नवी दिल्ली, 4 मार्च 2024
भारताच्या तीन टप्प्यातील अणुकार्यक्रमाच्या महत्त्वाच्या ऐतिहासिक दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करताना, पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तामिळनाडूतील कल्पक्कम येथे भारतातील पहिल्या स्वदेशी फास्ट ब्रीडर रिॲक्टर (500 MWe) अर्थात शीघ्र प्रजनक अणुभट्टीच्या “कोर लोडिंग” चा (अणुभट्टीत इंधन भरण्याच्या प्रक्रियेचा) प्रारंभ झाला.
माननीय पंतप्रधानांनी रिॲक्टर व्हॉल्ट आणि अणुभट्टीच्या नियंत्रण कक्षाचा दौरा केला. त्यांना या अणुभट्टीच्या ठळक वैशिष्ट्यांबद्दल अवगत करण्यात आले.
भारताने आण्विक इंधन चक्राच्या संपूर्ण स्पेक्ट्रममध्ये व्यापक क्षमता विकसित केली आहे. भारतातील सर्वात प्रगत अणुभट्टी-प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर (पीएफबीआर) बांधण्यासाठी आणि कार्यान्वयनासाठी भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेड (भविनी) च्या निर्मितीला सरकारने 2003 मध्ये मान्यता दिली होती.
आत्मनिर्भर भारताच्या मथितार्थानुसार, पीएफबीआर संरचना आणि बांधणी भविनी द्वारे एमएसएमई सह 200 हून अधिक भारतीय उद्योगांच्या महत्त्वपूर्ण योगदानासह स्वदेशी पद्धतीने केली गेली आहे. एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, व्यावसायिक दृष्ट्या कार्यरत शीघ्र प्रजनक अणुभट्टी असणारा भारत हा रशियानंतर दुसरा देश असेल.
फास्ट ब्रीडर रिएक्टर (एफबीआर) मध्ये सुरुवातीला युरेनियम-प्लुटोनियम मिश्रित ऑक्साईड (मॉक्स) इंधनाचा वापर होईल. युरेनियम-238 “आवरण (ब्लँकेट)” इंधनाच्या गाभ्याच्या सभोवतालचे अधिक इंधन तयार करण्यासाठी आण्विक उत्परिवर्तनातून जाईल, त्यामुळे ‘ब्रीडर’ म्हणजे प्रजनक हे नाव प्राप्त होईल. स्वतः विघटनशील पदार्थ नसलेल्या थोरियम -232 चा वापर आवरण म्हणून करण्याची देखील या टप्प्यात संकल्पना आहे. उत्परिवर्तनातून, थोरियम विघटनशील युरेनियम-233 तयार करेल जे तिसऱ्या टप्प्यात इंधन म्हणून वापरले जाईल. अशाप्रकारे एफबीआर हा कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी भारतातील विपुल थोरियम साठ्याचा पूर्ण वापर करण्याचा मार्ग खुला करणारी पायरी आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने, पीएफबीआर ही एक प्रगत तिसऱ्या पिढीची अणुभट्टी आहे ज्यामध्ये अंतर्निहित निष्क्रिय सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत जी आपत्कालीन परिस्थितीत संयंत्र त्वरित आणि सुरक्षितपणे बंद होण्याची खात्री देतात. पहिल्या टप्प्यापासून यात व्यतीत इंधनाचा वापर होत असल्याने, निर्माण होणाऱ्या आण्विक कचऱ्यामध्ये लक्षणीय घट करण्याच्या दृष्टीने देखील एफबीआर मोठा फायदा देते, ज्यामुळे मोठ्या भूगर्भीय विल्हेवाट सुविधांची गरज टाळली जाते.
कोर लोडिंग पूर्ण झाल्यावर, वीज निर्मितीमधील जोखमीचा पहिला दृष्टीकोन साध्य केला जाईल.
विशेष म्हणजे, प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश असूनही, भांडवली व्यय आणि प्रति युनिट वीज खर्च या दोन्हीची इतर आण्विक आणि पारंपरिक ऊर्जा प्रकल्पांशी तुलना करता येते.
ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वत विकास या दुहेरी उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाची वाढ अत्यावश्यक आहे. आण्विक आणि किरणोत्सारी पदार्थांच्या सुरक्षेची खातरजमा करताना प्रगत तंत्रज्ञानासह एक जबाबदार आण्विक शक्ती म्हणून, भारत हा ऊर्जा आणि बिगर ऊर्जा दोन्ही क्षेत्रात अणु तंत्रज्ञानाच्या शांततापूर्ण अनुप्रयोगांचा विस्तार करण्यासाठी बांधील आहे.
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Earlier today, witnessed the commencement of “core loading“ of India’s first and totally indegenous fast breeder reactor at Kalpakkam, which produces more fuel than is consumed.
— Narendra Modi (@narendramodi) March 4, 2024
This will pave way for eventual utilisation of India’s vast thorium reserves and thus obviate the… pic.twitter.com/gsYSIClbp9