पंतप्रधान कार्यालयाचे ओएसडी म्हणून सध्या काम पाहत असलेले पी.के.सिन्हा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे. 13 जून 2015 ते 30 ऑगस्ट 2019 या काळात सिन्हा यांनी कॅबिनेट सचिव म्हणून काम पाहिले आहे. उत्तर प्रदेश केडरच्या 1977 च्या तुकडीतले ते भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. ऊर्जा आणि नौवहन सचिव म्हणून सिन्हा यांनी काम केले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयात विशेष सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्रातली पदवी प्राप्त केली. त्यानंतर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी अर्थशास्त्रातले पदव्युत्तर शिक्षण घेतले. सेवेत असताना त्यांनी लोकप्रशासनात मास्टर्स डिप्लोमा आणि समाज शास्त्रात एमफिल केले आहे.
भारतीय प्रशासकीय सेवेतल्या आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत सिन्हा यांनी उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारमध्येही विविध पदं भूषवली. राज्य स्तरावर त्यांनी जौनपूर आणि आग्य्राचे जिल्हा दंडाधिकारी, वाराणसीचे आयुक्त, नियोजन सचिव आणि सिंचन प्रधान सचिव म्हणून काम पाहिले.
केंद्र सरकारमध्येही त्यांनी ऊर्जा आणि पायाभूत क्षेत्र, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, ऊर्जा नौवहन क्षेत्रात काम केले आहे. ऊर्जा, पायाभूत आणि वित्त क्षेत्रात त्यांचे प्राविण्य आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor