Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी आसामच्या सोनितपूर जिल्ह्यात विकासप्रकल्पांचा आरंभ करताना केलेले भाषण

पंतप्रधानांनी आसामच्या सोनितपूर जिल्ह्यात विकासप्रकल्पांचा आरंभ करताना केलेले भाषण


नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी 2021

 

भारत माता की जय

भारत माता की जय

भारत माता की जय

आसामचे लोकप्रिय मुख्यमंत्री  सर्वानंद सोनोवाल जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी रामेश्वर तेली जी, आसाम सरकार मधील मंत्री  हेमंता बिस्वा सरमा जी, अतुल बोरा जी,  केशव महंता जी,  रंजित दत्ता जी, बोडोलॅंड टेरीटोरियल रिजनचे मुख्य  प्रमोद बोरो जी, इतर सर्व खासदार, आमदार आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो.

मौर भाई बहिन सब,  तहनिदेर कि खबर, भालइ तौ?  खुलुमबाय। नोंथामोंनहा माबोरै दं? गेल्या महिन्यात मी आसामला आलो होतो. गरीब ,पिडीत , शोषित, वंचित समाजातील लोकांना जमिन वितरण करायच्या कार्यक्रमाचा भाग बनायचे सौभाग्य मला लाभले होते. तेव्हा मी म्हटले होते की आसाममधील आपणा लोकांचा स्नेह आणि आपले प्रेम एवढे मोठे आहे की ते मला पुन्हा पुन्हा आसाममध्ये घेऊन येते. आता पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना प्रणाम करण्यासाठी आलो आहे.  आपल्या सर्वांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे.    मी काल सोशल मीडियावर पहिले आणि नंतर ट्विट सुद्धा केले की ढाक्याजुली किती सुंदररित्या सजवले आहे. तुम्ही  लोकांनी एवढे दीप प्रज्वलित केलेत. या आपलेपणासाठी मी आसामच्या  जनतेच्या चरणांशी प्रणाम सादर करतो. मी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद जी,  हेमंता जी, रंजीत दत्ता जी तसेच सरकारमधील  आणि भाजपाच्या संघटनेत असलेल्या प्रत्येकाचे कौतुक करतो. ते सर्वजण एवढ्या वेगाने आसामच्या विकासाला, आसामची सेवा करत आहेत कि मला पुन्हा पुन्हा येथे विकास कार्यक्रमात येण्याची संधी मिळत आहे . आजचा दिवस तर माझ्यासाठी अजून एका कारणामुळे खूप खास आहे. मला आज सोनितपुर ढेक्याजुलीच्या या पवित्र धरतीला प्रणाम करण्याची संधी मिळाली आहे. ही तीच धरणी आहे जेथे रुद्रपद मंदिराजवळच आसामचा शतकानुशतकांचा पुरातन इतिहास आपल्या समोर आला होता. ही तीच भूमी आहे जेथे आसामच्या लोकांनी आक्रमणकर्त्यांना  हरवले होते. आपले ऐक्य, आपली शक्ती, आपले शौर्य याची ओळख करून दिली होती. 1942 मध्ये याच भूमीवर आसामच्या स्वातंत्र्ययोद्ध्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी, तिरंग्याच्या सन्मानासाठी आपले बलिदान दिले होते. आमच्या याच शहीदांच्या पराक्रमावर भूपेन हजारिकाजी म्हणायचे.

भारत हिंहह आजि जाग्रत हय।

प्रति रक्त बिन्दुते,

हहस्र श्वहीदर

हाहत प्रतिज्ञाओ उज्वल हय।

म्हणजे आज भारताचे सिंह जागे  झाले आहेत.  या शहिदांच्या रक्ताचा एक एक थेंब, त्यांचे साहस आमच्या संकल्पांना मजबूती देते. यामुळे शहिदांच्या शौर्याचा साक्ष असलेली ही सोनितपूर ची धरित्री आसामचा हा भूतकाळ माझे मन पुन्हा पुन्हा असमिया गौरवाने भरून टाकतो.

मित्रहो,

आपण सर्व नेहमी हे ऐकत , बघत आलो आहोत की देशातली पहिली सकाळ ईशान्य प्रदेशात  होते,  पण ईशान्य प्रदेश आणि आसाममध्ये विकासाची सकाळ उजाडायला भरपूर वाट बघावी लागली. हिंसा, अभाव, तणाव ,भेदभाव, पक्षपात, संघर्ष या सर्व गोष्टी मागे सोडून आता संपूर्ण ईशान्य प्रदेश  विकासाच्या मार्गाने पुढे जात आहे. आणि आसाम यात प्रमुख भूमिका निभावत आहे.

ऐतिहासिक बोडो शांती करारानंतर नुकतेच बोडोलांड टेरिटोरियल कौन्सिलच्या निवडणुकांनी येथे विकास आणि विश्वासाचा नवीन अध्याय लिहिला आहे. आजचा दिवससुद्धा आसामचे भाग्य आणि आसामचे भविष्य यातील स्थित्यंतराचा साक्षीदार आहे. आज एका बाजूला विश्वनाथ आणि चरईदेव येथे दोन वैद्यकीय  महाविद्यालयांची

भेट आसामला मिळत आहे आणि तेथेच ‘असम माला’च्या माध्यमातून आधुनिक  पायाभूत सुविधांचा पायाही घातला जातो आहे.

अखमर बिकाखर जात्रात आजि एक उल्लेखजोग्य़ दिन। एइ बिखेख दिनटोत मइ अखमबाखीक आन्तरिक अभिनन्दन जनाइछोँ।

मित्रहो,

एकत्रित प्रयत्न, एकत्रित संकल्प याचे काय फळ मिळते याचे एक मोठे उदाहरण म्हणजे आसाम आहे. आपल्याला पाच वर्षांपूर्वीचा तो काळ आठवत असेल तेव्हा आसामातल्या अधिकाधिक दुर्गम भागात चांगली रुग्णालये  हे फक्त स्वप्नातच होते. चांगले रुग्णालये , उत्तम उपचार  याचा अर्थ होता तासन् तास प्रवास, तासन् तास वाट बघणे आणि सततच्या अगणित अडचणी. मला आसामच्या लोकांनी सांगितले आहे की ही चिंता भेडसावायची  की कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती  येऊ नये.  परंतु या समस्या आता तोडगा मिळवण्याच्या दिशेने पुढे जात आहेत. आपण सहजपणे हा फरक बघू शकता. आपणास त्याची जाणीव होऊ शकते. स्वातंत्र्यानंतर सात दशकांमध्ये म्हणजे 2016 पर्यंत आसामात केवळ सहा मेडिकल कॉलेज होती. परंतु, या पाच वर्षांमध्ये आसामात 6 आणखी वैद्यकीय  महाविद्यालय उभारण्याचे काम सुरू केले गेले आहे. आज उत्तर आसाम आणि अप्पर आसाम मधल्या गरजांचा विचार करून बिस्वनाथ आणि चरईदेव मध्ये दोन आणखी वैद्यकीय  महाविद्यालयांचा शिलान्यास झाला आहे. ही वैद्यकीय  महाविद्यालय आधुनिक आरोग्य सेवांची केंद्रे तर बनतीलच. त्याच बरोबर पुढील काही वर्षांमध्ये इथूनच माझे हजारो नवयुवक डॉक्टर बनून बाहेर पडतील. आपण बघा 2016 पर्यंत आसाममध्ये  जवळपास सव्वा सातशे एकूण एमबीबीएस सीट्स होत्या. पण हे नवीन वैद्यकीय  महाविद्यालय जसे सुरू होईल, आसामला प्रत्येक वर्षी सोळाशे नवीन एमबीबीएस डॉक्टर मिळू लागतील. आणि माझे एक आणखी स्वप्न आहे. मोठे स्वप्न वाटेल पण माझ्या देशातील गावांमध्ये माझ्या देशातील गरिबांच्या घरांमध्ये गुणवत्तेची  कमतरता अजिबात नसते, त्यांना फक्त संधी मिळत नाही. स्वतंत्र भारत आता जेव्हा पंचाहत्तरीत प्रवेश करतो आहे तेव्हा माझे एक स्वप्न आहे. प्रत्येक राज्यात कमीत कमी एक वैद्यकीय  महाविद्यालय , कमीत कमी एक टेक्निकल कॉलेज मातृभाषेत शिकवणे चालू करेल. असमिया भाषेत शिकून कोणी चांगले डॉक्टर बनू शकत नाही का?  स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्षे होत आली. आणि म्हणूनच निवडणुकांनंतर आसाममध्ये नवीन सरकार येईल, तेव्हा मी इथे आसामातल्या माणसांच्या वतीने आपल्याला वचन देतो की आसामलासुद्धा एक मेडिकल कॉलेज स्थानिक भाषेमधले आम्ही सुरु करू , एक टेक्निकल कॉलेज स्थानिक भाषेमधले सुरू करू आणि हळूहळू यात वाढ होईल.  हे थांबू शकत नाही.  हे डॉक्टर्स आसामातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये ,  दुर्गम इलाख्यांमध्ये आपली सेवा देतील.  यामुळे इलाज सोपे होतील.  लोकांना इलाजासाठी खूप दूर जावे लागणार नाही.

मित्रहो,

आज गुवाहाटीमध्ये एम्सचे कामसुद्धा वेगाने पुढे जात आहे.  याचे काम पुढील दीड दोन वर्षांमध्ये पूर्ण होईल. एम्सच्या आत्ताच्या कॅम्पसमध्ये या शैक्षणिक  सत्रापासून पहिली बॅच सुरू सुद्धा झाली आहे. जसजसा पुढील काही वर्षात नवीन कॅम्पस तयार होईल आपण बघालच की गुवाहाटी आधुनिक आरोग्य सेवेचे केंद्र  म्हणून उभारी घेत सामोरे येईल.

गुवाहाटी फक्त आसामच्याच नाही, तर संपूर्ण पूर्वोत्तरच्या जीवनात एक मोठे परिवर्तन घडवून आणणार आहे. आज मी एम्सबद्दल बोलतोच आहे तर एक प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो.

देशातील आधीची सरकारे का समजू शकली नाही कि गुवाहाटीमध्येच एम्स असेल तर आपणा सर्वांना किती फायदा होईल ते? हे लोक पूर्वोत्तर भागापासून एवढे दूर होते की आपले त्रास ते कधी समजूच शकले नाहीत.

मित्रहो,

आज केंद्र सरकारच्या वतीने आसामच्या विकासासाठी संपूर्ण निष्ठेने काम केले जात आहे. देशाच्या बरोबरीने आसाम खांद्याला खांदा लावून पुढे जात आहे. आयुष्मान भारत योजना असो, जन औषधी केंद्र असो, प्रधानमंत्री नॅशनल डायलिसिस प्रोग्राम असो, हेल्थ वेलनेस सेंटर असो, आज संपूर्ण देशात सामान्य माणसाच्या जीवनात जो बदल बघायला मिळतो आहे, अगदी तसाच बदल, तश्याच सुधारणा आसाममध्येही दिसत आहेत.

आसामात आयुष्मान भारत योजनेचा फायदा जवळपास सव्वा कोटी गरिबांना मिळत आहे. मला सांगितले गेले की आसाम मध्ये साडेतीनशेपेक्षा जास्त रुग्णालये या योजनेशी जोडली गेली आहेत. एवढ्या कमी कालावधीत आसाममधील दीड लाख गरीबांनी आयुष्मान भारतच्या माध्यमातून स्वतः वर मोफत उपचार करून घेतले आहेत. या सर्व योजनांमुळे आसामच्या गरिबांचे शेकडो कोटी रुपये उपचारावर खर्च होण्यापासून वाचले आहेत. गरीबाचा पैसा वाचला आहे. आयुष्मान भारत योजनेबरोबरच लोकांना सरकारच्या अटल अमृत अभियानाचा सुद्धा फायदा होत आहे. या योजनेतून गरीबासोबतच सर्वसाधारण स्तरातील नागरिकांनाही अगदी कमी हप्त्यामध्ये आरोग्य विम्याचा फायदा दिला जात आहे. याबरोबरच आसामच्या कोपऱ्या कोपऱ्यातून हेल्थ अँड वेलनेस सेंटर्स सुद्धा उघडली जात आहेत. ती गावातल्या गरिबांच्या प्राथमिक आरोग्याची काळजी घेत आहेत. मला सांगितले गेले आहे की या सेंटर्सवर आत्तापर्यंत आसाममधल्या 55 लाखांहून अधिक बंधू-भगिनींनी स्वतःवर प्राथमिक उपचार करून घेतले आहेत.

मित्रहो,

आरोग्य सेवांच्या बाबतीतील संवेदनशीलता आणि आधुनिक सुविधांचे महत्व याची जाणीव देशाला  कोरोनाकाळात  अगदी व्यवस्थित झाली. देशाने कोरोनाशी ज्याप्रकारे झुंज दिली, ज्या प्रभावी तऱ्हेने भारत आपला व्हॅक्सिन प्रोग्रॅम पुढे नेत आहे, त्याची स्तुती आज संपूर्ण जगातून होताना  दिसते आहे. कोरोनापासून धडा घेत देशाने देशातील प्रत्येक नागरिकाचे जीवन सुरक्षित आणि सरल बनवण्यासाठी अजूनच वेगाने काम सुरू केले आहे. याची झलक आपल्याला या वेळच्या बजेटमध्ये सुद्धा बघायला मिळाली आहे.  बजेटमध्ये या वेळेस आरोग्यावर होणाऱ्या खर्चात अभूतपूर्व वाढ केली गेली आहे. सरकारने हे सुद्धा ठरवले आहे की आता देशातील 600 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये इंटिग्रेटेड लॅब्ज उभारल्या जातील. ज्या छोट्या  खेड्यातील आणि गावातील लोकांना मेडिकल टेस्ट साठी दूर जावे लागते त्यांना याचा फार मोठा लाभ होईल.

मित्रहो,

आसामची संपन्नता,  येथील प्रगती याचे एक मोठे केंद्र म्हणजे आसामच्या चहाच्या बागा सुद्धा आहेत. सोनितपुरचा लाल चहा तर तसाही आपल्या वेगळ्या चवीसाठी ओळखला जातो सोनितपूर आणि आसाम चहाचा स्वाद किती खास असतो  हे माझ्याहून अधिक व्यवस्थित कोणाला माहित असेल?  म्हणून मी कामगारांची प्रगती आसामच्या प्रगतीशी जोडूनच बघतो. मला आनंद वाटतो की या बाबतीत सुद्धा आसामचं सरकार वेगवेगळे सकारात्मक प्रयत्न करत आहे. अगदी आसाम चहा बगीचा धन पुरस्कार मेला या योजनेच्या माध्यमातून साडेसात लाख टी गार्डन वर्कर्सच्या  खात्यांमध्ये करोडो रुपये थेट ट्रान्सफर केले गेले आहेत. चहाच्या मळ्यात  काम करणाऱ्या गर्भवती महिलांना एका विशेष योजनेच्या माध्यमातून थेट मदत दिली जात आहे. टी वर्कर्स आणि त्यांच्या परिवाराच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी, तपासणी आणि उपचारांसाठी मोबाईल मेडिकल युनिटसुद्धा पाठवले जाते. औषधांचीही सोय केली जाते. आसाम सरकारच्या याच प्रयत्नांशी जोडून घेत यावर्षी देशाच्या अर्थसंकल्पात  सुद्धा चहा बागांमध्ये काम करणाऱ्या आमच्या बंधू आणि भगिनींसाठी एक हजार कोटी रुपयांच्या विशेष योजनेची घोषणा केली गेली आहे. हा पैसा आपल्याला मिळणाऱ्या सुविधांमध्ये वाढ करेल , आपल्या टी वर्कर्सचे जीवन अधिक सुलभ करेल.

मित्रहो,

आज जेव्हा मी आसामच्या टी वर्कर्सच्या बाबतीत बोलत आहे तेव्हा मी सध्याच्या दिवसांमध्ये देशाच्या विरोधात सुरू असलेल्या षड्यंत्रांच्या बाबतीत सुद्धा सांगू इच्छितो. आज देशाला बदनाम करण्यासाठी कट रचणारे या स्तरापर्यंत पोचले आहेत की भारताच्या चहालासुद्धा त्यांनी सोडलेले नाही. आपण बातम्यांमध्ये ऐकलं असेलच, हे कट रचणारे लोक म्हणत आहेत की भारताच्या प्रतिमेला बदनाम करायचे आहे. अगदी योजनाबद्ध पद्धतीने भारताच्या चहाच्या प्रतिमेला जगभरात बदनाम करायचे आहे. काही कागदपत्रे समोर आली आहे ज्यातून खुलासा होतो आहे की भारत आणि चहा या ओळखीवर प्रहार करण्याच्या प्रयत्नात काही परदेशी शक्ती गुंतल्या आहेत. आपल्याला असा हल्ला करणं योग्य वाटतं?  या अशा हल्ल्यांनंतर गप्प राहणारे आपल्याला योग्य वाटतात? हल्ला करणाऱ्यांची तारिफ करणारे आपल्याला योग्य वाटतात का? प्रत्येकाला उत्तर द्यावेच लागेल. त्यांनी हिंदुस्तानचा चहा बदनाम करायचा विडा उचलला आहे आणि त्यांच्याबाबतीत इथे गप्प बसलेल्या प्रत्येक राजकीय पक्षांपासून हर एक चहा  बागेला  उत्तर हवे आहे. हिंदुस्तानचा चहा  पिणाऱ्या प्रत्येक मनुष्याला उत्तर हवे आहे. मी आसामच्या धरतीवरून या कट रचणाऱ्यांना सांगू इच्छितो की, यांनी हवे तितके कट रचावेत, पण देश यांचे अपवित्र मनसुबे  यशस्वी होऊ  देणार नाही. माझा टी वर्कर ही लढाई जिंकूनच राहील.  भारताच्या चहावर केल्या जात असलेल्या या हल्ल्यामध्ये एवढी ताकद नाही की ते आमच्या गार्डन वर्कर्सच्या परिश्रमांशी झुंज घेऊ शकतील. देश याच प्रकारे विकास आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे जात राहील. आसाम याच प्रकारे विकासाची नवनवीन उंची गाठत राहील आसामच्या विकासाचं हे चक्र याच प्रकारे वेगाने फिरत राहील.

मित्रहो,

आज जेव्हा आसामात प्रत्येक क्षेत्रामध्ये एवढे काम होत आहे, प्रत्येक वर्ग आणि प्रत्येक क्षेत्र यांचा जो विकास होत आहे यावेळी आसामचे सामर्थ्य अधिक वाढवण्याचीही आवश्यकता आहे. आसामचे सामर्थ्य वाढवण्याच्या कामी येथील आधुनिक रस्ते आणि इन्फ्रास्ट्रक्चर  प्रमुख भूमिका निभावतात. हेच लक्षात घेऊन आज भारतमाला प्रकल्पाच्या  धर्तीवर आसामसाठी ‘असम माला’ चा आरंभ केला गेला आहे. येत्या पंधरा वर्षांमध्ये आसाममध्ये भल्या मोठ्या महामार्गांचे  जाळे असावे. येथील सर्व गावे मुख्य रस्त्यांशी जोडली गेली असावीत, येथील रस्ते देशातील मोठ्या शहरांत प्रमाणे आधुनिक असावेत. ‘असम माला’ प्रोजेक्ट आपली स्वप्ने पूर्ण करेल, आपले सामर्थ्य वाढवेल. गेल्या काही वर्षांमध्ये असे हजारो किलोमीटर रस्ते तयार केले गेले आहेत, नवनवीन पूल उभारले गेले आहेत. आज भूपेन हजारिका ब्रिज आणि सरायघाट ब्रिज आसामच्या आधुनिक ओळखीचा भाग बनून राहिले आहेत. येणाऱ्या दिवसांमध्ये हे काम आणखीनच वेगाने होणार आहे. विकास आणि प्रगती यांची गती वाढवण्यासाठी या वेळी अर्थसंकल्पात पायाभूत विकासावर  जोर दिला गेला आहे. एका बाजूला आधुनिक पायाभूत सुविधांवर काम तर दुसऱ्या बाजूला ‘असम माला’ सारख्या प्रोजेक्टच्या मदतीने कनेक्टिव्हिटी वाढवण्याचे काम. आपण कल्पना करा, येणाऱ्या दिवसांमध्ये आसामात किती काम होणार आहे आणि या कामांमध्ये किती युवकांना रोजगार मिळणार आहे. जेव्हा अधिक चांगले हायवेज असतील, अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल तेव्हा व्यापार आणि उद्योगसुद्धा वाढतील पर्यटनसुद्धा वाढेल. ज्यामुळे आमच्या युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी तयार होतील ,आसामच्या विकासाला  नवीन गती मिळेल.

मित्रहो,

आसामचे प्रसिद्ध कवी रूप कुंवर ज्योति प्रसाद अगरवाल यांच्या ओळी आहेत.

मेरी नया भारत की,

नया छवि,

जागा रे,

जागा रे,

आज याच ओळी साकार करून आपणास नवीन भारताला जाग आणायची आहे. हा नवीन भारत आत्मनिर्भर भारत असेल. हा नवीन भारत, आसामला विकासाच्या नव्या उंचीवर पोचवेल.  या माझ्या शुभेच्छांसह आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. माझ्यासोबत दोन्ही मुठी आवळून म्हणा, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, खूप खूप धन्यवाद.

 

* * *

S.Kane/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com