Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय हिंदी समितीची 31 वी बैठक


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत केंद्रीय हिंदी समितीची 31वी बैठक पार पडली.

समितीच्या सदस्यांनी रचनात्मक आणि व्यवहार्य सूचना केल्याबद्दल पंतप्रधानांनी समितीच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन मानले.

हिंदी भाषेचा प्रसार करताना रोजच्या व्यवहारातील भाषा वापरली जावी आणि शासकीय कामकाजात क्लिष्ट किंवा तांत्रिक शब्दांचा किमान वापर व्हावा, असे त्यांनी आग्रहपूर्वक सांगितले. सरकारी हिंदी आणि सामाजिक हिंदीमधील अंतर कमी करण्याची आवश्यकता व्यक्त करत शिक्षण संस्थांनी याकामी पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले.

जगभरातील आपल्या अनुभवांबद्दल सांगत हिंदी बरोबरच सर्व भारतीय भाषांच्या माध्यमातून आपण संपूर्ण जगाशी जोडले जाऊ शकतो असा दिलासा पंतप्रधानांनी सदस्यांना दिली.

तामिळसारख्या जगातील प्राचीन भारतीय भाषांबद्दल आपल्याला अभिमान वाटतो असे ते म्हणाले. देशातील सर्व भाषा, हिंदी भाषेला समृद्ध करू शकतात, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचाही उल्लेख केला.

तत्पूर्वी गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या स्वागतपर संबोधनानंतर राजभाषा सचिवांनी कार्यसूचीनुसार विविध विषयांसंदर्भातील आजवरच्या प्रगतीचा आढावा घेतला. अनेक सदस्यांनी हे मुद्दे तसेच हिंदी भाषेच्या प्रचार प्रसाराशी संबंधित इतर मुद्यांबाबत आपले विचार मांडले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय हिंदी संचालयातर्फे प्रकाशित गुजराती हिंदी कोषाचे प्रकाशन केले.

सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत केंद्र सरकारचे ज्येष्ठ मंत्री अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि गुजरातचे मुख्यमंत्री तसेच समितीचे इतर सदस्य सहभागी झाले.

 

S.Tupe/M.Pange/P.Kor