नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी उद्या दिनांक 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता दूरदृश्यप्रणालीद्वारे गुजरातमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या (PMJAY-MA) आयुष्मान कार्डांच्या वितरणास प्रारंभ करणार आहेत.
गरीब नागरिकांना वैद्यकीय उपचार मिळून आणि आजाराच्यावेळी येणाऱ्या आपत्तीजनक खर्चापासून संरक्षण मिळावे यासाठी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री या नात्याने, पंतप्रधानांनी 2012 मध्ये “मुख्यमंत्री अमृतम (एमए)” या योजनेला सुरूवात केली होती. सन 2014 मध्ये, या योजनेची व्याप्ती ज्या कुटुंबांची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 4 लाख रुपये आहे, त्यांच्यापर्यंत वाढविण्यात आली होती,त्यानंतर ही योजना इतर अनेक दुर्बल घटकांसाठीदेखील विस्तारित करण्यात आली होती.त्यावेळी या योजनेला मुख्यमंत्री अमृतम वात्सल्य योजना (MAV) असे नाव देण्यात आले होते.
या योजनेच्या यशाच्या अनुभवातून, पंतप्रधानांनी 2018 मध्ये आयुष्मान भारत प्रधान मंत्री जनआरोग्य योजना(AB-PMJAY) ही योजना कार्यान्वित केली असून, प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाख रुपयांपर्यंत व्याप्ती देणारी ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे, ज्यात कुटुंबातील माणसे आणि वयावर कोणतीही मर्यादा न ठेवता प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय स्तरावर काळजी घेत रुग्णालयातील सेवांसाठी ही योजना सहाय्य करते. गुजरातमध्ये 2019 मध्ये सुरू केलेल्या एबी-पीएम-जे (AB-PM-JAY) योजनेत एमए आणि एमएव्ही (MA/MAV) योजना एकत्रित करून त्यांचे नामकरण आता पीएमजे-एमए योजना (PMJAY-MA) असे झाले आहे आणि एमए आणि एमएव्ही यांचे सर्व (MA/MAV) लाभार्थी पीएमजे-एमए कार्ड (PMJAY-MA) साठी पात्र आहेत.
या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते या कार्डांच्या वितरणास प्रारंभ होईल, त्यानंतर लाभार्थ्यांची ई-केवायसी पडताळणी केल्यानंतर राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या यादीतील एजन्सींद्वारे छापील स्वरूपात 50 लाख रंगीत आयुष्मान कार्डांचे संपूर्ण गुजरातमधील सर्व लाभार्थ्यांना घरपोच वितरीत केली जातील.
A.Chavan/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai