Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नवी दिल्ली येथे अष्टलक्ष्मी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

नवी दिल्ली येथे अष्टलक्ष्मी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण


 

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा जी, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा जी, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा जी, सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंधिया जी, सुकांता मुजूमदार जी, अरुणाचल प्रदेशचे  उप-मुख्यमंत्री, मिजोरम आणि नागालँडच्या सरकारचे मंत्रीगण, अन्य लोकप्रतिनिधी, ईशान्य प्रदेशातून आलेले सर्व बंधू आणि भगिनी, स्त्री आणि पुरुषगण,

मित्रांनो,

आज राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेब यांनी तयार केलेले संविधान, संविधानाचे 75 वर्षांचे अनुभव…प्रत्येक देशवासियांसाठी खूप मोठी प्रेरणा आहे. मी सर्व देशवासियांच्या वतीने बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांना वंदन करतो.

मित्रांनो,

आपले हे भारत मंडपम मागील दोन वर्षांमध्ये अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे साक्षीदार राहिले आहे. इथे आपण जी –20 चे एवढे मोठे आणि यशस्वी आयोजन झालेले पाहिले. मात्र आजचे आयोजन आणखी खास आहे. आज दिल्ली ईशान्यमय झाली आहे. ईशान्य प्रदेशचे विविधतेने नटलेले रंग आज राजधानीत एक सुंदर इंद्रधनुष्य साकारत आहेत. आज आपण इथे पहिला अष्टलक्ष्मी महोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. पुढील तीन दिवस हा महोत्सव आपल्या ईशान्य प्रदेशचे सामर्थ्य संपूर्ण देशाला दाखवेल, संपूर्ण जगाला दाखवेल. इथे व्यापार-उद्योगाशी संबंधित सामंजस्य करार होतील, ईशान्य प्रदेशातील उत्पादनांची जगाला ओळख होईल, ईशान्य प्रदेशची संस्कृती, तिथले खाद्यपदार्थ आकर्षणाचे केंद्र असेल. ईशान्य प्रदेशातील आपली जी यशस्वी व्यक्तिमत्वे आहेत , त्यापैकी अनेक पद्म पुरस्कार विजेते इथे उपस्थित आहेत.. या सर्वांच्या प्रेरणेचे रंग इथे पसरतील. हे पहिले आणि अनोखे आयोजन आहे ज्यात एवढ्या मोठ्या स्तरावर ईशान्य प्रदेशात गुंतवणुकीच्या संधी खुल्या होत आहेत. ईशान्य प्रदेशातील शेतकरी, कारागीर, शिल्पकारांबरोबरच जगभरातील गुंतवणूकदारांसाठी देखील ही एक उत्तम संधी आहे. ईशान्य प्रदेशाची क्षमता काय आहे ती आपल्याला इथे जे प्रदर्शन लागले आहे, इथल्या हाट बाजारातही जर गेले तर आपल्याला त्याची  विविधता, त्याचे सामर्थ्य अनुभवायला मिळेल. मी अष्टलक्ष्मी महोत्सवाच्या आयोजकांचे, ईशान्य प्रदेशातील सर्व राज्यांच्या नागरिकांचे, इथे आलेल्या सर्व गुंतवणूकदारांचे, इथे येणाऱ्या सर्व पाहुण्यांचे अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

मागील 100-200 वर्षांचा कालखंड पाहिला तर पाश्चात्य जगाचा उदय आपण पाहिला आहे. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अशा प्रत्येक स्तरावर पाश्चात्य देशांनी जगावर छाप सोडली आहे आणि योगायोगाने, भारतातही आपण पाहिले आहे की आपल्या देशाचा संपूर्ण नकाशा आपण पाहिला तर, भारताच्या विकासगाथेत पाश्चिमात्य देशांनी मोठी भूमिका पार पाडली आहे. या पश्चिम-केंद्रित कालखंडानंतर आता 21 वे शतक पूर्वेचे आहे, आशियाचे आहे, पूर्वेचे आहे, भारताचे आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की भारतातही आगामी काळ हा पूर्व भारताचा, आपल्या ईशान्येचा आहे. मागील दशकांमध्ये, आपण मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद यासारख्या मोठ्या शहरांचा उदय पाहिला आहे. आगामी दशकांमध्ये आपण गुवाहाटी, आगरतळा, इंफाळ, ईटानगर, गंगटोक, कोहिमा, शिलॉन्ग आणि ऐजॉल सारख्या शहरांचे नवे सामर्थ्य पाहणार आहोत. आणि त्यामध्ये अष्टलक्ष्मी सारख्या आयोजनांची खूप मोठी भूमिका असेल.

मित्रांनो,

आपल्या परंपरेत माता लक्ष्मीला सुख, आरोग्य आणि समृद्धीची देवी म्हटले जाते. जेव्हा लक्ष्मीची पूजा केली जाते तेव्हा आपण तिच्या आठ रूपांची पूजा करतो. आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी, त्याचप्रमाणे भारताच्या ईशान्य भागात आठ राज्यांच्या अष्टलक्ष्मी विराजमान आहेत.. आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिजोरम, नागालँड , त्रिपुरा आणि  सिक्किम. ईशान्य भागातल्या या आठ राज्यांमध्ये अष्टलक्ष्मीचे  दर्शन होते. आता जसे पहिले रूप आहे आदि लक्ष्मी. आपल्या ईशान्येकडील प्रत्येक राज्यात आदि संस्कृतीचा सशक्त  विस्तार आहे. ईशान्येतील प्रत्येक राज्यात स्वतःची परंपरा, स्वतःची संस्कृती साजरी केली जाते. मेघालयचा चेरी ब्लॉसम महोत्सव , नागालँडचा हॉर्नबिल महोत्सव, अरुणाचलचा ऑरेंज महोत्सव, मिझोरमचा चपचर कुट महोत्सव, आसामचा बिहू, मणिपुरी नृत्य… ईशान्येत काय काय  आहे.

मित्रांनो,

दुसरी लक्ष्मी… धन लक्ष्मी, म्हणजेच नैसर्गिक साधनसंपत्तीचा देखील ईशान्येवर वरदहस्त आहे. तुम्हाला माहीत आहेच… ईशान्य प्रदेशात खनिजे, तेल, चहाचे मळे आणि जैवविविधतेचा अद्भुत संगम आहे. तिथे नवीकरणीय ऊर्जेची प्रचंड क्षमता आहे. “धन लक्ष्मी” चा हा आशीर्वाद संपूर्ण ईशान्येसाठी वरदान आहे.

मित्रांनो,

तिसरी लक्ष्मी…धान्य लक्ष्मीची देखील  ईशान्य प्रदेशावर मोठी कृपा आहे. आपला ईशान्य प्रदेश नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती आणि भरड धान्य यासाठी प्रसिद्ध आहे. सिक्कीम हे भारतातील पहिले पूर्णपणे सेंद्रिय राज्य असल्याचा आम्हाला अभिमान आहे. ईशान्येत उगवलेले तांदूळ, बांबू, मसाले आणि औषधी वनस्पती तेथील शेतीचे सामर्थ्य दाखवतात. आजचा भारत जगाला निरोगी जीवनशैली आणि पोषणाशी संबंधित जे उपाय देऊ इच्छितो… त्यात ईशान्य प्रदेशाची मोठी भूमिका आहे.

मित्रांनो,

अष्टलक्ष्मीची चौथी लक्ष्मी… गज लक्ष्मी. गज लक्ष्मी कमळावर विराजमान आहे आणि तिच्याभोवती हत्ती आहेत.आपल्या ईशान्य भागात विस्तीर्ण जंगले आहेतकाझीरंगा, मानस-मेहाओ सारखी राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्ये आहेत, अप्रतिम गुहा आहेत, आकर्षक तलाव आहेत. गजलक्ष्मीच्या आशीर्वादामध्ये ईशान्य भागाला  जगातील सर्वात सुंदर पर्यटन ठिकाण बनवण्याचे सामर्थ्य  आहे.

मित्रांनो,

पाचवी लक्ष्मी आहे …संतान लक्ष्मी म्हणजेच उत्पादकता, सर्जनशीलतेचे प्रतीक. ईशान्य प्रदेश सर्जनशीलता आणि कौशल्यासाठी ओळखला जातो. इथल्या प्रदर्शनाला, हाट -बाजाराला भेट देणाऱ्या लोकांना ईशान्य प्रदेशाची सर्जनशीलता दिसेल.हातमाग आणि हस्तकलेचे हे कौशल्य सर्वांचे मन जिंकून घेते. आसामचे मुगा सिल्क, मणिपूरचे मोइरांग फेई, वांखेई फी, नागालँडची चाखेशांग शाल…अशी डझनभर जीआय टॅग केलेली उत्पादने आहेत, जी ईशान्येकडील कलाकुसर आणि सर्जनशीलता दर्शवतात.

