इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 व्या जी 20 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी 14-16 नोव्हेंबर दरम्यान इंडोनेशियातील बालीचा दौरा करणार आहेत.
बाली शिखर परिषदेदरम्यान, जी 20 मधील नेते “मिळून सावरुया, जोरकसपणे सावरुया”,”रिकव्हर टुगेदर, रिकव्हर स्ट्राँगर” या संकल्पने अंतर्गत जागतिक आव्हानांबाबतच्या प्रमुख मुद्यांवर विस्तृतपणे विचारमंथन करतील. जी 20 शिखर परिषदेच्या अजेंड्याचा एक भाग म्हणून अन्न आणि ऊर्जा सुरक्षा; आरोग्य आणि डिजिटल परिवर्तन ही तीन कार्य सत्रे आयोजित केली जातील.
शिखर परिषदेच्या समारोप सत्रात राष्ट्राध्यक्ष विडोडो प्रतीकात्मकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जी 20 चे अध्यक्षपद सुपूर्द करतील. 1 डिसेंबर 2022 पासून भारत औपचारिकपणे जी 20 चे अध्यक्षपद भूषवणार आहे.
शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान इतरही राष्ट्रप्रमुखांबरोबर द्विपक्षीय बैठका घेतील. पंतप्रधान बाली येथे भारतीय समुदायाला संबोधित करत संवाद साधणार आहेत.