Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

“नेतृत्वाचे महत्त्व: आजच्या जगात महात्मा गांधी यांचे स्थान” संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक-सामाजिक परिषदेत गांधीजीच्या विचारांवर चर्चा


शांतता आणि अहिंसेचे वैश्विक प्रतीक असलेल्या महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्च-स्तरीय परिषद आयोजित केली होती. संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक-सामाजिक बैठकीत हा विशेष कार्यक्रम झाला.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अन्तोंनियो गुटारेस, कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन, सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष ली-सिंग-लुंग, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, जमैकाचे अध्यक्ष आंड्र्यू होलीनेस, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिका आर्देन आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

त्याशिवाय, भूतानचे पंतप्रधान लोटे त्सेरिंग, कोरियाच्याच्या प्रथम महिला किम जोंग-सुक, संयुक्त राष्ट्रसंघातील वरिष्ठ अधिकारी आणि राजनैतिक अधिकारी यावेळी उपस्थित होते.

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी यावेळी मान्यवरांचे स्वागत आणि कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात उभारण्यात आलेल्या गांधी सौर प्रकल्पाचे (भारत आणि संयुक्त राष्ट्रे यांच्या योगदानातून) आणि ओल्ड वेस्टबरी येथे असलेल्या स्टेट युनिव्हार्सिटी ऑफ न्यूयॉर्क मधल्या गांधी पीस गार्डनचे उद्घाटन झाले. तसेच, संयुक्त राष्ट्रे टपाल प्रशासनाच्या वतीने महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त विशेष टपाल तिकिटांचेही प्रकाशन यावेळी झाले.

यावेळी बोलतांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 व्या शतकात महात्मा गांधी यांनी मानवतेसाठी दिलेल्या विशेष योगदानाची माहिती दिली. सर्वोदय, अंत्योदय यावर त्यांनी दिलेला भर आणि पर्यावरणपूरक शाश्वत विकासाबाबत त्यांना असलेली चिंता या सगळ्याचे सविस्तर विश्लेषण पंतप्रधानांनी केले. सामूहिक इच्छाशक्ती, एकत्रित भागधेय, मूल्य, जनचळवळ अशा तत्वांवर आणि व्यक्तिगत जबाबदारीच्या भावनेवर महात्मा गांधी यांचा विश्वास होता. ही सर्व तत्वे आणि विचार आजही लागू आहेत असं पंतप्रधान म्हणाले.

हिंसक घटना, दहशतवाद, आर्थिक असमानता, सामाजिक-आर्थिक भेदभाव,साथीचे आजार आणि हवामान बदलाचे संकट या सर्वांचा मानवी आयुष्यावर,समाजावर आणि देशांवर खोलवर विपारित परिणाम होतो आहे. अशा सर्व प्रश्नांचा सामना करण्यासाठी नेतृत्व अत्यंत आवश्यक आहे. महात्मा गांधी यांनी प्रभावी नेतृत्वासाठी जी मूल्ये अधोरेखित केली होती, तसे नेतृत्व आजही जगाला मार्गदर्शक ठरु शकेल, असे मोदी म्हणाले.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अन्तोनियो गुतारेस यावेळी म्हणाले की आपले प्रत्येक धोरण आणि कृती योग्य आहे की नाही, हे तपासून पाहण्याचा चमत्कारी धागाच आपल्याला महात्मा गांधी यांनी या मूल्यांतून दिला आहे. आपण करत असलेली कृती गरीबातल्या गरीब व्यक्तीचे आयुष्य, प्रतिष्ठा आणि भाग्य वाढवण्यास उपयुक्त ठरेल की नाही हे तपासण्याची ही किल्ली आहे. सार्वजनिक स्वच्छता, मातांचे आरोग्य, प्राथमिक शिक्षण, लैंगिक समानता, महिला सक्षमीकरण, भूकबळींचे प्रमाण कमी करणे, शाश्वत मूल्ये आणि सहस्त्रक मूल्ये तयार करण्याच्या कितीतरी आधी गांधीजीनी आपल्यां जीवनकार्यातून दिलेल्या आदर्शांच्या आधारावर विकास करतांना त्यात जनतेचा सहभाग वाढवणे, या सगळ्याचे मार्गदर्शन गांधी यांनी केले आहे.खरे सांगायचे झाल्यास शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये म्हणजे गांधीजींच्याच तत्वज्ञानावर आधारित प्रत्यक्ष कृती होय, असे गुतारेस म्हणाले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी गांधीजींच्या विचारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. महात्मा गांधी यांचा वारसा येणाऱ्या कित्येक पिढ्यापर्यत कायम राहणार आहे, असे ते म्हणाले. महात्मा गांधी यांचे व्यक्तिमत्व वंश, धर्म, दे-राज्ये यांच्या सीमारेषा ओलांडून विश्वव्यापी झाले आहे. ते 21 व्या शतकाचा आवाज बनले आहेत. गांधीजी एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. ते एकाच वेळी राष्ट्रवादी आणि अंतरराष्ट्रीय नेते होते. परंपरावादी आणि आधुनिक नेते होते. राजकीय नेते आणि अध्यात्मिक गुरुदेखील होते. लेखक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते होते. आज जग केवळ त्यांना त्यांच्या अहिंसा आणि सर्वोच्च मानवतेसाठी ओळखत नाही तर, सार्वजनिक जीवनात पुरुष आणि महिलांचे वर्तन कसे आहे, राजकीय कल्पना आणि सरकारची धोरणे, आपल्या वसुंधरेच्या आशा आणि इच्छा या सर्व गोष्टींसाठी ते एक जागतिक मापदंड बनले आहेत, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

**************

N.Sapre/R.Aghor/D.Rane