Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नानाजी देशमुख जन्मशताब्दी सोहळ्याच्या उद्‌घाटन समारंभात पंतप्रधानांची उपस्थिती

नानाजी देशमुख जन्मशताब्दी सोहळ्याच्या उद्‌घाटन समारंभात
पंतप्रधानांची उपस्थिती

नानाजी देशमुख जन्मशताब्दी सोहळ्याच्या उद्‌घाटन समारंभात
पंतप्रधानांची उपस्थिती

नानाजी देशमुख जन्मशताब्दी सोहळ्याच्या उद्‌घाटन समारंभात
पंतप्रधानांची उपस्थिती


नानाजी देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या उद्‌घाटनानिमित्त आज नवी दिल्लीत पुसा इथल्या आयरी संस्थेत झालेल्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.

या निमित्त तंत्रज्ञान आणि ग्रामीण जीवन या संकल्पनेवर भरवण्यात आलेल्या प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी भेट दिली. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने ग्रामीण जनतेचे आयुष्य सुखकर बनवण्यासाठी तयार केलेली उपकरणे आणि प्रयोगांची माहिती या प्रदर्शनात देण्यात आली आहे. यावेळी पंतप्रधानांनी काही संशोधक आणि योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.

पंतप्रधानांनी नानाजी देशमुख आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांना पुष्पांजली अर्पण केली. नानाजी देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एका टपाल तिकीटाचं अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पंतप्रधानांनी दिशा या पोर्टलचेही उद्‌घाटन केले. केंद्र आणि राज्य सरकारांच्या विविध योजना आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी आणि त्याची प्रगती खासदार आणि आमदारांना या एकाच पोर्टलवर बघता येणार आहे. सध्या या पोर्टलवर 20 मंत्रालयांचे 41 कार्यक्रम अंर्तभूत करण्यात आले आहेत.

भारतातल्या ग्रामीण जनतेची सेवा करुन त्यांना सक्षम करण्यासाठी तयार केलेल्या ग्राम संवाद या ॲपचे पंतप्रधानांनी उद्‌घाटन केले. ग्रामपंचायत स्तरावर सुरु असलेल्या ग्राम विकास योजनांची सगळी माहिती नागरिकांना या पोर्टलवर मिळू शकेल. केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयातर्फे राबवण्यात येणाऱ्या 7 योजनांचा सध्या या ॲपवर समावेश करण्यात आला. तसेच पंतप्रधानांनी डिजिटल माध्यमातून 11 ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्थांच्या इमारतींचे आणि प्लांट फोनेमिक्स सुविधेचे लोकार्पण केले.

यावेळी स्वयं बचतगट, पंचायत, जल संवर्धन क्षेत्रातले संशोधक आणि प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी अशा सुमारे 10,000 लोकांना पंतप्रधानांनी संबोधित केले.

 

आज देशाच्या कल्याणासाठी अविरत झटलेल्या नानाजी देशमुख आणि लोकनायक जयप्रकाश नारायण या दोन महान विभूतींची जयंती आहे. त्यांना माझे विनम्र अभिवादन असे पंतप्रधान म्हणाले.

 

लोकनायक जयप्रकाश नारायण युवकांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. चले जाव चळवळीत जे पी आणि डॉ. लोहिया दोघांनीही महात्मा गांधीपासून प्रेरणा घेत मोठा लढा दिला होता. जे पीं ना कधीही सत्तेच्या राजकारणाचा मोह नव्हता, ते आयुष्यभर भ्रष्टाचाराविरोधात लढले असे पंतप्रधान म्हणाले.  नानाजी देशमुख यांनी आपले संपूर्ण आयुष्य ग्राम विकासासाठी वेचलं. गावांना स्वयंपूर्ण बनवून दारिद्रयमुक्त करण्यासाठी त्यांनी झटून काम केले, असे मोदी म्हणाले.

 

विकासाच्या केवळ उत्तम कल्पना मनात असणे पुरेसे नाही तर या कल्पना योग्य वेळेत प्रत्यक्षात उतरवायला पाहिजेत तरच त्याचा लाभ जनतेला मिळू शकेल असे ते म्हणाले. विकासासाठीचे प्रयत्न सर्वसमावेशक आणि योग्य ते फळ देणारेचं असावे असे मत त्यांनी व्यक्त केले.

शहरात उपलब्ध असलेल्या सुविधा गावातही उपलब्ध करुन द्याव्यात असे सांगत लोकशाहीचे खरे सत्व जन भागीदारीत आणि विकासाच्या प्रवासात शहरांसोबतच ग्रामीण जनतेला जोडून घेण्यात आहे असे पंतप्रधान म्हणाले. जनतेच्या सरकारसोबत कायम संवाद सुरु राहावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गावांमध्ये स्वच्छतेच्या सुविधांचा असलेला अभाव विकासासाठी मारक आहे असे नमूद करत त्यासाठीच सरकार ग्रामीण भागात स्वच्छतागृहे बांधण्यासाठी काम करत आहे, असे मोदी यांनी सांगितले.

   

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar