नवी दिल्ली, 30 ऑगस्ट 2023
G20 समन्वय समितीची नववी बैठक आज 30 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधानांचे प्रमुख सचिव पी के मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नवी दिल्लीत होणार असलेल्या जी 20 सदस्य देशांच्या नेत्यांच्या बैठकीसाठी झालेल्या तयारीचा प्रमुख सचिवांनी यावेळी आढावा घेतला. वाहतूक, शिष्टाचार, सुरक्षा आणि माध्यमांशी संबंधित तयारी इत्यादी बाबींचा या आढाव्यात समावेश होता. जी 20 सचिवालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच दूरसंचार विभाग येथील वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. कार्यस्थळी तसेच ‘भारत मंडपम’ इथे जागी चाललेले काम समाधानकारकरीत्या सुरू आहे असे यावेळी नमूद करण्यात आले. एकामेवाद्वितीय अशा भारतीय अनुभूतीसाठी भारतीय संस्कृतीवरील तसेच ‘मदर ऑफ डेमॉक्रसी’ ही प्रदर्शने भारत मंडपम मध्ये मांडली जात आहेत. कार्यक्रम स्थळावरील नटराजाची मूर्ती तसेच अतिथी नेत्यांच्या जोडीदारांसाठी खास तयार केलेला कार्यक्रम यांचाही प्रमुख सचिवांनी आढावा घेतला. जी-20 साठी पहिल्यांदाच मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे. ‘जी-20 इंडिया’ या नावाचे हे ॲप अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालीवर उतरवून घेण्यासाठी उपलब्ध आहे.
जी-20 साठीचे आमंत्रित आणि माध्यमकर्मी भारत मंडपम मध्ये उभारल्या जात असलेल्या इनोवेशन हब आणि डिजिटल इंडिया एक्स्पिरियन्शिअल हब यांच्या माध्यमातून डिजिटल इंडियाचे प्रत्यक्ष साक्षीदार होतील.
लॉजिस्टिकच्या बाबतीत सांगायचे तर,कवायती आयोजित केल्या जात आहेत तसेच रंगीत तालमीचे देखील नियोजन केले जात आहे. यावेळी प्रधान सचिवांनाही संबंधित अधिकाऱ्यांनी सुरक्षेसंदर्भातल्या बाबींची माहिती दिली. जनतेसाठी, रहदारी संबंधित सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सुरक्षा आणि शिष्टाचाराच्या कारणास्तव, रहदारीसंबंधी निर्बंध घातले जात असले तरी, जनतेची कमीत कमी गैरसोय होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत यावर प्रधान सचिवांनी भर दिला. यामुळे शहरातील अत्यावश्यक सेवांवर परिणाम होऊ नये, असे निर्देश त्यांनी दिले. रहदारी निर्बंधांसंबंधी होणारा संवाद हा अधिक वापरकर्ता-अनुकूल असला पाहिजे असे ते पुढे म्हणाले.
या शिखर परिषदेसाठी येणाऱ्या प्रसार माध्यमांच्या सुविधा व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला. आतापर्यंत 3600 हून अधिक विनंतीपत्रे परदेशी माध्यमांसह इतर माध्यमांकडून प्राप्त झाली असून त्यांना स्वीकृतीपत्रेगी जारी केले जात आहेत. भारत मंडपम येथील मीडिया सेंटर(माध्यम केंद्र) या आठवड्याच्या अखेरपर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होईल.
यावेळी प्रधान सचिवांनी सर्व संबंधित अधिकारी आणि विविध संस्थांच्या प्रमुखांना हे शिखर संमेलन यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. विविध कामांसाठी नेमलेल्या संस्थांमधील सुरळीत समन्वयासाठी, भारत मंडपम येथे एक बहुआयामी संस्था नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्ष तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रधान सचिव पुढील काही दिवसात नियोजित ठिकाणांना आणि स्थळांना देखील भेटी देतील.
* * *
R.Aghor/Vijaya/Vikas/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai