Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नवी दिल्लीत संपन्न होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

नवी दिल्लीत संपन्न होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन


नवी दिल्‍ली, 21 फेब्रुवारी 2025

 

संमेलनामध्ये उपस्थित ज्येष्ठ नेते श्री. शरद पवार, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, सर्व सदस्य आणि मराठी भाषेचे सर्व विद्वत्तजन आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो.

आत्ता डॉ. ताराजी यांचे भाषण पूर्ण झाले तेव्हा मी, थारछाण असे सहज म्हटले तेव्हा, त्यांनी मला गुजरातीत उत्तर दिले की मला गुजराती येते. देशाच्या आर्थिक राजधानीच्या, राज्यातून देशाच्या, राजधानीत आलेल्या सर्व मराठी, सारस्वतांना माझा नमस्कार.

आज दिल्लीच्या भूमीवर मराठी भाषेच्या या गौरवशाली कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. अखिल भारतीय मराठी संमेलन एक भाषा किंवा राज्य यापर्यंत मर्यादित राहाणारे आयोजन नाही, तर मराठी साहित्याच्या संमेलनात स्वातंत्र्याच्या लढ्याचा सुवास येतो आहे, त्यामध्ये महाराष्ट्र आणि राष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा दिसतो. ज्ञानोबा-तुकारामांच्या मराठीला आज राजधानी दिल्ली अतिशय मनापासून अभिवादन करते,

बंधू आणि भगिनींनो,

1878 मध्ये आयोजित पहिल्या संमेलनापासून आत्तापर्यंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, देशाच्या 147 वर्षांच्या प्रवासाचे साक्षीदार आहे. महादेव गोविंद रानडे, हरी नारायण आपटे, माधव श्रीहरी अणे, शिवराम परांजपे, वीर सावकर अशा देशातल्या कितीतरी महनीय व्यक्तींनी त्याचे अध्यक्षपद भुषवले आहे. शरद पवार यांच्या आमंत्रणावरून मला या गौरवपूर्ण परंपरेत सामील होण्याची संधी मला मिळाली आहे. मी आपल्या सर्वांना, देशातल्या सर्व मराठी प्रेमींना या आयोजनासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज जागतिक मातृभाषा दिवस आहे, तुम्ही दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी दिवसही अतिशय चांगला निवडला आहे.

मित्रांनो,

मी जेव्हा मराठी भाषेचा विचार करतो, तेव्हा मला संत ज्ञानेश्वरांच्या ओवीची आठवण येणे अत्यंत स्वाभाविक आहे. ‘माझ्या मराठीची बोलू कौतुके| परि अमृतातेही पैजा जिंके’| म्हणजेच, मराठी भाषा अमृताहून गोड आहे. त्यासाठी मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीप्रती मला जे प्रेम वाटते, आपण सारे त्याविषयी परिचीत आहात. आपण विद्वतजनांप्रमाणे मराठी भाषेमध्ये जास्त प्रवीण नाही, पण मराठी बोलण्याचा प्रयत्न, मराठीतले नवीन शब्द शिकण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत असतो.

मित्रांनो,

मराठीचे हे संमेलन अशा वेळी होत आहे, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली आहेत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मजयंतीला 300 वर्ष झाली आहेत आणि काहीच काळापुर्वी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या आपल्या संविधानाने 75 वर्ष पूर्ण केली आहेत.

मित्रांनो,

आजही, महाराष्ट्राच्या भूमीवर एका मराठी भाषिक महापुरुषाने 100 वर्षांपुर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बीज रोवले होते, या गोष्टींचा आम्हाला गर्व करतो. वटवृक्षातल्या रुपात संघ आपली शताब्दी वर्ष साजरे करतो आहे. वेदांपासून विवेकानंदांपर्यंत भारताच्या महान आणि पारंपरिक संस्कृतीला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, एक संस्कार यज्ञ गेल्या 100 वर्षापासून चालवत आहे. माझ्यासारख्या लाखो लोकांना आरएसएस ने देशासाठी जगण्याची प्रेरणा दिली आहे, हे माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. आणि संघामुळेच मी मराठी भाषा आणि मराठी परंपरा यांच्याशी जोडले जाण्याचे सौभाग्य मिळाले. याच कालखंडात काही महिने आधी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. देशात आणि जगभरात 12 कोटीहून अधिक लोक मराठी भाषिक आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी कोट्यवधी मराठी भाषिक दशकांपासून वाट पाहात होते. हे काम पूर्ण करण्याची संधी मला मिळाली हे माझ्या आयुष्याचे मोठेच सौभाग्य आहे, असे मी मानतो.

माननीय विद्वानजनहो,

आपल्याला माहीत आहे की, भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसते. आपली भाषा आपली संस्कृतीची वाहक असते. भाषा समाजातून जन्माला येते ही गोष्ट खरी आहे, पण भाषा समाजनिर्मितीतही तितकीच महत्त्वाची भूमिका निभावते. आपल्या मराठीने महाराष्ट्र आणि राष्ट्राच्या कितीतरी व्यक्तींचे विचार अभिव्यक्त करून आपल्या संस्कृतीची निर्मिती केली आहे. म्हणूनच, समर्थ रामदास म्हणतात, मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा आहे तितके जतन करावे पुढे आणिक मेळवावे महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे| मराठी संपूर्ण भाषा आहे. त्यासाठी मराठीत वीरता आहे, शौर्यही आहे. मराठीमध्ये सौदर्यही आहे, संवेदनाही आहे, समानताही आहे, समरसताही आहे, त्यात अध्यात्माचे स्वर आहेत आणि आधुनिकतेची लाटही आहे. मराठीमध्ये भक्ती आहे, शक्ती आहे आणि युक्तीही आहे. आपण पहा, जेव्हा भारताला आध्यात्मिक उर्जेची गरज भासली, तेव्हा महाराष्ट्रातल्या महान संतांनी ऋषींचे ज्ञान सुलभ केले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, संत नामदेव, संत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, गोरा कुंभार आणि बहीणाबाई, महाराष्ट्रातल्या कितीतरी संतांनी भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून मराठी भाषेत समाजाला नवी दिशा दाखवली. आधुनिक काळातही गजाजन दिगंबर माडगूळकर आणि सुधीर फडके यांनी गीतरामायणामुळे जो प्रभाव पडला, तो आपण सर्वच जाणतो.

मित्रांनो,

गुलामीच्या शेकडो वर्षांच्या कालखंडात, मराठी भाषा, आक्रमकांपासून मुक्ती देण्याचा नारा झाली. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि बाजीराव पेशवे यांच्यासारख्या मराठी वीरांनी शत्रूच्या नाकात वेसण घातली, त्यांना शऱणागती पत्करण्यास भाग पाडले. स्वातंत्र्य लढ्यात वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक आणि वीर सावरकर सारख्या स्वातंत्र्यसेनानींनी इंग्रजांची झोप उडवली. त्यांच्या या लढ्यात मराठी भाषा आणि मराठी साहित्याचे मोठेच योगदान होते. केसरी आणि मराठा सारख्या वर्तमानपत्रातून, गोविंदाग्रजांच्या ओजस्वी कवितांमधून, राम गणेश गडकरी यांच्या नाटकांमधून, मराठी साहित्यातून राष्ट्रप्रेमाचा झरा निर्माण झाला, त्यामुळे संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य चळवळीला खतपाणीच मिळाले. लोकमान्य टिळकांनी मराठीत गीता रहस्य लिहिले होते. पण त्यांच्या मराठी रचनेने संपूर्ण देशामध्ये एक नव्या उर्जेचा संचार झाला.

मित्रांनो,

मराठी भाषा आणि मराठी साहित्याने समाजाच्या शोषित, वंचित वर्गासाठी सामाजिक मुक्तीची दारे खुली करण्याचे अद्भुत कार्य केले आहे. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे आणि बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या कितीतरी महान समाजसुधारकांनी मराठी भाषेत नव्या युगाचा दृष्टिकोन रुजवण्याचे काम केले होते. मराठी भाषेने देशाला अतिशय समृद्ध दलित साहित्य देखील दिले आहे. आधुनिक विचारसरणीमुळे मराठी साहित्यात विज्ञान कथा देखील लिहिल्या गेल्या आहेत. भूतकाळात देखील  आयुर्वेद, विज्ञान आणि  तर्कशास्त्रात महाराष्ट्राच्या लोकांनी अद्भुत योगदान दिले आहे. याच  संस्कृतीमुळे महाराष्ट्राने नेहमीच नवीन कल्पना आणि प्रतिभेला वाव दिला आहे, ज्यामुळे महाराष्ट्राची यात प्रगती झाली आहे. आपली मुंबई केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी म्हणून उदयाला आली आहे.

आणि बंधू- भगिनींनो,

जेव्हा मुंबईचा उल्लेख होतो, तेव्हा चित्रपटांशिवाय ना साहित्याची चर्चा पूर्ण होते ना मुंबईची! महाराष्ट्र आणि मुंबईनेच मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटांना ही उंची गाठून दिली आहे. आणि सध्या तर ‘छावा’ चित्रपट अलोट गर्दी खेचत आहे. संभाजी महाराजांच्या शौर्याची ओळख शिवाजी सावंत यांच्या मराठी कादंबरीनेच करून दिली आहे.

मित्रांनो,

कवी केशवसुत यांचे एक पद आहे – “जुनें जाऊं द्या, मरणालागुनि जाळुनि किंवा, पुरुनि टाका सडत न एक्या ठायी ठाका, म्हणजे आपण जुन्या विचारांमध्ये कुंठित राहू शकत नाही. मानवी संस्कृती, विचार आणि भाषा सतत विकसित होत राहतात. आज भारत हा जगातील सर्वात प्राचीन जिवंत संस्कृतींपैकी एक आहे कारण आपण सातत्याने विकसित झालो आहोत, आपण नवीन कल्पनांचा अंगीकार केला आहे, नव्या बदलांचे स्वागत केले आहे. भारताची विशाल भाषिक विविधता या उत्क्रांतीचा दाखला आहे. आपली ही भाषिक विविधता आपल्या एकतेचा सर्वात मूलभूत आधार देखील आहे. मराठी स्वतः याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. कारण आपली भाषा त्या आईसारखी असते जिला आपल्या मुलांना नवीन आणि अधिकाधिक  ज्ञान द्यायचे असते. आईप्रमाणेच भाषा देखील  कुणाबरोबर भेदभाव करत नाही. भाषा प्रत्येक विचार, प्रत्येक विकासाला सामावून घेते. आपल्याला माहीतच आहे, मराठीची उत्पत्ती संस्कृतमधून झाली आहे मात्र त्यावर प्राकृत भाषेचा देखील तेवढाच प्रभाव आहे. ती पिढी – दर – पिढी पुढे जात राहिली, तिने मानवी भावभावनांना अधिक व्यापक बनवले. आताच मी लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्यचा उल्लेख केला. गीतारहस्य संस्कृत गीतेचा भावार्थ आहे. टिळकांनी गीतेतील मूळ विचारांना मराठी भाषेतून लोकांपर्यंत अधिक सुलभरित्या पोहोचवले. ज्ञानेश्वरी गीता मध्ये देखील संस्कृतवर मराठीत टिप्पणी केली आहे. आज तीच  ज्ञानेश्वरी देशभरातील विद्वान आणि संतांसाठी गीता समजून घेण्याचा एक मापदंड बनली आहे. मराठीने अन्य सर्व भारतीय भाषांमधील साहित्य घेतले आहे आणि त्या बदल्यात त्या भाषांनाही समृद्ध केले आहे. उदाहरणार्थ, भार्गवरम विठ्ठल वरेरकर यांच्यासारख्या मराठी साहित्यिकांनी ‘आनंदमठ’ सारख्या ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला.विंदा करंदीकर, त्यांच्या कविता तर अनेक भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. त्यांनी पन्ना धाय, दुर्गावती आणि राणी पद्मिनी यांच्या जीवनावर आधारित कविता लिहिल्या. म्हणजेच भारतीय भाषांमध्ये परस्परांविषयी शत्रुत्व कधीच नव्हते. भारतीय भाषांनी नेहमीच एकमेकांचा स्वीकार केला आहे, एकमेकांना समृद्ध केले आहे.

मित्रांनो, `

अनेकदा जेव्हा भाषेच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा आपल्या भाषांचा सामायिक वारसाच त्याला चोख प्रत्त्युत्तर देतो. या गैरसमजांपासून दूर राहून भाषा समृद्ध करणे, त्यांना  स्वीकारणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.म्हणूनच आज आपण देशातील सर्व भाषांना मुख्य प्रवाहातील भाषा म्हणून पाहत आहोत. आम्ही  मराठीसह सर्वच प्रमुख भाषांमधून शिक्षणाला प्रोत्साहन देत आहोत. आता महाराष्ट्रातील युवा वर्ग अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासह आपले उच्च शिक्षण मराठीतून घेऊ शकतील. इंग्रजी येत नसल्यामुळे प्रतिभेची उपेक्षा करण्याची मानसिकता आम्ही बदलली आहे.

मित्रांनो,

आपण सगळे म्हणतो की आपले साहित्य हे  समाजाचा आरसा असते. साहित्य समाजाचा मार्गदर्शकही असते. म्हणूनच, साहित्य संमेलन सारख्या कार्यक्रमांची, साहित्याशी संबंधित संस्थांची देशात अतिशय महत्वाची भूमिका असते. गोविंद रानडे जी, हरिनारायण आपटे जी, आचार्य अत्रे जी, वीर सावरकर जी, या महान विभूतींनी जो आदर्श प्रस्थापित केला आहे, तो अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पुढे नेईल अशी मी आशा करतो. 2027 मध्ये साहित्य संमेलनाच्या परंपरेला 150 वर्षे पूर्ण होतील. आणि तेव्हा 100 वे साहित्य संमेलन  होणार आहे.  मला वाटते, त्या निमित्ताने होणारा  सोहळा खास बनवण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू करावी. कितीतरी युवक आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी साहित्याची सेवा करत आहेत. तुम्ही त्यांना व्यासपीठ देऊ शकता, त्यांच्या प्रतिभेला ओळख देऊ शकता. अधिकाधिक लोक मराठी शिकावेत यासाठी तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्मला ,भाषिणी सारख्या उपक्रमांना प्रोत्साहन द्या.  मराठी भाषा आणि साहित्याबाबत युवकांमध्ये स्पर्धाही आयोजित करता येतील. मला विश्वास आहे की तुमचे हे प्रयत्न आणि मराठी साहित्याची प्रेरणा विकसित भारतासाठी 140 कोटी देशवासियांना नवी ऊर्जा देतील, नवी चेतना देतील, नवी प्रेरणा देतील. तुम्ही सर्वांनी महादेव गोविंद रानडे जी, हरि नारायण आपटे जी, माधव श्रीहरि अणे जी, शिवराम परांजपे जी, यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्वांची महान परंपरा पुढे न्यावी या सदिच्छेसह तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप-खूप धन्यवाद !

 

* * *

A.Chavan/Vijayalaxmi/Sushma/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai