Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या हस्ते पहिले राष्ट्रीय सृजक पुरस्कार प्रदान

पंतप्रधानांच्या हस्ते पहिले राष्ट्रीय सृजक पुरस्कार प्रदान


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम  येथे पहिला राष्ट्रीय सृजक पुरस्कार प्रदान केला. त्यांनी पुरस्कार विजेत्यांशी संक्षिप्त  संवादही साधला. राष्ट्रीय सृजक पुरस्कार हा कथाकथन, सामाजिक बदलाचे समर्थन पर्यावरणीय स्थैर्य , शिक्षण आणि गेमिंग यासह सर्व क्षेत्रांतील उत्कृष्टता आणि प्रभाव यांचा गौरव करण्याचा प्रयत्न आहे. सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सर्जनशीलतेचा वापर करण्यासाठी एक मंच म्हणून या पुरस्काराची कल्पना पुढे आली .

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी या कार्यक्रमासाठी निवडलेल्या भारत मंडपमच्या ठिकाणाची दखल घेतली आणि सांगितले की, राष्ट्रीय सृजक आज त्याच ठिकाणी एकत्र आले आहेत जिथे जागतिक नेत्यांनी जी 20 शिखर परिषदेत भविष्याला दिशा दिली होती.

कालौघात झालेले बदल आणि नव्या युगाच्या उदयाच्या बरोबरीने चालणे ही देशाची जबाबदारी असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की, देश आज प्रथमच  राष्ट्रीय सृजक पुरस्कार प्रदान करून ती  जबाबदारी पार पाडत आहे. राष्ट्रीय सृजक पुरस्कार नवीन युगाला त्याची सुरुवात होण्याआधीच ओळख देत आहेत”, असे  नमूद करतानाच पंतप्रधानांनी भविष्याचे आधीच विश्लेषण करण्याचे सामर्थ्य अधोरेखित केले.  नवीन युगाला ऊर्जा देऊन आणि तरुणांच्या सर्जनशीलतेचा आणि दैनंदिन जीवनातील बाबींप्रति त्यांच्या  संवेदनशीलतेचा आदर करून राष्ट्रीय सृजक पुरस्कार आगामी काळात मोठा प्रभाव निर्माण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान म्हणाले, भविष्यात, राष्ट्रीय सृजक पुरस्कार आशय निर्मात्यांसाठी प्रेरणास्रोत  बनतील आणि त्यांच्या कार्याची ओळख निर्माण करतील.  पंतप्रधानांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि अतिशय कमी वेळेतील स्पर्धकांच्या सक्रिय सहभागाचीही प्रशंसा केली. या कार्यक्रमासाठी 2 लाखांहून अधिक सर्जनशील मनांचे एकत्रित येणे  देशाची स्वतःची ओळख निर्माण करत आहे”,यावर त्यांनी भर दिला.

महाशिवरात्रीच्या शुभ प्रसंगी  प्रथमच राष्ट्रीय सृजक पुरस्कार देण्यात येत असल्याचे नमूद करून पंतप्रधान म्हणाले की, भाषा, कला आणि सर्जनशीलतेचे निर्माते म्हणून भगवान शिव यांचा गौरव केला जातो. आपला शिव नटराज आहे, त्याच्या डमरूतून महेश्वर सूत्र ऐकू येते त्याचे तांडव लय आणि निर्मितीचा पाया रचते  ”, असे सांगत पंतप्रधानांनी सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून पुरस्कार मिळविणाऱ्या महिलांचे अभिनंदन केले. भारताच्या सर्जनशील क्षेत्रात महिलांच्या सहभागाबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला. यावेळी त्यांनी सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या आणि गॅस सिलिंडरच्या दरात 100 रुपयांनी कपात करण्याच्या निर्णयाचीही माहिती दिली तेव्हा तिथे उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या गजरात त्या निर्णयाचे स्वागत केले.

देशाच्या विकास यात्रेत एखाद्या योजनेच्या किंवा धोरणाच्या गुणक प्रभावावर प्रकाश टाकून पंतप्रधानांनी गेल्या 10 वर्षांतील डेटा क्रांती आणि कमी किमतीत डेटा उपलब्ध असल्याचा उल्लेख केला. आशय निर्मात्यासाठी नवीन जगाच्या निर्मितीचे श्रेय त्यांनी डिजिटल इंडिया मोहिमेला दिले आणि या दिशेने तरुणांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. “तरुणांनी त्यांच्या सकारात्मक कृतींद्वारे रचनाकारांकडे लक्ष देण्याची सरकारला विनंती केली आहे,” असे सांगत पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले आणि अशा पुरस्कारांची सुरुवात केल्याचे श्रेय त्यांना दिले.

पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले की कोणीही आशय निर्माता अशा प्रकारच्या आशय निर्मितीच्या अभ्यासक्रमाशी निगडित नाही कारण तसा अभ्यासक्रम अस्तित्वात नाही आणि त्यांच्या शैक्षणिक ते आशय निर्मितीपर्यंतच्या प्रवासावर लक्ष केंद्रित केले. अशा प्रकारच्या प्रतिभेची सामूहिक क्षमता नमूद करून तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रकल्पांचे लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि संपादक आहात,” यावर पंतप्रधान मोदींनी भर दिला. रचनाकारांच्या जिद्दीचे आणि दृढनिश्चयाचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले तुम्ही एक संकल्पना मांडली, त्यात नावीन्य आणले आणि ते पडद्यावर साकार केले. तुम्ही केवळ तुमच्या क्षमतांची ओळख जगाला करून दिली नाही तर त्यांनाही जग दाखवले आहे.त्यांनी संपूर्ण भारतातील सामग्रीचा प्रभाव मान्य केला आणि ते म्हणाले, “तुम्ही इंटरनेटचे एमव्हीपी आहात.”

पंतप्रधानांनी सांगितले की रचना आणि सर्जनशीलतेच्या सहकार्याने बांधिलकी वाढते, रचनेला डिजिटल तंत्राची जोड दिली कि परिवर्तन घडते आणि रचना आणि उद्देशाची सांगड घातली कि परिणाम दिसतो. आपली रचना प्रेरणादायी करण्याची विनंती मोदींनी रचनाकारांना केली आणि लाल किल्ल्यावरून महिलांबद्दलच्या अनादराचा मुद्दा उपस्थित केल्याचे स्मरण केले. मुला-मुलींचे संगोपन करताना पालकांमध्ये समानतेची भावना रुजवण्याचे आवाहन त्यांनी आशय निर्मात्यांना  केले. आशय निर्मात्यांनी समाजाशी निगडित राहून ही मानसिकता प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा दृष्टिकोन त्यांनी मांडला. त्यांनी आशय निर्मात्यांना भारतातील नारी शक्तीची क्षमता प्रदर्शित करण्याचे आवाहन केले आणि आईची दैनंदिन कामे आणि आर्थिक उपक्रमात सहभागी ग्रामीण आणि आदिवासी भागातील महिला अशाप्रकारच्या संकल्पना त्यांच्या रचनेतून मांडण्यास सांगितले. “एखादी आशय निर्मिती चुकीच्या धारणा सुधारण्यात मदत करू शकते,” असे पंतप्रधानांनी उद्धृत केले.

स्वच्छ भारत मोहीम हा अविरत उपक्रम आहे हे अधोरेखित करून वाघ प्लास्टिकची बाटली उचलत असल्याच्या  अलीकडील व्हिडिओचा पंतप्रधानांनी उल्लेख केला आणि  आशय निर्मात्यांनी या दिशेने काम करत राहण्याचे आवाहन केले. मुलांमधील मानसिक आरोग्य आणि तणावाच्या गंभीर समस्यांवर अधिक जागरूकता निर्माण करणे आणि स्थानिक भाषांमध्ये आशयाची मांडणी करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे त्यांनी सुचवले. पंतप्रधानांनी सुमारे 15 वर्षांपूर्वी पाहिलेल्या या विषयावरील लघुपटाचेही कौतुक केले. परीक्षेपूर्वी मुलांशी संवाद साधण्याची संधी मिळणाऱ्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचाही पंतप्रधान मोदींनी उल्लेख केला. तरुणांवर अंमली पदार्थांचे नकारात्मक परिणाम अधोरेखित करणाऱ्या आशयाची मांडणी करून अमलीपदार्थ घातक असतात हे पटवून दिले पाहिजे अशी शिफारस मोदींनी आशय निर्मात्यांना केली.

पंतप्रधानांनी आगामी लोकसभा निवडणुकीकडे लक्ष वेधले आणि पुढील वर्षीही आशय निर्मात्यांना भेटण्याचा विश्वास व्यक्त केला. ही मोदींची हमी नाही, तर भारताच्या 140 कोटी नागरिकांची हमी आहे”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. निवडणुकीत विजयी आणि पराभूत घोषित करण्यासाठी मतदान केले जात नाही तर इतक्या विशाल देशाचे भविष्य घडवणाऱ्या निर्णय प्रक्रियेचा एक भाग बनण्यासाठी मतदान केले जाते, ही भावना जागृत करण्यासाठी देशातील तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले. जरी अनेक राष्ट्रे वेगवेगळ्या मार्गांनी समृद्ध झाली, तरीही त्यांनी लोकशाहीचा पर्याय निवडला असे त्यांनी नमूद केले. भारताने शंभर टक्के लोकशाहीचा अभिमान बाळगून विकसित राष्ट्र बनण्याचा संकल्प केला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भारताला जगासमोर आदर्श बनवण्यात तरुणांकडून असलेल्या अपेक्षा आणि त्यांचे योगदान त्यांनी मांडले आणि सोशल मीडियाच्या बळावर भारतातील दिव्यांग लोकांची अंगभूत शक्ती समोर आणण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.

जगावर भारताचा प्रभाव वाढत आहे या मुद्द्यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करताना भारताने आपल्या ताकदीची साक्ष पटवली असे ते म्हणाले. जगाचा भारताबद्दलचा दृष्टिकोन आणि भावना बदलल्या असल्या तरी भारताची प्रतिमा आणखी उंचावण्यावर  भर दिला पाहिजे असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी यावेळी त्यांच्या परदेश दौऱ्यातील एक आठवण सांगितली. ते एका परदेश दौऱ्यावर गेले असताना त्या देशातला एक संगणक अभियंता त्यांच्यासाठी दुभाषकाचे काम करत होता. पंतप्रधानांशी संवाद साधताना त्याने एक प्रश्न विचारला. भारत हा सर्प आणि जादूटोणा करणाऱ्यांचा देश आहे का हा तो प्रश्न होता असे मोदी म्हणाले.त्या काळात भारत अत्यंत शक्तिशाली असला तरी भारताची शक्ती आता जगाला दिशा देणाऱ्या संगणकाच्या माऊसवर केंद्रीत झाली आहे असे पंतप्रधान म्हणाले.

तुम्ही जगभरात भारताचे डिजिटल दूत आहात. तुम्ही वोकल फॉर लोकलचे ब्रँड ॲम्बॅसिडर आहात, असे मोदी म्हणाले. ते काल श्रीनगरच्या दौऱ्यावर होते, त्याबद्दल त्यांनी सांगितले. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून जागतिक ब्रँड तयार करणाऱ्या मधमाशीपालन उद्योजकाशी झालेल्या संवादाचा उल्लेख त्यांनी केला.

चला आपण क्रिएट ऑन इंडिया मूव्हमेंट सुरू करू या. भारताविषयीच्या कथा आणि परंपराभारताची संस्कृतीभारताचा वारसा यांची माहिती जगाला देऊ या. चला क्रिएट ऑन इंडिया आणि क्रिएट फॉर वर्ल्ड  करूया.असे पंतप्रधान म्हणाले. केवळ निर्मात्यालाच नव्हे तर देशालाही जास्तीत जास्त पसंती मिळवून देणारा मजकूर तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. भारताविषयी जगाला असलेली उत्सुकता लक्षात घेऊन मजकूर तयार करणाऱ्यांनी त्यांची पोहोच वाढवण्यासाठी जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश अशा संयुक्त राष्ट्रांच्या भाषांमध्ये मजकूर तयार करावा असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल (एआय) बिल गेट्स यांच्याशी अलीकडेच झालेल्या संवादाबद्दल पंतप्रधानांनी सांगितले. इंडिया एआय मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली त्याबद्दलची माहितीही त्यांनी दिली. भारतातील तरुणांना आणि त्यांच्या कलागुणांना याचे श्रेय देत पंतप्रधानांनी सेमीकंडक्टर मिशनचा उल्लेख केला. भारताने ज्याप्रमाणे 5जी तंत्रज्ञान आत्मसात केले त्याप्रमाणेच या बाबतीतही तो पुढे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेजारील राष्ट्रांशी संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्या त्या देशात प्रचलित असलेल्या भाषांचा वापर करण्यावरही त्यांनी भर दिला. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून त्यांचे भाषण वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित केले जाते आणि नमो ॲपवरून छायाचित्रे घेतली जातात अशी माहिती त्यांनी दिली.

आशय  निर्मात्यांची कार्यक्षमताच भारताच्या प्रतिमेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या उंचीवर नेऊ शकते असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी सर्जनशीलतेचे सामर्थ्य अधोरेखित केले. उत्खननात सापडलेल्या कलाकृतींचे सौंदर्य अनुभवण्यासाठी दर्शकांना त्याच युगात परत नेण्याची क्षमता सर्जनशीलतेत आहे, असे ते म्हणाले. भारताच्या विकासाला चालना देण्यासाठी याच सर्जनशीलतेची ताकद उपयोगी पडल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले आणि अल्पावधीत 2 लाखांहून अधिक अर्जदारांचा विचार करणाऱ्या ज्युरींच्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले.

यावेळी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते.

पार्श्वभूमी

नॅशनल क्रिएटर अवॉर्ड (राष्ट्रीय सर्जक  पुरस्कार) ला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या फेरीत विविध 20 श्रेणींमध्ये 1.5 लाखांहून अधिक नामांकने प्राप्त झाली. त्यानंतरच्या मतदान फेरीत विविध पुरस्कार श्रेणींमध्ये डिजिटल निर्मात्यांना सुमारे 10 लाख मते पडली. यानंतर तीन आंतरराष्ट्रीय निर्मात्यांसह 23 विजेते निश्चित करण्यात आले. हा इतका सहभाग लक्षात घेतला तर या पुरस्कारात खरोखरच लोकांच्या निवडीचे प्रतिबिंब उमटते असे म्हणता येईल.

सर्वोत्कृष्ट कथाकार पुरस्कारासह वीस श्रेण्यांमध्ये हा पुरस्कार दिला जातो. त्या त्या वर्षात डिसरप्टर ऑफ द इअर; सेलिब्रिटी क्रिएटर; ग्रीन चॅम्पियन; सामाजिक बदलासाठी सर्वोत्तम निर्माता; सर्वात प्रभावशाली कृषी निर्माता; सांस्कृतिक राजदूत; आंतरराष्ट्रीय निर्माता; सर्वोत्कृष्ट प्रवास निर्माता; स्वच्छता दूत; न्यू इंडिया चॅम्पियन; टेक क्रिएटर; हेरिटेज फॅशन आयकॉन; सर्वाधिक सर्जनशील निर्माता (पुरुष आणि महिला); अन्न श्रेणीतील सर्वोत्तम निर्माता; शिक्षण श्रेणीतील सर्वोत्तम निर्माता; गेमिंग श्रेणीतील सर्वोत्तम निर्माता; सर्वोत्कृष्ट मायक्रो क्रिएटर; सर्वोत्कृष्ट नॅनो निर्माता; सर्वोत्तम आरोग्य आणि फिटनेस निर्माता असे पुरस्कार दिले जातात.

***

N.Chitale/S.Kane/V.Joshi/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai