अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या दोन महत्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा’ आज नवी दिल्ली येथे प्रारंभ करताना केल्या.
शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या निकषांमध्ये महत्त्वपूर्ण बदलाची घोषणा पंतप्रधानांनी केली. आता 33 टक्के पिकांचे नुकसान झालेले शेतकरी देखील मदतीला पात्र ठरतील. यापूर्वी 50 टक्के किंवा त्याहून अधिक नुकसान झाल्यास मदत दिली जात होती.
संकटग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईच्या रक्कमेतही 50 टक्क्यांच्या वाढीची घोषणा पंतप्रधानांनी केली.
गेल्या वर्षभरात लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याबद्दल पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली.
संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदत करणे ही आपली जबाबदारी आहे म्हणूनच सरकारने नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची पथके तिथे पाठवली, असे ते म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारे, बँका आणि विमा कंपन्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.