Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नवी दिल्लीत आयोजित जागतिक बौद्ध परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन

नवी दिल्लीत आयोजित जागतिक बौद्ध परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन


नवी दिल्ली, 20 एप्रिल 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत हॉटेल अशोका इथे आजपासून सुरु झालेल्या जागतिक बौद्ध शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन केले. यावेळी, पंतप्रधानांनी इथे आयोजित फोटो प्रदर्शन पहिले आणि बुद्धांच्या मूर्तीला पुष्पांजली अर्पण केली. तसेच यावेळी उपस्थित एकोणीस मान्यवर बौद्ध भिक्खूना त्यांचा पोशाख चीवर भेट दिला.

यावेळी सर्वप्रथम पंतप्रधानांनी या परिषदेसाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले. भारताची ‘अतिथी देवो भव’ ही संस्कती असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आमच्या देशात येणारे सगळे लोक देवासमान आहेत, अशी या बुद्धाच्या भूमीची परंपरा आहे. आज जेव्हा गौतम बुद्धांची शिकवण आणि त्यांच्या आदर्शानुसार आयुष्य व्यतीत करणाऱ्या अनेक व्यक्ती इथे एकत्र आल्यामुळे, साक्षात बुद्धांच्याच अस्तित्वाचा अनुभव येतो आहे, असे पंतप्रधान म्हणाले.  बुद्ध हे एक व्यक्तिमत्व नाहीत, ते एक भावना आहेत .बुद्ध हे असे चैतन्य आहे, ज्यामुळे व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन होते, बुद्ध हा एक विचार आहे जो परिवर्तन घडवून आणतो आणि गौतम बुद्ध हा विवेक आहे जो प्रकट करण्याच्या पलीकडचा आहे. हा बुद्ध विवेक हा शाश्वत  आहे, असे पंतप्रधान म्हणाले. या ठिकाणी विविध क्षेत्रातले इतके लोक उपस्थित आहे, याचा अर्थ असा आहे की बुद्धाच्या विचारांचा प्रचंड प्रसार झाला आहे, जो संपूर्ण मानवतेला एका धाग्यात बांधून ठेवतो. जगाच्या कल्याणासाठी बुद्धाच्या कोट्यवधी अनुयायांची एकत्रित इच्छाशक्ती आणि निश्चय अतिशय महत्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या प्रसंगाचे महत्व सांगताना पंतप्रधान म्हणाले, की ही पहिली जागतिक बौद्ध परिषद या दिशेने काम करण्यासाठी सर्व देशांना एक मंच उपलब्ध करून देईल.  हा भव्य सोहळा आयोजित केल्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्रालय आणि अंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघाचे आभार मानले.

पंतप्रधानांनी बौद्ध धर्माशी असलेला आपला संबध अधोरेखित केला कारण वडनगर हे त्यांचे मूळ गाव एक महत्वाचे बौद्ध केंद्र आहे, युआन त्सांगने देखील वडनगरला भेट दिली होती. बौद्ध संस्कृतीशी असलेलं नातं समजावून सांगण्यासाठी त्यांनी सारनाथच्या संदर्भात काशीचा देखील उल्लेख केला.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत काळ साजरा करत असताना जागतिक बौद्ध परिषद  हात आहे, याचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की भारताने भविष्यासाठी मोठी उद्दिष्टे निश्चित केली असून जागतिक हितासाठी नवीन संकल्प केले आहेत. भारताने अलीकडच्या काळात विविध क्षेत्रांमध्ये प्राप्त केलेल्या अद्वितीय यशाची प्रेरणा स्वतः भगवान बुद्ध यांच्याकडून मिळालेली आहे, यावर त्यांनी भर दिला.

भगवान बुद्धांनी दाखवलेला सिद्धांत, सराव आणि अनुभूतीचा मार्ग अनुसरत भारताने गेल्या नऊ वर्षाच्या प्रवासात या तीनही तत्वांचे पालन केले, असे पंतप्रधान म्हणाले.  भगवान बुद्धांच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी भारताने संपूर्ण समर्पण वृत्तीने आणि समर्पण भावनेने कार्य केले असे सांगून भारत आणि नेपाळ मधील बुद्धिस्ट सर्किट चा विकास, सारनाथ आणि कुशीनगर येथील नूतनीकरण कार्य, कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाच्या सहकार्याने लुंबिनी येथे भारत आंतरराष्ट्रीय बौद्ध वारसा आणि संस्कृती केंद्राची स्थापना अशी कधी उदाहरणे पंतप्रधानांनी दिली.

मानवतेच्या प्रश्नांसाठी भारतात उपजत असलेल्या सहानुभूतीचे श्रेय पंतप्रधानांनी भगवान बुद्धांच्या शिकवणीला दिले. भारताने राबवलेल्या शांतता मोहिमेचा आणि तुर्की मध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपासारख्या आपत्तीमध्ये मदत कार्यात भारताने मनापासून केलेल्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला. 140 कोटी भारतीयांची ही भावना संपूर्ण जगाने पहिली, समजून घेतली आणि स्वीकारली, असे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघासारखे व्यासपीठ समान विचार आणि समान भावना असलेल्या राष्ट्रांना बुद्ध धम्म आणि शांतता यांचा प्रसार करण्यासाठी संधी उपलब्ध करून देते, असे ते म्हणाले.

एखाद्या समस्येपासून ते  समाधानापर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा खरा  बुद्धांचा वास्तविक प्रवास आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भगवान बुद्धांनी इतरांच्या आयुष्यातील दुःख पाहून  किल्ले आणि राजवाड्यांमधील जीवनाचा त्याग केला, असा पुनरुच्चार पंतप्रधानांनी भगवान बुद्धांच्या जीवन प्रवासाबद्दल बोलताना केला.  समृद्ध जगाचे स्वप्न साकारण्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे आपल्या स्व आणि संकुचित मनोवृत्तीचा त्याग आणि जग या विशाल संकल्पनेला पूर्णपणे आत्मसात करणे या बुद्धांनी दिलेल्या मंत्रांचा स्वीकार करणे, असे ते म्हणाले.   साधनसंपत्तीची कमतरता असलेल्या देशांचा विचार केला तर एक चांगले आणि स्थिर जग निर्माण होईल यावर त्यांनी भर दिला. प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक राष्ट्राचे आता स्वतःसह जागतिक हिताला प्राधान्य असणे ही काळाची गरज आहेअसे त्यांनी सांगितले.

युद्ध, आर्थिक अस्थिरता, दहशतवाद आणि धार्मिक कट्टरता आणि जगातील प्रजाती लुप्त होत असताना तसेच  हिमनद्या वितळत असताना हवामान बदलाचे मोठे आव्हान जगासमोर असल्याने  सध्याचा काळ हा या शतकातील सर्वात आव्हानात्मक काळ आहे, असे पंतप्रधान म्हणाले. या सर्वांमध्ये देखील भगवान बुद्धांवर निष्ठा असलेलेआणि सर्व प्राणिमात्रांचे कल्याण मानणारे लोक आहेत. ही आशा, हा विश्वास या पृथ्वीची सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा ही आशा एकरूप होईल तेव्हा बुद्धाचा धम्म या  जगाची श्रद्धा बनेल आणि बुद्धाची अनुभूती ही मानवतेची श्रद्धा बनेल.

आधुनिक काळातील सर्व समस्या परमेश्वराच्या प्राचीन शिकवणींद्वारेच सोडवल्या जातात असे सांगूनपंतप्रधानांनी भगवान  बुद्धांच्या  शिकवणीची प्रासंगिकता अधोरेखित केली. भगवान बुद्धांनी शाश्वत शांतीसाठी युद्ध, पराभव आणि विजयाचा त्याग करण्याचा उपदेश केला, असे पंतप्रधान म्हणाले. शत्रुत्वावर कधीही शत्रुत्वाने विजय मिळवता येत नाही आणि आनंद हा एकतेत असतो. त्याचप्रमाणे दुसऱ्याला उपदेश करण्यापूर्वी प्रत्येकाने स्वतःच्या आचरणाकडे पाहावे ही गौतम बुद्धांची शिकवण आत्मसात केली तर सध्याच्या  जगात सर्वत्र प्रचलित असलेला  स्वतःचे विचार इतरांवर लादण्याचा प्रकार बंद होईल, असे ते म्हणाले. परमेश्वराच्या शिकवणीची शाश्वत प्रासंगिकता अनुभवण्यासाठी स्वतःच स्वतःचा प्रकाश व्हा, अर्थात अप्प दीपो भवः, या त्यांच्या आवडत्या बुद्ध शिकवणीचा त्यांनी पुनरुच्चार केला, ‘आम्ही तो देश आहोत ज्याने जगाला बुद्ध दिलेला आहेयुद्ध नाही’ असे काही वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रांना सांगितल्याचे त्यांनी स्मरण केले.

पंतप्रधान म्हणाले, बुद्धाचा मार्ग हा भविष्याचा  आणि शाश्वततेचा मार्ग आहे. जगाने बुद्धाच्या शिकवणुकीचे  पालन केले असते तर हवामान बदलाच्या    समस्येला  तोंड  द्यावे लागले नसते. हे सांगताना पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, देशांनी  इतरांबद्दल आणि भावी  पिढ्यांचा विचार करणे थांबवले, त्‍यामुळे ही समस्या उद्भवली.    या चुकीचे आता आपत्‍तीमध्‍ये रूपांतर झाले आहे.  बुद्धांनी  वैयक्तिक लाभाचा विचार न करता सर्वांनी चांगले  आचरण करावे, असा उपदेश केला कारण अशा वर्तनामुळे सर्वांगीण- सर्वांचे कल्याण होते.

प्रत्येक व्यक्तीचा पृथ्वीवर कोणत्या ना कोणत्या मार्गाने  परिणाम होत आहे, मग त्यामध्‍ये  जीवनशैली, आहार  किंवा प्रवास करण्‍याच्या सवयी असे काहीही असो, त्याचा परिणाम होत असतो, असे   पंतप्रधानांनी अधोरेखित करून  हवामान बदलाशी लढण्यासाठी प्रत्येकजण योगदान देऊ शकतो हे निदर्शनास आणून दिले. बुद्धाच्या प्रेरणेने  प्रभावित झालेल्या भारताने राबविलेल्या उपक्रमावर पर्यावरणासाठी जीवनशैली किंवा ‘  मिशन लाइफ’ याबाबत पंतप्रधानांनी सांगितले.  जर लोक जागरूक झाले आणि त्यांनी  जीवनशैली बदलली, तर हवामान बदलाची ही मोठी समस्या हाताळता    येईल. “मिशन लाइफ बुद्धाच्या प्रेरणेने प्रभावित आहे आणि ते बुद्धांच्या विचारांना पुढे नेत आहे”, असे पंतप्रधान  मोदी यांनी नमूद केले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी भौतिकवाद आणि स्वार्थी विचारांच्या  व्याख्यांमधून बाहेर पडून भवतु सब्ब मंगलम चा विचार केला पाहिजे, अर्थात बुद्धाला केवळ प्रतीक बनवायचे नाही तर त्याचे प्रतिबिंब  आत्मसात करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.  भूतकाळात अडकून न राहता  नेहमी पुढे जाणे हे बुद्धांच्या वचनाचे स्मरण ठेवले  तरच हा संकल्प पूर्ण होईल, असेही ते यावेळी म्हणाले.  सर्वांनी एकत्रितपणे कार्य केल्यामुळे  संकल्प यशस्वी होतील, असा विश्वासही  पंतप्रधानांनी व्यक्त केला.

केंद्रीय संस्कृती  मंत्री जी किशन रेड्डी, केंद्रीय कायदा आणि  न्याय मंत्री  किरेन रिजिजू, केंद्रीय संस्कृती राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि  मीनाक्षी लेखी आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाचे महासचिव डॉ धम्मपिया यावेळी उपस्थित होते.

पार्श्‍वभूमी :-

संस्कृती  मंत्रालयाच्या वतीने, आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाच्या सहकार्याने 20-21 एप्रिल रोजी या  दोन दिवसीय शिखर परिषदेचे  आयोजन  केले  आहे. “समकालीन आव्हानांना प्रतिसाद : तत्त्वज्ञान ते रूढ प्रघात”  या संकल्पनेवर   जागतिक  बौद्ध शिखर परिषदेचे आयोजन केले आहे.

सार्वत्रिक चिंतेच्या मुद्द्यांवर जागतिक बौद्ध धम्म नेतृत्व आणि बौद्ध विद्वानांची मते जाणून घेताना, धोरणात्मक माहिती देणे आणि एकत्रितपणे मार्गदर्शन  करण्यासाठी एक प्रयत्‍न म्हणून या शिखर परिषदेचे आयोजन केले आहे. बुद्ध धम्माची मूलभूत मूल्ये समकालीन परिस्थितींमध्ये प्रेरणा आणि मार्गदर्शन कसे देऊ शकतात याचा शोध  शिखर परिषदेमधून  घेतला  जात आहे.

या शिखर परिषदेतला जगभरातून  नामवंत विद्वान, संघ नेते आणि धर्म अभ्यासक सहभागी झाले आहेत.  जागतिक समस्यांवर ते  चर्चा करतील आणि वैश्विक मूल्यांवर आधारित बुद्ध धम्मामधील  उत्तरे शोधतील. या परिषदेमध्‍ये  बुद्ध धम्म आणि शांतता; बुद्ध धम्म: पर्यावरणीय संकट, आरोग्य आणि शाश्‍वतता; नालंदा बौद्ध परंपरेचे जतन; बुद्ध धम्म तीर्थक्षेत्र, जिवंत वारसा आणि बुद्ध अवशेष: दक्षिण, आग्नेय  आणि पूर्व आशियातील देशांबरोबर  भारताचा  शतकानुशतके जुन्या सांस्कृतिक संबंधांचा  पाया; अशा चार संकल्पनावर चर्चा होत आहे.

blockquote class=”twitter-tweet tw-align-center”>

The noble teachings of Gautama Buddha have impacted countless people over centuries. https://t.co/M5PuhMbbas

— Narendra Modi (@narendramodi) April 20, 2023

 

 

JPS/SRT/SK/Radhika/Bhakti/Suvarna/PM

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai