Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नवी दिल्लीत एनसीसी/एनएसएस छात्रसैनिकांशी संवाद साधताना पंतप्रधानांच्या संबोधनातील मजकूर

नवी दिल्लीत एनसीसी/एनएसएस छात्रसैनिकांशी संवाद साधताना पंतप्रधानांच्या संबोधनातील मजकूर


देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी, मंत्रिमंडळातील माझे इतर सहकारी, एनसीसी चे महासंचालक, उपस्थित अधिकारी, मान्यवर पाहुणे, शिक्षकवर्ग, एनसीसी आणि एनएसएस मधील माझ्या युवा मित्रांनो, 
तुम्ही नुकतेच येथे जे सांस्कृतिक सादरीकरण केले ते पाहून मला अभिमानास्पद वाटले. राणी लक्ष्मीबाईंचे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व आणि इतिहासातील घटना तुम्ही अवघ्या काही क्षणांत साकारल्या. आपण सर्वच या घटनांशी परिचित आहोत, परंतु तुम्ही ज्या प्रकारे ते सादर केले ते खरोखर मनोहारी आहे. तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होणार आहात आणि यावेळी तो दोन कारणांमुळे अधिक खास झाला आहे. हा 75 वा प्रजासत्ताक दिन आहे आणि दुसरे म्हणजे, पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाचे संचलन देशाच्या स्त्री शक्तीला समर्पित आहे. आज मी देशाच्या विविध भागातून एवढ्या मोठ्या संख्येने मुली येथे येताना पाहत आहे. तुम्ही इथे एकट्या आलेल्या नाहीत, तर तुम्ही सर्वांनी तुमच्या राज्यांचा दरवळ, वेगवेगळ्या चालीरीतींचा अनुभव आणि तुमच्या समाजाची समृद्ध विचारसरणी तुमच्यासोबत आणली आहे. आज तुमची भेट हा एक खास प्रसंग आहे. आज राष्ट्रीय बालिका दिन आहे. आजचा दिवस मुलींच्या धैर्याची, भावनेची आणि कर्तृत्वाची प्रशंसा करण्याचा आहे. समाज आणि देश सुधारण्याची क्षमता मुलींमध्ये असते. इतिहासाच्या वेगवेगळ्या कालखंडात भारताच्या मुलींनी त्यांच्या दृढ हेतूने आणि समर्पणाच्या भावनेने अनेक मोठ्या बदलांचा पाया रचला आहे. काही वेळापूर्वी तुम्ही केलेल्या सादरीकरणातूनही ही भावना प्रतीत होते. 
माझ्या प्रिय मित्रांनो,
काल देशाने एक मोठा निर्णय घेतला हे तुम्ही सर्वांनी पाहिले असेल. जननायक कर्पूरी ठाकूर जी यांना भारतरत्न देण्याचा हा निर्णय आहे. आजच्या तरुण पिढीला कर्पूरी ठाकूरजींबद्दल जाणून घेणे आणि त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेणे खूप महत्त्वाचे आहे. जननायक कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची संधी मिळाली हे आपल्या भाजप सरकारचे भाग्य आहे. अत्यंत गरिबी आणि सामाजिक विषमता यांसारख्या आव्हानांशी झुंज देत त्यांनी राष्ट्रीय जीवनात खूप उच्च स्थान गाठले. ते दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्रीही होते. असे असूनही ते सदैव विनम्र राहिले आणि समाजातील सर्व घटकांसाठी त्यांनी काम केले. जननायक कर्पूरी ठाकूर हे नेहमीच त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जायचे. त्यांचे संपूर्ण जीवन सामाजिक न्याय आणि वंचितांच्या उन्नतीसाठी समर्पित होते. आजही त्यांच्या प्रामाणिकपणाचे उदाहरण देतात. गरिबांचे दुःख समजून घेणे, गरिबांच्या चिंता कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, गरिबांच्या कल्याणाला प्राधान्य देणे, गरीबातील गरीब लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेसारख्या मोहिमा राबवणे, समाजातील मागासलेल्या आणि अत्यंत मागासलेल्या घटकांसाठी सातत्याने नवनवीन योजना सुरू करणे या आपल्या सरकारच्या सर्व कामांमध्ये कर्पुरी बाबूंच्या विचारातून मिळालेली प्रेरणा तुम्हाला पाहायला मिळते. तुम्ही सर्वांनी त्यांच्याबद्दल वाचा, त्यांच्या आदर्शांना आपल्या जीवनाचा भाग बनवा. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक नवी उंची मिळेल.
माझ्या प्रिय युवा मित्रांनो,
तुमच्यामध्ये असे अनेक लोक असतील जे पहिल्यांदाच दिल्लीला आले असतील. तुम्ही प्रजासत्ताक दिनाबाबत खूप उत्साही आहात, पण मला माहीत आहे की अनेकांनी पहिल्यांदाच इतकी कडाक्याची थंडी अनुभवली असेल. हवामानाच्या बाबतीतही आपला देश विविधतेने परिपूर्ण आहे. अशा थंडीत आणि दाट धुक्यात तुम्ही रात्रंदिवस तालीम केली आणि इथेही अप्रतिम सादरीकरण केले. मला खात्री आहे की जेव्हा तुम्ही इथून घरी जाल तेव्हा तुमच्या प्रजासत्ताक दिनाच्या अनुभवांबद्दल तुम्हाला खूप काही सांगायला मिळेल आणि हेच या देशाचे वैशिष्ट्य आहे. विविधतेने भरलेल्या आपल्या देशात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यावर जीवनात नवीन अनुभवांची भर पडू लागते.
माझ्या प्रिय मित्रांनो,
तुमच्या पिढीला तुमच्या शब्दात ‘Gen जी’ म्हणतात. पण मी तुम्हाला अमृत पिढी समजतो. तुम्ही ते लोक आहात ज्यांच्या उर्जेने देशाला अमृतकाळात गती मिळेल. 2047 पर्यंत भारताने विकसित देश बनण्याचा संकल्प केला आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. पुढील 25 वर्षे देशासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. तुमच्या या अमृत पिढीचे प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे हा आमचा संकल्प आहे. तुमच्या पुढच्या पिढीला भरपूर संधी मिळाव्यात हा आमचा संकल्प आहे. अमृत पिढीच्या मार्गातील प्रत्येक अडथळे दूर व्हावेत हा आमचा संकल्प आहे. तुमच्या कामगिरीमध्ये मला आत्ता दिसलेली शिस्त, ध्येयवादी मानसिकता आणि समन्वय हाच अमृतकाळाचे संकल्प पूर्ण करण्यासाठी आधार आहे.
मित्रांनो,
या अमृतकाळाच्या प्रवासात माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जे काही करायचे आहे ते देशासाठीच करायचे आहे. राष्ट्र प्रथम -नेशन फर्स्ट हे तुमचे मार्गदर्शक तत्व असले पाहिजे. तुम्ही काहीही करा, मात्र त्याचा देशाला कसा फायदा होईल याचा आधी विचार करा. दुसरे म्हणजे, तुमच्या जीवनातील अपयशाने कधीही अस्वस्थ होऊ नका. आता बघा, आपले चांद्रयानही यापूर्वी चंद्रावर उतरू शकले नव्हते. पण नंतर आम्ही असा विक्रम केला की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलेल्यांमध्ये आम्ही पहिल्या क्रमांकावर आलो. त्यामुळे यशापयश काही असो, तुम्हाला सातत्य ठेवावे लागेल. आपला देश खूप मोठा आहे, पण छोट्या प्रयत्नांनीच तो यशस्वी होतो. प्रत्येक छोटासा प्रयत्न महत्त्वाचा असतो, प्रत्येक प्रकारचे योगदान महत्त्वाचे असते.

माझ्या तरुण मित्रांनो,

तुम्ही माझी सर्वात मोठी प्राथमिकता आहात. तुमच्याकडे जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. मी लाल किल्ल्यावरून म्हटले होते, ही वेळ आहे, हिच योग्य वेळ आहे. हा काळ तुमचा आहे. हाच तो काळ आहे जो तुमचे आणि देशाचे भविष्य ठरवेल. तुम्हाला तुमचे संकल्प बळकट करावे लागतील जेणेकरून विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करता येईल. तुम्हाला तुमच्या ज्ञानाचा विस्तार करावा लागेल जेणेकरून भारताची प्रतिभा जगाला नवी दिशा देऊ शकेल. तुम्हाला तुमची क्षमता वाढवावी लागेल जेणेकरून भारत जगाची आव्हाने सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकेल.

सरकार आपल्या तरुण सहकाऱ्यांसह खांद्याला खांदा लाऊन पुढे जात आहे. आज तुमच्यासाठी संधींचे नवे मार्ग खुले होत आहेत. आज तुमच्यासाठी नवीन क्षेत्रांमध्ये संधी निर्माण होत आहेत. अंतराळ क्षेत्रात पुढे जाण्यासाठी तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार केले जात आहेत. तुमच्यासाठी व्यवसाय करण्याच्या सुलभतेवर भर दिला जात आहे. संरक्षण क्षेत्रात तुमच्यासाठी खाजगी क्षेत्राची जागा निर्माण करण्यात आली आहे. तुमच्यासाठी राष्ट्रीय संशोधन संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. 21 व्या शतकात तुम्हाला कोणत्या प्रकारच्या आधुनिक शिक्षणाची गरज भासेल यावर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही देशाच्या शिक्षण व्यवस्थेत सुधारणा केल्या आहेत. आज तुम्हाला तुमच्या मातृभाषेतून उच्च शिक्षण घेण्याची संधी आहे. आज तुमच्या समोर कोणतीही शाखा किंवा विषयाचे बंधन नाही. तुम्ही कधीही तुमच्या आवडीचा विषय निवडू शकता आणि अभ्यास करू शकता. तुम्ही सर्वांनी अधिकाधिक संशोधन आणि नवोन्मेषात सक्रीय झाले पाहिजे. अटल टिंकरिंग लॅब्स सर्जनशीलता आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी खूप मदत करेल. लष्करात भरती होऊन कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींसाठीही सरकारने नवीन संधी निर्माण केल्या आहेत. आता मुलीही विविध सैनिकी शाळांमध्ये प्रवेश घेऊ शकतात. तुम्हाला पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जायचे आहे. तुमचे प्रयत्न, तुमची ध्येयदृष्टी, तुमची ताकद भारताला नव्या उंचीवर घेऊन घेऊन जाईल.

मित्रांनो, 

तुम्ही सर्व स्वयंसेवक आहात, मला आनंद आहे की तुम्ही तुमची ऊर्जा योग्य दिशेने वळवता आहात. तुम्ही त्याला कमी लेखता कामा नये. हा एखाद्याच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग असू शकतो. ज्याच्याकडे शिस्त आहे, ज्याने देशात खूप प्रवास केला आहे, ज्याचे विविध प्रांत आणि भाषा जाणणारे मित्र आहेत, त्याचे व्यक्तिमत्व निखरुन येणे स्वाभाविक आहे. आणखी एक गोष्ट जी तुम्ही नेहमी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे तंदुरुस्ती. मी बघतोय की तसे तर तुम्ही सगळेच तंदुरुस्त आहात. तंदुरुस्ती ही तुमची पहिली प्राथमिकता असली पाहिजे.

आणि तुमची शिस्त तंदुरुस्ती राखण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. असे होऊ शकते की प्रेरणा कधीकधी कमी असू शकते, परंतु शिस्तच तुम्हाला योग्य मार्गावर ठेवते. आणि जर तुम्ही शिस्त ही तुमची प्रेरणा बनवली, तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जिंकण्याची खात्री आहे.

मित्रांनो, 

मी सुद्धा तुमच्यासारखाच एन. सी. सी. मध्ये होतो. मी एन. सी. सी. तूनच आलो आहे. तुमच्यापर्यंत मी त्याच मार्गाने आलो आहे. मला माहीत आहे की एन. सी. सी. , एन. एस. एस. सारख्या संस्था किंवा सांस्कृतिक शिबिरे युवकांना समाज आणि नागरी कर्तव्यांविषयी जागरूक करतात. त्याच धर्तीवर देशात आणखी एक संस्था स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेचे नाव ‘ माय युवा भारत ” असे आहे. मी तुम्हा सर्वांना ‘माय भारत’ स्वयंसेवक म्हणून स्वतःची नोंदणी करण्यास सांगेन. माय भारत या ऑनलाईन संकेतस्थळाला भेट द्या.

मित्रांनो,

या प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवादरम्यान तुम्हाला अशा कार्यक्रमांना नियमितपणे भेट देण्याची संधी मिळणार आहे. संचलनात सहभागी होण्याव्यतिरिक्त, तुम्ही सर्वजण अनेक ऐतिहासिक स्थळांना भेट द्याल आणि अनेक तज्ञांनाही भेटाल. हा एक असा अनुभव असेल जो तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवाल. दरवर्षी जेव्हा तुम्ही प्रजासत्ताक दिनाचे संचलन पहाल, तेव्हा तुम्हाला हे दिवस नक्कीच आठवतील ट, तुम्हाला हे देखील लक्षात राहील की मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या होत्या. यासाठी माझे एक काम नक्की करा. करणार ना? हात वर करून मला सांगा? मुलींचा आवाज मोठा आहे, मुलांचा आवाज कमी आहे. करणार ना? हां आता समान आहे. तुमचे अनुभव कुठल्या तरी रोजनिशीत कुठेतरी नक्की लिहा. आणि दुसरे म्हणजे, प्रजासत्ताक दिनी तुम्ही काय शिकलात, हे तुम्ही नमो अॅपवर लिहूनही किंवा एखादी चित्रफीत चित्रीत करून मला पाठवू शकता. तुम्ही पाठवाल ना? आवाज दबला. आजचे तरुण नमो एपच्या माध्यमातून माझ्याशी जोडलेले राहू शकतात. आणि जेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल तुमच्या खिशात ठेवाल, तेव्हा तुम्ही जगाला सांगू शकता की मी नरेंद्र मोदींना माझ्या खिशात ठेवतो.

माझ्या युवा मित्रांनो, 

मला तुमच्या सामर्थ्यावर विश्वास आहे, तुमच्यावर विश्वास आहे. खूप अभ्यास करा, एक कर्तव्यनिष्ठ नागरिक बना, पर्यावरणाचे रक्षण करा, वाईट सवयींपासून दूर रहा आणि आपल्या वारसा तसेच संस्कृतीचा अभिमान बाळगा. तुमच्या सोबत देशाचे आशीर्वाद आहेत, माझ्या शुभेच्छा आहेत, संचलना दरम्यानही तुम्हा सर्वांची छाप राहिल, सर्वांची मने जिंका, माझी हीच मनोकामना आहे. तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. पूर्ण शक्तीनिशी माझ्या सोबत बोला, हात वर करुन – 

भारत माता की- जय.

भारत माता की- जय.

भारत माता की- जय.

वंदे मातरम.

वंदे मातरम.

वंदे मातरम.

वंदे मातरम.

वंदे मातरम.

वंदे मातरम.

वंदे मातरम.

वंदे मातरम.

वंदे मातरम.

शाबाश!

***
NM/VasantiJ/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai