Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या कतार दौऱ्या दरम्यानचे भारत-कतार संयुक्त निवेदन

पंतप्रधानांच्या कतार दौऱ्या दरम्यानचे भारत-कतार संयुक्त निवेदन

पंतप्रधानांच्या कतार दौऱ्या दरम्यानचे भारत-कतार संयुक्त निवेदन


1. कतारचे अमिर महामहिम तमिम-बिन-हमाद-अल-थानी यांच्या निमंत्रणावरुन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4-5 जून 2016 ला कतारला दोन दिवसांची कार्यालयीन भेट दिली.

2. महामहिम अमिर यांनी अमिरी दिवान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 5 जून रोजी भेट घेतली, आणि परस्पर हिताच्या द्विपक्षीय, प्रादेशिक आणि समान हिताच्या बहुपक्षीय मुद्दयांवर चर्चा केली. विविध मुद्दयांवरची ही चर्चा सौहार्दपूर्ण आणि मैत्रीपूर्ण वातावरणात झाली.

3. कतार भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामहीम शेख अब्दुल्ला बिन नासिर बिन खलिफा अल थानी, पंतप्रधान तसेच कतारचे अंतर्गत व्यवहार मंत्र्यांची भेट घेतली.

4. भारत आणि कतार यांच्यातल्या ऐतिहासिक संबंधाना बैठकी दरम्यान उजाळा देण्यात आला तसेच दोन्ही देशातल्या जनतेत पिढयान पिढयांचे परस्पर हिताचे आणि पारंपरिक संबंध काळाच्या कसोटीवर सुलाखून निघाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

5. उभय देशातल्या द्विपक्षीय संबंधाबाबत दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कतार भेटीदरम्यान झालेल्या विविध करार आणि सामंजस्य करारांचे स्वागत करण्यात आले. नुकतेच झालेले तसेच याआधी करण्यात आलेल्या करारांमुळे भारत आणि कतार यांच्यातली मैत्री आणि सहकार्य अधिक दृढ होईल असा विश्वास दोन्ही देशांनी व्यक्त केला.

6. व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा, संरक्षण आणि मनुष्यबळ यासारख्या क्षेत्रात द्विपक्षीय संस्थात्मक यंत्रणा उत्तमपणे कार्यरत असल्याची प्रशंसा उभय नेत्यांनी केली. उभय देशातले सहकार्य अधिक दृढ होण्यासाठी विभागीय संयुक्त कार्यकारी गटांनी नियमितपणे भेटी सुरुच ठेवायला हव्यात यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला. परस्परहिताच्या द्विपक्षीय, प्रादेशिक जागतिक बाबींचा नियमित आढावा घेण्यासाठी आंतर मंत्रालय उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन करायला दोन्ही देशांनी मान्यता दिली.

7. सध्याच्या सद्‌भावनांची दखल घेत परस्परहिताच्या विविध क्षेत्रात द्विपक्षीय संबंध अधिक व्यापक आणि सखोल करण्यालाही दोन्ही नेत्यांनी मान्यता दिली. उच्चस्तरीय राजकीय आदान-प्रदान, संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य, व्यापार आणि आर्थिक संबंध तसेच उभय देशातल्या जनतेचे संबंध अधिक व्यापक करण्यालाही दोन्ही नेत्यांनी संमती दर्शवली. आपल्या प्रदेशात आणि जगात शांतता, स्थैर्य आणि सुरक्षितता राखण्याप्रती आपली जबाबदारी लक्षात घेऊन 21व्या शतकासाठी दोन्ही देशांत मजबूत भागिदारी निर्माण करण्यावर या नेत्यांनी भर दिला.

8. नोव्हेंबर 2008 मध्ये स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या संरक्षण सहकार्य करारामुळे उभय देशातले संरक्षणविषयक संबंध बळकट करण्यासाठी रुपरेखा मिळाल्याची दखल यावेळी घेण्यात आली. या संबंधांना अधिक चालना देण्यासाठी संयुक्त कवायती, नौदल, हवाई दल, भूदल आणि तटरक्षक दल क्षेत्रात प्रशिक्षणवृध्दी करण्यालाही या दोन नेत्यांनी संमती दर्शवली. मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत भारतात संरक्षण साहित्याच्या संयुक्त उत्पादनात कतारने विशेष रुची दर्शविली.

9. भारतात फेब्रुवारी 2016 मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्हयूमध्ये आणि मार्च 2016 मध्ये झालेल्या डिफेक्सोमध्ये कतारच्या सहभागाबद्दल भारताने प्रशंसा केली. तसेच भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या आस्थापनांना कतार शिष्टमंडळाच्या वाढत्या भेटींबद्दलही समाधान व्यक्त केले. मार्च 2016 मध्ये झालेल्या डिमडेक्स मध्ये भारताच्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युध्दनौकेसह भारताच्या उच्चस्तरीय सहभागाबद्दल कतारने भारताचे आभार मानले. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या जहाजांच्या नियमित सदिच्छा भेटींप्रतीही कतारने कृतज्ञता व्यक्त केली. कतारच्या सशस्त्र दल आणि तटरक्षक दलांच्या कर्मचाऱ्यांकरिता भारतात आणि कतारमध्ये विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याची भारताने तयारी दर्शविल्याबद्दल कतारने प्रशंसा केली.

10. दोन्ही देशांसाठी महत्वाच्या असणाऱ्या सुरक्षा आणि प्रगतीसाठी आखातात आणि हिंदी महासागर क्षेत्रात सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी सहकार्य वाढवायला उभय नेत्यांनी एकमान्यता दर्शविली.

11. आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा दोन्ही नेत्यांनी तीव्र धिक्कार केला. संपूर्ण जगाला, समाजाला धोका असणाऱ्या या जागतिक संकटाचा समूळ नायनाट करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याच्या कटिबध्दतेचा पुनरुच्चार यावेळी त्यांनी केला. जागतिक आणि प्रादेशिक स्तरावर दहशतवादी संघटनांची फैलावलेली व्याप्ती आणि दहशवादी कारवायातील वाढ यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेच्या वातावरणाला तसेच सातत्यपूर्ण विकासासाठीच्या प्रयत्नांना खीळ बसत असल्याची दखल या नेत्यांनी घेतली.

12. दहशतवाद, हिंसाचार तसेच जहालवादाचा दोन्ही नेत्यांनी निषेध केला. कोणत्याही स्वरुपातल्या, कोणत्याही परिस्थितीत ही कृत्ये समर्थनीय असू शकत नाहीत असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. दहशतवादाची कोणत्याही धर्माशी, संस्कृतीशी अथवा वंश गटाशी सांगड घातली जाऊ शकत नाही असे या नेत्यांनी स्पष्ट केले.

13. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांना दहशतवादाच्या पुरस्कर्त्यांना एकाकी पाडण्याच्या गरजेवर दोन्ही नेत्यांनी भर दिला. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या, धोरण म्हणून त्याचा वापर करणाऱ्या सर्वांविरोधात तातडीने कारवाई करायला हवी यावरही उभय नेत्यांनी एकमत दर्शविले.

14. जागतिक दहशतवादाची समस्या हाताळतांना सर्वंकष दृष्टिकोन आवश्यक असून त्यामध्ये हिंसक जहालवादाला आळा घालणे, दहशतवादी कारवायात अडथळा निर्माण करणे, दहशतवादाला आर्थिक पाठबळ पुरवणारे स्रोत थांबविणे, दहशतवादाचे तळ नष्ट करणे, दहशतवाद्यांकडून केल्या जाणाऱ्या अपप्रचाराचा इंटरनेटद्वारा मुकाबला करणे यांचा यात समावेश हवा मात्र केवळ एवढयापुरतीच ही कारवाई सिमीत राहू नये याची दखल यावेळी घेण्यात आली.

15. सायबर सुरक्षा क्षेत्रात सहकार्य आणखी वाढविण्याचे मार्ग आणि साधने यावर उभयपक्षी चर्चा झाली. सायबर क्षेत्राचा, सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी उपयोग होऊ नये तसेच दहशतवादासाठी त्याचा वापर रोखण्याबाबतही विचारविनिमय झाला. सर्व धर्मात समाविष्ट असणाऱ्या शांतता, सहिष्णूता, सर्वसमावेशकता आणि कल्याणाच्या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उभय देशातले धार्मित तत्ववेत्ते, विचारवंत यांच्यात विचारांची देवाणघेवाण होत असल्याचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. यासंदर्भात परिषदा आणि चर्चासत्रांचे आयोजन होत असल्याबद्दलही संतोष व्यक्त करण्यात आला.

16. संरक्षण आणि सुरक्षिततेविषयी दोन्ही देशातल्या सध्याच्या द्विपक्षीय सहकार्याची प्रशंसा करतानाच दहशतवादाला आळा घालण्यासाठी सहकार्य, गुप्तवार्ता माहितीची देवाणघेवाण, उत्तम प्रथा आणि तंत्रज्ञान विकसित करणे, याबाबत सहकार्याला संमती देण्यात आली. काळया पैशाविरोधात, अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात तसेच गुन्हयासंदर्भात कायद्याच्या अंमलबजावणीत सहकार्य वाढविण्यालाही उभय नेत्यांनी मान्यता दिली. पैशाच्या बेकायदा हस्तांतरणाविरोधात कारवाई करायलाही दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली. काळा पैसा, दहशतवादाला आर्थिक पाठबळ पुरवणे आणि तत्सम गुन्हयांसंदर्भात गुप्तवार्ता माहितीचे आदान-प्रदान करण्याबाबत सहकार्यविषयक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्याचे या नेत्यांनी स्वागत केले.

17. दहशतवादाला आळा घालण्यासाठी जागतिक समुदायाकडून कठोर एकत्रित कृती गरजेची असल्याचे दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केले. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी संबंधित बहुपक्षीय संस्थांमध्ये सहयोग वाढविण्यावर सहमती झाली.

18. द्विपक्षीय व्यापार संबंध हा दोन्ही देशातला अतूट बंध असल्याचे उभय देशांनी सांगितले. या उत्कृष्ट व्यापारी संबंधांची दखल घेतानांच तसेच दोन्ही देश एकमेकांसाठी सर्वोच्च व्यापारी भागिदार असल्याची नोंद घेतानाच व्यापारात वैविध्य आणून हे संबंध आणखी दृढ करायलाही मान्यता देण्यात आली. परस्पर व्यापाराविषयक प्रदर्शनात नियमित सहभागी होण्यासाठी आणि व्यापार संवर्धन उपाययोजनांना चालना देण्यासाठी प्रोत्साहन दयायलाही या नेत्यांनी संमती दिली. परस्पर बाजारपेठेत भारत आणि कतारच्या कंपन्यांच्या वाढत्या उपस्थितीबद्दल समाधान व्यक्त करतानाच अशा सहभागाला आणखी प्रोत्साहन दयायला दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. व्यापार आणि पर्यटन संबंधांना चालना देण्याच्या दृष्टीने उभय देशाच्या व्यापाऱ्यांना आणि पर्यटकांना तातडीने व्हिसा देण्यासाठी योग्य यंत्रणा तयार करण्यालाही मान्यता देण्यात आली.

19. कतारमध्ये फिफा 2022 जागतिक करंडकाच्या तयारीसाठी पायाभूत विकास प्रकल्पात भारतीय कंपन्यांच्या सहभागाबद्दल कतारने स्वागत केले.

20. भारतात व्यवसाय करणे सुलभ व्हावे या हेतूने सध्याच्या नियमांचे सुसूत्रीकरण आणि सुलभीकरण, रेल्वे, संरक्षण, विमा यासारख्या प्रमुख क्षेत्रातली थेट परकीय गुंतवणूकीची मर्यादा शिथील करण्यासह केंद्र सरकारचे प्रमुख उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठळकपणे स्पष्ट केले. 100 स्मार्ट सिटीज्‌द्वारे भारतात जागतिक दर्जाच्या पायाभूत सोयी करणे, 50 शहरातले मेट्रो प्रकल्प, प्रत्येकाच्या आवाक्यात असणारी परवडणारी आरोग्यसेवा, 2019 पर्यंत सर्वांसाठी स्वच्छता आणि 2022 पर्यंत प्रत्येक कुटुंबाला निवारा या भारताच्या योजनांविषयी माहिती देतानाच भारताच्या या विकासगाथेत भागीदार होण्यासाठी पंतप्रधानांनी कतारला निमंत्रण दिले.

21. भारताच्या विकासाला अधिक चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाची प्रशंसा करतानांच भारताच्या विकासाच्या या गाथेबाबत अमिर यांनी विश्वास व्यक्त केला. विकासासाठी भारताच्या अर्थव्यवस्थेला सार्थक बळ प्रदान करण्याच्या आपल्या क्षमतेबाबत विश्वास व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडिया, स्मार्ट सिटी, क्लीन इंडिया यासारख्या नव्या उपक्रमांची महामहिम अमीर यांनी स्तुती केली.

22. भारतीय अर्थव्यवस्थेचा उच्च विकासदर आणि क्षमता ओळखून भारताच्या विकासात भागिदार होण्याचे महत्व आणि कतारची गुंतवणूक क्षमता ओळखून दोन्ही बाजूंनी भारतात, कतारने गुंतवणूक करण्याविषयी विविध मार्गांची चर्चा केली. विशेषत: विविध पायाभूत क्षेत्रे तसेच सार्वजनिक उपक्रमांच्या निर्गुंतवणूकीबाबतही चर्चा झाली.

23. दोन्ही देशातल्या पायाभूत प्रकल्पात परस्परांचा सहभाग वाढवायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. कतार गुंतवणूक प्राधिकरण आणि भारताचा राष्ट्रीय पायाभूत आणि गुंतवणूक निधी यांच्यातल्या सहकार्याच्या महत्वाबाबतही यावेळी चर्चा झाली. राष्ट्रीय पायाभूत आणि गुंतवणूक निधीत कतारच्या संस्थागत गुंतवणूकदारांच्या सहभागासाठी चौकट पुरवणाऱ्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्याचे उभय नेत्यांनी स्वागत केले.

24. प्राप्त गुंतवणूक संधीबाबत नियमित आणि वेळेवर आदान-प्रदान करण्यालाही मान्यता देण्यात आली. कतार गुंतवणूक प्राधिकरण आणि संबंधित भारतीय प्राधिकरण, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या यांच्यात नियमित बैठका होण्याची गरज यावेळी जाणण्यात आली.

25. कतार हा भारताचा एजएनजी आणि एलपीजीचा सर्वात मोठा पुरवठादार असल्याची दखल घेत ऊर्जा क्षेत्रातल्या वाढत्या द्विपक्षीय व्यापाराबद्दल दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केले. भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेल्या कतारच्या योगदानाची भारताने प्रशंसा केली.

26. ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वृध्दींगत करण्यावर लक्ष केंद्रीत करायला दोन्ही देशांनी मंजूरी दिली. यामध्ये मनुष्यबळ विकास आणि प्रशिक्षण, संशोधन आणि विकासात सहकार्य, पेट्रो केमिकल क्षेत्रात संयुक्त प्रकल्प, भारत आणि इतर देशात संयुक्त तेल उत्खननात सहकार्याचा समावेश आहे.

27. नव्या तेल उत्खनन क्षेत्रांचा शोध घेण्यासाठी, शोध लागलेल्या तेल आणि भूगर्भ वायू क्षेत्राच्या विकासासाठी तसेच कतारमधल्या सध्याच्या कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू संसाधनाचा पुरेपूर वापर करण्यासाठी कतार पेट्रोलियम आणि इतर कंपन्यातल्या संधीचा लाभ घेण्यासाठी ऊर्जा कंपन्यांनी रुची दर्शविल्याचे भारताने अधोरेखित केले.

28. नव्या हायड्रोकाब्रन एक्स्ल्पोरेशन अँड लायसन्सिंग धोरणाअंतर्गत आणि छोटया क्षेत्रांचा शोध या धोरणाअंतर्गत भारतातल्या तेल क्षेत्रांचा शोध घेण्यासाठी बोली लावून भारतातल्या शोध आणि उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी भारताने कतारला निमंत्रित केले.

29. भारतात निर्माण करण्यात येत असलेल्या धोरणात्मक साठा भांडार सुविधेच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होण्यासाठी भारताने कतारला आमंत्रित केले आहे.

30. बँकिंग, विमा, भांडवली व्यापार क्षेत्रासह वित्तीय सेवा क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्याच्या मुद्दयावरही या दोन नेत्यांनी चर्चा केली. उभय देशातल्या सेंट्रल बँका तसेच सेबीसारख्या वित्तीय संस्थांमध्ये सहकार्य आणखी वाढविण्याचा निर्णय या नेत्यांनी घेतला.

31. जागतिक दर्जाच्या वैद्यकीय उपचार सुविधा स्पर्धात्मक दरात भारत देऊ शकतो हे लक्षात घेऊन आरोग्य सेवा, आरोग्य कर्मचाऱ्यांचे आदान-प्रदान, आरोग्य शिक्षण आणि औषधनिर्माण क्षेत्रासह आरोग्य विभागात सहकार्य वाढविण्यासाठी कार्यरत राहायला दोन्ही देशांनी मान्यता दिली. भारत आणि कतार यांच्यात आरोग्य क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य करण्याविषयी स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या सामंजस्य कराराचे उभय नेत्यांनी स्वागत केले.

32. आंतरराष्ट्रीय सौर युती स्थापन करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकाराची कतारने प्रशंसा केली. नव्या सौर तंत्रज्ञानाची जगभरात प्रगती होण्याच्या दृष्टीने ही बाब महत्वाची असल्याचे कतारने म्हटले आहे.

33. आंतरराष्ट्रीय योग दिनाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे संतुलित, आरोग्यपूर्ण भविष्यसाठी जागतिक समुदायाच्या इच्छेचे प्रतिबिंब असल्यावर या नेत्यांनी भर दिला. 21 जून 2015 या पहिल्या जागतिक योग दिनाला पाठिंबा दिल्याबद्दल तसेच या दिनाप्रित्यर्थ कतार टपाल विभागाने जारी केलेल्या तक्रारीबद्दल पंतप्रधानांनी कतारेचे आभार मानले.

34. भारत आणि कतार या देशातल्या जनतेला एकत्र आणण्यात सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या भूमिकेची नोंद दोन्ही देशाच्या नेत्यांनी घेतली. सांस्कृतिक आणि क्रीडा पथकांची वारंवार ये-जा, चित्रपट क्षेत्रातला सहयोग यासह सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात द्विपक्षी सहकार्य वृध्दींगत करायला दोन्ही देशांनी मान्यता दिली. 2019 मध्ये कतार-भारत सांस्कृतिक वर्ष साजरे करण्याच्या कतारच्या संग्रहालयांच्या निर्णयाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. पर्यटन सहकार्याविषयीचा सामंजस्य करार, भारत सरकार आणि कतार सरकार यांच्यात युवा आणि क्रीडा क्षेत्रातल्या पहिल्या कार्यकारी कार्यक्रमाबाबत झालेल्या सामंजस्य कराराचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले.

35. भारत आणि कतार संबंधांच्या केंद्रस्थानी उभय देशातल्या जनतेमधला संबंध आहे याची नोंद या संबंधीची जोपासना सुरु ठेवण्याला दोन्ही देशांनी मान्यता दर्शविली. कतारचा विकास आणि प्रगतीमध्ये भारतीय समुदायाची भूमिका आणि योगदानाची अमिर यांनी प्रशंसा केली. कतारमधल्या कुशल आणि अकुशल मजूरांच्या संरक्षणासाठी तेथील कामगार कायद्यात केलेल्या सुधारणांची माहिती कतारने भारताला दिली. भारतीय समुदायाच्या आदरातिथ्याबद्दल तसेच त्यांच्या कल्याण आणि सुरक्षिततेची खातरजमा करत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारच्या नेतृत्वाचे मन:पूर्वक आभार मानले. कौशल्य विकास आणि पात्रता जाणून घेण्यासंदर्भातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्याचे या नेत्यांनी स्वागत केले.

36. प्रादेशिक तसेच परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय बाबी, पश्चिम आशिया, मध्य पूर्व, दक्षिण आशियातील सुरक्षा परिस्थिती यावर उभय नेत्यांनी चर्चा केली. सिरीया-इराक, लिबिया, येमेनमधल्या सुरक्षा स्थितीबाबत या नेत्यांनी तीव्र चिंता व्यक्त करत या मुद्दयांवर चर्चा आणि राजकीय वाटाघाटीद्वारे शांततापूर्ण तोडगा काढणे महत्त्वाचे असल्याचा पुनरुच्चार केला.

37. संयुक्त राष्ट्र सुधारणेच्या संदर्भात एका बहुपक्षीय प्रणालीच्या महत्वावर दोन्ही नेत्यांनी भर दिला जी संयुक्त राष्ट्र संघाची वास्तविकता दर्शवित आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुधारणा तातडीने करण्यावर उभय नेत्यांनी भर दिला. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत अनेक प्रतिनिधीबरोबरच अधिक प्रभावी, विश्वासार्ह आणि जास्त प्रतिनिधींची संख्या असावी यासाठी सदस्यता विस्तार करण्याच्या गरजेवर भर देण्यात आला.

38. स्नेहपूर्ण स्वागत आणि अतिथ्यशीलतेबदृदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमिर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अमिर यांनी परस्पर सोयीच्या वेळी भारताला भेट दयावी यासाठी पंतप्रधानांनी त्यांना आमंत्रण दिले त्याचा आनंदाने स्वीकार करण्यात आला.

N.Chitale/B.Gokhale