Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नेपाळमध्ये काठमांडू येथे राष्ट्रीय सभागृहात पंतप्रधानांचे संबोधन

नेपाळमध्ये काठमांडू येथे राष्ट्रीय सभागृहात पंतप्रधानांचे संबोधन

नेपाळमध्ये काठमांडू येथे राष्ट्रीय सभागृहात पंतप्रधानांचे संबोधन


शाक्य जी, आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी काठमांडूच्या महानगरपालिकेने माझ्यासाठी या स्‍वागत समारंभाचे आयोजन केले आहे. याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. हा केवळ माझाच नाही तर संपूर्ण भारताचा सन्मान आहे. एकटा मी नाही तर सव्वाशे कोटी भारतीय याबद्दल कृतज्ञ आहेत. काठमांडूशी आणि नेपाळशी प्रत्येक भारतीयाचे एक आपुलकीचे नाते आहे. आणि हे सौभाग्‍य मलाही लाभले आहे.

जेव्हा मी राजकारणातही नव्हतो, तेव्हापासून ते आतापर्यंत ज्या ज्या वेळी मी नेपाळमध्ये आलो, त्या प्रत्येक वेळी मला शांतता आणि आत्मियतेचा प्रत्यय आला. आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपणा सर्वांचे प्रेम, स्नेह, आपुलकीने केलेले स्वागत, सत्कार आणि सम्‍मान.

काल मी जनकपूरला भेट दिली. जनकपूर आजच्या युगाला एक फार मोठा संदेश देते. राजा जनकाचे काय वैशिष्ट्य होते? त्याने शस्‍त्रांचा विनाश केला आहे स्‍नेहभावनेने मने जोडली. ही अशी धरती आहे जी शस्त्रांचा विनाश करते आणि स्नेहाने जोडून घेते.

मित्रहो, जेव्हा मी काठमांडू बद्दल विचार करतो तेव्हा जी प्रतिमा समोर येते, ती केवळ एका शहराची नसते, एका भौगोलिक प्रदेशाची नसते. काठमांडू आमचे शेजारी आणि अभिन्‍न मित्र देश नेपाळची राजधानी आहे. इतकेच नव्हे तर भगवान बुद्धाचे जन्मस्थान असणाऱ्या देशाचीही राजधानी आहे. एव्हरेस्‍ट पर्वताच्या देशातील हे शहर ही केवळ या देशाची राजधानी नाही. काठमांडू हे एक स्वयंपूर्ण विश्व आहे आणि या विश्वाचा इतिहास हिमालयाइतकाच भव्य आणि विशाल आहे.

मला नेहमीच काठमांडू, नेपाळने आकर्षित केले आहे, कारण हे शहर जितके गहन आहे, तितकेच गतीशीलही आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेले हे एक अनमोल रत्‍न आहे. काठमांडू म्हणजे केवळ एक लाकडी मंडप नाही. हा आमच्या समान संस्कृती आणि वारशाचा भव्य दिव्‍य असा महाल आहे. या शहराच्या विविधतेत नेपाळचा महान वारसा आणि त्याच्या मोठ्या मनाची प्रचिती वारंवार येते. नागार्जुनचे जंगल असो वा शिवपुरीची शिखरे, शेकडो झरे आणि जलधारांची शिथिलता असो वा बागमतीचा उगम, हजारो म‍ंदिरे, मंजुश्रीच्या गुहा आणि बौद्ध विहारांचे हे शहर अवघ्या जगात अनन्यसाधारण असेच आहे.

इमारतींच्या छपरांवरून एकीकडे धोलगिरी आणि अन्नपूर्णा, दुसरीकडे उत्तुंग शिखर, ज्याला संपूर्ण जग एव्हरेस्ट आणि कंचनगंगा या नावाने ओळखते. असे दर्शन कोठे बरे मिळेल? ते शक्य आहे केवळ काठमांडूमध्ये.

बसंतपुरची भूल, पाटणची प्रतिष्ठा, भरतपुरची भव्‍यता, कीर्तिपुरची कला ललितपुरचे लालित्य. काठमांडूने एखाद्या इंद्रधनुष्याप्रमाणे सर्व रंग सामावून घेतले आहेत. चंदनात कुंकु मिसळून जावे त्याप्रमाणे येथील हवेत अनेक परंपरा मिसळून गेल्या आहेत. पशुपतिनाथ मध्ये प्रार्थना आणि भक्तांची गर्दी, स्वयंभूच्या पायऱ्यांवर अध्यात्माची पावले, बौद्ध परिक्रमा करणाऱ्या भाविकांचा ओम मणि पदमेहम चा जप, या वातावरणात स्वरमंडळातील सर्व सूर एकवटल्याचा आभास होतो.

मला सांगण्यात आले आहे की नेवारी समुदायाच्या काही सणांमध्ये बौद्ध आणि हिंदू चालीरीती आणि प्रथांचा अभूतपूर्व संगम दिसून येतो.परंपरा आणि संस्कृतीने काठमांडूची हस्तकला आणि कलाकारांना उत्तम प्रकारे घडवले आहे. मग तो हाताने बनवलेला कागद असो किंवा तारा आणि बुद्धासारख्या मूर्ती, भरतपूरची मातीची भांडी असो किंवा पाटनमधील दगड, लाकूड आणि धातुचे काम असो. काठमांडू हा नेपाळच्या अजोड कलेचा आणि कारागिरीचा हा महाकुंभ आहे. आजची युवा पिढी ही परंपरा पुढे नेत आहे, याचा मला मनापासून आनंद वाटतो. ही पिढी परंपरेत युवांना अनुकुल असे बदल करून नवेपण देण्याचाही प्रयत्न करीत आहे.

मित्रहो, आतापर्यंत दोन वेळा मी नेपाळला आलो आणि दोन्ही वेळा मला पशुपतीनाथाचे दर्शन लाभले. या दौऱ्यात मला भगवान पशुपतीनाथाबरोबरच पवित्र धाम जनकपूर आणि मुक्तीनाथ, अशा तिन्ही पवित्र तीर्थस्थानांच्या दर्शनाचा लाभ झाला. ही तिन्ही केवळ तीर्थस्थाने नाहीत तर भारत आणि नेपाळमधल्या अतूट संबंधांचा हिमालय आहेत. यानंतर मी जेव्हा नेपाळच्या दौऱ्यासाठी येईन, तेव्हा भगवान बुद्धाचे जन्मस्थान अर्थात लुंबिनीला निश्चितच भेट देईन.

मित्रहो, शांतता, प्रकृतीशी संतुलन आणि आध्‍यत्मिक जीवनमूल्यांनी परिपूर्ण अशा आपल्या दोन्ही देशांची मूल्ये, हा संपूर्ण मानवजातीसाठी, संपूर्ण विश्वासाठी एक अनमोल वारसा आहे. म्हणूनच शांतीचा शोध घेणारे जगभरातील लोक भारत आणि नेपाळकडे आकृष्ट होतात, यात आश्चर्य वाटण्याजोगे काहीच नाही.

कोणी बनारसला जातात तर कोणी बोधगयेला, कोणी हिमालयाच्या कुशीत जाऊन राहतात तर कोणी बुद्ध विहारांमध्ये साधना करतात. एकाच गोष्टीचा शोध घेतात. आधुनिक आयुष्यातील अस्वस्थपणाचे उत्तर भारत आणि नेपाळमधील समान मूल्यांमध्ये मिळेल.

मित्रहो, बागमतीच्या किनाऱ्यावर काठमांडूमध्ये पशुपतीनाथ आणि गंगेच्या किनारी काशी विश्‍वनाथ. बुद्धाचे जन्मस्थान लुंबिनी, तपस्थान बोधगया आणि संदेश देण्याचे क्षेत्र सारनाथ.

मित्रहो, आपणा सर्वांना हजारो वर्षांचा समान समृद्ध वारसा लाभला आहे. आपला हा समान वारसा, ही दोन्ही देशांच्या युवा पिढीची संपदा आहे. यात त्यांच्या भूतकाळाची पाळेमुळे, वर्तमानाचे बीज आणि भविष्‍याचे अंकुर आहेत.

मित्रहो, जगात सध्या अनेक प्रकारची स्थित्यंतरे घडून येत आहेत. वैश्विक वातावरणात अनेक प्रकारे अस्थैर्य दिसून येते आहे.

मित्रहो, हजारों वर्षांपासून आपण वसुधैव कुटुंबकम अर्थात संपूर्ण विश्व हे एक कुटुंब आहे, असे मानत आलो आहोत. हे भारताचे दर्शन आहे. सबका साथ सबका विकास. आम्ही त्याच पवित्रतेने परदेशांशीही सहकार्य कायम ठेवले आहे. भारतीय शास्‍त्रांमध्ये एक प्रार्थना आहे, सर्वे भवन्‍तु सुखिन: सर्वे सन्‍तु निरामया:। सर्वे भद्राणि पश्‍यन्‍तु मा कश्चित् दुःख भाग्भवेत्…. अर्थात सर्वांनी प्रसन्‍न व्हावे, सर्वांनी स्‍वस्‍थ असावे, सर्वांचे कल्‍याण व्हावे, कोणालाही दु:ख मिळू नये. भारतातील मुनींनी नेहमीच हे स्वप्न पाहिले आहे. हा आदर्श मार्ग साध्य व्हावा, यासाठीच सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे परराष्ट्र धोरण आम्ही स्वीकारले आहे. विशेषत: शेजारी देशांबरोबर आम्ही आमचे अनुभव आणि संधी यांची देवाण घेवाण करतो. शेजारधर्माला आम्ही नेहमीच प्राधान्य देतो. हे केवळ आमचे परराष्ट्र धोरण नाही तर जीवन शैली आहे. स्वत: विकसनशील असतानाही भारताने भारतीय तांत्रिक आणि आर्थिक महामंडळ कार्यक्रमांतर्गत 160 पेक्षा जास्त देशांमध्ये क्षमता उभारणीसाठी सहकार्य आणि त्या देशांच्या गरजांनुसार आम्ही सहकार्य केल्याची अनेक उदाहरणे आहेत.

गेल्या वर्षी भारताने एक दक्षिण आशियाई उपग्रह प्रक्षेपित केला. त्याच्या माध्यमातून आमच्या अवकाश क्षेत्रातील क्षमतांचे सुपरिणाम आमच्या शेजारी देशांनाही उपभोगता येत आहेत. याच काळात, जेव्हा सार्क परिषदेसाठी मी आलो होतो, तेव्हा त्याच मंचावरून मी याबाबतची घोषणा केली होती. त्याचबरोबर जगासमोर असणाऱ्या आव्हानांचाही आम्ही विचार करतो, ज्यांच्याही कोणताही एकटा देश लढा देऊ शकत नाही. त्यांचा सामना करण्यासाठी आपण कशा प्रकारे आंतरराष्ट्रीय भागिदारी विकसित करू शकू, ते विचारात घेतले पाहिजे. उदाहरणार्थ – 2016 साली भारत आणि फ्रान्सने एकत्रितपणे वातावरणातील बदलांसंदर्भात एका नव्या आंतरराष्‍ट्रीय तहावर आधारित संघटनेची कल्पना विचारात घेतली होती. हे क्रांतिकारी पाऊल आता एक यशस्वी प्रयोग म्हणून ओळखले जाते.

या वर्षी मार्च महिन्यात फ्रान्सचे राष्‍ट्रपती श्री मॅक्रो आणि सुमारे 50 इतर देशांचे नेते दिल्लीमध्ये आयोजित सौरउर्जाविषयक पहिल्या आंतरराष्ट्रीय संमेलनात सहभागी झाले. अशा प्रयत्नांमुळे वातावरणातील बदलासारख्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी तंत्रज्ञानविषयक आणि आर्थीक भागिदारी विकसित करण्याच्या दृष्टीने आणि लहान, विकसनशील देशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत होईल, असा विश्वास मला वाटतो.

मित्रहो, जेव्हा भारतीय नेपाळकडे पाहतात तेव्हा नेपाळला पाहून, येथील वातावरण पाहून आम्हाला अतिशय आनंद वाटतो. नेपाळमध्ये आशेचे वातावरण आहे, उज्‍ज्‍वल भविष्‍याच्या कामनेचे वातावरण आहे, लोकशाहीच्या दृढीकरणाचे वातावरण आहे, समृद्ध नेपाळ, सुखी नेपाळी असे सूचित करणारे वातावरण आहे आणि हे असे वातावरण निर्माण करण्यात आपणा सर्वांचा मोठा हातभार लागला आहे.

2015 सालच्या भयंकर भूकंपानंतरच्या परिस्थितीला नेपाळ आणि विशेषत: काठमांडूच्या नागरिकांनी ज्या धैर्याने आणि धाडसाने तोंड दिले, तो जगभरातला आदर्श ठरावा. इतक्या कमी काळात या संकटाचा मुकावला करत नेपाळमध्ये एक नवी व्यवस्था निर्माण झाली, यावरून आपल्या समाजाची दृढ निष्‍ठा आणि कर्मठपणाची प्रचिती येते. भूकंपानंतर केवळ इमारतींचेच नाही तर एका परीने देशाचे आणि समाजाचेही पुनर्निर्माण झाले आहे. आज नेपाळमध्ये सांघिक, प्रांतिक आणि स्थानिक अशा तिन्ही स्तरांवर लोकशाही सरकारे आहेत. या तिन्ही स्तरांवर एका वर्षाच्या अवधीत यशस्वीपणे निवडणुका पार पडल्या. ही आपली सर्वांची आंतरिक शक्ती आहे आणि यासाठी मी आपणा सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो.

मित्रहो, नेपाळने युद्धापासून बुद्धापर्यंतचा मोठा प्रवास केला आहे. बुलेटचे प्राबल्य होते तिथे बॅलेट अर्थात मतदानाचा मार्ग स्वीकारण्यात आला. हा युद्धापासून बुद्धापर्यंतचा प्रवास आहे. अंतिम लक्ष्य अजून दूर आहे, मोठे मार्गक्रमण करायचे आहे. म्हणजे एक प्रकारे आपण माऊंट एव्हरेस्टच्या वेस कँम्पपर्यंत पोहोचलो आहोत. शिखरापर्यंतची चढाई अजून शिल्लक आहे. ज्याप्रमाणे गिर्यारोहकांना नेपाळच्या शेर्पांची खंबिर साथ आणि समर्थन लाभते, त्याच प्रकारे नेपाळच्या या विकास यात्रेत भारत आपल्यासाठी शेर्पाची तीच भूमिका निभावायला तयार आहे.

गेल्या महिन्यात पंतप्रधान श्री ओली जींच्या भारत दौऱ्यात आणि काल व आज माझ्या या नेपाळ दौऱ्यादरम्यान आमचा हाच संदेश आहे, माझी हीच भावना मी वेगळ्या शब्दात मांडली आहे. नेपाळने आपल्या गरजा आणि प्राधान्यक्रमानुसार पुढे मार्गक्रमण करावे. हे मी फार जबाबदारीने बोलतो आहे. नेपाळने आपल्या गरजा आणि प्राधान्यक्रमानुसार पुढे मार्गक्रमण केले पाहिजे. आपल्या यशस्वितेसाठी भारत नेहमी नेपाळच्या खांद्याला खांदा भिडवून चालत राहील. आपल्या यशातच भारताचे यश आहे. नेपाळच्या आनंदातच भारताचा आनंद आहे.

काम, मग ते रेल्वे मार्गाचे असो वा रस्ते बांधणीचे असो, जल उर्जेचे असो वा ट्रान्समिशन लाइन्सचे असो, इंटिग्रेटेड चेक पोस्‍टचे असो किंवा तेलवाहिनीचे असो किंवा मग भारत-नेपाळ सांस्कृतिक संबंध अथवा नागरिकांचे परस्पर संबंध अधिक दृढ आणि सक्षम करण्याचे काम असो. आपल्या प्रत्येक आवश्‍यकतेची दखल घेत आम्ही आपल्याला साथ दिली आहे आणि यापुढेही आम्ही सदैव आपल्यासोबत राहू. आम्ही काठमांडूला रेल्वेमार्गाने भारताशी जोडण्याच्या प्रकल्पाच्या डीपीआरचे काम सुरू केले आहे. आता नेपाळमध्ये याबाबत किती चर्चा आहे, याची मला कल्पना नाही. सध्या भारतात IPL चे क्रिकेट सामने सुरू आहेत आणि आता नेपाळही IPL मध्ये सहभागी झाल्याचे दिसत आहे.

या दौऱ्यादरम्यान अनेक बाबी मला नव्याने समजल्या. मला सांगण्यात आले की पहिल्यांदाच नेपाळचा संदीप लमीछाने हा खेळाडू IPL मध्ये सहभागी झाला आहे. येणाऱ्या काळात केवळ क्रिकेट नाही तर इतरही खेळांच्या माध्यमातून आपल्या दोन्ही देशांच्या नागरिकांचे परस्पर संबंध अधिक दृढ होतील, अशी आशा मला वाटते.

मित्रहो, याच शब्दांसह मी पुन्हा एकदा काठमांडूचे महापौर श्री शाक्यजींचे, काठमांडू प्रशासनाचे, नेपाळ सरकारचे, आदरणीय मुख्‍यमंत्रीजींचे, परराष्ट्र व्यवहार मंत्रीमहोदयांचे आणि आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो. ज्या भावना आता माझ्या मनात आहेत, त्याच तुमच्याही मनात आहेत, प्रत्येक नेपाळी व्यक्तीच्या मनात आहेत,प्रत्येक भारतीयाच्या मनातआहेत. त्या काहीशा अशा आहेत की…

नेपाळ भारत मैत्री अमर रहोस…..

नेपाळ भारत मैत्री अमर रहोस…..

नेपाळ भारत मैत्री अमर रहोस…..

अनेकानेक आभार!!!

B.Gokhale/M.Pange/D.Rane