Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या सिलवासा येथील विकास कामांच्या उद्घाटनावेळी दिलेल्या भाषणाचा मजकूर

PM’s speech at launch of development works in Silvassa


दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीवचे प्रशासक प्रफुल्लभाई पटेल, संसदेमधील माझ्या सहकारी कलाबेन डेलकर, सर्व मान्यवर, बंधू-भगिनींनो, नमस्कार! 

कसे आहात सगळे?

आज इथला उत्साह खूपच जबरदस्त वाटतो आहे. संघ प्रदेशातील सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो की तुम्ही सर्वांनी मिळून मला येथे येण्याची संधी दिली. अनेक वर्षांनंतर ओळखीच्या चेहऱ्यांना पुन्हा भेटण्याचा आनंद काही वेगळाच आहे. 

मित्रांनो,

सिलवासाच्या या निसर्गसौंदर्यात, येथील लोकांच्या मायेने आणि दादरा नगर हवेली, दीव-दमणशी असलेल्या माझ्या जिव्हाळ्याच्या नात्याने नेहमीच एक विशेष आकर्षण राहिले आहे. हे नाते किती जुने आहे, हे तुम्ही सर्वजण जाणता. येथे आल्यावर मिळणारा आनंद आणि आपुलकी हे केवळ आपणच समजू शकता. आज येथे अनेक जुन्या सहकाऱ्यांना पाहताना मला खूप समाधान वाटत आहे. पूर्वी मला येथे वारंवार येण्याची संधी मिळायची. त्या वेळी सिलवासा आणि संपूर्ण दादरा नगर हवेली, दमण-दीव यांची परिस्थिती काय होती, हे तुम्ही सर्व जाणताच. त्या काळी लोकांना असे वाटायचे की समुद्रकिनाऱ्यावर असलेली ही छोटी जागा मोठ्या विकासाच्या संधींसाठी योग्य ठरेल का? पण मला येथील लोकांची क्षमता आणि जिद्द यावर पूर्ण विश्वास होता. 2014 मध्ये केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर, आम्ही या विश्वासाला सामर्थ्यात रूपांतरित केले आणि विकासाला नवा वेग दिला. आज आपले सिलवासा आणि हा संपूर्ण प्रदेश एका आधुनिक ओळखीने पुढे आला आहे. सिलवासा आता असे शहर बनले आहे जिथे देशभरातील लोक राहतात. येथील बहुसांस्कृतिक वातावरण हे दर्शवते की दादरा नगर हवेलीमध्ये किती झपाट्याने विकास होत आहे आणि किती नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. 

मित्रांनो

आज येथे 2500 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले आहे. या प्रकल्पांमध्ये पायाभूत सुविधा, वाहतूक, आरोग्य, शिक्षण आणि पर्यटन यांसारख्या सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे. हे प्रकल्प या प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाला गती देतील आणि येथे नव्या संधी उपलब्ध करतील. या प्रकल्पांसाठी मी तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. 

तुमच्याशी एक छोटीशी गोष्ट सामायिक करतो – अनेक जण सिंगापूरला जात असतील. तुम्हाला ठाऊक आहे का, की सिंगापूर कधी काळी एक लहानसे मच्छीमार गाव होते? त्या काळी तेथील प्रमुख व्यवसाय फक्त मासेमारी होता. पण तिथल्या लोकांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर काही दशकांतच सिंगापूरला एका विकसित राष्ट्रामध्ये बदलले. आज संपूर्ण जग त्याचे कौतुक करते. त्याचप्रमाणे, जर संघ प्रदेशातील प्रत्येक नागरिक ठरवेल, तर मी तुमच्या सोबत उभा राहायला तयार आहे. पण तुम्हालाही पुढे यावे लागेल, कारण हा विकास एकट्याने नाही, तर एकत्र येऊन घडवायचा आहे. 

मित्रांनो

दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव हे केवळ केंद्रशासित प्रदेश नाहीत, तर आमच्या अभिमानाचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. म्हणूनच आम्ही या प्रदेशाला असे मॉडेल स्टेटबनवत आहोत, ज्याला सर्वसमावेशक विकासाचे उदाहरण म्हणून पाहिले जाईल. 

मी इच्छितो की,

हा प्रदेश ओळखला जावा – अत्याधुनिक पायाभूत सुविधांसाठी,

हा प्रदेश ओळखला जावा – आधुनिक आरोग्य सेवांसाठी,

हा प्रदेश ओळखला जावा – जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थांसाठी!

येथील ओळख असावी – येथील पर्यटनासाठी, ‘ब्लू इकॉनॉमीसाठी!

येथील ओळख असावी – औद्योगिक प्रगती, युवकांसाठी नवीन संधी, महिलांची भागीदारी आणि चौफेर विकासासाठी!

बंधू आणि भगिनींनो,

प्रफुल्लभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि केंद्र सरकारच्या पाठिंब्यामुळे, आम्ही आता या ध्येयाच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत. गेल्या 10 वर्षांमध्ये, आम्ही या दिशेने वेगाने पावले टाकली आहेत. आज सिलवासा आणि संपूर्ण संघ प्रदेश देशाच्या नकाशावर विकासाच्या एका वेगळ्या ओळखीने उभे राहत आहेत.

दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव यांना अनेक योजनांमध्ये संपूर्ण सॅच्युरेशन मिळाले आहे. म्हणजेच, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक गरजेच्या ठिकाणी सरकारच्या योजना प्रभावीपणे पोहोचल्या आहेत.

आपण पाहतोय:

वन नेशन वन राशन कार्डयोजनेमुळे प्रत्येक नागरिकाला अन्नसुरक्षा मिळाली आहे. जल जीवन मोहीमअंतर्गत प्रत्येक घरात स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचले आहे. भारत नेटयोजनेमुळे डिजिटल संपर्क मजबूत झाला आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेमुळे प्रत्येक कुटुंब बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ हजारो लोकांना मिळत आहे.

या योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे लोकांचा सरकारवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. या योजनांमुळे येथील नागरिकांच्या जीवनात झालेले सकारात्मक बदल स्पष्टपणे दिसून येत आहेत.

आमचे पुढील लक्ष्य आहे स्मार्ट सिटी मिशन, समग्र शिक्षा, आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना यांसारख्या योजनांमध्ये 100% सहभाग मिळवणे. ही पहिलीच वेळ आहे की सरकार स्वतः नागरिकांच्या दारात जाऊन त्यांच्यापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवत आहे. यामुळे समाजातील वंचित आणि आदिवासी वर्गाला विशेषतः मोठा फायदा झाला आहे. 

आपण सर्वजण एकत्र आलो, तर हा प्रदेश विकासाच्या बाबतीत संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरू शकतो. चला, हा संकल्प घेऊया की आपण सर्वांनी मिळून दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीवला विकासाच्या नवीन उंचीवर नेऊया!

मित्रांनो,

पायाभूत सुविधांपासून ते शिक्षण, रोजगार आणि औद्योगिक विकासापर्यंत, कशा प्रकारे या प्रदेशाचे चित्र बदलले आहे ते आज आपल्यासमोर आहे. एक काळ होता ज्यावेळी येथील युवा वर्गाला उच्च शिक्षणासाठी बाहेर जावे लागत असायचे. पण आता या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील 6 संस्था आहेत. नमो मेडिकल कॉलेज, गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, आयआयआयटी दीव, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी आणि दमणचे अभियांत्रिकी महाविद्यालय, या संस्थांमुळे आपला सिल्वासा आणि हा केंद्रशासित प्रदेश शिक्षणाचे नवे केंद्र बनले आहे. येथील युवा वर्गाला या संस्थांचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी त्यांच्या जागा राखीव ठेवल्या आहेत. पूर्वी मला हे पाहून आनंद होत असायचा की एक असा प्रदेश आहे जिथे हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि मराठी या चार वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. आता मला या गोष्टीचा देखील अभिमान आहे की येथील प्राथमिक आणि छोट्या शिशुवर्गातील बालके देखील स्मार्ट क्लास रुम्समध्ये शिकत आहेत.

मित्रांनो,

गेल्या काही वर्षांत या प्रदेशात आधुनिक आरोग्य सेवांचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. 2023 मध्ये, मला येथे नमो मेडिकल कॉलेजचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली होती. आता त्यात 450 खाटांची क्षमता असलेल्या आणखी एका रुग्णालयाची भर पडली आहे. त्याचे नुकतेच येथे उद्घाटन झाले आहे. आज येथे आरोग्याशी संबंधित अनेक प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली आहे. सिल्वासातील या आरोग्य सुविधांमुळे येथील आदिवासी समुदायाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

मित्रांनो,

आज, सिल्वासातील, आरोग्याशी संबंधित हे प्रकल्प आणखी एका कारणासाठी विशेष बनले आहेत. आज जन औषधी दिवस देखील आहे. जन औषधी म्हणजे स्वस्त उपचारांची हमी! जनऔषधीचा मंत्र आहे – कमी किंमत, प्रभावी औषध, कमी किंमत, प्रभावी औषध, आमचे सरकार चांगली रुग्णालये देखील उभारत आहे, आयुष्मान योजनेअंतर्गत मोफत उपचार देत आहे आणि जनऔषधी केंद्रांद्वारे स्वस्त औषधे पुरवत आहे. सर्वांनी आपल्या आयुष्यात पाहिलेले आहे की रुग्णालयात उपचार घेतल्यानंतरही औषधांच्या खर्चाचा भार बराच काळ पडत असतो. हा भार कमी करण्यासाठी, देशभरातील 15 हजारांहून अधिक जनऔषधी केंद्रांवर लोकांना 80 टक्क्यांपर्यंत कमी किमतीत औषधे मिळत आहेत. 80% पर्यंत सूट म्हणा ना! दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव येथील लोकांनाही सुमारे 40 जनऔषधी केंद्रांचा लाभ मिळत आहे. येत्या काळात, आम्ही देशभरात 25 हजार जनऔषधी केंद्रे उघडण्याचे उद्दिष्ट ठेवून पुढे जात आहोत. ही योजना सुरू झाल्यापासून, आतापर्यंत सरकारने गरजूंना सुमारे साडे सहा हजार कोटी रुपयांची स्वस्त औषधे पुरवली आहेत. जन औषधी केंद्रे सुरू झाल्यामुळे, गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या सुमारे 30 हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. जनऔषधी केंद्रांमुळे अनेक गंभीर आजारांवरील उपचार स्वस्त झाले आहेत. आमचे सरकार सामान्य माणसाच्या गरजांविषयी किती संवेदनशील आहे याचा हा दाखला आहे.

मित्रांनो,

आरोग्याशी संबंधित या महत्त्वाच्या विषयांबरोबरच, मला आणखी एक महत्त्वाचा विषय मांडायचा आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहेच की आज जीवनशैली आणि त्याच्याशी संबंधित आजार, जीवनशैलीमुळे होणारे मृत्यू हे आपल्या आरोग्यासाठी एक मोठा धोका बनत आहेत. असाच एक आजार आहे लठ्ठपणा, ओबेसिटी, हे लोक खुर्चीवर देखील बसू शकत नाहीत, आजूबाजूला पाहायचे नाही आहे. नाहीतर मी सांगितले म्हणून आजूबाजूला पाहतील, की माझ्या जवळ जास्त वजनाचा कोण बसला आहे. हा लठ्ठपणा आज इतर आजारांचे कारण बनू लागला आहे. अलीकडेच लठ्ठपणाच्या समस्येवर एक अहवाल आला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की 2050 पर्यंत 44 कोटींपेक्षा जास्त भारतीय लठ्ठपणा, ओबेसिटीच्या समस्येने ग्रस्त असतील. ही आकडेवारी खूप जास्त आहे, ही आकडेवारी भीतीदायक आहे. याचा अर्थ आहे की प्रत्येक 3 पैकी एका व्यक्तीला ओबेसिटीमुळे गंभीर आजाराची लागण होऊ शकते. हा लठ्ठपणा जीवघेणा ठरू शकतो. म्हणजेच प्रत्येक कुटुंबात कोणी एक व्यक्ती ओबेसिटीचा बळी ठरू शकते. ही किती मोठे संकट असू शकेल. आपल्याला आतापासूनच ही परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करावाच लागेल. आणि यासाठी अनेक उपाय असू शकतात, मी एक आवाहन केले आहे आणि आज मला तुमच्याकडून हे वचन हवे आहे, हे रुग्णालय तर चांगले बांधले आहे, पण तुमच्यावर या रुग्णालयात जाण्याची वेळ यावी, असे मला अजिबात वाटत नाही. मग रुग्णालय रिकामी का राहिना, तुम्ही लोक तंदुरुस्त रहा. माझे तुमच्याकडे एक काम आहे, तुम्ही कराल का? हात वर करून जरा सांगा, कराल का? मला एक वचन द्या की करणार म्हणून, सर्वांनी हात वर करून जरा बोला, करणार 100 टक्के करणार, या शरीराचे वजन वाढेल आणि लठ्ठ होत जाल, त्यामध्ये सडपातळ होण्याचा प्रयत्न करायचा आहे. 

आपल्या सर्वांना आपल्या जेवणातील तेलात 10 टक्के कपात करण्याची गरज आहे. आपल्याला दर महिन्याला 10 टक्के कमी तेलात भागवण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजेच आपण दर महिन्याला जितके तेल घेतो, आतापासूनच 10 टक्के कमी खरेदी करण्याचे निर्धारित करा.

बोला, तेलाचा वापर 10% नी कमी करण्याचे वचन देणार का, सर्वजण हात वर करा, खास करून भगिनीवर्गांनी वचन द्यावे, मग भलेही घरी इतरांची बोलणी ऐकावी लागली तरीही चालेल, पण तेलाचा वापर कमी कराल, हे पक्के. वजन कमी करण्याच्या दिशेने हे एक खूप महत्त्वपूर्ण पाऊल असेल. याशिवाय, आपण व्यायामाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे आवश्यक आहे. जर तुम्ही रोजच काही किलोमीटर पायी चालत असाल, रविवारी सायकल चालवण्यासाठी जात असाल तर याचा तुम्हाला खूप मोठा लाभ होईल. आणि हे पहा मी तुमच्याशी केवळ दहा टक्के तेल कमी वापरण्याबद्दल बोलत आहे, दुसरे कोणतेही काम करायला सांगत नाही, नाहीतर तुम्ही म्हणाल की मी तुम्हाला 50% कमी तेलाचा वापर करायला सांगतो आहे आणि मग तुम्ही मला सिल्वासाला परत कधीच बोलवणार नाही. आज देश विकसित भारताचा संकल्प सिद्ध करण्यासाठी प्रयत्नरत आहे. निरोगी देशच हे लक्ष्य साध्य करू शकतो, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच, दादरा आणि नगर हवेली, दमन आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील लोकांना देखील मी सांगू इच्छितो की जर आपण रोजच्या जेवणात तेलाचा वापर कमी केला, स्वतःला तंदुरुस्त ठेवले तर विकसित भारताच्या यात्रेत हे तुमचे खूप मोठे योगदान असेल.

मित्रांनो,

ज्या राज्याकडे विकासाचा दृष्टिकोन असतो तेथे संधी देखील जलद गतीने मिळत राहतात. म्हणूनच गेल्या दशकापासून हा भाग औद्योगिक केंद्राच्या रूपात उदयास येत आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात आम्ही मिशन उत्पादन, हे खूप मोठे काम हाती घेतले आहे, ज्याचा सर्वात जास्त फायदा येथील लोकांना होऊ शकतो. गेल्या दहा वर्षात येथे शेकडो नवे उद्योग सुरू झाले आहेत आणि अनेक उद्योगांचा विस्तार झाला आहे. येथे हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. हे उद्योग स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहेत. या रोजगाराच्या संधींचा जास्तीत जास्त लाभ आपल्या आदिवासी समाजाला, आदिवासी मित्रांना मिळेल, हे आम्ही सुनिश्चित करत आहोत. याचप्रमाणे अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, महिला यांना सशक्त बनवण्यासाठी येथे गीर आदर्श आजीविका योजना देखील लागू करण्यात आली आहे. छोट्या दूध उत्पादक फार्मच्या स्थापनेमुळे येथे स्वयंरोजगाराच्या नव्या संधी देखील निर्माण होत आहेत.

मित्रांनो,

रोजगाराचे एक खूप मोठे माध्यम पर्यटन देखील आहे. येथील समुद्रकिनारे आणि येथील समृद्ध वारसा देश विदेशातील पर्यटकांना मोठ्या संख्येने आकर्षित करत आहे. दमनमध्ये रामसेतू, नमो पथ आणि टेन्ट सिटी च्या विकासामुळे या प्रदेशाचे आकर्षण वाढले आहे. दमनमधील रात्री भरणारा बाजार पर्यटकांना खूपच आवडतो आहे. येथे एका विशाल पक्षी विहाराची निर्मिती करण्यात आली आहे. दुधनीमध्ये इको रिसॉर्ट सुरू करण्याची तयारी चालू आहे. दीवमध्ये समुद्रकिनाऱ्यावर कोस्टल प्रो-मेनेड, समुद्रकिनाऱ्यांचा विकास ही कामे देखील सुरू आहेत. 2024 मध्ये दीव समुद्रकिनारी क्रीडा स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले होते, त्यानंतर लोकांमध्ये समुद्रकिनारी खेळल्या जाणाऱ्या क्रीडा प्रकारांबद्दल आकर्षण वाढत आहे. ब्ल्यू फ्लॅग मिळाल्यानंतर दीवमधील घोगला समुद्रकिनारा एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनला आहे. आणि, आता तर दीव जिल्ह्यात ‘केबल कार’चा विकास केला जात आहे. ज्यातून अरबी समुद्राचा शानदार देखावा पाहता येईल असा हा भारतातला पहिलाच रोप वे असेल. म्हणजेच, आपले दादरा नगर, हवेली आणि दमन, दीव ही आपली केंद्रशासित राज्ये भारतातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांच्या यादीत समाविष्ट होत आहेत.

मित्रांनो,

येथे जी संपर्क सुविधांची कामे झाली आहेत त्यांचीही या विकासात खूप मोठी भूमिका आहे. दादऱ्याजवळ बुलेट ट्रेनच्या स्थानकाच्या उभारणीचे काम सुरू आहे. मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे सिल्वासा मधून जातो. मागच्या काही वर्षांपासून येथे अनेक किलोमीटर लांबीचे नवे रस्ते बनवले जात आहेत आणि 500 किलोमीटरहून अधिक लांबीच्या रस्त्यांच्या निर्मितीचे काम सुरू आहे. यावर हजारो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. या भागाला उडान योजनेचा देखील खूप फायदा झाला आहे. उत्कृष्ट संपर्क सुविधांसाठी येथील विमानतळांचे अद्यतनीकरण केले जात आहे. म्हणजेच आमचे सरकार तुमच्या विकासात कोणतीही कसर शिल्लक ठेवत नाही.

मित्रांनो,

दादरा आणि नगर हवेली, दमन आणि दीव विकासाबरोबरच सुप्रशासन आणि जीवन सुलभीकरण असलेले प्रदेश देखील बनत आहेत, याचा मला खूप आनंद आहे. एक वेळ अशी होती जेव्हा लोकांना आपल्या अडचणी सोडवण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये अनेक चकरा माराव्या लागत होत्या. आज येथे सरकारी कार्यालयाशी संबंधित अधिकांश कामे मोबाईलवर केवळ एका क्लिकद्वारे पूर्ण केली जाऊ शकतात. या नव्या दृष्टिकोनाचा सर्वात जास्त फायदा त्या आदिवासीबहुल भागांना होत आहे जे कैक दशकांपासून दुर्लक्षित केले जात होते. आज अनेक गावांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन केले जात आहे. या शिबिरात लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण तेथेच करण्याचे प्रयत्न केले जातात. अशा प्रयत्नांसाठी मी प्रफुल भाई आणि त्यांच्या संपूर्ण चमुचे अभिनंदन करतो. दादरा आणि नगर हवेली, दमन आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांच्या विकासासाठी आम्ही निरंतर प्रयत्न करत राहू, याची मी तुम्हाला हमी देतो. मी पुन्हा एकदा आज सुरू झालेल्या विकास योजनांसाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो, आणि ज्या उत्साहाने तुम्ही माझे शानदार स्वागत केले, जो आपलेपणा दाखवला, जे प्रेम दिले, जो सन्मान दिला, यासाठी मी या प्रदेशातील सर्व नागरिकांचे हृदयपूर्वक आभार मानतो. खूप खूप धन्यवाद!

अस्वीकरण : पंतप्रधानांच्या भाषणातील काही अंश काही ठिकाणी गुजराती भाषेमध्ये देखील आहे, ज्याचा येथे भावानुवाद करण्यात आला आहे.

***

S.Tupe/G.Deoda/S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com