पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी के मिश्रा आणि दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी जी-20 शिखर परिषदेच्या तयारीचा घेतला आढावा घेण्यासाठी दिल्लीत विविध स्थळांना भेट दिली.
जी 20 शिखर परिषदेच्या तयारीशी संबंधित तयार करण्यात आलेल्या समन्वय समितीचे अध्यक्ष प्रधान सचिव आहेत. परिषदेला येणा-या सर्व मंडळींना ही परिषद संस्मरणीय रहावी, या दृष्टीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्यासाठी केलेल्या नियोजनानुसार सर्व गोष्टींचे काम पूर्ण होत आहे, याची खात्री करण्यासाठी डॉ. पी के मिश्रा यांनी संपूर्ण तयारीची पाहणी करून आढावा घेतला. शिखर परिषदेसाठी येणार्या सर्व राष्ट्रप्रमुखांना आणि इतर आंतरराष्ट्रीय मान्यवरांना त्यांच्या भेटीदरम्यान भारताच्या संस्कृतीची झलक पहायला मिळावी आणि जागतिक दर्जाचा अनुभव मिळावा यासाठी तयारी कशी सुरू आहे, याची पाहणी करण्यात आली.
भारत मंडपमबरोबरच, राजघाट, ‘ सी हेक्सागन – इंडिया गेट’, विमानतळाचे टर्मिनल 3 आणि त्यामधील अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी असलेले दालन (व्हीआयपी लाउंज), एरोसिटी क्षेत्र, प्रमुख रस्त्यांचे महत्वपूर्ण भाग, यांच्यासह सुमारे 20 ठिकाणांना प्रधान सचिवांनी भेट दिली आणि तयारीचा आढावा घेतला.
राजघाटाच्या बाह्य परिसराचे तसेच दिल्लीतील प्रमुख स्थाने आणि चौकांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. भारत मंडपममध्ये ‘शिव-नटराज’ची स्थापना करण्यात आली आहे. पारंपरिक कास्टिंग पद्धतीने सुमारे 20 टन वजनाची 27 फूट नटराजाची मूर्ती अष्ट-धातूपासून तयार करण्यात आली आहे. जी-20 अध्यक्षपदाच्या वेळी भारत मंडपमसमोर स्थापित केलेली भगवान शिवाची नटराज रूपातील ही कांस्य मूर्ती आहे.
यावेळी प्रधान सचिवांनी वाहतूक व्यवस्थेचाही आढावा घेतला. या काळामध्ये सर्वसामान्यांना कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी पर्यायी व्यवस्थेविषयी पुरेशी माहिती प्रशासनाला द्यावी, असा सल्ला दिला. तसेचे विशेष पाहुण्यांच्या स्वागतासाठी केलेल्या सुविधांच्या दृष्टीने दिल्ली विमानतळावरील व्यवस्थेचाही आढावा यावेळी घेण्यात आला.
डॉ मिश्रा यांनी पालम येथील हवाईदल स्थानकाच्या तांत्रिक भागालाही भेट दिली; देशांच्या प्रमुख नेत्यांची विमाने या हवाई स्थानकावर येणार आहेत. वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी डॉ. मिश्रा यांना विमानांच्या पार्किंगसाठी, देशांच्या प्रमुखांचे स्वागत, विश्रामगृह आणि इतर सुविधांबाबत माहिती दिली. या तांत्रिक विमानतळ परिसरात आपत्कालीन वैद्यकीय सुविधाही उभारण्यात आल्या आहेत.
दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या वतीने पूर्ण राजधानीमध्ये सुशोभीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे त्यामुळे दिल्ली शहर अधिक भव्य, देखणे दिसत आहे. निरुपयोगी पडलेल्या संरचनांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. स्वच्छता मोहिमेसोबतच अनेक ठिकाणी सुरू करण्यात आलेली कारंजी लक्षवेधी ठरत आहेत. देशातील विविधतेचे दर्शन घडविणारे पुतळे आणि पोस्टर्स मोठ्या संख्येने शहरभर लावले आहेत. ते पाहून येणा-या प्रवासी अतिथींना आनंद वाटेल. महत्त्वाच्या ठिकाणी जी-20 देशांचे राष्ट्रध्वज लावण्यात आले आहेत आणि जी -20 सदस्य देशांच्या राष्ट्रीय प्राण्यांचे पुतळेही लावले जात आहेत. पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांनी यावेळी सुशोभनाचे काम करवून घेणा-या अधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्या पथकाने केलेल्या कामाचे कौतुक केले.
ही पाहणी करताना जनतेची गैरसोय टाळण्यासाठी पंतप्रधानांचे प्रधान सचिव आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिनीबसने प्रवास केला. काल सायंकाळी 5 ते 8.30 या वेळेत त्यांनी ही भेट झाली.
त्यांच्यासोबत पंतप्रधानांचे सल्लागार अमित खरे आणि मुख्य सचिव तरुण कपूर, पोलीस आयुक्त, तसेच इतर अनेक उच्च अधिकारी उपस्थित होते.
****
Sonal T/SB/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai