पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील ऑइल इंडिया लिमिटेडच्या तेल विहिर क्र बाग़जन-5 मधील गळती आणि आग लागल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.
आढावा बैठकीला गृहराज्यमंत्री अमित शहा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, इतर केंद्रीय मंत्री आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या विहिरीतून 27 मे 2020 रोजी अनियंत्रित गॅस गळतीला सुरुवात झाली. त्यानंतर गळतीवर नियंत्रण ठेवण्याच्या तयारी सुरु असताना 9 जून 2020 रोजी या विहिरीला आग लागली. आसपासच्या भागात राहणाऱ्या कुटुंबांना तिथून हलविण्यात आले आहे आणि राज्य सरकारने ऑइल इंडिया लिमिटेड यांच्या सहकार्याने मदत शिबिरे उभारली आहेत. या मदत शिबिरांमध्ये अंदाजे 9,000 लोक राहत आहेत. त्वरित मदत उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने चिन्हित केलेल्या 1610 कुटुंबांसाठी प्रत्येकी 30,000 रुपये मंजूर झाले आहेत.
पंतप्रधानांनी आसामच्या जनतेला आसामच्या मुख्यमंत्र्यांमार्फत आश्वासन दिले की केंद्र सरकार पीडित कुटुंबांना सहाय्य तसेच मदत आणि पुनर्वसन पुरविण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. या दुर्दैवी घटनेमुळे उद्भवलेल्या या कठीण परिस्थितीत राज्य सरकारच्या पाठीशी उभे आहे. या घटनेचा अभ्यास करून त्याचे दस्तऐवजीकरण करण्याचे निर्देश त्यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाला दिले जेणेकरून भविष्यात ते निष्कर्ष उपयुक्त ठरतील भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि अशा दुर्घटना उद्भवल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी आपल्या स्वतःच्या संघटनांमध्ये अधिक क्षमता आणि कौशल्य विकसित केले पाहिजे.
आढावा बैठकीत माहिती देण्यात आली की विहिरीतून वायूचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी आणि तो बंद करण्यासाठी भारतीय आणि परदेशी तज्ञांच्या मदतीने सविस्तर योजना आखण्यात आली आहे. तयार केलेल्या वेळापत्रकानुसार ही योजना राबविण्यात येत असून आवश्यक ती सुरक्षाविषयक खबरदारी घेत 7 जुलै 2020 रोजी विहीर बंद करण्याचा प्रस्ताव आहे.
B.Gokhale/S.Kane/P.Kor
Reviewed the situation in the wake of the Baghjan fire tragedy in Assam. Centre and state government are working to ensure proper relief and rehabilitation to those affected. https://t.co/X0Cz6bVUDS
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2020