्पांसाठी जनतेचे अभिनंदन केले.

यापूर्वी विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला. पूर्वीच्या काळात योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या, विद्यमान सरकारने लाभार्थ्यांशी चर्चा आणि संवादाची एक नवीन परंपरा सुरू केली आहे, याचा अर्थ ‘थेट लाभ आणि थेट अभिप्राय’, असे त्यांनी सांगितले. यामुळे विभाग आणि अधिकाऱ्यांची कामगिरी चांगली झाली आहे, असेही ते म्हणाले.“स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी लोकशाहीचा खरा लाभ खर्‍या अर्थाने योग्य लोकांपर्यंत पोहोचला आहे”, असे पंतप्रधानांनी सांगितले.

सरकार प्रत्येक योजनेचा  लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे लाभार्थी वर्ग हा सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षतेच्या खर्‍या स्वरूपाचे उदाहरण बनला आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले . या दृष्टिकोनामुळे दलाली मागणारे दलाल आणि घोटाळेबाजांचे नामोनिशाण राहिलेले नाही  आणि त्यामुळे भ्रष्टाचार आणि भेदभाव नाहीसा झाला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

गेल्या 9 वर्षांत सरकारने केवळ एका कुटुंबासाठी आणि एका पिढीसाठी काम केले नाही तर भविष्यातील पिढ्यांचे जीवन सुधारण्यासाठीही काम केले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी यावेळी  प्रधानमंत्री आवास योजनेचे उदाहरण दिले. या योजने अंतर्गत   4 कोटींहून अधिक कुटुंबांना पक्की घरे देण्यात आली आहेत आणि आज उत्तर प्रदेशमध्ये 4 लाख पक्की घरे लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. “ही घरे सुरक्षिततेची भावना निर्माण करतात आणि घरमालकांचा आत्मविश्वास वाढवतात”,असे सांगत  या घरांच्या बहुतेक घरमालक अशा महिला आहेत ज्यांच्या नावावर  पहिल्यांदाच  मालमत्ता नोंदवली गेल्याचे त्यांनी अधोरेखित केले.  ही पक्की घरे अशा महिलांना आर्थिक सुरक्षिततेचे साधन उपलब्ध करून देतात, असे ते म्हणाले.
सरकारी योजनांच्या प्रभावाविषयी पुढे बोलत, पंतप्रधानांनी आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती निदर्शनास आणून दिली. ही योजना, केवळ 5 लाखांपर्यंतच्या  मोफत उपचारापुरती मर्यादित नाही, ती अनेक पिढ्यांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम करणारी आहे. अनेक घरांमध्ये, वैद्यकीय खर्चामुळे पुढच्या पिढ्या नापिकी आणि कर्जाच्या खाईत लोटल्या जाऊ शकतात. “आयुष्मान भारत योजना गरीब लोकांना अशा संकटापासून वाचवत आहे. आणि म्हणूनच, सर्व गरिबांना हे  कार्ड मिळावे, यासाठी मी स्वतः मिशन मोडवर प्रयत्न करत आहे’ असे पंतप्रधान म्हणाले. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात, आयुष्मान  भारत योजनेची कार्डे, एक कोटी साठ लाख लोकांना वितरित करण्यानेच झाली.

“एखाद्या राष्ट्राच्या संसाधनांवर सर्वात मोठा हक्क, त्या देशातील गरीब आणि वंचितांचा असतो”, असे पंतप्रधान म्हणाले. 50 कोटी जन धन खाती आणि मुद्रा योजनेंतर्गत विनातारण कर्जे यासारख्या आर्थिक समावेशनाच्या  योजनांचा उल्लेख त्यांनी  केला. याचा फायदा गरीब, दलित, वंचित, मागास, आदिवासी, अल्पसंख्याक आणि महिला उद्योजकांना झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

पीएम स्वनिधी योजनेविषयी देखील पंतप्रधान बोलले. देशातील अनेक फेरीवाले,हातगाडीवाले मागास समुदायातून येत असले, तरीही, आधीच्या सरकारांनी कधीही त्यांचे प्रश्न समजून घेतले नाहीत उलट त्यांना त्रासच दिला गेला, असा आरोप त्यांनी केला. आतापर्यंत, 35 लाख लोकांना पीएमस्वनिधी योजनेचा लाभ मिळाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आणि आजही, वाराणसी इथल्या 1.25लाख पेक्षा अधिक लाभार्थ्यांना कर्जे वितरित करण्यात आली आहेत, “ गरिबांचा आत्मसन्मान हा  मोदीचा शब्द आहे” असे पंतप्रधान म्हणाले.

आधीच्या सरकारांच्या काळात, अप्रामाणिक गोष्टी केल्यामुळे निधीची कमतरता जाणवत होती. आज, “गरीब कल्याणाच्या योजना असोत किंवा पायाभूत सुविधा, कशासाठीही निधीची कमतरता नाही. करदाते तेच आहेत, व्यवस्था तीच आहे, केवळ सरकार बदलले आहे.” आता इरादे बदलले आहेत, आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसतच आहेत.” असे ते म्हणाले. घोटाळे आणि काळाबाजाराच्या भूतकाळातील बातम्यांची जागा नवीन प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणीच्या बातम्यांनी घेतली आहे. या बदलाचे उदाहरण म्हणून त्यांनी पूर्व समर्पित मालवाहू मार्गिका (ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर), मालगाड्यांसाठी विशेष ट्रॅकच्या प्रकल्पांचे दाखले दिले. 2006 मध्ये या प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली होती मात्र,  2014 पर्यंत एक किलोमीटर लांबीचा रूळही दिसला नाही, अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या 9 वर्षांत या प्रकल्पाचा महत्त्वपूर्ण भाग पूर्ण झाला असून त्या भागात मालगाड्याही  सुरू झाल्या आहेत.

“आजही दीनदयाल उपाध्याय जंक्शनपासून नवीन सोननगर विभागाचे उद्घाटन झाले आहे. यामुळे केवळ मालगाड्यांचा वेग वाढणार नाही तर ईशान्य भारत आणि पूर्व भारतात रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण होतील ”, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.

वेगाने धावणाऱ्या गाड्यांची भारताची गरज अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की जरी राजधानी एक्सप्रेस देशात 50 वर्षांपूर्वी पहिल्यांदा धावली असली तरी ती आजतागायत केवळ 16 मार्गांवरच धावू शकली आहे. यावेळी त्यांनी 30-35 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या आणि सध्या केवळ 19 मार्गांवर धावत असलेल्या शताब्दी एक्सप्रेसचे देखील उदाहरण दिले. पंतप्रधानांनी वंदे भारत एक्सप्रेसला अधोरेखित केले आणि सांगितले की 4 वर्षांच्या थोडक्या कालखंडात ही ट्रेन 25 मार्गांवर धावत आहे. “ देशातील पहिल्या वंदे भारत चा बहुमान बनारसला मिळाला, असे त्यांनी नमूद केले. गोरखपूर येथून आज गोरखपूर- लखनौ आणि जोधपूर- अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाड्या  रवाना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.  

“ही वंदे भारत मध्यमवर्गामध्ये अत्यंत लोकप्रिय झाली  आहे आणि तिची मागणी वाढतच चालली आहे”, मोदी म्हणाले. तो दिवस दूर नाही ज्यावेळी वंदे भारत देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्याला जोडलेली असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या 9 वर्षात काशीमधील दळणवळणात सुधारणा करण्यासाठी झालेल्या अभूतपूर्व कामावर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी यामुळे अनेक नव्या रोजगारसंधी निर्माण झाल्या असल्याची बाब अधोरेखित केली. 7 कोटी पर्यटक आणि भाविकांनी काशीला भेट दिली आहे आणि एका वर्षात ही वाढ 12 पट झाली असून त्यामुळे रिक्षा ओढणाऱ्यांपासून दुकानदार, ढाब्यावर आणि हॉटेलात काम करणारे लोक आणि बनारसी साडी उद्योगाला  अधिक चांगल्या  उत्पन्ना संधी निर्माण होत असल्याचे  त्यांनी नमूद केले. नावाड्यांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले आणि संध्याकाळच्या गंगा आरतीच्या वेळी बोटींच्या संख्येबाबत आश्चर्य व्यक्त केले. “तुम्ही लोक अशा प्रकारे बनारसची काळजी घेत आहात”, ते म्हणाले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी आजच्या प्रकल्पांबद्दल सर्वांचे अभिनंदन केले आणि वाराणसीच्या विकासाचा हा प्रवास ‘बाबा’च्या आशीर्वादाने असाच पुढे सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला.

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्रनाथ पांडे, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रो. एस. पी. सिंग बाघेल आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

पंतप्रधानांनी समर्पित मालवाहतूक मार्गिकेवरील पंडित  दीनदयाल  उपाध्याय जंक्शन- सोन नगर रेल्वे मार्गाचे लोकार्पण केले. 6760 कोटी रुपये खर्चाने उभारण्यात आलेल्या या नव्या मार्गामुळे मालाची वाहतूक अधिक वेगाने आणि कार्यक्षम पद्धतीने होणार आहे. त्यांनी विद्युतीकरण झालेल्या किंवा दुहेरी मार्ग झालेल्या 990 कोटी रुपये खर्चाच्या तीन रेल्वे मार्गांचे देखील लोकार्पण केले. यामध्ये गाझीपूर- औनरिहार रेल्वे मार्ग,  औनरिहार- जौनपूर रेल्वे मार्ग आणि भटनी- औनरिहार या मार्गांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे उत्तर प्रदेशातील रेल्वे मार्गाचे 100 टक्के विद्युतीकरणाचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. 

राष्ट्रीय महामार्ग 56 च्या वाराणसी – जौनपूर या भागाच्या चौपदरीकरण कामाचे लोकार्पण पंतप्रधानांनी केले. त्यासाठी 2750 कोटी रूपयांचा खर्च आला. हे काम पूर्ण झाल्यामुळे वाराणसी ते लखनौ प्रवास अधिक सोपा आणि वेगवान झाला आहे.  

पंतप्रधानांनी  वाराणसीत अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 18 रस्त्यांचे बांधकाम आणि नूतनीकरण; बनारस हिंदू विद्यापीठ (बीएचयू) परिसरात   आंतरराष्ट्रीय कन्या वसतिगृह इमारतीचे बांधकाम; कारसारा गावात सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे (सीआयपीईटी)- व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र; सिंदौरा येथे पोलीस स्टेशन सुविधा आणि निवासी इमारत, भुल्लनपूर येथे पीएसी, पिंद्रा येथे अग्निशमन केंद्र आणि तरसाडा येथील सरकारी निवासी शाळा; आर्थिक गुन्हे संशोधन संस्थेची इमारत; मोहन कटरा ते कोनिया घाटापर्यंत मलजल वाहिनी  आणि रामना गावात आधुनिक मलकुंड  व्यवस्थापन व्यवस्था ; दुहेरी बाजूचे 30 बॅकलिट एलईडी युनिपोल; रामनगर येथे राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या (एनडीडीबी) दुग्ध प्रकल्पाच्या ठिकाणी शेणावर आधारित बायोगॅस संयंत्र; आणि गंगा नदीत भक्तांना स्नान करण्यासाठी दशाश्वमेध घाटावरच्या जेटीत कपडे बदलण्यासाठी एक तरंगती खोली अशा विकासकामांचा समावेश आहे.

चौखंडी, कादीपूर आणि हरदत्तपूर रेल्वे स्थानकांजवळचे 3 द्विपदरी रेल्वे ओव्हर ब्रिज  बांधणे; व्यासनगर – पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम; आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 15 रस्त्यांचे बांधकाम आणि नूतनीकरण या कामांची पायाभरणी पंतप्रधानांनी केली.  हे प्रकल्प सुमारे 780 कोटी रुपयांच्या एकत्रित खर्चाने विकसित केले जातील.

जलजीवन मिशन अंतर्गत 550 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून उभारण्यात  येणाऱ्या 192 ग्रामीण पेयजल योजनांची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. या योजनेमुळे 192 गावांतील 7 लाख लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल.

पंतप्रधानांनी मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र घाटांच्या पुनर्रचना आणि पुनर्विकासाची पायाभरणीही केली. पुनर्विकास घाटांमध्ये सार्वजनिक सुविधा, प्रतीक्षालय, लाकूड साठवण, कचऱ्याची विल्हेवाट आणि पर्यावरणपूरक स्मशान चिता यांच्या तरतुदी असतील.

दशाश्वमेध घाटाच्या फ्लोटिंग चेंजिंग रूम जेटींच्या धर्तीवर वाराणसीतील गंगा नदीवरील सहा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्नान घाटांवर अशा खोल्या आणि कारसाराच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंगच्या (सीआयपीइटी) परिसरात विद्यार्थी वसतिगृहाचे बांधकाम या कामांची पायाभरणीही आज झाली.

कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील लाभार्थ्यांना पीएम स्वनिधीचे कर्ज, पंतप्रधान  आवास योजनेअंतर्गत ग्रामीण घरांच्या चाव्या आणि आयुष्मान भारत कार्डचे वाटप केले. यामुळे 5 लाख लाभार्थ्यांचा गृहप्रवेश, पात्र लाभार्थ्यांना 1.25 लाख कर्जाचे वितरण आणि 2.88 कोटी आयुष्मान कार्डचे वितरण सुरू होईल.

 

 

 

 

 

 

* * *

S.Kakade/Sushma/Sonal C/Shailesh P/Radhika/Prajna/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai