Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या हस्ते जागतिक आरोग्य संघटनेच्या जामनगर येथील पारंपरिक औषध केंद्राचा कोनशीला समारंभ संपन्न

पंतप्रधानांच्या हस्ते जागतिक आरोग्य संघटनेच्या जामनगर येथील पारंपरिक औषध केंद्राचा कोनशीला समारंभ संपन्न


मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांच्या उपस्थितीत आज जामनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक औषध केंद्राच्या स्थापनेचा कोनशीला समारंभ संपन्न झाला. जगभरातील अशा प्रकारचे हे जागतिक पातळीवरील पारंपरिक औषधांचे पहिले आणि एकमेव बाह्यस्थ केंद्र असणार आहे. हे केंद्र जागतिक स्वास्थ्यासाठीचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून उदयाला येईल. बांगलादेश, भूतान, नेपाळ या देशांचे पंतप्रधान आणि मालदीवचे राष्ट्रपती यांनी पाठविलेले व्हिडीओ संदेश यावेळी उपस्थितांसमोर सादर करण्यात आले. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय, सर्वानंद सोनोवाल, डॉ. मुंजपारा महेंद्रभाई आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यावेळी उपस्थित होते.

जामनगर येथे जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक औषध केंद्राच्या स्थापनेसाठी सर्व प्रकारची मदत करण्यात पुढाकार घेतल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेयेसुस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. जागतिक आरोग्य संघटनेच्या 107 सदस्य देशांकडे आपापली देशनिहाय सरकारी कार्यालये आहेत त्यामुळे पारंपरिक औषधांच्या क्षेत्रातील नेतृत्वासाठी जग भारताकडेच येईल आणि म्हणून हे केंद्र म्हणजे खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवरील केंद्र आहे असे ते म्हणाले. जागतिक पातळीवर पारंपरिक औषधे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि म्हणून पारंपरिक औषधोपचार पद्धती फलदायी करण्यासाठी या केंद्राला बरेच प्रयत्न करावे लागतील. डॉ. टेड्रोस घेब्रेयेसुस यांनी सांगितले कि जगाच्या अनेक भागांमध्ये पारंपरिक औषध प्रणाली हीच प्राथमिक  उपचार पद्धती म्हणून वापरली जाते. म्हणून हे नवे केंद्र औषधांच्या बाबतीत उपलब्ध माहिती, अभिनव संशोधन आणि टिकाऊपणा यावर लक्ष केंद्रित करेल आणि त्यानुसार पारंपरिक औषधांच्या अधिकाधिक वापरासाठी प्रयत्न करेल असे ते पुढे म्हणाले. संशोधन आणि आघाडी, पुरावा आणि शिक्षण, माहिती आणि विश्लेषणात्मक अभ्यास, शाश्वतता आणि समतोल तसेच अभिनव संशोधन आणि तंत्रज्ञान ही या केंद्राची या पाच मुख्य कार्यक्षेत्रे असतील असे डॉ. टेड्रोस घेब्रेयेसुस यांनी यावेळी सांगितले.

मॉरिशस देशाला या कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांनी देखील पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. विविध संस्कृतींमध्ये भारतीय औषधोपचार प्रणालीचे आणि वनौषधींचे महत्त्व यावर त्यांनी त्यांच्या भाषणात अधिक भर दिला. ते म्हणाले की, या केंद्राच्या स्थापनेसाठी आत्तापेक्षा अधिक योग्य अशी दुसरी कुठलीही वेळ असू शकत नाही.या केंद्राच्या स्थापनेसाठी पुढाकार घेण्यात पंतप्रधान मोदी यांनी दिलेले व्यक्तिगत योगदान देखील त्यांनी अधोरेखित केले. या निस्वार्थी योगदानाबद्दल आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत सरकार आणि भारतीय जनता यांचे अत्यंत आभारी आहोत, प्रविंद कुमार जुगनाथ म्हणाले. वर्ष 1989 पासून मॉरिशस देशात आयुर्वेदाला देण्यात आलेल्या कायदेशीर मान्यतेचे तपशील देखील त्यांनी उपस्थितांना दिले. मॉरिशसच्या विद्यार्थ्यांना जामनगर येथे आयुर्वेदिक वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी शिष्यवृत्ती दिल्याबद्दल त्यांनी गुजरात सरकारचे देखील आभार मानले.

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी डॉ. टेड्रोस गेब्रेयेसुस यांच्या आपुलकीयुक्त भाषणाबद्दल त्यांचे आभार मानले. पंतप्रधानांनी डॉ. टेड्रोस गेब्रेयेसुस यांचे भारताशी नाते  आणि मेडिसिन (जीसीटीएम) प्रकल्पातील त्यांच्या वैयक्तिक सहभागाचा उल्लेख केला .  ते म्हणाले की डब्ल्यूएचओ ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिनच्या रूपात त्यांचा स्नेह दिसून येतो. भारताकडून त्यांच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन पंतप्रधानांनी त्यांना  दिले.

पंतप्रधानांनी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ आणि त्यांच्या कुटुंबाशी असलेल्या तीन दशकांच्या दीर्घ संबंधांनाही अधोरेखित केले.  आणि त्यांच्या भाषणाबद्दल  आणि उपस्थितीबद्दल त्यांचे आभार मानले. ज्या नेत्यांचे व्हिडिओ संदेश प्रसारित करण्यात आले त्यांचेही  मोदी यांनी आभार मानले.

पंतप्रधान म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेचे  ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिन ही या क्षेत्रातील भारताच्या योगदानाची आणि क्षमतेची  ओळख आहे.  “भारत ही भागीदारी संपूर्ण मानवतेची सेवा करण्याची एक मोठी जबाबदारी मानतो.”असे त्यांनी सांगितले.

जागतिक  केंद्राबद्दल  आनंद व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले, “निरोगीपणाप्रति जामनगरच्या   योगदानाला जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक पारंपरिक औषध केंद्रामुळे  जागतिक स्तरावर ओळख मिळेल.”  मोदी म्हणाले की, जामनगरमध्ये पाच दशकांपूर्वी जगातील पहिले आयुर्वेदिक विद्यापीठ स्थापन करण्यात आले होते. आयुर्वेद शिक्षण आणि संशोधनातील ही  दर्जेदार आयुर्वेदिक संस्था आहे.

निरामय आरोग्यप्राप्ती हे आपले अंतिम ध्येय असले पाहिजे यावर पंतप्रधानांनी भर दिला. ते म्हणाले की रोगमुक्त राहणे हा आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असू शकतो परंतु अंतिम ध्येय निरामय आयुष्य  असणे आवश्यक आहे. पंतप्रधान म्हणाले की, निरोगीपणाचे महत्त्व महामारीच्या काळात तीव्रतेने जाणवले. आज जग, आरोग्य सेवा पुरवण्याचे  नवीन आयाम शोधत आहे. मला आनंद आहे की एक ग्रह एक  आरोग्यही घोषणा देऊन जागतिक आरोग्य संघटनेने  एक पृथ्वी, एक आरोग्यया भारतीय संकल्पनेला प्रोत्साहन दिले आहे.

पंतप्रधान म्हणाले, भारताची पारंपरिक औषध प्रणाली केवळ उपचारापुरती मर्यादित नाही. हे जीवनाचे समग्र विज्ञान आहे. आयुर्वेद औषधे  आणि उपचारांच्या पलीकडील आहे , आणि आयुर्वेदामध्ये औषधे आणि उपचारांव्यतिरिक्त सामाजिक आरोग्य, मानसिक आरोग्य-आनंद, पर्यावरणीय आरोग्य, सहानुभूती, करुणा आणि उत्पादकता समाविष्ट आहे. “आयुर्वेद हे जीवनाचे ज्ञान मानले जाते आणि तो पाचवा वेद मानला जातो”, असे  मोदी म्हणाले. उत्तम आरोग्याचा थेट संबंध संतुलित आहाराशी असतो, असे सांगत पंतप्रधानांनी स्पष्ट केले की आपल्या पूर्वजांनी आहार हा उपचाराचाच अर्धा भाग मानला होता आणि आपली वैद्यकीय व्यवस्था आहारविषयक सल्ल्याने परिपूर्ण आहे. पंतप्रधान म्हणाले की, भारतासाठी 2023 हे वर्ष हे संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय बाजरीचे वर्ष म्हणून निवडले आहे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. हे पाऊल मानवतेसाठी फायदेशीर ठरेल, असे ते म्हणाले.

जागतिक स्तरावर आयुर्वेद, सिद्ध, युनानी औषध प्रणालीच्या  वाढत्या  मागणीकडे  पंतप्रधानांनी लक्ष वेधले.  कारण अनेक देश महामारीचा  सामना करण्यासाठी पारंपरिक औषधांवर भर देत आहेत. त्याचप्रमाणे जगभरात योगविद्येची लोकप्रियता वाढत आहे. मधुमेह, लठ्ठपणा आणि नैराश्य यांसारख्या आजारांशी लढण्यासाठी योगसाधना  अत्यंत उपयुक्त ठरत आहे, याकडे मोदींनी लक्ष वेधले. योगामुळे लोकांना मानसिक तणाव कमी करण्यात आणि मन-शरीर आणि चेतना यांचा समतोल साधण्यात मदत होत आहे.

पंतप्रधानांनी नवीन केंद्रासाठी पाच उद्दिष्टे निश्चित केली. एक , तंत्रज्ञानाचा वापर करून पारंपारिक ज्ञान प्रणालीचा डेटाबेस तयार करणे; दुसरे, पारंपारिक औषधांच्या चाचणी आणि प्रमाणीकरणासाठी जीसीटीएम आंतरराष्ट्रीय मानके तयार करू शकते जेणेकरून या औषधांवरील विश्वास वाढेल. तिसरे, जीसीटीएम असा एक मंच  म्हणून विकसित व्हायला हवे जिथे पारंपरिक औषधांमधील  जागतिक तज्ञ एकत्र येतील  आणि अनुभव सामायिक करतील. त्यांनी केंद्राला वार्षिक पारंपरिक औषध महोत्सव आयोजित करण्याबाबत सुचवले. चौथे, जीसीटीएमने पारंपरिक औषधांच्या क्षेत्रातील संशोधनासाठी निधी गोळा करावा. तसेच जीसीटीएमने  विशिष्ट रोगांच्या सर्वांगीण उपचारांसाठी नियमावली विकसित केली पाहिजे जेणेकरुन रूग्णांना पारंपरिक आणि आधुनिक औषधांचा लाभ  मिळेल.

मोदींनी वसुधैव कुटुंबकमया भारतीय संकल्पनेचे आवाहन केले आणि संपूर्ण जग नेहमी निरोगी राहावे अशी प्रार्थना केली. ते म्हणाले की डब्ल्यूएचओ-जीसीटीएमच्या स्थापनेमुळे ही परंपरा अधिक समृद्ध होईल.

***

S.Patil/S.Chitnis/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com