नवी दिल्ली, 17 जुलै 2023
नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावरील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्र(आयईसीसी) येथे आज भारताच्या जी-20 अध्यक्षतेबाबतच्या समन्वय समितीची सहावी बैठक संपन्न झाली. नवी दिल्ली येथे 9 आणि 10 सप्टेंबर 2023 या दिवशी होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेच्या आयोजनाच्या तयारीशी संबंधित विविध घटकांचा आढावा घेण्यावर पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ.पी.के.मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
या संदर्भात, समितीने शिखर परिषदेच्या आयोजनस्थळी व्यवस्थांचा आढावा घेतला तसेच नियमावली,सुरक्षितता, विमानतळाशी समन्वय,माध्यम प्रतिनिधींची व्यवस्था, पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण तसेच दिल्ली आणि दिल्लीशेजारील राज्यांमध्ये या बाबतीत करण्यात आलेली तयारी इत्यादींशी संबंधित सर्व पैलूंचा देखील समिती सदस्यांनी आढावा घेतला. जी-20 शिखर परिषदेला यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित संस्थांनी “सरकारच्या संपूर्ण सहभागासह” या दृष्टीकोनासह काम केले पाहिजे असे आवाहन डॉ.मिश्रा यांनी यावेळी बोलताना केले.
समितीच्या सदस्यांनी परिषदेच्या काळात होणाऱ्या विविध बैठकांच्या आयोजनस्थळी देखील भेट दिली आणि बारीकसारीक तपशील जाणून घेतले. विविध संस्थांच्या सुरळीत एकत्रित परिचालनासाठी परिषदेच्या ठिकाणी सर्व कार्यक्रमांच्या प्रायोगिक चाचण्या आणि रंगीत तालीम राबवण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला. आगामी जी-20 शिखर परिषदेसाठी सुरु असलेल्या विविध प्रकारच्या तयारीबाबत समितीने मार्गदर्शन आणि दिशादर्शन केले आणि पुढील आढाव्यासाठी येत्या दोन आठवड्यांमध्ये पुन्हा एकत्र भेटण्याचा निर्णय घेतला.
भारताच्या जी-20 अध्यक्षतेखाली आतापर्यंत घेण्यात आलेल्या बैठकांचा तसेच यापुढील काळात होऊ घातलेल्या बैठकांचा आढावा घेण्याची संधी देखील समन्वय समितीच्या या बैठकीने उपलब्ध करून दिली. जी-20 अध्यक्षतेत भारताने आतापर्यंत देशातील 55 वेगवेगळ्या ठिकाणी 170 बैठका घेतल्या आहेत तसेच जुलै आणि ऑगस्ट 2023 या महिन्यांमध्ये अनेक मंत्रीस्तरीय बैठका होणार आहेत याची नोंद समितीने घेतली.
केंद्रीय मंत्रिमंडळाने भारताच्या जी-20 अध्यक्षतेशी संबंधित तयारीवर तसेच व्यवस्थांवर लक्ष ठेवण्याचे अधिकार समन्वय समितीकडे सोपविले आहेत. आतापर्यंत समन्वय समितीच्या पाच बैठका झाल्या आहेत. याबरोबरच, भारताच्या जी-20 अध्यक्षतेशी संबंधित विशिष्ट वस्तुनिष्ठ आणि लॉजीस्टिक विषयक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी इतर अनेक बैठका देखील घेण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल, दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के.सक्सेना, केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्यासह इतर अनेक मान्यवर आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai