पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना जनतेशी प्रभावीपणे जोडून घेण्यासाठी परिस्थिती आणि त्यांच्या सभोवतालाप्रति संवदनशील राहण्याचा सल्ला दिला आहे.
सहायक सचिवांच्या उद्घाटन सत्रात भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, आतापर्यंतच्या प्रशिक्षणात ते जे काही शिकले त्याच्या पलीकडे कौशल्ये आणि ज्ञान वाढवण्याची संधी या निमित्ताने त्यांना मिळाली आहे. या पुढील तीन महिन्यांचा वापर त्यांची कौशल्ये अधिक समृद्ध करण्यासाठी तसेच ते काम करत असलेल्या विभागाच्या कामाकाजाला अधिक मौल्यवान करण्यासाठी करावा असे आवाहन त्यांनी केले. प्रशासनातील तंत्रज्ञानाच्या वापराचा त्यांनी खास उल्लेख केला आणि सरकारी कामकाजात तंत्रज्ञानाच्या अद्ययावतीकरणासाठी काम करा असे त्यांनी युवा अधिकाऱ्यांना सांगितले.
केंद्र सरकारचे सहायक सचिव म्हणून पुढील तीन महिने काम करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदामुळे दबून जाऊ नका, त्यांच्याशी मोकळेपणाने आणि भीती न बाळगता संवाद साधा असे आवाहन पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना केले.
ते म्हणाले की, 2013 च्या तुकडीच्या अधिकाऱ्यांना प्रथमच अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारमध्ये काम करण्याचा अनुभव मिळावा, जी संधी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली नाही ती संधी देण्याचा उद्देश या मागे आहे.
केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
MD/ST/SK/PM