Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या हस्ते तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे 20,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी

पंतप्रधानांच्या हस्ते तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे 20,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी


नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे 20,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली. विकास प्रकल्पांमध्ये तामिळनाडूमधील रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू आणि जहाजबांधणी क्षेत्रांचा समावेश आहे.

मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधानांनी सर्वांना नवीन वर्ष यशदायी आणि भरभराटीचे जावो अशा शुभेच्छा दिल्या आणि 2024 मध्ये त्यांचा पहिला सार्वजनिक कार्यक्रम तामिळनाडूमध्ये होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ, ऊर्जा आणि पेट्रोलियम पाइपलाइन या क्षेत्रातील प्रकल्पांसाठी राज्यातील जनतेचे अभिनंदन करताना पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की आजचे 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे प्रकल्प तामिळनाडूच्या प्रगतीला बळ देतील. यापैकी अनेक प्रकल्पांमुळे प्रवासाला चालना मिळेल आणि राज्यात हजारो रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.

तामिळनाडूसाठी गेल्या तीन बिकट आठवड्यांचा संदर्भ देताना, अतिवृष्टीमुळे झालेली जीवितहानी आणि मालमत्तेचे लक्षणीय नुकसान याबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आणि “केंद्र सरकार तामिळनाडूच्या लोकांच्या पाठीशी उभे असून राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करत असल्याचा दिलासा त्यांनी दिला.”

नुकतेच निधन झालेल्या थिरू विजयकांत यांना आदरांजली वाहताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “ते केवळ चित्रपट क्षेत्रातच नव्हे तर राजकारणातही ‘कॅप्टन’ होते. त्यांनी आपल्या कामातून आणि चित्रपटातून लोकांची मने जिंकली आणि राष्ट्रहिताला सर्वांत प्राधान्य दिले. त्यांनी देशासाठी अन्न सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या दिवंगत डॉ. एम एस स्वामीनाथन यांच्या योगदानाचे स्मरण केले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.

पुढील 25 वर्षांसाठी स्वातंत्र्याचा अमृतकाळ भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. विकसित भारतचा विचार करताना त्यांनी आर्थिक आणि सांस्कृतिक दोन्ही पैलूंचा उल्लेख केला कारण तामिळनाडू हे भारताच्या समृद्धीचे आणि संस्कृतीचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “तामिळनाडू हे प्राचीन तामिळ भाषेचे घर आहे आणि ते सांस्कृतिक वारशाचा खजिना आहे”, असे पंतप्रधानांनी संत थिरुवल्लुवर आणि सुब्रमण्य भारती या उत्कृष्ट साहित्यकारांचा उल्लेख करताना सांगितले. त्यांनी असेही नमूद केले की तामिळनाडू हे सी व्ही रामन आणि इतर शास्त्रज्ञांसारखे वैज्ञानिक आणि तांत्रिक तज्ज्ञांचे घर आहे जे त्यांना त्यांच्या या राज्याच्या प्रत्येक भेटीत नवीन ऊर्जा देतात.

तिरुचिरापल्लीच्या समृद्ध वारशाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, येथे आपल्याला पल्लव, चोल, पांड्या आणि नायक राजवंशांच्या सुशासन मॉडेलचे अवशेष सापडतात. ते म्हणाले की, परदेश दौऱ्यात कोणत्याही विषयावर बोलण्‍याची संधी मिळताच आपण   या प्राचीन तमिळ संस्कृतीचा उल्लेख करीत असतो. “देशाचा विकास आणि वारशात तमिळ सांस्कृतिक प्रेरणांनी दिलेल्या योगदानाच्या निरंतर विस्तारावर माझा विश्वास आहे”, असेही ते म्हणाले.  नवीन संसदेत पवित्र सेंगोलची स्थापना, काशी तमिळ आणि काशी सौराष्ट्र संगम यांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला ज्यामुळे देशभरात तमिळ संस्कृतीबद्दल उत्साह वाढला आहे.

गेल्या 10 वर्षात रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ, गरीबांसाठी मोफत घरे आणि रुग्णालये यासारख्या क्षेत्रात भारताने केलेल्या  प्रचंड प्रमाणावरील गुंतवणुकीची माहिती पंतप्रधानांनी दिली.  आणि  त्यांनी भौतिक पायाभूत सुविधांवर सरकारचा भर असल्याचे अधोरेखित केले. जगासाठी आशेचा किरण बनलेल्या जगातील अव्वल 5 अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश झाल्याचाही त्यांनी उल्लेख केला. जगभरातून भारतात येणाऱ्या मोठ्या गुंतवणुकीचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले की, त्याचा थेट लाभ तामिळनाडू आणि तेथील लोकांना मिळत आहे कारण, राज्य मेक इन इंडियाचे प्रमुख ‘सदिच्छा दूत- शुभंकर’  बनले आहे.

पंतप्रधानांनी सरकारच्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार केला. ज्यावेळी देशांतील  राज्याचा विकास होतो, त्यावेळी त्या विकासाचे प्रतिबिंब राष्ट्राच्या विकासात दिसून येते, असे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या 40  हून अधिक केंद्रीय मंत्र्यांनी गेल्या वर्षभरामध्‍ये 400 पेक्षा अधिक वेळा तामिळनाडूचा दौरा केल्याची माहिती त्यांनी दिली. “तामिळनाडूच्या प्रगतीबरोबरच  भारताची प्रगती होईल”, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की,  कनेक्टिव्हिटी म्हणजेच संपर्क व्यवस्था  हे विकासाचे माध्यम आहे. यामुळे  व्यवसायांना चालना मिळते आणि लोकांचे जीवन सुसह्य बनते. आजच्या प्रकल्पांचा संदर्भ देत, पंतप्रधानांनी तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचा उल्लेख केला.  या नव्या टर्मिनलमुळे  विमानतळाची क्षमता तीन पटीने वाढेल आणि पूर्व आशिया, मध्य पूर्व आणि जगाच्या इतर भागांशी संपर्क मजबूत होईल. नवीन टर्मिनल इमारतीच्या उद्घाटनामुळे गुंतवणूक, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य आणि पर्यटनाच्या नव्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी नमूद केले. तसेच उन्नत रस्त्याने विमानतळाची राष्ट्रीय महामार्गाशी वाढलेली जोडणीही त्यांनी नमूद केली. पायाभूत सुविधांसह त्रिची विमानतळ जगाला तमिळ संस्कृती आणि वारशाची ओळख करून देईल याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

पाच नवीन रेल्वे प्रकल्पांचा संदर्भ देवून,  पंतप्रधान मोदी म्हणाले की, यामुळे उद्योग आणि वीज निर्मितीला चालना मिळेल.  नवीन रस्ते प्रकल्प श्रीरंगम, चिदंबरम, रामेश्वरम आणि वेल्लोर यासारख्या  श्रद्धा आणि पर्यटनाच्या दृष्‍टीने  महत्त्वाच्या  केंद्रांना  जोडतील.

गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारने  बंदर-क्षेत्राच्या विकासावर लक्ष केंद्रित करताना, किनारपट्टीच्या  भागामध्‍ये  आणि मच्छिमारांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारे  प्रकल्प सुरू केले आहेत, त्यांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. त्यांनी मत्स्यव्यवसायासाठी स्वतंत्र मंत्रालय आणि अर्थसंकल्प, मच्छिमारांसाठी किसान क्रेडिट कार्ड, खोल समुद्रातील मासेमारीसाठी बोटींच्या आधुनिकीकरणासाठी केलेली मदत आणि पंतप्रधान मत्स्य संपदा योजना यांची माहिती दिली.

सागरमाला योजनेचा संदर्भ देत  पंतप्रधानांनी  सांगितले की, देशातील बंदरे चांगल्या रस्त्यांनी जोडली जात आहेत. कामराजर बंदराची क्षमता दुप्पट करण्यात आल्याने बंदराची क्षमता आणि जहाजांना ये-जा करण्‍यासाठी लागणा-या वेळेत  लक्षणीय सुधारणा झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी कामराजर बंदराच्या जनरल कार्गो बर्थ- दुस-या टप्‍प्याच्या उद्घाटनाचाही उल्लेख केला.  यामुळे तामिळनाडूची आयात आणि निर्यात वाढेल,  विशेषतः ऑटोमोबाईल क्षेत्र मजबूत होईल. त्यांनी यावेळी अणुभट्टी आणि गॅस पाईपलाईन या विषयांनाही स्पर्श केला.यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील, असे ते म्हणाले.

केंद्र सरकारकडून  तामिळनाडूच्या विकासासाठी  केलेल्या विक्रमी खर्चाची माहिती यावेळी पंतप्रधानांनी दिली. ते म्हणाले की 2014 पूर्वीच्या दशकात राज्यांना 30 लाख कोटी रुपये देण्यात आले होते, तर गेल्या 10 वर्षांत राज्यांना 120 लाख कोटी रुपये देण्यात आले होते. तमिळनाडूला देखील 2014 पूर्वीच्या 10 वर्षांच्या तुलनेत या कालावधीत 2.5 पट जास्त पैसा मिळाला. राष्ट्रीय महामार्ग बांधणीसाठी, राज्यात तिप्पट खर्च करण्यात आला आणि राज्यातील रेल्वे क्षेत्रात 2.5 पट जास्त पैसा खर्च झाला, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली. राज्यातील लाखो कुटुंबांना रेशनचे मोफत अन्नधान्य , वैद्यकीय उपचार आणि पक्की घरकुले, शौचालये आणि नळाव्दारे पेयजल  यांसारख्या सुविधा मिळत आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले.

भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी सबका प्रयास  किंवा विकसित भारतचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येकाच्या प्रयत्नांची गरज अधोरेखित केली.त्यांनी तामिळनाडूतील तरुणाईच्या  आणि लोकांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला.“मी तामिळनाडूच्या तरुणांमध्ये एका नव्या आशेचा उदय बघत आहे ही आशा विकसित भारताची उर्जा बनेल”, असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला.

यावेळी तामिळनाडूचे राज्यपाल  आर एन रवी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री   एम के स्टॅलिन, केंद्रीय नागरी हवाई  वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि केंद्रीय माहिती आणि  प्रसारण राज्यमंत्री  एल मुरुगन आदी उपस्थित होते. .

 

पार्श्वभूमी

तिरुचिरापल्ली येथील सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधानांनी तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले.1100 कोटींहून अधिक खर्च करून विकसित केलेली, दोन मजली नवीन आंतरराष्ट्रीय टर्मिनल इमारत वार्षिक 44 लाखाहून अधिक प्रवाशांना आणि गर्दीच्या वेळेत सुमारे 3500 प्रवाशांना सेवा देऊ शकते.नवीन टर्मिनलमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सुविधा आणि वैशिष्ट्ये आहेत.

पंतप्रधानांनी अनेक रेल्वे प्रकल्पांचे राष्ट्रार्पण केले. यात 41.4 किमी सेलम-मॅग्नेसाइट जंक्शन-ओमालूर-मेत्तूर धरण विभागाच्या दुहेरीकरणाचा  प्रकल्प; मदुराई – तुतीकोरीन 160 किमी रेल्वे मार्गिका विभागाच्या दुहेरीकरणासाठी प्रकल्प; आणि तिरुच्छिरापल्ली-मनमदुराई-विरुधुनगर ; विरुधुनगर – तेनकासी जंक्शन; सेनगोट्टाई – तेनकासी जंक्शन – तिरुनेलवेली – तिरुचेंदूर या रेल्वे मार्गिका विद्युतीकरणासाठीच्या   तीन प्रकल्पांचा समावेश आहे. हे रेल्वे प्रकल्प मालवाहतूक आणि प्रवासी वाहून नेण्याची रेल्वेची  क्षमता सुधारण्यास मदत करतील आणि तामिळनाडूमध्ये आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीला हातभार लावतील.

पंतप्रधानांनी रस्ते क्षेत्रातील पाच प्रकल्पांचे राष्ट्रार्पण केले.  या प्रकल्पांमध्ये  राष्ट्रीय महामार्ग -81 च्या त्रिची-कल्लागाम विभागासाठी 39 किमी चौपदरी रस्ता;राष्ट्रीय महामार्ग-81 च्या कल्लागम – मीनसुरत्ती विभागाचे 60 किमी लांबीचे 4/2-रस्ते मार्गिका ;  राष्ट्रीय महामार्ग  -785 चा  चेट्टीकुलम –  नाथम विभागाचा 29 किमी चौपदरी रस्ता; राष्ट्रीय महामार्ग -536 च्या कराईकुडी – रामनाथपुरम विभागाच्या पदपथ जोडणी रस्त्यासह 80 किमी लांब दोन मार्गिका; आणि राष्ट्रीय महामार्ग -179 अ  सेलम – तिरुपथूर – वानियांबडी रस्त्याच्या  विभागाचे 44 किमी लांबीचे चौपदरीकरण या कामांचा समावेश आहे. रस्ते प्रकल्पांमुळे प्रदेशातील लोकांचा सुरक्षित आणि जलद प्रवास सुकर होईल आणि त्रिची, श्रीरंगम, चिदंबरम, रामेश्वरम, धनुष्कोडी, उथिराकोसमंगाई, देवीपट्टीनम, एरवाडी, मदुराई यासारख्या औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्रांची संपर्क सुविधा  सुधारेल.

पंतप्रधानांनी या कार्यक्रमादरम्यान महत्त्वाच्या रस्ते विकास प्रकल्पांची पायाभरणीही केली. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग – 332 अ  च्या मुगैयुर ते मरक्कनम पर्यंत 31 किमी लांबीच्या चौपदरी रस्त्याच्या बांधकामाचा समावेश आहे.  हा रस्ता तामिळनाडूच्या पूर्व किनार्‍यावरील बंदरांना जोडेल, जागतिक वारसा स्थळ – ममल्लापुरमशी संपर्क सुविधा  वाढवेल आणि कल्पक्कम अणुऊर्जा प्रकल्पाला चांगली संपर्क सुविधा प्रदान करेल.

पंतप्रधानांनी कामराजर बंदरातील मालवाहतूक जहाज उभे राहण्याचा  सामान्य मालवाहतूक जहाज तळ -II (वाहन निर्यात /आयात टर्मिनल-II आणि कॅपिटल ड्रेजिंग टप्पा -V) राष्ट्राला समर्पित केला. सामान्य मालवाहतूक जहाज तळ-II चे उद्घाटन हे देशाच्या व्यापाराला बळकटी देण्याच्या दिशेने एक पाऊल असेल जे आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीला चालना देईल.

कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी  9000 कोटींहून अधिक खर्चाचे महत्त्वाचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू प्रकल्पाचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणीही केली. राष्ट्रार्पण  केलेल्या दोन प्रकल्पांमध्ये  इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या  (आयओसीएल ) आयपी 101 (चेंगलपेट) ते आयपी  105 (सायलकुडी) विभागातील एन्नोर – थिरूवल्लूर – बंगळुरू – पुदुचेरी – नागपट्टीनम – मदुराई – तुतीकोरिन या 488 किमी लांबीच्या  नैसर्गिक वायू पाईपलाईनचा तसेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एचपीसीएल)   697 किमी लांबीच्या  विजयवाडा-धर्मपुरी बहुउत्पादन (पीओएल ) पेट्रोलियम पाईपलाईनचा  (व्हीडीपीएल ) समावेश आहे.

ज्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली  त्यामध्ये भारतीय वायू प्राधिकरण मर्यादित (जीएआयएल ) द्वारे कोची-कूट्टानाड-बंगळुरू-मंगळुरू गॅस पाईपलाईनच्या II (केकेबी एमपीएल  II)  कृष्णगिरी ते कोईम्बतूर विभागापर्यंत 323 किमी नैसर्गिक वायू पाईपलाईनचा विकास आणि चेन्नईत वल्लूर इथे प्रस्तावित ग्रास रूट टर्मिनलसाठी सामान मार्गिकेमध्ये पीओएल  पाईपलाईन टाकणे याचा यात समावेश आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील  हे प्रकल्प या क्षेत्रातील ऊर्जेच्या औद्योगिक,देशांतर्गत आणि व्यावसायिक गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल ठरतील.यामुळे या प्रदेशात रोजगार निर्मिती होईल आणि रोजगार निर्मितीला हातभार लागेल.

पंतप्रधानांनी कल्पक्कम येथील  इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्र (आयजीसीएआर ) येथे प्रात्यक्षिक शीघ्र  अणुभट्टी इंधन पुनर्प्रक्रिया संयंत्र (डीएफआरपी) राष्ट्राला समर्पित केले. 400 कोटी रुपये खर्चून विकसित केलेले डीएफआरपी हे अनोख्या रचनेसह  सुसज्ज आहे, जे जगातील अशा प्रकारचे एकमेव आहे आणि शीघ्र  अणुभट्ट्यांमधून सोडल्या जाणार्‍या कार्बाइड आणि ऑक्साईड या दोन्ही इंधनांवर पुनर्प्रक्रिया करण्यास सक्षम आहे.याची रचना  संपूर्णपणे भारतीय शास्त्रज्ञांनी केलेली आहे  आणि मोठ्या व्यावसायिक स्तरावरील शीघ्र   अणुभट्टी इंधन पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

इतर प्रकल्पांमध्ये, पंतप्रधानांनी राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था  (एनआयटी ) – तिरुचिरापल्लीच्या 500 खाटांच्या मुलांचे वसतीगृह ‘AMETHYST’ चे उद्घाटन केले. 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

S.Patil/Vasanti/Suvarna/Sonal C/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai