Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नवी दिल्लीत कर्तव्यपथच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

नवी दिल्लीत कर्तव्यपथच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण


आजच्या या ऐतिहासिक कार्यक्रमाकडे संपूर्ण देशाचे डोळे लागले आहेत. सर्व देशवासीय यावेळी या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असलेल्या सर्व देशवासियांचे मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. या ऐतिहासिक क्षणी, मंत्रीमंडळातील माझे सहकारी श्री हरदीप पुरी जी, श्री जी किशन रेड्डी जी, श्री अर्जुनराम मेघवाल जी, श्रीमती मीनाक्षी लेखी जी, श्री कौशल किशोर जी आज माझ्यासोबत मंचावर उपस्थित आहेत. देशातील अनेक मान्यवरही आज येथे उपस्थित आहेत.

मित्रांनो,

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आज देशाला नवी प्रेरणा, नवी ऊर्जा मिळाली आहे. आपण आज भूतकाळाला मागे टाकत भविष्याच्या चित्रात नवे रंग भरत आहोत. आज सर्वत्र दिसणारी हा नवी आभा, नव्या भारताचा आत्मविश्वास आहे. गुलामगिरीचे प्रतीक असलेला किंग्जवे आजपासून इतिहासजमा झाला आहे, तो कायमचा पुसला गेला आहे. आज कर्तव्यपथाच्या रूपाने नवा इतिहास रचला आहे. स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात गुलामगिरीच्या आणखी एका निशाणीतून मुक्त झाल्याबद्दल मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो.

मित्रांनो,

आपले राष्ट्रनायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा आज इंडिया गेटजवळ उभारला आहे. पारतंत्र्यात असताना ब्रिटीश राजवटीच्या प्रतिनिधीचा पुतळा इथे होता. त्याच ठिकाणी आज नेताजींच्या पुतळ्याची स्थापना करून देशाने आधुनिक आणि सशक्त भारताची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. खरंच, हा प्रसंग ऐतिहासिक आहे, अभूतपूर्व आहे. आपण आज हा दिवस पाहत आहोत, त्याचे साक्षीदार आहोत हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे.

मित्रांनो,

सुभाषचंद्र बोस असे महामानव होते जे पद आणि साधनसंपत्ती या आव्हांनांपलिकडे गेले होते. सगळ्या जगाने त्यांच्या नेतृत्वाचा स्वीकार केला होता. सगळे विश्व त्यांना नेता मानत होते. त्यांच्यात साहस होते, स्वाभिमान होता. त्यांच्यापाशी स्वतःचे असे विचार होते, दूरदृष्टी होती. त्यांच्या नेतृत्वात क्षमता होती, धोरणे होती. नेताजी सुभाषचंद्र म्हणत असत- भारत हा आपला गौरवशाली इतिहास विसरणारा देश नाही. भारताचा गौरवशाली इतिहास प्रत्येक भारतीयाच्या रक्तातच आहे, त्याच्या परंपरेत आहे. नेताजी सुभाषबाबूंना भारताच्या वारशाचा अभिमान होता. त्यांना भारताला लवकरात लवकर आधुनिकही बनवायचे होते. स्वातंत्र्यानंतर आपला भारत सुभाषबाबूंच्या मार्गावर चालला असता तर आज देशाने कितीतरी प्रगती केली असती. परंतु दुर्भाग्याने, स्वातंत्र्यानंतर आपल्या या महानायकास विस्मृतीत टाकण्यात आले. त्यांचे विचार, त्यांच्याशी संबंधित प्रतीके दुर्लक्षित करण्यात आली. सुभाषबाबूंच्या 125 व्या जयंती वर्षाच्या आयोजनाच्या वेळी मला कोलकाता इथे त्यांच्या घरी जाण्याचे सौभाग्य लाभले होते. नेताजींशी संबंधित त्या जागी त्यांच्या अनंत ऊर्जेची मला अनुभूति आली. नेताजींच्या त्याच ऊर्जेचे देशाला मार्गदर्शन मिळत रहावे, असा आज देशाचा प्रयत्न आहे. कर्तव्यपथावर नेताजींचा पुतळा याचे माध्यम बनेल. देशाची धोरणे आणि निर्णयांमधे सुभाषबाबूंचा ठसा रहावा, यासाठी हा पुतळा प्रेरणास्रोत ठरेल.

बंधू आणि भगिनींनो,

गेल्या आठ वर्षात आम्ही एका पाठोपाठ एक असे कित्येक निर्णय घेतले आहेत, ज्यावर नेताजींच्या आदर्श आणि ध्येयस्वप्नांची छाप आहे. नेताजी सुभाषबाबू, अखंड भारताचे पहिले प्रमुख होते ज्यांनी 1947 च्याही आधी अंदमान स्वतंत्र करून तिथे तिरंगा फडकवला होता. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याची अनुभूती काय असेल, याचा त्यावेळी त्यांनी विचार केला होता. आजाद हिंद सरकारच्या 75 वर्ष पूर्ती निमित्त लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले होते, तेव्हा ती अनुभूती मी स्वतः घेतली. आमच्याच सरकारच्या प्रयत्नांनी लाल किल्ल्यात नेताजी आणि आजाद हिन्द सेनेशी संबंधित वास्तूसंग्रहालय उभारले आहे.

मित्रांनो,

2019 मधे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात आजाद हिन्द सेनेच्या जवानांनीही भाग घेतला होता, तो मी दिवस कधीच विसरू शकत नाही. या सन्मानाची त्यांना प्रतिक्षा होती. अंदमानात नेताजींनी जिथे तिरंगा फडकवला होता, तिथेही मला जाण्याची संधी मिळाली. तिथे तिरंगा फडकवण्याचे भाग्य लाभले. तो क्षण प्रत्येक देशवासीयांसाठी अभिमानास्पद होता.

 बंधू आणि भगिनींनो,

 नेताजींनी सर्वात आधी स्वतंत्र केलेले अंदमानातील ते द्वीपही काही काळापूर्वीपर्यंत गुलामीच्या चिन्हांचे ओझे वाहत होते. स्वतंत्र भारतातही त्या द्वीपांची ओळख इंग्रज शासकांच्या नावाने होती. आम्ही गुलामीची ती चिन्हे पुसत त्या द्वीपांना नेताजी सुभाषचंद्र यांच्यांशी जोडत भारतीय नावे दिली, भारतीय ओळख दिली.

 मित्रांनो,

स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशाने स्वतःसाठी ‘पंच प्रणांची ध्येयदृष्टी ठेवली आहे. या पंच प्रणांमधे विकासाचे मोठे संकल्प आहेत. कर्तव्यांची प्रेरणा आहे. यात गुलामीच्या मानसिकतेचा त्याग करण्याचे आवाहन आहे, आपल्या वारशाचा अभिमान बाळगण्याचा संदेश आहे. आज भारताचे आदर्श आपले स्वतःचे आहेत, या आदर्शांचे पैलू आपले आहेत. आज भारताचे संकल्प आपले आहेत. लक्ष्ये आपली आहेत. आज आपले मार्ग स्वतःचे आहेत. प्रतीके आपली आहेत. आणि मित्रांनो, राजपथाचे अस्तित्व समाप्त होऊन तो कर्तव्यपथ होणे, पंचम जॉर्जचा पुतळा हटवून नेताजींचा पुतळा बसवणं हे गुलामीच्या मानसिकतेच्या त्यागाचे पहिले उदाहरण नाही. ही सुरुवात नाही की हा शेवट नाही. ही मनातून आणि मानसिकतेतून स्वातंत्र्याचे ध्येय प्राप्त करेपर्यंत निरंतर चालणारी संकल्प यात्रा आहे. देशाचे पंतप्रधान जिथे राहत आले आहेत, त्या जागेचे रेस कोर्स रोड हे नाव बदलून तो आता लोक-कल्याण मार्ग झाला आहे. आपल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात आता भारतीय वाद्यांचे सूर ऐकू येतात. मिटींग रिट्रीट सोहळ्यात आता देशभक्तीपर गीते ऐकून प्रत्येक भारतीय आनंदाने भरून जातो. नुकतीच, भारतीय नौदलानेही गुलामीची निशाणी उतरवून, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतीक धारण केले आहे. राष्ट्रीय युद्ध स्मारक बनवून देशाने समस्त देशवासियांची अनेक वर्षांची इच्छा देखील पूर्ण केली आहे.

 मित्रांनो,

हे परिवर्तन फक्त प्रतीकांपुरते मर्यादित नाही, तर ते आता देशाच्या धोरणांचा देखील भाग बनले आहे. इंग्रजांच्या काळापासून चालत आलेले शेकडो कायदे आता आपल्या देशाने बदलले आहेत. आपला अर्थसंकल्प, गेली अनेक दशके ब्रिटिश संसदेने ठरवलेल्या तारखांनुसार सादर केला जात होता, त्याची तारीख आणि वेळ देखील आता बदलण्यात आली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून आता परदेशी भाषा सक्तीमधून देखील देशातील तरूण पिढीला मुक्त केले जात आहे. म्हणजेच, आज देशाचा विचार आणि देशाचे व्यवहार या दोन्ही गोष्टी गुलामगिरीच्या मानसिकतेमधून मुक्त होत आहेत. ही मुक्तीच आपल्याला विकसित भारताच्या उद्दिष्टापर्यंत घेऊन जाईल.

मित्रहो,

तामिळ महाकवी भरतियार यांनी भारताच्या महानतेवर तामिळ भाषेत अतिशय सुंदर कविता लिहिली होती. या कवितेचं शीर्षक आहे- पारुकुलै नल्ल नाडअ-यिंगल, भारत नाड-अ. महाकवी भरतियार यांची ही कविता प्रत्येक भारतीयाने अभिमानाने फुलून जावे अशीच आहे. त्यांची ही कविता सांगते की, आपला भारत देश संपूर्ण जगात सर्वात महान आहे. ज्ञान, अध्यात्म, प्रतिष्ठा, अन्नदान, संगीत, चिरकाल टिकणारे काव्य या सगळ्यामध्ये आपला भारत देश संपूर्ण जगात सर्वात महान आहे. वीरता, सैन्याचे शौर्य, करुणा, दुसऱ्यांची सेवा, जीवनाचे सत्य शोधणे, वैज्ञानिक संशोधन या सगळ्यामध्ये आपला भारत देश संपूर्ण जगात सर्वात महान आहे. भरतियार यांची, त्यांच्या कवितेची, त्यांच्या प्रत्येक शब्दाची, प्रत्येक भावनेची अनुभूती घ्या.  

मित्रांनो,

गुलामीच्या त्या कालखंडात भारताने संपूर्ण जगाला साद घातली होती. ते आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे आवाहन होतं. भरतियार यांनी त्यांच्या कवितेत वर्णन केले आहे, त्या सर्वश्रेष्ठ भारताची आपल्याला निर्मिती करायची आहे. त्याचा मार्ग या कर्तव्य पथावरूनच जातो.

मित्रहो,

कर्तव्य पथ हा केवळ दगड-विटांनी तयार झालेला एक रस्ता नाही. भारताच्या इतिहासातील लोकशाही आणि भारताचे चिरकालीन आदर्श यांना सामावणारा तो एक जिवंत मार्ग आहे. आपल्या देशाचे नागरिक इथे येतील, तेव्हा नेताजींची प्रतिमा, राष्ट्रीय युद्ध स्मारक या सर्व गोष्टी त्यांना केवढी मोठी प्रेरणा देतील, त्यांना कर्तव्य भावनेने भारावून सोडतील! याच जागी देशाचे सरकार काम करत आहे. तुम्ही कल्पना करा, देशाने ज्यांच्यावर जनतेची सेवा करण्याची जबाबदारी सोपवली आहे, त्यांना आपण जनतेचे सेवक असल्याची जाणीव राजपथाने कशी करून दिली असती? एखाद्याचा मार्गच राजपथ असेल, तर त्याचा प्रवास लोकाभिमुख कसा असेल? राजपथ हा ब्रिटीश राजवटीसाठी होता. कारण त्यांच्यासाठी भारताचे नागरिक हे त्यांचे गुलाम होते. राजपथामागची भावना गुलामगिरीचे प्रतीक होती. त्याची रचनादेखील गुलामगिरीचे प्रतीक होती. आज त्याचे स्थापत्यच नाही तर त्याचा आत्मादेखील बदलला आहे. आता देशाचे खासदार, मंत्री, अधिकारी या मार्गावरून, कर्तव्यपथावरून जातील तेव्हा त्यांना देशाबद्दलच्या त्यांच्या कर्तव्यांची जाणीव होईल. त्यासाठी त्यांना नवी ऊर्जा मिळेल, प्रेरणा मिळेल. राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून ते कर्तव्यपथ आणि राष्ट्रपती भवनापर्यंतचा हा संपूर्ण परिसर ‘सर्वाधिक प्राधान्य देशाला’ या भावनेची त्यांना दर क्षणाला जाणीव करून देईल.

मित्रांनो,

आजच्या या प्रसंगी, मला आपल्या त्या मेहनती साथीदारांचे विशेष आभार मानायचे आहेत, ज्यांनी कर्तव्य पथाची केवळ निर्मितीच केली नाही, तर श्रमांची पराकाष्ठा करून देशाला कर्तव्याचा मार्ग देखील दाखवला आहे. मला आज त्या मेहनती सहकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी देखील मिळाली. त्यांच्याशी बोलताना मला अशी जाणीव होत होती, की देशाच्या गरीब, श्रमजीवी आणि सामान्य माणसाच्या मनामध्ये देखील भारताचे केवढे भव्य स्वप्न वसलेले आहे. आपला घाम गाळताना देखील ते हे स्वप्न जिवंत ठेवतात. आज या प्रसंगी मी देशाच्या वतीने त्या प्रत्येक गरीब मजुराचे आभार मानतो, त्याचे अभिनंदन करतो. आपले हे मेहनती बांधव देशाच्या अभूतपूर्व विकासाला वेग देत आहेत. आज त्यांना भेटल्यावर मी त्यांना सांगितले आहे की ते सगळेजण यंदाच्या वर्षी २६ जानेवारीच्या कार्यक्रमाला त्यांच्या कुटुंबासमवेत माझे विशेष पाहुणे असतील. आज नव्या भारतात श्रम आणि श्रमजीवींचा सन्मान करण्याची एक संस्कृती निर्माण होत आहे, ही परंपरा पुनरुज्जीवित होत आहे, याचा मला आनंद आहे. मित्रांनो, धोरणांमध्ये संवेदनशीलता असते, तेव्हा निर्णयदेखील तेवढेच संवेदनशील घेतले जातात. म्हणूनच, देशाला आता आपल्या श्रम-शक्तीचा अभिमान वाटत आहे. आज ‘श्रम एव जयते’ हा देशाचा मंत्र बनत आहे. म्हणूनच, बनारसमध्ये, काशीमध्ये, विश्वनाथ धामाच्या लोकार्पण सोहोळ्याचा अलौकिक क्षण असतो, तेव्हा तिथे त्यासाठी कष्ट वेचलेल्या लोकांच्या सन्मानासाठी देखील पुष्प-वर्षाव होतो. प्रयागराज कुंभ मेळ्याच्या पवित्र पर्वामध्ये श्रमिक स्वच्छता सेवकांचे आभार मानले जातात. काही दिवसांपूर्वी आयएनएस विक्रांत ही स्वदेशी विमान-वाहू युद्ध नौका देशाला मिळाली आहे. मला तेव्हादेखील आयएनएस विक्रांतच्या निर्मितीसाठी दिवस-रात्र काम करणाऱ्या श्रमिक बंधू-भगिनींना आणि त्यांच्या कुटुंबांना भेटण्याची संधी मिळाली होती. त्यांची भेट घेऊन मी त्यांचे आभार मानले होते. श्रमांचा सन्मान करण्याची ही परंपरा देशाच्या संस्कारांचा अविभाज्य भाग बनत आहे. नवीन संसदेचे बांधकाम झाल्यावर त्यात काम करणाऱ्या श्रमिकांना देखील एका खास गवाक्षात स्थान दिले जाईल, याचे तुम्हालादेखील नक्कीच समाधान वाटेल. लोकशाहीच्या पायामध्ये एका बाजूला संविधान आहे, तर दुसऱ्या बाजूला श्रमिकांचे योगदान आहे, याची हे गवाक्ष येणाऱ्या पिढ्यांना आठवण करून देईल. हा कर्तव्य पथ देखील प्रत्येक देशवासीयाला हीच प्रेरणा देईल. हीच प्रेरणा परिश्रमांमधून सफलतेचा मार्ग खुला करेल.

मित्रहो,

आपल्या व्यवहारांबरोबरच आपली साधने, आपले स्रोत आणि आपल्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण हे या अमृत प्रवासाचे मुख्य ध्येय आहे. मित्रहो, आपण पायाभूत सुविधांबद्दल बोलतो, तेव्हा रस्ते किंवा उड्डाणपुलाचे चित्र बहुतेक लोकांना दिसू लागते. पण आधुनिकीकरणाची कास धरणाऱ्या भारतामधील पायाभूत सुविधांचा विस्तार हा एवढ्यापुरताच मर्यादित नाही, त्याचे अनेक पैलू आहेत. आज घडीला भारतात सामाजिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा, वाहतुकीशी संबंधित पायाभूत सुविधा, डिजिटल क्षेत्रातील पायाभूत सुविधा तसेच सांस्कृतिक पातळीवरील पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात वेगाने काम सुरू आहे. यासंदर्भात सामाजिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांचे उदाहरण आपण पाहू या. आज देशातील एम्सची (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस) संख्या आधीच्या तुलनेत तिप्पट झाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येतही 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आपल्या नागरिकांना आधुनिक वैद्यकीय सुविधा प्रदान करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठी भारत कशाप्रकारे कार्यरत आहे, हे यावरून दिसून येते. आजघडीला देशात नवीन आयआयटी, ट्रिपल आयटी तसेच वैज्ञानिक संस्थांच्या आधुनिक जाळ्याचा सतत विस्तार केला जातो आहे. मागच्या तीन वर्षांत देशाच्या ग्रामीण भागातील साडेसहा कोटीपेक्षा जास्त कुटुंबांना पाईपद्वारे पाणीपुरवठा प्रदान करण्यात आला आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरे तयार करण्याची भव्य मोहीमही सुरू आहे. भारतातील सातत्याने विस्तारणाऱ्या या सामाजिक पायाभूत सुविधा, सामाजिक न्यायाची व्याप्ती वाढवत आहेत.

मित्रहो,

वाहतुकीच्या क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भारतात आज ज्या प्रकारे काम सुरू आहे, तसे यापूर्वी कधीही झाले नव्हते. आपल्या देशभरात एकीकडे ग्रामीण रस्ते बांधले जात आहेत, तर दुसरीकडे विक्रमी संख्येने आधुनिक द्रुतगती मार्ग बांधले जात आहेत. देशात रेल्वेचे विद्युतीकरणसुद्धा झपाट्याने होते आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या शहरांमध्ये मेट्रोच्या जाळ्याचाही वेगाने विस्तार होतो आहे. आज देशात अनेक नवे विमानतळ बांधले जात आहेत, तर दुसरीकडे जलमार्गांच्या संख्येतही अभूतपूर्व वाढ होते आहे. डिजिटल क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये भारताने संपूर्ण जगातील आघाडीच्या देशांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. दीड लाखांपेक्षा जास्त पंचायतींपर्यंत ऑप्टिकल फायबर पोहोचवणाऱ्या आणि डिजिटल पेमेंटचे नवे विक्रम नोंदवणाऱ्या भारताच्या डिजिटल क्षेत्रातील प्रगतीची चर्चा जगभरात होते आहे.

बंधु आणि भगिनींनो,

देशातील पायाभूत सुविधांच्या या कामांचा आढावा घेत असताना सांस्कृतिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांशी संबंधित कामांची फारशी चर्चा झालेली नाही. प्रसाद योजनेअंतर्गत देशातील अनेक तीर्थक्षेत्रांचे नूतनीकरण करण्यात येते आहे. काशी – केदारनाथ – सोमनाथ ते कर्तारपूर साहिब कॉरिडॉरसाठी करण्यात आलेले काम अभूतपूर्व आहे. मित्रहो, जेव्हा आपण सांस्कृतिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांबद्दल बोलतो तेव्हा त्याचा अर्थ केवळ श्रद्धास्थानांशी संबंधित पायाभूत सुविधा, असा होत नाही. आपल्या इतिहासाशी संबंधित असणाऱ्या, आपल्या राष्ट्रीय वीरांशी आणि राष्ट्रीय वीरांगनांशी संबंधित असणाऱ्या, आपल्या परंपरेशी निगडित असणाऱ्या पायाभूत सुविधांचाही त्यात समावेश होतो आणि या सुविधासुद्धा तितक्याच तत्परतेने उभारल्या जात आहेत. सरदार पटेल यांचा पुतळा म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी असो किंवा आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांना समर्पित संग्रहालय असो, पीएम म्युझियम असो किंवा बाबासाहेब आंबेडकर स्मारक, राष्ट्रीय युद्ध स्मारक असो किंवा राष्ट्रीय पोलीस स्मारक असो, ही सगळी सांस्कृतिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांची उदाहरणे आहेत. एक राष्ट्र म्हणून आपली संस्कृती काय आहे, आपली मूल्ये काय आहेत आणि आपण त्यांचे कशा प्रकारे रक्षण करत आहोत, हे या सुविधांच्या विकासावरून अधोरेखित होते. आकांक्षांनी भारलेला देशच सामाजिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा, वाहतुकीशी संबंधित पायाभूत सुविधा, डिजिटल क्षेत्रातील पायाभूत सुविधा तसेच सांस्कृतिक पातळीवरील पायाभूत सुविधांच्या उभारणीला चालना देऊन वेगाने प्रगती करू शकतो. आज कर्तव्यपथाच्या रूपाने देशाला सांस्कृतिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा आणखी एक मोठा आदर्श मिळतो आहे, याचा मला मनापासून आनंद होतो आहे. तुम्हाला इथे स्थापत्यकलेपासून ते आदर्शांपर्यंतची भारतीय संस्कृती पाहायला मिळेल आणि बरेच काही शिकायलाही मिळेल. देशातील प्रत्येक नागरिकाला मी आवाहन करतो, तुम्हा सर्वांना मी आमंत्रण देतो, नव्याने निर्माण झालेला हा कर्तव्यपथ बघायला या. या कर्तव्यपथाच्या बांधकामात तुम्हाला भारताचे भविष्यातील चित्र पाहता येईल. या कर्तव्यपथावरील ऊर्जा तुम्हाला आपले विशाल राष्ट्र घडविण्यासाठी एक नवा दृष्टीकोन देईल, एक नवा विश्वास देईल. उद्यापासून पुढचे तीन दिवस म्हणजे शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी संध्याकाळी या ठिकाणी नेताजी सुभाष बाबू यांच्या जीवनावर आधारित ड्रोन शो आयोजित केला जाणार आहे. तुम्ही इथे या, स्वत:चे आणि आपल्या कुटुंबाचे फोटो काढा, सेल्फी घ्या. सोशल हॅशटॅग कर्तव्यपथ वापरून तुम्ही ते मीडियावर सुद्धा अपलोड करू शकता. हा संपूर्ण परिसर दिल्लीच्या लोकांसाठी अगदी जिव्हाळ्याची जागा आहे, याची कल्पना मला आहे. संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी अनेक लोक आपल्या कुटुंबासह येतात, वेळ घालवतात. हे लक्षात घेऊनच कर्तव्य पथाचे नियोजन, रचना आणि प्रकाशयोजना करण्यात आली आहे. कर्तव्यपथाच्या या प्रेरणेतून देशात कर्तव्याचा प्रवाह निर्माण होईल आणि हा प्रवाहच आपल्याला नव्या आणि विकसित भारताच्या संकल्पाच्या पूर्ततेकडे घेऊन जाईल, असा विश्वास मला वाटतो. या विश्वासासह तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार ! आता माझ्याबरोबर तुम्हीही घोषणा द्या. मी म्हणेन, नेताजी, तुम्ही म्हणा, अमर रहे! अमर रहे! 

नेताजी अमर रहे! 

नेताजी अमर रहे!

नेताजी अमर रहे!

भारत माता की जय! 

भारत माता की जय! 

वंदे मातरम! 

वंदे मातरम!

वंदे मातरम!

अनेकानेक आभार!

***

ShilpaP/Vinayak/RAgashe/M Pange/Vsc/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com