मित्रांनो,

अष्टलक्ष्मीची सहावी लक्ष्मी आहे …वीर लक्ष्मी. वीर लक्ष्मी म्हणजे साहस आणि शक्ती यांचा संगम. ईशान्य प्रदेश हे नारी शक्तीच्या सामर्थ्याचे  प्रतीक आहे. मणिपूरचे नुपी लान आंदोलन हे महिला-शक्तीचे उदाहरण आहे. ईशान्येतील महिलांनी गुलामगिरीविरुद्ध कसे रणशिंग फुंकले याची भारताच्या इतिहासात नेहमीच सुवर्णाक्षरांनी नोंद केली जाईल. राणी गैडिनलियू, कनकलता बरुआ, राणी इंदिरा देवी, ललनू रोपिलियानी लोक- कथांपासून ते आपल्या स्वातंत्र्यलढ्यापर्यंत… ईशान्येतील नारी शक्तीने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली आहे. आजही ईशान्येतील आपल्या मुली ही परंपरा समृद्ध करत आहेत. इथे येण्याआधी मी ज्या स्टॉल्सना भेट दिली त्यातही बहुतेक महिलाच  होत्या. ईशान्येतील महिलांची ही उद्यमशीलता संपूर्ण ईशान्य प्रदेशाला मजबूत बनवते, ज्याला  तोड नाही.

मित्रांनो,

अष्टलक्ष्मीची सातवी लक्ष्मी आहे …जय लक्ष्मी. म्हणजे यश आणि कीर्ती  देणारी.  आज संपूर्ण जगाच्या भारताकडून ज्या अपेक्षा आहेत, त्यात आपल्या ईशान्य प्रदेशाची महत्त्वाची भूमिका आहे. आज, जेव्हा भारत आपल्या संस्कृतीच्या आणि आपल्या व्यापाराच्या जागतिक कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित करत आहे, तेव्हा ईशान्य प्रदेश भारताला दक्षिण आशिया आणि पूर्व आशियाच्या अफाट संधींशी जोडतो आहे .

मित्रांनो,

अष्टलक्ष्मीची आठवी लक्ष्मी आहे … विद्या लक्ष्मी म्हणजे ज्ञान आणि शिक्षण. आधुनिक भारताच्या उभारणीत शिक्षणाची जी काही मोठी केंद्रे आहेत त्यापैकी अनेक केंद्रे ईशान्येकडील आहेत. आयआयटी  गुवाहाटी, एनआयटी सिल्चर, एनआयटी मेघालय, एनआयटी अगरतला आणि आयआयएम शिलॉँग…अशी अनेक मोठी शिक्षण केंद्रे ईशान्य प्रदेशात आहेत. ईशान्य प्रदेशाला आपले पहिले एम्स मिळाले आहे. देशाचे पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ देखील मणिपूर येथे उभे राहत आहे. मैरी कॉम, बाइचुंग भूटिया, मीराबाई चानू, लोवलीना, सरिता देवी…असे कितीतरी खेळाडू ईशान्य प्रदेशाने भारताला दिले आहेत.  आज ईशान्य प्रदेश तंत्रज्ञानाशी संबंधित स्टार्टअप्स, सेवा केंद्रे आणि सेमीकंडक्टर सारख्या उद्योगांमध्येही पुढे येताना दिसत आहे. यामध्ये हजारो तरुण काम करत आहेत. म्हणजेच “विद्या लक्ष्मी” च्या रूपाने हा प्रदेश युवकांसाठी  शिक्षण आणि कौशल्याचे मोठे केंद्र बनत आहे.

मित्रांनो,

अष्टलक्ष्मी महोत्सव… हा ईशान्य प्रदेशाच्या उज्वल भविष्याचा उत्सव आहे. विकासाच्या नव्या सूर्योदयाचा हा उत्सव आहे… जो विकसित भारताच्या मिशनला गती देणार आहे. आज ईशान्य प्रदेशात गुंतवणुकीसाठी खूप उत्साह आहे. गेल्या दशकात आपण सर्वांनी ईशान्य क्षेत्राच्या विकासाचा एक अद्भुत प्रवास पाहिला आहे. पण इथपर्यंत पोहोचणं सोपं नव्हते. ईशान्येकडील राज्यांना भारताच्या विकासगाथेशी जोडण्यासाठी आम्ही शकत ती सर्व पावले उचलली आहेत. मतपेढीवरून विकासाचे कसे मोजमाप केले गेले  हे आपण दीर्घकाळापर्यंत पाहिले आहे.

ईशान्येकडील राज्यांमध्ये मतदारांची संख्याही कमी आणि संसदेतल्या लोकप्रतिनिधींची संख्याही कमी होती. त्यामुळे आधीच्या सरकारांनी या भागाच्या विकासाकडे कधी लक्षच दिलं नाही. अटलजींच्या सरकारनं ईशान्येकडील राज्यांच्या विकासासाठी पहिल्यांदा स्वतंत्र मंत्रालय स्थापन केलं. 

मित्रांनो,

गेल्या दहा वर्षांत आम्ही दिल्ली आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये असलेले भावनिक अंतर आणि विकासातील तफावत दूर करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. केंद्रिय मंत्र्यांनी 700हून अधिक वेळा ईशान्येकडील राज्यांचा दौरा केला, तिथल्या नागरिकांसोबत बराच काळ राहिले. यामुळे ईशान्येकडील राज्यांचा विकास झाला तसेच केंद्र सरकार आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये भावनिक नाते निर्माण झाले. तिथल्या विकासाला गती मिळाली. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ईशान्य भारताच्या विकासाला गती देण्यासाठी 90च्या दशकात एक धोरण आखलं गेलं. त्यानुसार केंद्र सरकारच्या 50पेक्षा जास्त मंत्रालयांनी आपल्या एकूण खर्चाच्या 10 टक्के रक्कम ईशान्य भारताच्या विकासामध्ये गुंतवावी असं ठरवण्यात आलं. हे धोरण आखल्यानंतर 2014पर्यंत ईशान्य भारताला जेवढा निधी मिळाला त्याच्या कितीतरी पट जास्त निधी आम्ही गेल्या दहा वर्षांत ईशान्य भारतातील राज्यांना दिला. या एका योजनेअंतर्गत गेल्या दशकात या भागासाठी 5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च केला गेला. यातून सध्याच्या सरकारनं ईशान्य भारताच्या विकासाला दिलेलं प्राधान्य दिसून येतं.

मित्रांनो,

आम्ही या योजनेबरोबरच ईशान्य भारतासाठी आणखी बऱ्याच विशेष योजना सुरू केल्या आहेत. पीएम डिव्हाइन, विशेष पायाभूत सुविधा विकास योजना आणि ईशान्य भारत उपक्रम निधी या योजनांद्वारे रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध झाल्या. ईशान्य भारताची औद्योगिक क्षमता विकसित करण्यासाठी आम्ही उन्नती योजना सुरू केली. नव्या उद्योगांना पोषक वातवरण तयार झाले तर नवीन रोजगारनिर्मितीदेखील होईल. सेमीकंडक्टर निर्मिती उद्योग भारतासाठी नवं क्षेत्र आहे. या नव्या उद्योग क्षेत्राला गती देण्यासाठीही आम्ही ईशान्य भारतातल्या आसामची निवड केली आहे. ईशान्य भारतात अशा प्रकारे नवीन उद्योग सुरू झाले तर देशातले आणि जगभरातले उद्योजक इथे गुंतवणूक करतील.

मित्रांनो,

ईशान्य भारताच्या विकासासाठी आम्ही भावना, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण या तिन्ही बाबी महत्त्वाच्या मानल्या आहेत. या भागात आम्ही केवळ पायाभूत सुविधांचा विकास करत नसून त्याद्वारे भविष्याचा मजबूत पाया रचत आहोत. यापूर्वी ईशान्येकडील राज्यातलं सर्वात मोठं आव्हान होतं संपर्क आणि दळणवळणाची साधनं. तिथल्या दूरवरच्या गावांत पोहोचण्यासाठी कित्येक दिवस, आठवडे लागत असत. या राज्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी रेल्वेची सेवाच उपलब्ध नव्हती. म्हणूनच 2014पासून आमच्या सरकारनं केवळ दळणवळणाच्या पायाभूत सुविधाच नाही तर सामाजिक सुविधा विकासालाही प्राधान्य दिलं. यामुळे ईशान्य भारतातल्या राज्यांमध्ये पायाभूत सुविधा विकसित होण्याबरोबरच लोकांच्या जीवनमानातही सुधारणा झाली. आम्ही या सुधारणांच्या अंमलबजावणीचा वेगही वाढवला. बरीच वर्षे रखडलेले प्रकल्प पूर्ण केले. बोगी बील प्रकल्पाचंच उदाहरण घ्या, कित्येक वर्षात पूर्ण न झालेला हा प्रकल्प पूर्ण होण्याआधी धेमाजीतून दिब्रूगडला जायला पूर्ण दिवस लागत होता. आता प्रकल्प पूर्ण झाल्यावर हे अंतर एक दोन तासातच पार करता येऊ लागलं आहे. अशी बरीच उदाहरणं मी सांगू शकतो.

मित्रांनो,

गेल्या दहा वर्षांमधे जवळपास 5 हजार किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्गांचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. अरुणाचल प्रदेशातला सेला बोगदा, भारत, म्यानमार, थायलंड हा त्रिस्तरीय महामार्ग तसंच नागालँड, मणिपूर, मिझोराम राज्यातले सीमारस्ते यांच्या माध्यमातून रस्त्यांचं मजबूत जाळं निर्माण होत आहे. गेल्या वर्षी जी 20 परिषदेत भारतानं I-MAC प्रकल्प जगासमोर सादर केला. I-MAC म्हणजेच भारत–मध्य पूर्व युरोप कॉरीडोरमुळे ईशान्य भारतातली राज्यं अख्ख्या जगाशी जोडली जातील.

मित्रांनो,

ईशान्य भागातल्या रेल्वे सुविधेतही कमालीची सुधारणा झाली आहे. इथल्या सर्व राज्यांच्या राजधान्या रेल्वेमार्गानं एकमेकांशी जोडण्याचं कामदेखील लवकरच पूर्ण होईल. ईशान्य भारतात पहिली वंदे भारत रेल्वेही सुरू झाली आहे. गेल्या दहा वर्षात ईशान्य भारतातल्या विमानतळांची तसंच विमान उड्डाणांची संख्यादेखील दुप्पट झाली आहे. ब्रम्हपुत्रा आणि बराक नद्यांमध्ये जलमार्ग तयार करण्याचं कामही सुरू आहे. सबरुम भूबंदरामुळे जलमार्ग वाहतूक चांगली सोईची झाली आहे.

मित्रांनो,

मोबाइल सेवा आणि पाइप लाइनद्वारे गॅस पुरवठा करण्याचं कामही वेगानं सुरू आहे. ईशान्य भारतातल्या प्रत्येक राज्याला ईशान्य गॅस ग्रिडशी जोडण्यात येत आहे. 1600 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची गॅस पाइप लाइन टाकण्याचं काम करण्यात येत आहे.

सुरळीत इंटरनेट सेवा पुरवण्यावरदेखील आमचा भर असेल. या राज्यांमध्ये 2600 पेक्षा जास्त मोबाइल टॉवर उभारले जात आहेत. ऑप्टीकल फायबरचं 13 हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचं जाळं उभारण्यात आलं आहे. ईशान्येकडच्या सर्व राज्यांमध्ये 5जी सुविधा सुरू झाल्याचा मला अतिशय आनंद होत आहे.

मित्रांनो,

सामाजिक सुधारणांच्या बाबतीतही या राज्यांमध्ये बरेच प्रयत्न केले गेलेत. बरीच वैद्यकीय महाविद्यालयं सुरू केली. कर्करोगासारख्या गंभीर आजारावरच्या अत्याधुनिक उपचार सुविधा या राज्यांमध्ये सुरू होत आहेत. आयुष्मान भारत योजनेमुळे इथल्या लाखो रुग्णांना मोफत उपचार करुन घेणं शक्य झालं आहे. 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार सुविधा मिळतील अशी हमी मी निवडणुकीच्या काळात तुम्हाला दिली होती. आयुष्मान वय वंदना कार्डद्वारे सरकारनं या हमीची पूर्तता केली आहे.

मित्रांनो,

दळणवळणाच्या सुविधांबरोबरच आम्ही ईशान्य भारतातल्या राज्यांच्या परंपरा, वस्त्रोद्योग आणि पर्यटनावर भर दिला. यामुळे आता देशभरातले पर्यटक या राज्यांमधली पर्यटनस्थळं पाहायला येऊ लागले आहेत. गेल्या दशकभरात इथं येणाऱ्या पर्यटकांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. गुंतवणूक आणि पर्यटनात वाढ झाल्यामुळं नवीन व्यवसाय निर्माण होत आहेत तसंच रोजगाराच्या नवनव्या संधी निर्माण होत आहेत. पायाभूत सुविधांमुळे समावेशकता, संपर्कसाधनांच्या सुधारणेमुळे आपलेपणा, आर्थिक प्रगतीतून भावनिकता… या प्रवासानं ईशान्य भारताच्या विकासाला, अष्टलक्ष्मीच्या विकासाला नवी उंची मिळवून दिली आहे.

मित्रांनो,

आज केंद्र सरकारचं प्राधान्य अष्टलक्ष्मी राज्यातल्या युवा पिढीला आहे. इथल्या तरुण पिढीला खूप आधीपासून विकासाची आस आहे. इथल्या प्रत्येक राज्यात कायमची शांतता आणि सलोखा असण्याला लोकांचा पाठिंबाच असल्याचं गेल्या दहा वर्षात दिसून आलं. केंद्र आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नांमुळे हजारो तरुणांनी हिंसेचा त्याग करुन विकासाचा मार्ग अवलंबला. गेल्या दहा वर्षात ईशान्य भारतात अनेक शांतता करार झाले. दोन राज्यांमध्ये सीमेवरुन जे काही विवाद होते त्यावर सौहार्दपूर्ण तोडगा काढला जात आहे. परिणामी या भागातल्या हिंसाचाराच्या घटना लक्षणीयरित्या कमी झाल्या. अनेक राज्यांमधून AFSPA  कायदा मागं घेतला गेला. आपल्याला सगळ्यांना मिळून अष्टलक्ष्मीचं नवीन उज्ज्वल भवितव्य घडवायचं आहे आणि सरकार यासाठी सर्वप्रकारे प्रयत्न करत आहे.

मित्रांनो,

ईशान्य भारतातली उत्पादनं जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावीत अशी आपल्या सर्वांचीच इच्छा आहे. म्हणूनच प्रत्येक जिल्ह्यातल्या उत्पादनाला ‘एक जिल्हा एक उत्पादन’ अभियानाद्वारे प्रोत्साहन दिलं जात आहे. ईशान्य भारतात तयार झालेली अनेक उत्पादनं आपण इथल्या प्रदर्शनात, ग्रामीण हाट बाजारात पाहू शकता, खरेदी करू शकता. या उत्पादनांसाठी मी व्होकल फॉर लोकल चळवळीला प्राधान्य देतो. ही उत्पादनं परदेशी पाहुण्यांना भेट म्हणून देण्याचा माझा प्रयत्न असतो. यामुळे तुमच्या या अद्भुत कलेला, कौशल्याला जागतिक स्तरावर ओळख मिळते. देशातल्या जनतेनं, दिल्लीतल्या रहिवाशांनी ईशान्य भारतातल्या उत्पादनांचा आपल्या जीवनशैलीत समावेश करावा असा माझा आग्रह आहे.

मित्रांनो,

आज मी तुम्हाला एक वेगळा अनुभव सांगतो. गेल्या काही वर्षांत आपले ईशान्य भारतातले बंधुभगिनी गुजरातमधल्या विशेष सांस्कृतिक महोत्सवात सहभागी होत आहेत. गुजरातमध्ये पोरबंदरजवळ माधवपूर जत्रा भरते. मी तुम्हाला या जत्रेत सहभागी होण्याचं आमंत्रण देतो. माधवपूर जत्रा म्हणजे श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा विवाह सोहोळा असतो आणि देवी रुक्मिणी ईशान्य भारताची कन्या असल्याचं मानलं जातं.

दरवर्षी मार्च एप्रिल महिन्यांत रामनवमीच्या आसपास साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात ईशान्य भारतीय राज्यातल्या माझ्या सर्व कुटुंबियांनी सहभागी व्हावं अशी माझी विनंती आहे. माधवपूर उत्सवादरम्यान गुजरातमध्येही ईशान्य भारतीय राज्यांचा महोत्सव आयोजित केला जावा आणि ईशान्य भारतातल्या उत्पादनांच्या प्रदर्शन तसंच विक्रीसाठी बाजारपेठ निर्माण केली जावी अशी माझी इच्छा आहे. यातून ईशान्य भारतातल्या कारागीरांना उत्पन्न मिळेल आणि त्यांच्या अनोख्या कलाकौशल्याला ओळख मिळेल. मला पूर्ण विश्वास आहे की भगवान श्रीकृष्ण आणि अष्टलक्ष्मीच्या आशीर्वादामुळे 21व्या शतकात ईशान्य भारत प्रगतीचा नवा टप्पा गाठेल. ईशान्य भारताच्या प्रगतीच्या अपेक्षेसह या अष्टलक्ष्मी उपक्रमालाही उत्तुंग यश लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि मी माझं भाषण संपवतो.

तुमचे सर्वांचे मनःपूर्वक आभार.

***

H.Akude/S.Kane/S.Joshi/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com