Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या हस्ते ‘मुद्रा योजने’चे उद्‌घाटन समृध्द अर्थव्यवस्थेसाठी लघु उद्योजकांना अर्थ सहाय्य गरजेचे-पंतप्रधान


देशातील लघु उद्योजकांना आर्थिक साहाय्य करणे हा भारतीय अर्थव्यवस्थेला समृद्ध करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे केले. प्रधानमंत्री लघु घटक विकास व पुनर्वित्तीय संस्था अर्थात मुद्रा योजनेच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. देशाच्या अर्थव्यवस्थेत छोट्या उद्योजकांचा भरीव वाटा असल्याचे सांगत, आगामी वर्षभराच्या कालावधीत सर्व प्रमुख बँका मुद्रा मॉडेल स्वीकारतील असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.

मोठ्या उद्योगातून रोजगाराच्या सर्वाधिक संधी निर्माण होतात हा आपल्या देशातील समज अत्यंत चुकीचा असून प्रत्यक्षात देशातील केवळ १ कोटी २५ लाख लोकांनाच ह्या क्षेत्रातून रोजगार मिळतो, तर १२ कोटी लोकांना छोट्या उद्योगांतून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात अशी माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली.

मोठ्या उद्योगांना सरकारकडून अनेक सुविधा पुरविल्या जात आहे, त्या तुलनेत छोट्या उद्योगांना मिळणाऱ्या सुविधा कमी आहेत. केवळ ११ लाख कोटींचे भांडवल वापरून देशातील १२ कोटी लोकांना रोजगार पुरविणाऱ्या ५ कोटी ७५ लाख स्वयं रोजगार करणाऱ्या लोकांवर लक्ष केंद्रित करणे आता क्रमप्राप्त आहे व त्याच विचारातून मुद्रा बँकेची संकल्पना पुढे आणली असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

भांडवलापासून वंचित असलेल्या उद्योगांना भांडवल पुरविणे हे मुद्रा योजनेचे प्रमुख उद्दिष्ट असून आतापर्यंत सावकाराच्या मर्जीवर राहणाऱ्या छोट्या उद्योजकांमध्ये यामुळे नवा आत्मविश्वास निर्माण होईल अशी आशा पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.

सचोटी हाच छोट्या उद्योजकांसाठी सर्वात मोठा ठेवा असून ह्या सचोटीला मुद्रेची अर्थात भांडवलाची जोड मिळाल्यास छोटे उद्योग अधिक यशस्वी होतील असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. यावेळी महिला बचत गटांमध्ये दिसणारा प्रामाणिकपणा व एकात्मता इतर कुठल्याही उद्योगात आढळून येत नाही अशा शब्दात पंतप्रधानांनी महिला उद्योजकांची प्रशंसा केली.