तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन!
तुम्ही सर्व जण मानवतेसाठी एक खूप मोठे कार्य करून परतले आहात. ऑपरेशन दोस्तशी संबंधित संपूर्ण टीम, मग ते एनडीआरएफ असो, लष्कर असो, हवाई दळ असो किंवा आमचे इतर सेवा भागीदार असोत, त्यांनी अप्रतिम काम केले आहे. आणि एवढेच नव्हे तर आमच्या मुक्या मित्रांनी, श्वान पथकातील सदस्यांनीही अद्भुत क्षमता दाखवली आहे. देशाला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे.
मित्रांनो,
आपल्या संस्कृतीने आपल्याला वसुधैव कुटुंबकम ही शिकावण दिली आहे आणि हा मंत्र ज्या श्लोकामध्ये सांगितला आहे, तो तर खूपच प्रेरणादायी आहे. अयं निजः परो वेति गणना लघु चेतसाम्। उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्॥ म्हणजेच विशाल अंतःकरण असलेली माणसे कधीही आपपरभाव मानत नाहीत. म्हणजेच ते सर्व सजीवांना आपले मानून त्यांची सेवा करतात.
मित्रांनो,
तुर्किए असो किंवा सीरिया, संपूर्ण पथकाने या भारतीय मूल्यांचे दर्शन घडवले आहे. आपण सर्व विश्वाला एक कुटुंब मानतो. अशा वेळी जर कुटुंबातील एखाद्या सदस्यावर संकट आले तर त्याच्या मदतीसाठी तत्परतेने पुढे येणे हा भारताचा धर्म आहे, ते भारताचे कर्तव्य आहे. देश कोणताही असो, मानवतेचा, मानवी संवेदनशीलतेचा मुद्दा असेल, तर भारत मानवहिताला सर्वोच्च प्राधान्य देतो.
मित्रांनो,
नैसर्गिक संकटाच्या वेळी सहाय्य किती तत्परतेने दिले गेले याला अतिशय महत्व आहे. अपघाताच्या वेळी जसा गोल्डन अवर – सुवर्ण तास म्हणतात तसाच नैसर्गिक संकटाचाही सुवर्णकाळ असतो. बचाव आणि मदत पथक किती लवकर पोहोचले, याला महत्व आहे. तुर्किए मध्ये भूकंपानंतर तुम्ही सर्व इतक्या वेगाने तिथे पोहोचलात की त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले. यातून तुमची सज्जता दिसून येते, तुमच्या प्रशिक्षणातील कौशल्य दिसून येते. पूर्ण दहा दिवस तुम्ही सर्वानी ज्या निष्ठेने प्रत्येक आव्हानाचा सामना करत मदत केली ते खरोखर प्रेरणादायी आहे. तिथली एक आई तुमच्या कपाळाचे चुंबन घेऊन तुम्हाला आशीर्वाद देते तेव्हाची ती छायाचित्रे आपण सर्वांनी पाहिली आहेत. ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले निष्पाप जीव जेव्हा तुमच्या प्रयत्नांमुळे पुन्हा फुलले. ढिगार्यांच्या मधोमध, एक प्रकारे तुम्ही देखील तिथे मृत्यूचा सामना करत होतात. पण मी हे सुद्धा सांगेन की तिथून येणाऱ्या प्रत्येक छायाचित्राबरोबर देशाच्या मनात अभिमानाची भावना जागृत होत होती. तिथे गेलेल्या भारतीय पथकाने व्यावसायिकतेसह दाखवलेल्या मानवी संवेदना अतुलनीय आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती आघातातून जात असते, जेव्हा कोणीतरी सर्वस्व गमावल्यानंतर पुन्हा शुद्धीवर येण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा ते अधिक उपयुक्त ठरते. अशा परिस्थितीत लष्कराचे रुग्णालय आणि तेथील जवानांनी ज्या संवेदनशीलतेने काम केले तेही वाखाणण्याजोगे आहे.
मित्रांनो,
2001 मध्ये जेव्हा गुजरात मध्ये भूकंप आला होता, तेव्हा तो मागील शतकातील सर्वात मोठा भूकंप असल्याचे मानले जात होते, मग हा भूकंप तर त्यापेक्षा कित्येक पटींनी मोठा आहे. जेव्हा गुजरात मध्ये भूकंप आला होता, तेव्हा मी बराच काळ स्वयंसेवक म्हणून तेथील मदत कार्यात गर्क होतो. ढिगारा हटवण्यामध्ये येणारी संकटे, ढिघाऱ्याखालील लोकांना शोधण्यातील आव्हाने, खाण्या पिण्याची आबाळ किती होते, औषधांपासून ते दवाखान्यापर्यंत सर्वच आवश्यक असते आणि मी पहिले होते की भुज मधील संपूर्ण रुग्णालय त्या भूकंपात उध्वस्त झाले होते. म्हणजेच, संपूर्ण व्यवस्था नष्ट झाली होती आणि मला त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला आहे. त्याच प्रमाणे १९९५ मध्ये गुजरातमधील मोरबी येथील मच्छू धरण फुटून संपूर्ण गाव पाण्याने उद्ध्वस्त होऊन संपूर्ण मोरबी शहर उद्ध्वस्त झाले होते, त्यात शेकडो लोकांचा बळी गेला होता. त्यानंतरही मी स्वयंसेवक म्हणून महिनोनमहिने तिथे राहून काम करायचो. आज माझे ते अनुभव आठवले की, तुमची मेहनत, तुमची तळमळ, तुमच्या भावना किती प्रबळ आहेत याची मी कल्पना करू शकतो. तुम्ही काम तिथे करत होतात मात्र तुम्ही कोणत्या अवस्थेत काम करत असाल याची मी येथे कल्पना करत होतो. आणि म्हणूनच आज माझ्यासाठी तुम्हाला सलाम करण्याची संधी आहे आणि मी तुम्हाला सलाम करतो.
मित्रांनो,
जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःची मदत स्वतः करू शकते तेव्हा आपण त्यांना स्वावलंबी म्हणतो. परंतु जेव्हा कोणी इतरांना मदत करायला पुढे येतो तेव्हा तो निस्वार्थ म्हणवतो. हे केवळ व्यक्तींनाच नाही तर राष्ट्रांनाही लागू होते. म्हणूनच भारताने गेल्या काही वर्षात स्वावलंबनासोबत निस्वार्थीपणाची आपली ओळख सिद्ध केली आहे. जेव्हा आपण तिरंगा घेऊन कुठेही जातो तेव्हा एक आश्वासन मिळते की आता भारतीय पथक आले आहे, म्हणजे परिस्थिती लवकरच सुधारेल. आणि सीरियाचे उदाहरण द्यायचे तर तेथील एका बॉक्सवर दाखवलेला ध्वज उलटा होता, नारंगी रंग, भगवा रंग तळाशी होता, तेव्हा तेथील नागरिकाने ते नीट केले आणि अभिमानाने सांगितले की मी भारताचे आदरपूर्वक आभार मानतो. तिरंगा ध्वजाबाबतीत हीच भावना आम्ही काही काळापूर्वी युक्रेन मध्ये देखील पहिली होती. भारताचा तिरंगा जेव्हा संकटात सापडलेल्या अनेक देशांतील भारतीय नागरिकांसाठी तसेच मित्रांसाठी ढाल बनला, तेव्हा ऑपरेशन गंगाने सर्वांसाठी आशास्थान बनून एक मोठा आदर्श घालून दिला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आम्ही आमच्या प्रियजनांना अफगाणिस्तानातून सुखरूप परत आणले, आम्ही ऑपरेशन देवीशक्ति राबवले. हीच बांधिलकी आपण कोरोना जागतिक महामारीच्या काळातही पाहिली.
अनिश्चितेच्या त्या वातावरणात भारताने एकेका नागरिकाला मायदेशी परत आणण्याचा विडा उचलला होता. आपण इतर देशातील अनेक लोकांना देखील मदत केली होती. भारतानेच जगभरातील शेकडो गरजू देशांपर्यंत आवश्यक ती औषधे आणि लस पोहोचवली. म्हणूनच आज जगभरात भारताविषयी एक सद्भावना आहे.
मित्रांनो,
ऑपरेशन दोस्त, मानवतेप्रती भारताचे समर्पण आणि संकटात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी तत्काळ उभे राहण्याची आपली कटिबद्धता दर्शविणारे अभियान आहे. जगात कुठेही संकट आले असेल तर भारत सर्वप्रथम मदतीचा हात देण्यासाठी सज्ज असतो. नेपाळचा भूकंप असो, मालदीव मध्ये, श्रीलंकेत आलेली संकटे असो, भारताने सर्वात आधी मदतीचा हात पुढे केला होता. आता तर भारताच्या सैन्य दलांसह एन डी आर एफ ने देखील देशातील लोकांच्या मनात एक विश्वासार्ह भावना तयार केली आहे. देशात कुठेही संकट असो, संकटाची शक्यता असो, चक्रीवादळ असो, लोक जेव्हा अशा संकटात तुम्हाला बघतात, तेव्हा ते तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतात. तुमचं म्हणणं ऐकतात. संकटाचा कोणताही प्रसंग असो, चक्रीवादळ असो किंवा भूकंप एन डी आर एफ च्या वर्दीत जेव्हा तुम्ही आणि तुमचे सहकारी घटनास्थळी पोहचतात, तेव्हा लोकांची उमेद परत येते, विश्वास परत येतो. हीच एक खूप मोठी उपलब्धी आहे. जेव्हा कोणत्याही दलात कौशल्यासोबत संवेदनशीलता ही असते,तेव्हा त्या दलाला मानवी चेहरा मिळतो. आणि त्याची ताकद कित्येक पटीने वाढते. यासाठी मी एन डी आर एफ ची विशेष प्रशंसा करेन.
मित्रांनो,
आपल्या सज्जतेविषयी देश आश्वस्त आहोत. मात्र आपल्याला इथेच थांबायचे नाही. आम्हाला संकटकाळात मदत आणि बचावाचे सामर्थ्य अधिक वाढवायचे आहे.जगातील सर्वश्रेष्ठ बचाव आणि मदत पथक म्हणून आपली ओळख अधिक सक्षम करायची आहे आणि म्हणूनच जेव्हा मी आपल्याशी बोलत होतो, तेव्हा सातत्याने आपल्याला विचारत होतो, की इतर देशातील पथके, जी तिथे आली होती, त्यांची कार्यशैली, त्यांची उपकरणे, कशी आहेत, कारण आपण घेतलेले प्रशिक्षण जेव्हा प्रत्यक्षात उपयोगात येते, त्यावेळी आपली कार्यकुशलता आणखी वाढते, तीक्ष्ण होते.
इतक्या मोठ्या संकटकाळात जेव्हा आपण तिथे पोहोचलात, त्यावेळी, संवेदना आणि जबाबदारी या भावनेतून,मानवतेच्या आपल्या नात्यातून, आपण काम तर केलेच आहे, पण तुम्ही खूप काही शिकूनही आला आहात. खूप काही जाणून घेतले आहे. इतक्या मोठ्या संकटकाळात जेव्हा आपण काम करतो, तेव्हा दहा गोष्टींचे आपण निरीक्षण करत असतो. विचार करतो, असं झालं नसतं तर किती चांगलं झालं असतं. असं केलं असतं तर अधिक बरं झालं असतं, ते असं करत आहेत, आपणही करु या, असा सगळा विचार करुन आपण आपल्या क्षमता वाढवत असतो. गेले 10 दिवस तुर्कीयेच्या लोकांप्रती आपण आपली जबाबदारी पार पाडत होतो. मात्र, तिथे तुम्ही जे शिकलात, त्याचे दस्तऐवजीकरण केले पाहिजे. त्यातून आपण नवे काय शिकू शकतो? अजूनही अशी कुठली आव्हाने आहेत, ज्यांच्यासाठी आपली ताकद आपल्याला अजून वाढवावी लागेल. आपली क्षमता वाढवावी लागेल. आता जसे आपल्या मुली तिथे गेल्या, पहिल्यांदाच गेल्या, आणि मला जी माहिती मिळाली, त्यानुसार, आपल्या मुलींच्या उपस्थितीमुळे, तिथल्या स्त्रियांमध्ये एक विश्वास निर्माण झाला. त्या मोकळेपणाने आपल्या तक्रारी, आपल्या वेदना सांगू शकल्या. आता आधी कोणी असा विचार करत असतील, इतके मोठे काम आहे, तिथे आपल्या मुलींच्या पथकाला पाठवून त्यांना कशाला त्रास द्यायचा? पण यावेळी आम्ही हा निर्णय घेतला आणि मग आमच्या मुलीही तिकडे गेल्या. त्यांची संख्या मर्यादित असेल, पण तिथे एक आपलेपणाचे नाते जोडण्यासाठी हा उपक्रम खूप कामाचा ठरला. मला असा विश्वास आहे, की आपली तयारी-सज्जता जितकी उत्तम असेल, आपण जगाची तेवढीच उत्तम सेवा करु शकतो. मला विश्वास आहे मित्रांनो, आपण खूप मोठे काम करुन आला आहात आणि खूप काही शिकूनही आला आहात. तुम्ही जे केले आहे, त्याने देशाचा मानसन्मान वाढला आहे. आणि तुम्ही जे शिकला आहात, त्याला जर आपण संस्थात्मक स्वरूप दिले, तर येणाऱ्या भविष्यात आपण लोकांसाठी एक नवा विश्वास निर्माण करु शकतो. आणि मला पूर्ण विश्वास आहे, की आपल्यापैकी प्रत्येकाकडे सांगण्यासाठी कहाण्या असतील, अनुभव असतील. काही ना काही तरी निश्चितच सांगण्यासारखे असेल. आणि मी हे विचारत राहायचो, मला आनंद व्हायचा, की आपल्या पथकातील सगळे लोक नीट आहेत, सुरक्षित आहेत, त्यांची प्रकृतीही चांगली आहे. कारण त्याचीही चिंता होती, की हवामान, तापमान खूप वेगळे आहे. जिथे अशा प्रकारच्या दुर्घटना होतात, तिथे काही व्यवस्था असणे, शक्यच नसते. कोणालाच शक्य नसते. मात्र, अशा कठीण स्थितीतही, अडचणी असूनही तुम्ही काम केले आहे, आणि आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. तुम्ही बरेच काही शिकूनही आला आहात, जे भविष्यात कामी येईल. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो. मला कल्पना आहे, आपण सगळे आजच परत आले आहात. थकले असाल. मात्र मी गेले दहा दिवस आपल्या संपर्कात होतो, तुमच्याकडून माहिती घेत होतो, त्यामुळे मनाने मी तुमच्यासोबतच होतो. म्हणून मला इच्छा झाली की, तुम्हाला बोलवावे, तुमचे अभिनंदन करावे, आपण इतके उत्तम काम करुन आला आहात, त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना सलाम करतो!
धन्यवाद !
***
GopalC/BhaktiS/RadhikaA/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
Interacting with personnel involved in #OperationDost in Türkiye and Syria. Their efforts in disaster response and relief measures have been commendable. https://t.co/D80SShsFn3
— Narendra Modi (@narendramodi) February 20, 2023
Glimpses from the interaction with the human assistance and disaster relief personnel who were a part of 'Operation Dost.' pic.twitter.com/xk5KUeRpG3
— Narendra Modi (@narendramodi) February 20, 2023
India has always believed in being self sufficient and selfless. pic.twitter.com/3KyRQlcYHP
— Narendra Modi (@narendramodi) February 20, 2023
India is always ready to help those facing humanitarian challenges. pic.twitter.com/55L9MqUV81
— Narendra Modi (@narendramodi) February 20, 2023
The efforts of entire team involved in rescue and relief measures during #OperationDost is exemplary. pic.twitter.com/xIzjneC1dH
— PMO India (@PMOIndia) February 20, 2023
For us, the entire world is one family. #OperationDost pic.twitter.com/kVFeyrJZQ4
— PMO India (@PMOIndia) February 20, 2023
Humanity First. #OperationDost pic.twitter.com/Aw8UMEvmmT
— PMO India (@PMOIndia) February 20, 2023
India's quick response during the earthquake has attracted attention of the whole world. It is a reflection of the preparedness of our rescue and relief teams. #OperationDost pic.twitter.com/G4yfEnvlMK
— PMO India (@PMOIndia) February 20, 2023
Wherever we reach with the 'Tiranga', there is an assurance that now that the Indian teams have arrived, the situation will start getting better. #OperationDost pic.twitter.com/npflxt29Kz
— PMO India (@PMOIndia) February 20, 2023
India was one of the first responders when earthquake hit Türkiye and Syria. #OperationDost pic.twitter.com/Rmnmm6DrqT
— PMO India (@PMOIndia) February 20, 2023
The better our own preparation, the better we will be able to serve the world. #OperationDost pic.twitter.com/pZYUE85Daa
— PMO India (@PMOIndia) February 20, 2023