Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रगती मैदानावरील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन तसेच संमेलन केंद्राचे (आयईसीसी) उद्घाटन

पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रगती मैदानावरील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन तसेच संमेलन केंद्राचे (आयईसीसी) उद्घाटन


नवी दिल्‍ली, 26 जुलै 2023

 

पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथे प्रगती मैदानावरील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन तसेच संमेलन केंद्राचे (आयईसीसी) उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधानांनी यावेळी जी-20 नाणे आणि जी-20 टपाल तिकिटाचे अनावरण देखील केले. पंतप्रधानांच्या उपस्थितीत ड्रोनच्या सहाय्याने या संमेलन केंद्राचे ‘भारत मंडपम’ असे नामकरण करण्यात आले तसेच या सोहळ्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात आला. पंतप्रधानांनी मांडलेल्या संकल्पनेतून तसेच 2700 कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय प्रकल्प म्हणून विकसित करण्यात आलेले प्रगती मैदानावरील हे नवे आयईसीसी संकुल  भारताला जागतिक व्यापार केंद्र म्हणून प्रसिध्द करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी देशातील नवा उत्साह आणि नवे वारे  वाहत असल्याचे दर्शवणाऱ्या कवितेने त्यांच्या भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले, “भारत मंडपम म्हणजे भारताच्या क्षमता आणि देशाची नवी उर्जा यांच्यासाठीचे आवाहन आहे, भारताची भव्यता आणि इच्छाशक्ती दर्शवणारे ते एक तत्वज्ञान आहे”.

ही वास्तू उभारणाऱ्या कामगारांचा पंतप्रधानांनी आज सकाळी गौरव केला, त्याची आठवण काढून ते म्हणाले की, या कामगारांची मेहनत आणि समर्पण पाहून संपूर्ण देश प्रभावित झाला आहे. भारत मंडपमची उभारणी झाल्याबद्दल पंतप्रधानांनी दिल्लीच्या जनतेचे तसेच प्रत्येक भारतीय नागरिकाचे अभिनंदन केले. आज कारगिल विजय दिवसाचा ऐतिहासिक प्रसंग आहे याचा उल्लेख करून कारगिलच्या युद्धात भारतासाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्म्यांना पंतप्रधानांनी संपूर्ण देशाच्या वतीने श्रद्धांजली वाहिली.

भगवान बसवेश्वर मंदिरातील ‘अनुभव मंडपम’ ही ‘भारत मंडपम’ या नावामागील प्रेरणा आहे असा तपशील पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना दिला. ते म्हणाले की अनुभव मंडपम आपल्या देशातील चर्चा आणि अभिव्यक्तीच्या परंपरेचे प्रतिनिधित्व करतो. भारताला लोकशाहीची जननी म्हटले जाते याची उपस्थितांना आठवण करून देऊन त्यांनी या संदर्भात अनेक ऐतिहासिक तसेच पुरातत्वीय उदाहरणे दिली. “हा ‘भारत मंडपम’ म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीची 75 वर्षे साजरी करत असताना आपण भारतीयांनी आपल्या लोकशाहीला दिलेली एक सुंदर भेट आहे”, ते पुढे म्हणाले. काही आठवड्यांनी याच ठिकाणी जेव्हा जी-20 शिखर परिषद होईल तेव्हा संपूर्ण जगाला येथून भारताची प्रगती आणि सतत उंचावणारे स्थान दिसेल असे पंतप्रधानांनी सांगितले.

दिल्लीत जागतिक दर्जाचे संमेलन केंद्र का आवश्यक होते हे स्पष्ट करताना पंतप्रधान म्हणाले की, “21 व्या शतकात आपल्याकडे 21 व्या शतकासाठी साजेसे बांधकाम असायला हवे .” भारत मंडपम जगभरातील प्रदर्शकांसाठी अत्यंत लाभदायक ठरेल आणि भारतातील परिषद पर्यटनाचे एक माध्यम बनेल असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारत मंडपम  देशातील स्टार्टअप्सच्या क्षमता प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल, कारागीर आणि कलाकारांच्या कामगिरीचे साक्षीदार बनेल आणि हस्तकला कारागिरांचे प्रयत्नप्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देईल असे ते पुढे म्हणाले. “भारत मंडपम हे आत्मनिर्भर भारत आणि व्होकल फॉर लोकल अभियानाचे  प्रतिबिंब बनेल” असे पंतप्रधानांनी नमूद केले.  हे संमेलन केंद्र अर्थव्यवस्थापासून ते पर्यावरणापर्यंत आणि व्यापार ते तंत्रज्ञान पर्यंतच्या प्रत्येक क्षेत्रासाठी एक मंच म्हणून उदयाला येईल असे त्यांनी अधोरेखित केले.

भारत मंडपमसारखी पायाभूत सुविधा दशकांपूर्वी विकसित व्हायला हवी होती याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. निहित स्वार्थ असलेल्यांचा विरोध असूनही पायाभूत सुविधा निर्माण करणे सुरू ठेवण्यावर  भर देण्यात आला असे ते म्हणाले.  विखुरलेल्या पद्धतीने काम करून कोणताही समाज प्रगती करू शकत नाही यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले की, भारत मंडपम हे दूरदर्शक समग्र कार्यशैलीचे उदाहरण आहे. 160 हून अधिक देशांसाठी ई-कॉन्फरन्स व्हिसा सुविधेसारख्या उपाययोजनांची माहिती देऊन त्यांनी हे स्पष्ट केले. दिल्ली विमानतळाची क्षमता 2014 मधील 5 कोटींवरून आज वार्षिक 7.5 कोटी झाली आहे. जेवर विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर ही क्षमता आणखी वाढेल. दिल्ली एनसीआरमधील आदरातिथ्य उद्योगाचा विस्तारही मोठ्या प्रमाणात झाला आहे. यातून परिषद पर्यटनासाठी संपूर्ण परिसंस्था निर्माण करण्याचा नियोजनबद्ध दृष्टिकोन दिसून येतो असे ते म्हणाले.

राजधानी नवी दिल्लीतला  गेल्या काही वर्षांतील पायाभूत सुविधांचा विकास अधोरेखित करताना पंतप्रधानांनी नव्याने उदघाटन झालेल्या संसद भवनाचा उल्लेख केला आणि सांगितले की ते प्रत्येक भारतीयामध्ये अभिमानाची भावना निर्माण करते. राष्ट्रीय युद्ध स्मारक, पोलिस स्मारक, बाबासाहेब आंबेडकर स्मारक यांसारख्या स्मारकांची त्यांनी उदाहरणे दिली. कार्यसंस्कृती तसेच कामाच्या ठिकाणचे वातावरण बदलण्याला सरकार चालना देत असून  कर्तव्य पथाच्या आसपासच्या  कार्यालयीन इमारतींच्या विकासाचे काम वेगाने  सुरू असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. भारतात आतापर्यन्त होऊन गेलेल्या प्रत्येक पंतप्रधानांच्या जीवनाची झलक दाखवणाऱ्या  प्रधानमंत्री संग्रहालयाचाही त्यांनी उल्लेख केला. नवी दिल्लीत ‘युगे युगीन भारत’ या जगातील सर्वात मोठ्या संग्रहालयाचे काम वेगाने सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. विकसित देश बनण्यासाठी आपल्याला व्यापक  विचार करावा लागेल आणि मोठी लक्ष्य गाठावी लागतील  यावर पंतप्रधानांनी भर दिला. म्हणूनच, “भारत ‘थिंक बिग, ड्रीम बिग, अॅक्ट बिग’ या तत्त्वाने पुढे मार्गक्रमण करत असल्याचे ते म्हणाले. “आपण भव्य, उत्तम आणि वेगवान निर्मिती करत आहोत”. असे ते म्हणले.  त्यांनी जगातील सर्वात मोठे सोलर-विंड पार्क, सर्वात उंच रेल्वे पूल, सर्वात लांब बोगदा, सर्वात उंच वाहतूक योग्य रस्ता, सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम, जगातील सर्वात उंच पुतळा आणि  आशियातील दुसरा सर्वात मोठा  रेल्वे पूल भारतात असल्याचे सांगितले. हरित  हायड्रोजनमधील प्रगतीचा त्यांनी  उल्लेख केला.

“संपूर्ण देश सध्याच्या सरकारच्या या आणि मागील कार्यकाळातील विकास स्तंभांचे साक्षीदार आहे” असे पंतप्रधान म्हणाले. भारताचा विकासाच्या दिशेने सुरु असलेला प्रवास आता थांबवता येणार नाही असे  पंतप्रधानांनी नमूद केले. 2014 मध्ये विद्यमान सरकार सत्तेवर आले तेव्हा भारत जगातील 10 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होता मात्र आज भारत ही जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचे मोदींनी अधोरेखित केले. मागील कामगिरी लक्षात घेतली तर तिसऱ्या कार्यकाळात  भारताचे स्थान जगातील आघाडीच्या 3 अर्थव्यवस्थांमध्ये असेल असा विश्वास  पंतप्रधानांनी व्यक्त केला. “हा मोदीचा शब्द आहे”, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तिसऱ्या कार्यकाळात भारताच्या विकासाच्या प्रवासाचा वेग अनेक पटींनी वाढेल आणि नागरिकांना त्यांची स्वप्ने पूर्ण होताना दिसतील अशी ग्वाही पंतप्रधानांनी नागरिकांना दिली.

भारत आज देशाच्या पुनर्बांधणीच्या क्रांतीचा साक्षीदार आहे कारण गेल्या 9 वर्षांत पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर 34 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. यंदाही भांडवली खर्च 10 लाख कोटी ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. भारत अभूतपूर्व वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर काम करत आहे, असे ते म्हणाले. मागील 9 वर्षांत 40 हजार किमी रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले,  त्यापूर्वीच्या सात दशकांमध्ये केवळ 20 हजार रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण झाले होते असे पंतप्रधान म्हणाले. 2014 पूर्वी दरमहा 600 मीटर मेट्रो लाईन टाकली जात होती, मात्र आज दरमहा 6 किमी लांबीची मेट्रो लाईन टाकली जात असल्याचे त्यांनी सांगितले. 2014 मधील केवळ 4 लाख किमीच्या तुलनेत आज देशात 7.25 लाख किमी लांबीचे ग्रामीण रस्ते आहेत, असे ते म्हणाले. विमानतळांची संख्या 70 वरून सुमारे 150 पर्यंत वाढली आहे. सिटी गॅस वितरण देखील 2014 मधील केवळ 60 च्या तुलनेत आता 600 शहरांपर्यंत पोहोचले आहे, असे त्यांनी सांगितले. 

“नवीन भारत पुढे जात आहे आणि प्रगतीच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडथळ्यांवर मात करत आहे”. समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यावर सरकार भर देत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. सामाजिक पायाभूत सुविधांसाठी गेम चेंजर ठरत असलेल्या पीएम गतिशक्ती मुख्य आराखड्याचे उदाहरण देताना पंतप्रधान म्हणाले की यात डेटाचे 1600 पेक्षा जास्त स्तर असून, त्याद्वारे देशाचा वेळ तसेच पैसा वाचवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले. 

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात 1930 च्या कालखंडाकडे लक्ष वेधले आणि म्हणाले की, गेल्या शतकातील तिसरे दशक हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी महत्त्वपूर्ण असून या काळात स्वराज हेच सर्वांचे ध्येय होते. त्याचप्रमाणे, या शतकातील तिसरे दशक भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे कारण या काळात आपले ध्येय ‘समृद्ध भारत – ‘विकसित भारत’ हे आहे. स्वराज्य आंदोलनामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. “आता या तिसर्‍या दशकात, पुढच्या 25 वर्षांत ‘विकसित भारत’ हेच आमचे लक्ष्य आहे”, प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकाचे स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देताना पंतप्रधान बोलत होते. आपल्या अनुभवांबाबत बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, त्यांनी भारताला अनेक उपलब्धी प्राप्त करताना पाहिले आहे. आणि आपल्याला देशाच्या सामर्थ्याची जाणीव आहे. “भारत विकसित देश होऊ शकतो! भारत गरिबी देखील दूर करू शकतो,” असे पंतप्रधान म्हणाले. निती आयोगाच्या अहवालाचा हवाला देत पंतप्रधानांनी सांगितले की, भारतात केवळ 5 वर्षांत 13.5 कोटी लोक दारिद्रयातून बाहेर आले आहेत. आंतरराष्ट्रीय संस्थांनी नमूद केल्याप्रमाणे भारतातील हलाखीची परिस्थिती दूर होत असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. गेल्या 9 वर्षात सरकारने घेतलेल्या निर्णयांना आणि राबवलेल्या धोरणांना यांचे श्रेय जातं असल्याचे ते म्हणाले.

स्वच्छ हेतू आणि योग्य धोरणांच्या गरजेवर भर देत पंतप्रधानांनी जी-20 च्या बैठक आयोजनाचे उदाहरण दिले. “आम्ही जी -20 फक्त एका शहरापुरते किंवा एका ठिकाणापुरते मर्यादित ठेवले नाही, तर आम्ही 50 हून अधिक शहरांमध्ये जी -20 च्या बैठका आयोजित केल्या . याद्वारे आम्ही जगाला भारतातील विविधतेचे दर्शन घडवले. भारताची सांस्कृतिक शक्ती काय आहे, भारताचा वारसा काय आहे हे आम्ही जगाला दाखवून दिले, असेही ते म्हणाले. जी 20 अध्यक्षांच्या कार्यपद्धतीबद्दल अधिक तपशीलवार सांगताना पंतप्रधान म्हणाले, “जी -20 बैठकीसाठी अनेक शहरांमध्ये नवीन सुविधा निर्माण करण्यात आल्या आणि जुन्या सुविधांचे आधुनिकीकरण करण्यात आले. याचा फायदा देशाला आणि देशातील जनतेला झाला. हे सुशासन आहे. ‘राष्ट्र प्रथम, नागरिक प्रथम ‘ या भावनेचे पालन करून आम्ही भारताला विकसित करणार आहोत,  असे त्यांनी सांगितले. 

यावेळी केंद्रीय व्यापार आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, इतर अनेक केंद्रीय मंत्री आणि सरकारमधील मंत्री तसेच आघाडीचे उद्योगतज्ञ उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

देशात बैठका, परिषदा आणि प्रदर्शने आयोजित करण्यासाठी जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा असण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीमुळे प्रगती मैदानावर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषद केंद्राची (IECC) ची निर्मिती करण्यात आली आहे. प्रगती मैदानावरील जुन्या आणि कालबाह्य सुविधांमध्ये सुधारणा करणारा हा प्रकल्प सुमारे 2700 कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय प्रकल्प म्हणून विकसित केला जात आहे. अंदाजे 123 एकर इतके परिसर क्षेत्र असलेले आयईसीसी कॉम्प्लेक्स हे भारतातील सर्वात मोठे MICE (बैठक, प्रोत्साहन, परिषद आणि प्रदर्शने) गंतव्यस्थान म्हणून विकसित केले गेले आहे. कार्यक्रमांसाठी छत असलेल्या ठिकाणांच्या बाबतीत, जगातील सर्वोत्तम प्रदर्शन आणि परिषद संकुलांमध्ये आयईसीसी कॉम्प्लेक्सचा समावेश होतो. प्रगती मैदानावर नव्याने विकसित झालेल्या आयईसीसी कॉम्प्लेक्समध्ये परिषद केंद्र, प्रदर्शन हॉल आणि ॲम्फीथिएटर सारख्या अनेक अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे.

प्रगती मैदान संकुलाचा केंद्रबिंदू म्हणून हे प्रदर्शन केंद्र विकसित करण्यात आले आहे. हे केंद्र एक भव्य स्थापत्यशास्त्रातील एक चमत्कारच म्हणावे लागेल. भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शने, व्यापार मेळे, अधिवेशने, परिषदा आणि इतर प्रतिष्ठित कार्यक्रम आयोजित करण्यासाठी यांची रचना करण्यात आली आहे. हे केंद्र अनेक बैठक कक्ष, विश्रामगृह, सभागृह, अँफीथिएटर आणि व्यवसाय केंद्राने सुसज्ज आहे. यामुळे इथे विविध कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात. या केंद्रातील भव्य बहुउद्देशीय हॉल आणि प्लेनरी हॉलमध्ये सात हजार लोकांची एकत्रित आसन क्षमता आहे, जी ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध सिडनी ऑपेरा हाऊसच्या आसन क्षमतेपेक्षाही जास्त आहे. यातील भव्य ॲम्फीथिएटरची आसन क्षमता 3,000 व्यक्तींची आहे.

संमेलन केंद्र इमारतीची वास्तुशिल्प रचना भारतीय परंपरांपासून प्रेरित अशी आहे. एकीकडे, आधुनिक सोयी-सुविधा आणि जीवनशैलीचा स्वीकार करतानाच भूतकाळाविषयीचा अभिमान बाळगणाऱ्या भारताचा अभिमान आणि आत्मविश्वास या इमारतीतून झळकतो आहे.  इमारतीचा आकार शंखाच्या आकारासारखा आहे. तसेच संमेलन केंद्राच्या वेगवेगळ्या भिंती आणि दर्शनी भागात भारताच्या पारंपारिक कला आणि संस्कृतीची चित्रे रेखाटलेली आहेत.  यात ‘सूर्य शक्ती’चा समावेश आहे, ज्यात सौर उर्जेचा वापर करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना अधोरेखित केले गेले आहे. ‘झिरो टू इस्रो’ मध्ये भारताची अंतराळातील उपलब्धी साजरी करत, आकाश, वायु, अग्नि, जल, पृथ्वी या पंच महाभूतांना इमारतीच्या पायात प्रतिकात्मक रुपात दर्शवले गेले आहे.  तसेच, भारताच्या विविध प्रांतातील विविध चित्रे आणि आदिवासी कला प्रकार या संमेलन केंद्राची शोभा वाढवतात.

संमेलन केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या इतर सुविधांमध्ये 5G-सक्षम असे पूर्णपणे वाय-फाय असलेले परिसर, 10G इंट्रानेट कनेक्टिव्हिटी, 16 वेगवेगळ्या भाषांमधून माहिती देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज दुभाषी व्यवस्था कक्ष, मोठ्या आकाराच्या व्हिडिओ दाखवल्या जाणाऱ्या भिंतींसह प्रगत ऑडिओ-व्हिडीओ प्रणाली, इमारत व्यवस्थापन प्रणाली,जास्तीत जास्त कार्यक्षमता आणि ऊर्जा कार्यक्षमता सुनिश्चित करणे, मंद आणि सेन्सर असलेली प्रकाश व्यवस्थापन प्रणाली, अत्याधुनिक DCN (डेटा कम्युनिकेशन नेटवर्क) प्रणाली, एकात्मिक देखरेख प्रणाली आणि ऊर्जा-कार्यक्षम केंद्रीकृत वातानुकूलन प्रणाली यांचा समावेश आहे.  

त्याशिवाय, IECC इमारतीमध्ये सात प्रदर्शन दालन आहेत आणि प्रत्येक दालन प्रदर्शन, व्यापारी मेळे आणि व्यवसाय कार्यक्रम आयोजित करण्यासाठी एक बहुपर्यायी उपयुक्त स्थान ठरले आहे.  प्रदर्शन दालन विविध प्रकारच्या उद्योगांना सामावून घेण्यासाठी आणि जगभरातील उत्पादने आणि सेवांचे प्रदर्शन करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.  या अत्याधुनिक वास्तू भारताच्या आधुनिक अभियांत्रिकी आणि वास्तुशास्त्रीय चमत्काराचाच पुरावा आहेत.

IECC च्या बाहेरील क्षेत्राचा विकास देखील विचारपूर्वक तयार केला गेला आहे. जो मुख्य इमारतीच्या सौंदर्यास पूरक आहे आणि या प्रकल्पात केलेल्या काळजीपूर्वक नियोजन आणि विकासाची साक्ष आहे.  शिल्पे, प्रतिष्ठापने आणि भित्तिचित्रे भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा दर्शवतात. येथील संगीतमय कारंजे मंत्रमुग्ध करतात आणि आणखीन एक दर्शनीय घटक जोडतात. तलाव, सरोवर आणि पाण्याचा कृत्रिम प्रवाह यांसारखे जलस्रोत परिसराची शांतता आणि सौंदर्य वाढवतात.

या केंद्राला भेट देणाऱ्यांची सुविधा, याला  IECC चे प्राधान्य आहे, इथे 5,500 पेक्षा अधिक वाहने मावू शकतील असे भव्य आणि सुसज्ज वाहनतळ आहे.   

प्रगती मैदानावर नवीन IECC इमारतीच्या विकासामुळे भारताला जागतिक व्यावसायिक गंतव्यस्थान म्हणून प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल.  व्यापार आणि व्यापाराला चालना देण्यासाठी देखील ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, ज्यामुळे भारताची आर्थिक वाढ होईल आणि रोजगार निर्मिती सुद्धा होईल.  हे केंद्र लघु आणि मध्यम उद्योगांना त्यांची उत्पादने आणि सेवा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करून त्यांच्या वाढीस समर्थन देईल.  यामुळे ज्ञानाची देवाणघेवाण सुलभ होईल आणि सर्वोत्तम पद्धतीचा वापर केला जाईल.  तांत्रिक प्रगती आणि उद्योगातील प्रचार- प्रसारास याद्वारे प्रोत्साहन मिळेल.  प्रगती मैदानावर उभरण्यात आलेले हे आयईसीसी केंद्र, भारतातील आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक उत्कृष्टतेचा नमूना तर आहेच; शिवाय, आत्मनिर्भर भारताच्या भावनेचे ते एक मूर्तिमंत प्रतीकही आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

R.Aghor/Sanjana/Shraddha/Sushma/Gajendra/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai