Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नोएडा आणि दिल्ली दरम्यानच्या नव्या मेट्रो लिंकचे पंतप्रधानांनी केले उद्‌घाटन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नोएडा आणि दिल्ली दरम्यानच्या नव्या मेट्रो लिंकचे उद्‌घाटन केले. बोटॅनिकल गार्डन मेट्रो स्थानकात त्यांनी फलकाचे अनावरण करुन दिल्ली मेट्रोच्या मजेंटा लाईनचे उद्‌घाटन केले. यामुळे नोएडामधले बोटॅनिकल गार्डन आणि दक्षिण दिल्लीतले कालकाजी मंदिर हे भाग जोडले जाणार आहेत. सार्वजनिक सभेच्या ठिकाणी जाण्यापूर्वी पंतप्रधानांनी छोटा मेट्रो प्रवासही केला.

पंतप्रधानांनी या कार्यक्रमात बोलताना जनतेला ख्रिसमसनिमित्त शुभेच्छा दिल्या. पंडित मदनमोहन मालवीय आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी या दोन भारतरत्नने सन्मानित महान व्यक्तींचा आज जन्मदिन असल्याचंही पंतप्रधान म्हणाले.

उत्तर प्रदेशमुळे देशाला मजबूत आणि स्थिर सरकार मिळाले आहे, असे सांगून उत्तर प्रदेशच्या जनतेच्या या स्नेहाबद्दल आपण सदैव ऋणी राहू, असे पंतप्रधान म्हणाले.

संपर्क आणि दळणवळणाच्या युगात आपण राहतो, असे सांगून मेट्रो लाईन उद्‌घाटनामुळे केवळ आत्ताच्याच नव्हे, तर भावी पिढ्यांचाही लाभ होईल, असे त्यांनी सांगितले. 2022 मधे स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात आपल्या पेट्रोल आयातीत घट झाली असेल, असे आपले स्वप्न असल्याचे ते म्हणाले. यासाठी अत्याधुनिक सार्वजनिक वाहन व्यवस्था ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. डिसेंबर 2002 मधे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दिल्ली मेट्रोचा प्रवास केला, तेव्हापासून नॅशनल कॅपिटल रिजनमधे मेट्रो जाळ्याचा लक्षणीय विस्तार झाल्याचे त्यांनी नमूद केले.

‘मेरा क्या’ या शब्दांनी सुरु होऊन ‘मुझे क्या’ जवळ येऊन संपणाऱ्या विचारधारेमुळे प्रभावी प्रशासन शक्य होत नाही. ‘मला काय’, अशी मानसिकता आता बदलत चालली आहे. केंद्र सरकार, राजकीय लाभासाठी नव्हे, तर राष्ट्रीय हितासाठी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

याआधीचे सरकार हे नवीन कायदे करण्यात धन्यता मानत होते. मात्र सध्याचे सरकारला कालबाह्य कायदे रद्द करायचे आहेत. कालबाह्य कायदे निर्णय क्षमतेवर परिणाम करत असतील, तर सुप्रशासन शक्य नसल्याचे पंतप्रधान म्हणाले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करुन, त्यांनी सुप्रशासनावर लक्ष केंद्रित केल्यामुळे राज्य, नवी उंची गाठण्याच्या दिशेने जात आहे. नोएडामधे येऊन त्यांनी याविषयी जोडलेला अंधविश्वास नष्ट केल्याचे पंतप्रधान म्हणाले. एखाद्या ठिकाणाला भेट न दिल्यामुळे मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द प्रदीर्घ राहते आणि एखाद्या ठिकाणाला भेट दिल्याने तीन लवकर संपते अशी विचारधारा असलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा हक्क नसल्याचे पंतप्रधान म्हणाले. रेल्वे पायाभूत सुविधा, रस्त्याच्या जाळ्याचा विस्तार, नवीकरणीय उर्जा क्षेत्रातली कामगिरीचा उल्लेखही त्यांनी केला. अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्याला विकासाचा मार्ग दाखवल्याचे सांगून त्यांना ‘भारत मार्ग विधाता’ असे पंतप्रधानांनी संबोधले.

याआधी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, यांनी आपल्या भाषणात, पंतप्रधानांची प्रशंसा केली. पंतप्रधानांनी राष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा दिल्याचे ते म्हणाले. आपल्याला विकासाच्या मार्गावरुन वाटचाल करायची आहे, असा पंतप्रधानांचा ध्यास असल्याचे ते म्हणाले.

B.Gokhale/N.Chitale/D.Rane