Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या हस्ते 41,000 कोटी रुपयांच्या 2000 हून अधिक रेल्वेविषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांची कोनशीला, उद्घाटन आणि लोकार्पण

पंतप्रधानांच्या हस्ते 41,000 कोटी रुपयांच्या 2000 हून अधिक रेल्वेविषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांची कोनशीला, उद्घाटन आणि लोकार्पण


नवी दिल्‍ली, 26 फेब्रुवारी 2024 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 41,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह देशातील 2000 हून अधिक रेल्वेविषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांची कोनशीला, उद्घाटन आणि लोकार्पण झाले. देशभरातील 500 रेल्वे स्थानके आणि 1500 इतर ठिकाणांहून लाखो लोक या विकसित भारत विकसित रेल्वे कार्यक्रमाशी जोडले गेले होते.

याप्रसंगी बोलताना, पंतप्रधान म्हणाले की आजचा कार्यक्रम हा नव्या भारताच्या नव्या कार्यसंस्कृतीचे प्रतीक आहे. “भारत आज जे काही करून दाखवतो आहे, ते तो अभूतपूर्व वेग आणि प्रमाणासह करतो आहे. आम्ही मोठी स्वप्ने बघतो आणि ती पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करतो. विकसित भारत विकसित रेल्वे कार्यक्रमातून हा निर्धार स्पष्टपणे दिसून येतो,” ते म्हणाले. या कामांच्या प्रमाणातील वाढीने आता अभूतपूर्व वेग घेतला आहे याचा उल्लेख त्यांनी केला. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी जम्मू आणि गुजरात येथे झालेल्या कार्यक्रमांचा उल्लेख केला, या कार्यक्रमांमध्ये त्यांनी शिक्षण तसेच आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या मोठ्या प्रमाणातील विस्तारासाठीचे कार्य सुरु केले. तसेच आजदेखील देशातील 12 राज्यांमध्ये असलेल्या 300 जिल्ह्यांतील 550 रेल्वे स्थानकांच्या सुधारणेचे काम सुरू झाले आहे. उत्तर प्रदेशातील गोमती नगर प्रकल्पाविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की दीड हजाराहून अधिक रस्ते आणि उड्डाणपूल प्रकल्पांतून महत्त्वाकांक्षेचा वेग आणि प्रमाण तसेच नव्या भारताच्या निर्धाराचा प्रत्यय येतो.

पंतप्रधान म्हणाले की आज 40,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे प्रकल्प सुरु होत आहेत. देशातील 500 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्याच्या कामासाठी काही महिन्यांपूर्वी अमृत भारत स्थानके प्रकल्प सुरु करण्यात आला याची आठवण त्यांनी सांगितली. आजच्या कार्यक्रमामुळे हे कार्य आणखी पुढे नेण्याचा विचार दिसून येतो ही बाब  अधोरेखित करत पंतप्रधान मोदी म्हणाले की भारताच्या प्रगतीच्या वेगाची झलक देखील त्यातून दिसते आहे. आजच्या रेल्वे प्रकल्पांसाठी पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या नागरिकांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान मोदी यांनी आजच्या विकास प्रकल्पासाठी भारताच्या युवा शक्तीचे विशेष अभिनंदन केले कारण ते विकसित भारताचे खरे लाभार्थी आहेत. आजच्या विकास प्रकल्पांमुळे लाखो युवकांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतील तसेच शाळांमध्ये शिकत असणाऱ्यांनाही त्याचा लाभ होईल असे ते म्हणाले. “विकसित भारत कसा घडेल हे ठरवण्याचा सर्वात  जास्त अधिकार युवकांना आहे” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. विविध स्पर्धांच्या माध्यमातून विकसित भारतातील रेल्वेचे  स्वप्न सर्वांसमोर मांडल्याबद्दल त्यांनी युवकांचे आभार मानले आणि विजेत्यांचे अभिनंदनही केले. त्यांनी युवकांना आश्वासन दिले की त्यांची स्वप्ने आणि कठोर परिश्रम आणि पंतप्रधानांचा संकल्प यातूनच विकसित भारत साकार होणार आहे. 

आगामी अमृत भारत स्थानके विकास आणि वारसा  या दोन्हींचे प्रतीक असतील याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. ओदिशातील बालेश्वर स्थानकाची रचना भगवान जगन्नाथ मंदिराच्या संकल्पनेनुसार केली  आहे आणि सिक्कीमच्या रंगपो स्थानकावर स्थानिक वास्तुकलेचा प्रभाव दिसेल असे ते म्हणाले राजस्थानमधील सांगनेर स्थानक 16 व्या शतकातील हँड-ब्लॉक प्रिंटिंग प्रदर्शित करत आहे, तामिळनाडूमधील कुंभकोणम येथील स्थानक चोल  काळातील वास्तुकला प्रदर्शित करेल. आणि अहमदाबाद स्थानक मोढेरा सूर्य मंदिरापासून प्रेरित आहे, द्वारका स्थानक द्वारकाधीश मंदिरापासून प्रेरित आहे, आयटी सिटी गुरुग्राम स्थानक आयटी साठी समर्पित असेल. म्हणजे “अमृत भारत स्थानक हे  त्या शहराच्या वैशिष्ट्यांची जगाला ओळख करून देईल”, असे सांगत पंतप्रधान म्हणाले की ही स्थानके विकसित करताना दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांचा विचार करण्यात आला आहे.

गेल्या 10 वर्षांत विकसित भारताची उभारणी करण्याच्या दिशेने प्रयत्न केल्याचा  मोदी यांनी पुनरुच्चार केला, विशेषत: रेल्वेमध्ये हे बदल दिसून येत आहेत. गेल्या 10 वर्षात, ज्या सुविधा एकेकाळी अशक्य वाटत होत्या त्या आता प्रत्यक्षात आल्याचे त्यांनी नमूद केले आणि वंदे भारत, अमृत भारत, नमो भारत यासारख्या आधुनिक सेमी हाय-स्पीड गाड्या, रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाचा वेग आणि गाडीच्या आत आणि स्थानकाच्या फलाटावरील  स्वच्छता यांचे उदाहरण दिले. एकेकाळी  मानवरहित फाटक भारतीय रेल्वेची ओळख बनले होते , त्याची तुलना करत ते म्हणले की ओव्हरब्रिज आणि अंडरब्रिजमुळे आज विना अडथळा  आणि अपघातमुक्त वाहतूक सुनिश्चित झाली आहे. विमानतळांप्रमाणेच आधुनिक सुविधा आता गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी रेल्वे स्थानकांवर उपलब्ध करून दिल्या जात असल्याचेही त्यांनी नमूद केले..

आजची रेल्वे नागरिकांसाठी आरामदायी प्रवासाचा मुख्य आधार बनली आहे. रेल्वेच्या परिवर्तनाबाबत पंतप्रधान म्हणाले की, अर्थव्यवस्थेने जागतिक क्रमवारीत 11 व्या स्थानावरून 5 व्या स्थानावर झेप घेतल्यामुळे रेल्वेच्या तरतुदीत 10 वर्षांपूर्वीच्या 45 हजार कोटींवरून आज 2.5 लाख कोटींपर्यंत मोठी वाढ झाली आहे. “जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता झाल्यावर आपली ताकद किती वाढेल याची कल्पना करा. म्हणूनच लवकरात लवकर भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी मोदी जोमाने प्रयत्न करत आहेत ”, असे ते म्हणाले.

घोटाळे न झाल्यामुळे पैशाची बचत झाली आहे याकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधले . बचत केलेल्या पैशाचा वापर नवीन रेल्वेमार्ग टाकण्याचा वेग दुप्पट करण्यासाठी, जम्मू आणि काश्मीरपासून  ते ईशान्येकडील नवीन भागात रेल्वे नेण्यासाठी आणि 2,500 किमी समर्पित फ्रेट कॉरिडॉरवर काम करण्यासाठी करण्यात आला. ते म्हणाले की, करदात्यांच्या पैशातील प्रत्येक पैसा प्रवाशांच्या कल्याणासाठी वापरला जात आहे. ते म्हणाले की, सरकारकडून प्रत्येक रेल्वे तिकिटावर 50 टक्के सवलत दिली जात आहे.

“बँकांमध्ये ठेवलेल्या पैशावर जसे व्याज मिळते, त्याचप्रमाणे पायाभूत सुविधांवर खर्च होणारा प्रत्येक पैसा उत्पन्नाचे नवीन स्रोत आणि नवीन रोजगार निर्माण करतो.” असे सांगून पंतप्रधानांनी हे अधोरेखित केले की, नवीन रेल्वे मार्ग रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करतो, मग तो कामगार असो, की अभियंता. ते पुढे म्हणाले की, सिमेंट, स्टील आणि वाहतूक यांसारख्या अनेक उद्योगांमध्ये आणि दुकानांमध्ये नोकरीच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. ते म्हणाले, “आजची काही लाख कोटी रुपयांची गुंतवणूक ही उद्याच्या हजारो नोकऱ्यांची हमी आहे”. पंतप्रधानांनी ‘एक स्थानक एक उत्पादन’ कार्यक्रमाविषयीही सांगितले, ज्यामध्ये रेल्वे स्थानकांवर उभारलेल्या हजारो स्टॉल्सच्या माध्यमातून लहान शेतकरी, कारागीर आणि विश्वकर्मा मित्रांच्या उत्पादनांना रेल्वेकडून प्रोत्साहन दिले जात आहे.

“भारतीय रेल्वे ही केवळ प्रवासी सुविधा नसून ती भारताच्या कृषी आणि औद्योगिक प्रगतीची वाहक आहे”, पंतप्रधानांनी नमूद केले. वेगवान रेल्वेमुळे वाहतुकीचा वेळ वाचेल आणि उद्योग क्षेत्राचा खर्चही कमी होईल, आणि पर्यायाने मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टाला चालना मिळते. भारत हे गुंतवणुकीसाठी जगाच्या आकर्षणाचे केंद्र असून, याचे श्रेय इथल्या आधुनिक पायाभूत सुविधांना असल्याचे पंतप्रधान म्हणाले.पुढील 5 वर्षांचा मार्ग स्पष्ट करत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला आणि सांगितले की, देशातील हजारो रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण झाल्यावर भारतीय रेल्वेची क्षमता सुधारेल आणि देशात गुंतवणुकीची मोठी क्रांती घडेल.

पार्श्वभूमी

रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याच्या महत्त्वावर पंतप्रधानांनी नेहमीच भर दिला आहे. या प्रयत्नांच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून पंतप्रधानांनी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील 553 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. एकूण 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ही रेल्वे स्थानके असून, त्याच्या पुनर्विकासासाठी 19,000 कोटींहून अधिक खर्च अपेक्षित आहे. ही स्थानके शहराच्या दोन्ही टोकांना जोडणारी ‘सिटी सेंटर्स’ म्हणून काम करतील. या रेल्वे स्थानकांवर  रूफ प्लाझा, सुंदर लँडस्केपिंग, इंटर मोडल कनेक्टिव्हिटी, आधुनिक दर्शनी भाग, मुलांसाठी खेळण्याचे क्षेत्र, दुकाने, फूड कोर्ट इत्यादी आधुनिक प्रवासी सुविधा असतील. या रेल्वे स्थानकांचा विकास पर्यावरणपूरक आणि दिव्यांग स्नेही म्हणून केला जाईल. स्थानकांमधील इमारतींची रचना स्थानिक संस्कृती, वारसा आणि स्थापत्यकलेपासून प्रेरित असेल.

पंतप्रधानांनी उत्तर प्रदेश येथील गोमती नगर रेल्वे स्थानाकाचेही उद्घाटन केले, एकूण 385 कोटी रुपये खर्चाने या स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला आहे. भविष्यातील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, या स्थानकात आगमन आणि निर्गमन सुविधा स्वतंत्रपणे विकसित करण्यात आल्या आहेत. हे स्थानक शहराच्या दोन्ही टोकांना जोडते. मध्यवर्ती वातानुकूलन व्यवस्था असलेल्या या स्थानकात मोकळ्या जागा, गर्दी मुक्त वावर करण्याची सुविधा , फूड कोर्ट आणि वरच्या आणि खालच्या तळघरात पार्किंगसाठी पुरेशी जागा, यासारख्या आधुनिक प्रवासी सुविधा आहेत.

पंतप्रधानांनी 1500 उन्नत पूल आणि भुयारी मार्गांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पणही केले. हे उन्नत पूल आणि भुयारी मार्ग देशातील 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये असून, या प्रकल्पांचा खर्च जवळजवळ रु. 21,520 कोटी इतका आहे. या प्रकल्पांमुळे गर्दी कमी होईल, सुरक्षा आणि दळणवळण सुधारेल, क्षमता सुधारेल आणि रेल्वे प्रवासाची कार्यक्षमता वाढेल.

* * *

N.Chitale/Sanjana/Sushma/Rajshree/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai