Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या हस्ते राजकोट येथील महात्मा गांधी वास्तूसंग्रहालयाचे उद्‌घाटन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजकोट येथील महात्मा गांधी वास्तूसंग्रहालयाचे उद्‌घाटन केले. महात्मा गांधी यांच्या शालेय जीवनातील जडण-घडणीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आल्फ्रेड उच्च विद्यालयात हे वास्तूसंग्रहालय बनवण्यात आले आहे. गांधींचे विचार, त्यांची मूल्ये आणि संस्कृती याविषयी जागृती करण्यासाठी या संग्रहालयाचा उपयोग होईल.

624 घरांच्या सरकारी गृहनिर्माण प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. तसेच त्यांच्या उपस्थितीत 240 लाभार्थी कुटुंबियांचा त्यांच्या हक्काच्या घरात ई-गृहप्रवेश झाला.

महात्मा गांधींकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. गुजरातचा महात्मा गांधींशी जवळचा संबंध होता. त्यामुळे हे राज्य अतिशय भाग्यवान ठरले.

महात्मा गांधींना पर्यावरणाची विशेष काळजी होती याचा उल्लेख करत त्यांच्यापासून प्रेरणा घेत आपण स्वच्छ आणि हरीत भविष्यासाठी काम करायला हवे असे पंतप्रधान म्हणाले.

रांगेतल्या शेवटच्या व्यक्तीचा, म्हणजेच गरीबातल्या गरीब व्यक्तीचा विचार करण्याची शिकवण महात्मा गांधींनी आपल्याला दिली. त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन आपले सरकार गरीबांची सेवा करत आहे असे मोदी यांनी सांगितले. आमच्या विविध प्रकल्पांच्या मदतीने गरीबांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला त्यांच्यासाठी घरं बांधायची आहेत असे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्याला 70 वर्षे उलटून गेल्यानंतरही बापूंचे स्वच्छ भारताचे स्वप्न अपूर्णच आहे अशी खंत व्यक्त करत आपल्या सगळ्यांना मिळून त्यांचे हे स्वप्न पूर्ण करायचे आहे असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

गेल्या चार वर्षात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत, अनेक महत्वाची कामे झाली मात्र पुढेही ही कामे होत राहीली पाहिजेत असेही त्यांनी सांगितले. यानंतर पंतप्रधानांनी महात्मा गांधी वास्तू संग्रहालयाला भेट दिली.

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar