नवी दिल्ली, 7 मार्च 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिले राष्ट्रीय निर्माणकर्ते पुरस्कार 8 मार्च 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता नवी दिल्लीत भारत मंडपम इथे प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
कथाकथन, सामाजिक बदलासाठी प्रयत्न, पर्यावरणीय शाश्वतता, शिक्षण, गेमिंग यांसह इतर विविध क्षेत्रांमधील सर्वोत्तम गुणवत्ता आणि तिचा प्रभाव यांची दखल घेण्याच्या हेतूने या पुरस्कारांची सुरुवात करण्यात येत आहे. कल्पकतेतून सकारात्मक बदल घडवू पाहणाऱ्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे.
पुरस्काराच्या पहिल्याच वर्षात मोठ्या प्रमाणावर लोकसहभागाची नोंद झाली आहे. पहिल्या फेरीत विविध 20 श्रेणीतील पुरस्कारांसाठी 1.5 लाखांहून अधिक नामांकने प्राप्त झाली. त्यानंतर मतदान फेरीत जवळपास 10 लाख मतांची नोंद झाली. त्यातून 23 निर्माणकर्त्यांची निवड करण्यात आली असून त्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील तीन निर्माणकर्त्यांचा समावेश आहे. प्रचंड लोकसहभाग हा हे पुरस्कार खऱ्या अर्थाने लोकांची पसंती दर्शवणारा असल्याची ग्वाही आहे.
पुरस्कार 20 श्रेणींमध्ये दिले जाणार असून त्यामध्ये उत्कृष्ट कथाकथनकार, व्यत्यय निर्माणकर्ता, ख्यातनाम निर्माणकर्ता, ग्रीन चॅम्पिअन, सामाजिक बदलासाठी उत्कृष्ट निर्माणकर्ता, सर्वात प्रभावी कृषी निर्माणकर्ता, सांस्कृतिक राजदूत, आंतरराष्ट्रीय निर्माणकर्ता, उत्कृष्ट प्रवास निर्माणकर्ता, स्वच्छतादूत, नव्या भारताचा चॅम्पिअन, टेक निर्माणकर्ता, वारसा फॅशन आयकॉन, सर्वात कल्पक निर्माणकर्ता व निर्माणकर्ती यांसह खाद्य, शिक्षण, गेमिंग, मायक्रो, नॅनो तसेच आरोग्य व फिटनेस निर्माणकर्ता यांचा समावेश आहे.
* * *
S.Kane/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai