नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथे 41 वी प्रगती (PRAGATI) बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रगती हे आयसीटी आधारित मल्टी मोडल व्यासपीठ असून, ते केंद्र आणि राज्य सरकारांचा समावेश असलेले कार्यक्षम प्रशासन आणि प्रकल्पांच्या वेळेवर अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आले आहे.
या बैठकीत नऊ महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. नऊ प्रकल्पांपैकी तीन प्रकल्प रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे, दोन प्रकल्प रेल्वे मंत्रालयाचे आणि प्रत्येकी एक प्रकल्प ऊर्जा मंत्रालय, कोळसा मंत्रालय, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे होते. या नऊ प्रकल्पांची एकत्रित किंमत रु. 41,500 कोटी असून, ते छत्तीसगड, पंजाब, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आसाम, गुजरात, महाराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेश या 13 राज्यांशी संबंधित आहेत. मिशन अमृत सरोवरचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला.
पंतप्रधानांनी मंत्रालये आणि राज्य सरकारांना पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या नियोजनासाठी पीएम गतिशक्ती पोर्टलचा वापर करण्याचा सल्ला दिला. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी भूसंपादन, युटिलिटी शिफ्टिंग (साधन-सुविधांचे स्थलांतर) आणि इतर समस्यांचे त्वरित निराकरण करण्याचा त्यांनी आग्रह धरला. केंद्र सरकारची मंत्रालये आणि राज्य सरकारे यांच्यात योग्य समन्वय ठेवण्यावर त्यांनी भर दिला. या संवादादरम्यान पंतप्रधानांनी ‘मिशन अमृत सरोवर’चाही आढावा घेतला. गुजरातमधील किशनगंज, बिहार आणि बोटाड इथल्या अमृत सरोवर स्थळांचे त्यांनी ड्रोनद्वारे प्रत्यक्ष निरीक्षण केले. पंतप्रधानांनी सर्व मंत्रालये आणि राज्य सरकारांना अमृत सरोवरचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी मिशन मोडमध्ये पूर्ण करण्याचा सल्ला दिला. योजने अंतर्गत 50,000 अमृत सरोवरांचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रभाग पातळीवरील देखरेखीवर पंतप्रधानांनी भर दिला.
देशभरातील जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ‘मिशन अमृत सरोवर’ ही आगळी कल्पना राबवली जात असून, त्यामुळे भविष्यातील जलसंधारणाला मदत होणार आहे. हे मिशन पूर्ण झाल्यावर, जमिनीच्या जलधारण क्षमतेमधील अपेक्षित वाढ सुमारे 50 कोटी घनमीटर असेल, हवेमधील कार्बन-डाय ऑक्साईड कमी होण्याचे अपेक्षित प्रमाण प्रति वर्ष सुमारे 32,000 टन असेल आणि भूजल पातळीतील अपेक्षित वाढ 22 दशलक्ष घनमीटरपेक्षा जास्त असेल. याशिवाय, पूर्ण झालेले अमृत सरोवर प्रकल्प सामुदायिक कार्यक्रम आणि सहभागाचे केंद्र म्हणून विकसित होत असून, त्यामुळे जन भागीदारीची भावना वाढत आहे. स्वच्छता रॅली, जलसंधारणावर जलशपथ, शालेय मुलांच्या रांगोळी स्पर्धा, छठपूजेसारखे धार्मिक सण, यासारखे अनेक सामाजिक उपक्रम अमृत सरोवर स्थळांवर आयोजित केले जात आहेत.
‘प्रगती‘ बैठकीत आतापर्यंत एकूण 15.82 लाख कोटी रुपये खर्चाच्या 328 प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला आहे.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
Chaired a PRAGATI session today. Key infrastructure works worth over Rs. 41,500 crores were reviewed. We also reviewed aspects relating to Amrit Sarovar projects. Highlighted the need to increase usage of PM GatiShakti portal to plan for infra projects. https://t.co/Rp4lDvALNC
— Narendra Modi (@narendramodi) February 22, 2023