Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचा 24 ऑगस्टला हरियाणा आणि पंजाब दौरा


नवी दिल्‍ली, 22 ऑगस्‍ट 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 ऑगस्ट 2022 रोजी हरियाणा आणि पंजाबचा दौरा करणार आहेत. त्या दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते दोन महत्त्वाच्या आरोग्य उपक्रमांचे उद्घाटन/राष्ट्रार्पण केले जाणार आहे. सकाळी 11 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते हरियाणातील फरिदाबाद येथे अमृता रुग्णालयाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मोहालीला जातील आणि दुपारी 02:15 वाजता मुल्लानपूर, न्यू चंदीगड, साहिबजादा अजितसिंग नगर जिल्हा (मोहाली) येथे ‘होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र’ राष्ट्राला समर्पित करतील.

पंतप्रधानांची हरियाणा भेट

पंतप्रधानांद्वारे फरिदाबादमध्ये अमृता रुग्णालयाचे उदघाटन झाल्यावर राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (NCR) आधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेला चालना मिळेल. माता अमृतानंदमयी मठाचे व्यवस्थापन असणारे सुपर स्पेशालिटी रुग्णालय 2600 खाटांनी सुसज्ज असेल. सुमारे 6000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणारे हे रुग्णालय, फरिदाबाद आणि संपूर्ण एनसीआर मधील लोकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा प्रदान करेल.

पंतप्रधानांची पंजाब भेट

पंजाब आणि शेजारील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील रहिवाशांना जागतिक दर्जाची कर्करोग सेवा पुरविण्याच्या प्रयत्नात पंतप्रधान मुल्लानपूर, न्यू चंदीगड, साहिबजादा अजितसिंग नगर जिल्हा (मोहाली) येथे ‘होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र’ राष्ट्राला समर्पित करतील. भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागांतर्गत टाटा मेमोरियल सेंटर या अनुदानित संस्थेद्वारे 660 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे हे रुग्णालय बांधण्यात आले आहे.

कर्करोग रुग्णालय हे 300 खाटांच्या क्षमतेचे टर्शरी केअर रुग्णालय आहे आणि शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी आणि वैद्यकीय ऑन्कोलॉजी – केमोथेरपी, इम्युनोथेरपी आणि अस्थिमज्जा प्रत्यारोपण यासारख्या उपलब्ध उपचार पद्धतींचा वापर करून सर्व प्रकारच्या कर्करोगांवर उपचार करण्यासाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे.

हे रुग्णालय संपूर्ण क्षेत्रात कर्करोग सुविधा आणि उपचारांसाठी “केंद्र” म्हणून काम करेल आणि संगरूरमधील 100 खाटांचे रुग्णालय त्याची “शाखा” म्हणून काम करेल.

 

* * *

S.Tupe/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai