Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी अखिल भारतीय महापौर परिषदेचे केले उद्घाटन

पंतप्रधानांनी अखिल भारतीय महापौर परिषदेचे केले उद्घाटन


नवी दिल्‍ली, 17 डिसेंबर 2021

 

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अखिल भारतीय महापौर परिषदेचे उद्घाटन केले.  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यावेळी उपस्थित होते.

मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधानांनी प्राचीन वाराणसी शहरातील नजीकच्या काळातील घडामोडींचा उल्लेख केला.  काशीचा विकास हा संपूर्ण देशासाठी पथदर्शी ठरू शकतो, या त्यांच्या विधानाची आठवण त्यांनी करून दिली.  

आपल्या देशातील बहुतेक शहरे ही पारंपारिक शहरे आहेत, जी पारंपारिक पद्धतीने विकसित झाली आहेत असे पंतप्रधान म्हणाले. आधुनिकीकरणाच्या या युगात या शहरांचा पुरातन वारसाही तितकाच महत्त्वाचा आहे.  ही शहरे आपल्याला वारसा आणि स्थानिक कौशल्ये कशी जपायची हे शिकवू शकतात, अशी टिप्पणी त्यांनी केली.  विद्यमान वास्तू नष्ट करणे हा मार्ग नसून पुनरुज्जीवन आणि जतन करण्यावर भर द्यायला हवा. आधुनिक काळाच्या गरजेनुसार हे केले पाहिजे, असे पंतप्रधानांनी आवर्जून सांगितले.  

स्वच्छतेसाठी शहरांमध्ये निरोगी स्पर्धेचे आवाहन पंतप्रधानांनी केले. सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांसह स्वच्छतेसाठी सर्वोत्तम प्रयत्न करणाऱ्या शहरांचीही दखल घेण्यासाठी नवीन श्रेणी असू शकतात का यावर विचार केला पाहिजे असे सांगत, स्वच्छतेबरोबरच शहरांच्या सुशोभिकरणाचाही त्यांनी आग्रह धरला.  यासंदर्भात त्यांनी महापौरांना त्यांच्या शहरातील प्रभागांमध्ये निरोगी स्पर्धा भावना निर्माण करण्यास सांगितले.

‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’शी संबंधित कार्यक्रम जसे की स्वातंत्र्य संग्रामाच्या संकल्पनेवर आधारित ‘रांगोळी’ स्पर्धा, स्वातंत्र्य लढ्यावरील गीतगायन स्पर्धा आणि ओव्यांची, अंगाईगीतांची स्पर्धा, असे कार्यक्रम त्यांनी महापौरांना राबवण्यास सांगितले. पंतप्रधान आपल्या भाषणात आणि मन की बातमधे याचा सतत आग्रह धरतात.

महापौरांनी शहरांचे वाढदिवस शोधून साजरे करावेत, अशी सूचनाही पंतप्रधानांनी केली.  नद्या असलेल्या शहरांनी नदी उत्सव साजरा केला पाहिजे.  लोकांनी नद्यांचा अभिमान बाळगावा आणि त्या स्वच्छ ठेवल्या पाहिजेत यासाठी नद्यांचे वैभव वाढवण्याची, त्याचे महत्व सर्वदूर सांगण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.  “नद्या शहरी जीवनाच्या पुन्हा केंद्रस्थानी आणल्या पाहिजेत.  यामुळे आपल्या शहरांना नवसंजीवनी मिळेल” असे पंतप्रधान म्हणाले. एकदाच वापरल्या जाणार्‍या प्लास्टिक निर्मूलनाच्या विरोधातील मोहिमेला पुनरुज्जीवित करण्याचे त्यांनी महापौरांना सांगितले.  कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्याचे मार्ग शोधावेत.  “आपले शहर देखील स्वच्छ आणि निरोगी असावे, हा आपला प्रयत्न असावा”, असे ते म्हणाले. 

महापौरांनी त्यांच्या शहरातील पथदिवे आणि घरांमध्ये एलईडी बल्बचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाईल याची खातरजमा करावी, हे काम युद्धपातळीवर करावे असे त्यांनी सांगितले. सध्याच्या योजनांचा नव्या उपयोगांसाठी वापर करून त्या पुढे नेण्याचा विचार केला पाहिजे असे ते म्हणाले. महापौरांनी शहरातील एनसीसी युनिट्सशी संपर्क साधून शहरातील पुतळे स्वच्छ करण्यासाठी गट तयार करावेत, तसेच ‘आझादी का अमृत महोत्सव’ च्या पार्श्वभूमीवर थोर व्यक्तिमत्त्वांवर व्याख्याने आयोजित करावीत असे त्यांनी सांगितले.  

त्याचप्रमाणे महापौर त्यांच्या शहरातील एखादे ठिकाण निवडू शकतात आणि पीपीपीच्या धर्तीवर आझादी का अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने एक स्मारक तयार उभारु शकतात असे पंतप्रधान म्हणाले.

‘एक जिल्हा एक उत्पादन’ कार्यक्रमाचा संदर्भ देत, पंतप्रधानांनी महापौरांना त्यांच्या शहरांची, विशिष्ट ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. शहरातील काही विशिष्ट उत्पादन किंवा ठिकाणाद्वारे जे  प्रसिद्ध झाले आहेत याचा त्यात समावेश असावा.

पंतप्रधानांनी त्यांना शहरी जीवनातील विविध पैलूंबाबत लोकाभिमुख विचार विकसित करण्यास सांगितले.  सार्वजनिक वाहतुकीच्या वापराला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.  त्यांनी महापौरांना सुगम्य भारत अभियान- सुलभ भारत अभियानानुसार त्यांच्या शहरातील प्रत्येक सुविधा दिव्यांगांसाठी अनुकूल असल्याची खातरजमा करण्यास सांगितले.

“आपली शहरे ही आपल्या अर्थव्यवस्थेची प्रेरक शक्ती आहेत.  आपण शहरांना चैतन्यदायी अर्थव्यवस्थेचे केंद्र बनवले पाहिजे” असे ते म्हणाले.  आर्थिक उलाढालींना आमंत्रण देणारी आणि प्रोत्साहन देणारी परिसंस्था निर्माण करण्यासाठी सर्व सुविधा एकाच वेळी विकसित होणारी सर्वांगीण व्यवस्था तयार करण्यास त्यांनी त्यांना सांगितले.

आपल्या विकासाच्या मॉडेलमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) सक्षम करण्याच्या गरजेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.  “रस्त्यावरील विक्रेते (फेरीवाला)  हे आपल्या प्रवासाचा एक भाग आहेत, त्यांचा त्रास आपण प्रत्येक क्षणी पाहतो. त्यांच्यासाठी आपण पंतप्रधान स्वानिधी योजना आणली आहे.  ही योजना खूप चांगली आहे.  तुमच्या शहरात त्यांची यादी बनवा आणि त्यांना मोबाईल फोनचे व्यवहार करायला शिकवा.  यामुळे अधिक चांगल्या पद्धतीने बँक वित्तपुरवठा सुलभ होईल”, असे पंतप्रधान म्हणाले.  ते म्हणाले की महामारीच्या काळात त्यांचे महत्त्व अगदी स्पष्टपणे समोर आले.

काशीच्या विकासासाठी महापौरांनी त्यांच्या अनुभवातून सूचना कराव्यात,  “मी तुमच्या सूचनांसाठी कृतज्ञ राहीन आणि मी तुमचा पहिला विद्यार्थी होईन” अशी विनंती करून पंतप्रधानांनी समारोप केला.

सरदार पटेल अहमदाबादचे महापौर होते आणि देश आजही त्यांचे स्मरण करतो, असे पंतप्रधान म्हणाले.  महापौर पद हे अर्थपूर्ण राजकीय कारकीर्दीसाठी एक महत्वपूर्ण पायरी ठरू शकते जिथे तुम्ही या देशातील लोकांची सेवा करू शकता”, असेही पंतप्रधान म्हणाले.
 

 

 

 

 

* * *

M.Chopade/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com